पत्रिका—सुवार्ता सांगण्याचे एक साधेच पण प्रभावशाली माध्यम
१ फार पूर्वीपासून, म्हणजे सन १८८१ पासून यहोवाचे लोक आपल्या सेवेत पत्रिकांचा उपयोग करत आले आहेत. बंधू चार्ल्स टेझ रस्सल यांनी पत्रिकांचे मोल जाणले आणि म्हणूनच आपल्या पहिल्या कायदेशीर संस्थेचे त्यांनी झायन्स वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट (पत्रिका) सोसायटी असे नाव ठेवले. पण आपल्याबाबत काय? सेवेत पत्रिकांचा उपयोग करण्याला आपण महत्त्व देतो का?
२ विशेषतः, सन १९८७ पासून पत्रिकांचा उपयोग करण्यावर संस्थेने खास जोर दिला आहे आणि जीवनातल्या विविध परिस्थितींशी लोकांना लढत देता यावी म्हणून निरनिराळ्या विषयांवर, बऱ्याच पत्रिका प्रकाशित केल्या आहेत. उदाहरणार्थ, आपल्याकडे बायबल, कुटुंब, आपण राहात असलेल्या काळाचे महत्त्व, मृत्यू, पुनरुत्थान, मनुष्याचे भवितव्य आणि अशा अनेक विषयांवर पत्रिका उपलब्ध आहेत.
३ आपल्यापैकी बऱ्याच जणांना या पत्रिकांतील विषय माहीत आहेत आणि परिणामकारकपणे आपण त्यांचा उपयोग देखील केला आहे. उचित विषयाच्या एखाद्या पत्रिकेचा उपयोग करून घरमालकासोबत संभाषण सुरू करणे किती सोपे आहे याचा प्रत्ययही आपल्याला आला आहे. खासकरून, नव्याने सेवेत सहभाग घेणाऱ्यांच्या बाबतीत हे खरे आहे. क्षेत्र सेवेत आपल्या पालकांसोबत कार्य करताना लोकांना पत्रिका देण्यात मुलांना देखील एक आगळाच आनंद मिळतो.
४ आज बहुतेक भाषांमध्ये आपल्या पत्रिका उपलब्ध असल्यामुळे लाखो लोकांप्रत सुवार्ता पोहंचवणे सुलभ झाले आहे. आपल्या देशात, वाचता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीजवळ तिच्या स्वतःच्या भाषेत एक पत्रिका असल्यास किती बरे होईल. पत्रिका विनामूल्य दिल्या जात असल्यामुळे गरीब लोकांनाही त्यांपासून फायदा होऊ शकतो. आपण निरनिराळ्या भाषेतील, निरनिराळ्या पत्रिका नेहमी सोबत ठेवू शकतो.
मे महिना—खास पत्रिकांसाठी
५ या महिन्यात एक खास पत्रिका मोहीम देशभर आयोजित केलेली आहे. भारतात मे महिन्यात दोन गोष्टी आपल्याला हमखास आढळतात: १) या महिन्यात शाळकरी मुलांना उन्हाळ्याची सुट्टी असते तसेच २) या महिन्यात मोठ्या संख्येने प्रचारक सहायक पायनियरींग करतात. आयोजित केलेल्या या मोहिमेमुळे वैयक्तिकरित्या तर आपल्याला मदत होईलच पण, त्यामुळे आपल्या शेजाऱ्यांनाही आध्यात्मिक लाभ मिळतील. ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाने’ दिलेल्या सूचनेनुसार सबंध जगभरातील आपले बंधुभगिनी, जेथे कोठे लोक भेटू शकतील तेथे जाऊन त्यांना भेटण्याचे मार्ग शोधून काढत आहेत. (मत्त. २४:४५-४७) आपण भारतासारख्या क्षेत्रात राहत आहोत हा किती मोठा विशेषाधिकार आपल्याला आहे; कारण या देशात, आपण जेथे कोठे जातो तेथे आपल्याला लोक भेटतातच. तर मग, पत्रिका देण्याकरता सतत जागृत राहून सर्व प्रसंगी त्यांचे वाटप करण्याद्वारे आपल्याला पत्रिकांचा चांगला उपयोग करता येईल. यासाठी आपल्याला निरनिराळ्या विषयांवरील आणि निरनिराळ्या भाषेतील पत्रिका सोबत घ्याव्या लागतील तसेच लोकांशी बोलताना निरनिराळ्या प्रकारे संभाषण सुरू करण्यास नेहमी तयार असण्याची गरज आहे.
