पुढाकार घेणारे ओव्हरसियर —टेहळणी बुरूज अभ्यास घेणारा
१ आपल्याला “यथाकाळी” आध्यात्मिक अन्न देण्याचे ‘विश्वासू व बुद्धिमान दासाचे’ प्रमुख माध्यम म्हणजे टेहळणी बुरूज, यहोवाच्या राज्याचा प्रकाशक ही पत्रिका. (मत्त. २४:४५) टेहळणी बुरूज अभ्यास घेणारा वडील हा शिकवण्यात निपुण, आणि नेहमी ख्रिस्ती तत्त्वांनुसार चालण्याच्या बाबतीत मंडळीपुढे एक उत्तम आदर्श असतो; याअर्थी, त्याच्यावर एक मोठी जबाबदारी असते.—रोम. १२:७; याको. ३:१.
२ उत्तमरित्या अभ्यास चालवण्यासाठी, टेहळणी बुरूज अभ्यास घेणाऱ्याने दर आठवड्याच्या लेखाचा अगदी चांगला अभ्यास केला पाहिजे; प्रार्थनापूर्वक आणि अगदी लक्षपूर्वक. त्याला मंडळीतल्या सर्वांबद्दल कळकळ असल्यामुळे तो अभ्यासाचे मुद्दे आपल्या अगदी मनापर्यंत पोचतील अशाप्रकारे मांडण्याचा प्रयत्न करतो. लेखाच्या मुख्य मुद्द्यांपासून न भरकटता, या मुद्द्यांचा मुख्य विषयाशी कसा संबंध आहे हे समजून घ्यायला तो आपली मदत करतो.
३ यासाठी त्याला अगदी चांगली तयारी करणे भाग आहे; शास्त्रवचनांचा विषयाशी कसा संबंध आहे हे समजवण्यासाठी ती वचने आधीच वाचून ठेवणेही यात आलेच. शिवाय, अभ्यास घेताना देखील तो देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष होऊ देत नाही; यासाठी अभ्यास सुरू असताना सर्वांना बायबल उघडून उत्तरे देण्याचे तो प्रोत्साहन देतो. उत्तरे देणाऱ्यांनी जर एखादा महत्त्वाचा मुद्दा सोडून दिला असेल, किंवा एखाद्या मुख्य शास्त्रवचनाचा विषयाशी कसा संबंध आहे हे जर कोणी सांगितले नसेल, तर तो एखादा मुद्देसूद प्रश्न विचारून ही महत्त्वाची माहिती काढून घेतो. अशाप्रकारे, अभ्यासातून आपल्याला नेमके काय शिकण्यासारखे आहे आणि ते आपण आपल्या जीवनात कसे लागू करू शकतो हे समजून घेण्यासाठी तो आपल्याला साहाय्य करतो.
४ आपल्याला आणखी चांगल्याप्रकारे कसे शिकवता येईल म्हणून टेहळणी बुरूजचा अभ्यास घेणारा सतत प्रयत्नशील असतो. अभ्यास घेताना तो स्वतः जास्त बोलत नाही, तर इतरांना बोलायला लावतो—स्वतःच्या शब्दांत, थोडक्यात आणि मुद्द्याला धरून. अधूनमधून त्याला आठवण करून द्यावी लागते की परिच्छेदाचे पहिले उत्तर देणाऱ्याने पत्रिकेतल्या प्रश्नाचे अगदी थोडक्यात, नेमके उत्तर सांगावे. यानंतर, शास्त्रवचनांचा कसा संबंध आहे, विषयाला दुजोरा देणारे आणखी मुद्दे कोणते, तसेच दररोजच्या जीवनात त्यांचा कसा उपयोग करता येईल हे स्पष्ट करण्यासाठी इतरजण आणखी उत्तरे देऊ शकतात. टेहळणी बुरूजचा अभ्यास घेणारा सर्वांना आधीच तयारी करण्याचे प्रोत्साहन देतो, एकेकट्याने असो किंवा कुटुंबातले सर्वजण मिळून असो; यामुळे सर्वांना उत्तरे देण्याची उत्सुकता वाटते.
५ आपण ‘यहोवापासून शिक्षण पावलेले’ लोक आहोत. आपल्याला शिकवण्यासाठी ‘श्रम घेणारे’ टेहळणी बुरूज अभ्यास घेणारे, म्हणजे त्याने आपल्याला दिलेल्या “मानवरूपी देणग्या” आहेत आणि याबद्दल आपण त्याचे कृतज्ञ आहोत.—यश ५४:१३; इफिस ४:८ NW, ११; १ तीम ५:१७.