तुम्ही मदतीचा हात देऊ शकता का?
१ प्रेषित पौलाने मंडळीतील सदस्यांना ‘एकमेकांची सारखीच काळजी घेण्याचा’ सल्ला दिला. (१ करिंथ. १२:५) तेव्हा, आपण एकमेकांविषयी वैयक्तिक पातळीवर आस्था दाखवली पाहिजे आणि आवश्यक तेथे प्रेमपूर्वक मदत करायलाही तयार असले पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्या काही आध्यात्मिक बहिणी एकट्यानेच आपल्या मुलांचे सत्यात संगोपन करत आहेत. आपल्या पाल्यांवर आध्यात्मिक संस्कार करण्याची सगळी जबाबदारी त्या एकट्यानेच पार पाडत आहेत. या बहिणी कौतुकास पात्र आहेत; त्यांना आपण प्रेमळ उत्तेजन दिले पाहिजे, आणि त्यांच्या ‘गरजेनुसार’ व्यावहारिक मार्गांनी मदतही केली पाहिजे. (रोम. १२:१३अ) तुम्ही त्यांच्या मदतीला पुढे येऊ शकता का?
२ कोणत्या प्रकारची मदत: सभांना, संमेलनांना येण्याकरता ज्यांना सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते, अशांना आपल्या गाडीतून नेल्यास त्यांचा बराच खर्च वाचू शकतो. किंवा मग, सभांमध्ये एखाद्या बहिणीला तिच्या लहान मुलांना सांभाळायला आपण मदत केली, तर त्या बहिणीला सभेचा पूर्ण लाभ घेणे शक्य होईल. त्याचप्रमाणे, क्षेत्र सेवेला मुलांना घेऊन जाताना तिची मदत केल्यास तिचा बराच त्रास कमी होईल. तसेच, अशा बहिणींच्या मुलांबद्दल मनापासून कळकळ दाखवल्यास आणि त्यांच्याशी मैत्री केल्यास आपल्या मंडळीतील या मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव पडेल. शिवाय अशा एक-पालक कुटुंबांना तुम्ही अधूनमधून आपल्या कौटुंबिक अभ्यासाच्या दिवशी घरी बोलावू शकता, हा त्यांच्यासाठी आध्यात्मिकरित्या चैतन्यदायी अनुभव ठरेल.
३ मदत करा, पण विचारपूर्वक: ज्यांना मदतीची आवश्यकता वाटत नाही, अशांवर जबरदस्ती न करण्याची आपण काळजी घेतली पाहिजे. तसेच कोणाला मदत करताना त्यांच्या कौटुंबिक व्यवहारांत लुडबूड करणेही योग्य ठरणार नाही. अर्थात, गरजू बहिणींना मदत करण्याचा प्रश्न येतो तेव्हा मंडळीतल्या इतर बहिणी किंवा विवाहित जोडपी त्यांच्या मदतीला पुढे आल्यास सर्वात उत्तम.
४ “आतिथ्य करण्यात तत्पर असा” हा सल्ला सर्व ख्रिश्चनांना देण्यात आला आहे. (रोम. १२:१३ब) ख्रिस्ताने दाखवलेली प्रीती आपल्यात आहे हे आपण अनेक मार्गांनी दाखवू शकतो; आपल्या आध्यात्मिक बहीणभावांना मदतीचा हात देणे हा त्यांपैकी एक मार्ग.—योहा. १३:३५.