६ काही बंधुभगिनी घरोघरच्या सेवेत, मार्ग साक्षकार्यात आणि बस-स्थानकांवर पत्रिकांचा चांगला उपयोग करत आहेत. प्रवास करताना ते केवळ प्रवाशांनाच नव्हे तर बस चालकांना, ऑटो किंवा टॅक्सी चालकांना देखील पत्रिका देतात. अलीकडेच, भारतातील एका भगिनीने बसने प्रवास करताना बाजूला बसलेल्या एका स्त्रीशी मैत्रीपूर्ण संभाषण सुरू केले. बोलता बोलता, त्या स्त्रीने अन्यायाचा उल्लेख केला; त्यामुळे आपल्याला बहिणीला, शांतीदायक नवीन जगातील जीवन ही पत्रिका दाखवून तसेच त्यातील प्रकटीकरण २१:३-५ या वचनाकडे तिचे लक्ष वेधून राज्याविषयी बोलण्याची संधी मिळाली. राज्य संदेशाविषयी त्या स्त्रीने आस्था दाखवली आणि तिने बहिणीला आपला नावपत्ता देऊन भेट घेण्याची विनंती केली. आपल्या कार्यस्थळी सहकर्मचाऱ्यांना संक्षिप्त साक्ष देण्यासाठी पत्रिका सगळ्यात चांगल्या असतात असे अनेक प्रचारकांना दिसून आले आहे. होय, पत्रिका दिसायला लहान असल्या तरी धार्मिक प्रवृत्तीच्या आणि सार्वकालिक जीवनास पात्र असलेल्यांना ओळखण्याचे अति महत्त्वपूर्ण काम त्या करतात.
प्रस्तुती सुधारण्यास पत्रिका उपयुक्त
७ अशाप्रकारे बऱ्याच पत्रिकांचा उपयोग केल्याने केवळ अधिक लोकांची भेटच होत नाही तर एक ना अनेक विषयांवर संक्षिप्त, सरळ, मुद्देसूद आणि सहजसोप्या पद्धतीने सुवार्ता सांगण्याचे प्रशिक्षणही आपल्याला मिळते. तर मग, मे महिन्यात पत्रिकांच्या माध्यमाने अधिक लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असताना, लोकांशी कसे बोलावे हे शिकण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू या. मनापासून बोलून, ऐकणाऱ्यांच्या मनांपर्यंत पोहंचण्याची कला आपण आत्मसात करण्यास हवी. निरनिराळ्या पार्श्वभूमीच्या आणि विश्वासांच्या लोकांशी आपला संपर्क येत असतो. त्यामुळे “कृपावचने” वापरून लोकांशी संभाषण सुरू कसे करावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे. (लूक ४:२२) ही कृपावचने जबरदस्तीने इतरांवर न लादता आशा धरण्यास इच्छुक असणाऱ्यांना आपण मदत करतो. प्रेषित पौलाने म्हटले त्याप्रमाणे आपण “सर्वांना सर्व काही” झाले पाहिजे.—१ करिंथकर ९:२२.
८ आपण नेहमी एकच साचेबद्ध संदेश देत राहिलो तर त्याचा अर्थ आपण मनापासून बोलत नाही. घरमालकांना निरनिराळ्या प्रचारकांकडून वर्षानुवर्षे तोच तो संदेश ऐकावा लागला तर ते कदाचित संतापतील, आपल्याला विरोध करतील आणि आपल्याशी सभ्यपणे वागणार नाहीत. आपल्या कुटुंबातला एखादा सदस्य दिवसभर एकच गीत गुणगुणत राहिला किंवा आपले शेजारी वारंवार तेच ते संगीत वाजवत राहिले तर आपल्याला कसे वाटेल? किंवा मग, एखादी ओळखीची व्यक्ती वारंवार तीच ती गोष्ट आपल्याला सांगत राहिली तर त्या व्यक्तीला आपण काय म्हणू? तसेच, आपल्या क्षेत्रातील लोकही वर्षानुवर्षे तीच ती प्रस्तुती ऐकत राहिले तर यहोवा देवाबद्दल आणि त्याचे वचन बायबल याबद्दल त्यांना काय वाटेल?
९ मे महिन्यातील खास पत्रिका मोहिमेत पूर्णार्थाने सहभाग घेतल्याने सगळ्यांनाच मोठा फायदा होईल. तुम्ही एक नवीन प्रचारक असल्यास, तुमचा बायबल अभ्यास घेणाऱ्यांसोबत या पत्रिकांचा अभ्यास करण्यासाठी तसेच तुमच्या क्षेत्रात या पत्रिकांतील माहितीचा उपयोग कसा केला जाऊ शकतो याची चर्चा करण्यासाठी वेळ द्या. “पायनियर साह्य” कार्यक्रमातील एखादा पायनियर तुमची मदत करत असल्यास पत्रिकांचा उपयोग करण्यासाठी त्याची मदत घेण्यात काय हरकत आहे? सुवार्ता सांगताना प्रभावशालीपणे त्यांचा उपयोग करता यावा म्हणून तुम्ही आणि तुमची मदत करणारा पायनियर सराव करू शकता. पालकांनो, तुम्ही देखील यास एक कौटुंबिक प्रकल्प बनवून क्षेत्र सेवेत असताना तुम्हाला आणि तुमच्या मुलांना प्रत्येक पत्रिकेचा उपयोग कसा करता येईल याचा तुम्ही सर्वजण विचार करू शकता. खरे तर, प्रत्येक प्रचारक अधिक प्रभावीपणे पत्रिका सादर करण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक प्रयत्न करू शकतो. आपल्या क्षेत्रात कोणत्या प्रस्तुती प्रभावशाली असतील हे ठरवण्याचे एक उत्तम साधन म्हणजे आपल्यापाशी असलेले युक्तीवाद (इंग्रजी) पुस्तक. तसेच, पत्रिकांचा उपयोग करण्याच्या विषयावरील आमची राज्य सेवा याचे आधीचे अंकही आपण पडताळू शकतो. ऑगस्ट १९९३ पृ. ३-४; फेब्रुवारी १९९१ पृ. ४; फेब्रुवारी १९९० पृ. ४ पाहा.
१० पुढील पत्रिका कशा सादर केल्या जाऊ शकतात याच्या काही सुचवलेल्या पद्धती:
तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता
नेहमीप्रमाणे अभिवादन केल्यानंतर तुम्ही म्हणू शकता, “आज दोन हजारांहून अधिक भाषांमध्ये बायबल उपलब्ध आहे; पण फारच कमी लोकांना त्यात रस राहिला आहे; तुम्हाला काय वाटतं, त्याचं कारण काय असावं?” [प्रतिसादासाठी वाव द्या] मग पुढे असे म्हणा: “बायबलच्या अभ्यासावरून आम्हाला हे समजलं आहे, की सुरवातीपासूनच या ग्रंथाचा विपर्यास करण्यात आला आहे. पण, त्यात सर्व लोकांसाठी असलेला एक संदेश मी तुम्हाला दाखवू शकतो का?” मग घरमालकाला पृष्ठ ४ वरील ‘भविष्याचे भाकित करणे’ हे उपशीर्षक दाखवून पृष्ठे ५ आणि ६ वरील शेवटले चार परिच्छेद विचारात घ्या. थोडक्यात बोलून एखादे मासिक किंवा अपेक्षा माहितीपत्रक सादर केले जाऊ शकते.
यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्वास आहे?
अभिवादन केल्यानंतर, पत्रिकेचा उपयोग करून तुम्ही अशाप्रकारे संभाषण सुरू करू शकता: “तुम्हाला काय वाटतं, कोणती गोष्ट आपल्या समाजातील सर्व लोकांना सुखासमाधानाने राहण्यास मदत करील?” [प्रतिसादासाठी वाव द्या] मग आपण म्हणू शकतो की, “यहोवाचे साक्षीदार या नात्याने आम्हाला असं वाटतं की एकमेकांचे विश्वास आणि जीवन पद्धती जाणून घेतल्याने आपण एकमेकांना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकतो. याबद्दल तुमचे वैयक्तिक मत काय आहे?” [प्रतिसादासाठी वाव द्या] मग असे म्हणू शकता: “आम्ही देखील समाजाचेच एक भाग आहोत पण आज फारच कमी लोकांना आमच्याबद्दलची माहिती असल्यामुळे आम्ही ही पत्रिका तयार केलेली आहे; आम्ही कोण आहोत, आमचे विश्वास काय आहेत याची माहिती देण्यासाठी आम्ही ही पत्रिका तुम्हाला देऊ इच्छितो.” तुम्ही पत्रिकेतील एखादा विशिष्ट मुद्दा ठळकपणे सांगू शकता किंवा मग सविस्तर स्पष्टीकरण देण्यासाठी पुन्हा भेट घेण्याची व्यवस्था करू शकता.
शांतीदायक नवीन जगातील जीवन
सुरवातीला नेहमीप्रमाणे अभिवादन केल्यानंतर तुम्ही असे म्हणू शकता, “आज तुमच्या या परिसरातील सर्व लोकांच्या भेटी घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि तुम्हाला घरी भेटून मला आनंद वाटतो. आम्ही एक प्रश्न विचारत आहोत आणि त्यावरील तुमचे मत काय हे जाणू इच्छितो. भारतात बरेच लोक अनेक निरनिराळ्या देवदैवतांची भक्ती करतात; तरीही बऱ्याच जणांचे असे मत आहे की परमात्मा एकच आहे आणि त्यानेच सर्व जीवधारी प्राणीमात्राला जीवन शक्ती दिली आहे. तुम्हालाही असंच वाटतं का?” [प्रतिसादासाठी वाव द्या] तुम्ही पुढे असे म्हणू शकता, “मग ही पृथ्वी आणि त्यावरील सर्वकाही बनवण्याचा या परमात्म्याचा उद्देश काय होता असं तुम्हाला वाटतं?” पृथ्वी ही मनुष्यासाठी आणि मनुष्य पृथ्वीसाठी बनवला गेला होता, त्याला या पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याच्या आशेसह बनवलं होतं हे सांगण्यासाठी पत्रिकेतील माहितीवर आधारित चर्चा सुरू होऊ शकते. पहिले तीन परिच्छेद विचारात घेतल्यानंतर चर्चा चालू ठेवण्यासाठी पुन्हा भेट घेण्याची निश्चित योजना आखा.
मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा?
तुम्ही असे म्हणून सुरवात करू शकता, “मृत्यू हा मानवी जीवनाचा एक अटळ भाग असला तरीही तो स्वाभाविक आहे असं तुम्हाला वाटतं का?” [प्रतिसादासाठी वाव द्या.] मग असे म्हणता येईल: “मृत्यू हा स्वाभाविक नाही म्हणूनच तर आपल्याला मरावंसं वाटत नाही, आपल्या कुणालाही मरायची इच्छा नसते. मृत व्यक्तींसाठी लोक केवळ शोकविलापच करत नाहीत तर हे मृत लोक अजूनही कुठेतरी अस्तित्वात आहेत असंही त्यांना वाटतं. या विषयावर आज बरंच काही शिकवलं जातं. पण, आपल्या मृत प्रिय जनांना पुन्हा पाहणे शक्य आहे याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?” मग पृष्ठ २ वरील १-३ परिच्छेद त्यांना दाखवा. निघण्यापूर्वी पुनरुत्थानाच्या आशेचा उल्लेख करा आणि त्यावरील सविस्तर चर्चा करण्यासाठी पुन्हा भेट घेण्याची योजना करा.
तुम्ही थेटपणे गृह बायबल अभ्यास सादर करू शकता आणि हे दाखवण्यासाठी कोणत्याही पत्रिकेचा उपयोग करून एक प्रात्यक्षिक दाखवले जाऊ शकते.
जीवन वाचवणारे संभाषण
११ या मोहिमेमुळे निश्चितच आणखीन पुष्कळांना जीवनाच्या मार्गावर येण्यास मदत होईल. आपल्याला भेटणाऱ्या लोकांशी सविस्तर, रंजक संभाषणे करण्याची संधी आपल्याला लाभेल. आपल्यासाठी ते घरमालक आहेत पण, त्यांच्यासाठी मात्र आपण अनोळखी व्यक्ती आहोत हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे आपण अतिशय विचारपूर्वक बोलण्यास हवे, नाही तर आपल्या एखाद्या अविचारी शब्दामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच, आपण सुरवातीला जे काही म्हणतो त्याविषयी दक्षता बाळगण्याची तसेच आपण जे काही बोलतो ते केवळ स्थानिक गरजांनाच नव्हे तर क्षेत्रातील परिस्थितीसही लागू करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, आपल्या वागण्याबोलण्याद्वारे आपण हे दर्शवतो का की ख्रिस्ती धर्मजगतातल्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाही? की यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण वेगळे आहोत हे आपण दाखवून देतो? आपल्या प्रस्तुतींवरून आपण हे प्रकट करतो का की एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाविषयी आपल्या मनात पूर्वग्रह आहे? की आपण अतिशय तटस्थ असून यहोवा अधिकार गाजवण्यास अनुमती देतो अशा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला आपण सापेक्ष अधिनता दाखवतो हे लोकांच्या लक्षात येते?
१२ जगभरात, बायबल सिद्धान्तांचे पालन करण्याच्या बाबतीत, प्रामाणिक, कष्टाळू असण्याच्या बाबतीत आणि उच्च नैतिक दर्जे राखण्याच्या बाबतीत यहोवाचे साक्षीदार सुप्रसिद्ध आहेत. पण कधीकधी, गैरसमजुतीमुळे त्यांच्यावर चुकीचा दोषारोप लावला जातो; आणि हा दोषारोप लोकांना त्यांच्याबद्दल असलेल्या ग्रहावर आधारित असतो. त्यांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी, पहिल्या शतकातील लोकांशी व्यवहार करताना येशू जसा संभाषणात्मक, प्रेमळ आणि कुशल होता तसे आपणही असले पाहिजे. या महिन्यादरम्यान, पत्रिकांचा उपयोग करून लोकांशी संभाषण करण्याद्वारे हे गैरसमज दूर करण्यात आपण हातभार लावू.