वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९८ पृ. ३-६
  • धन्याची मालमत्ता सांभाळणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धन्याची मालमत्ता सांभाळणे
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ख्रिस्ती कारभार
  • “विश्‍वासू व विचारशील कारभारी”
  • पद्धतीत बदल
  • विविध संघटनात्मक गरजा
  • तोलण्याजोग्या बाबी
  • मालमत्ता सांभाळणे
  • तुम्ही भरवशालायक कारभारी आहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • तुम्हाला माहीत होतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • देवाच्या स्तुतीसाठी पवित्र शास्त्र साहित्याचे उत्पादन
    यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत
आमची राज्य सेवा—१९९८
km ६/९८ पृ. ३-६

धन्याची मालमत्ता सांभाळणे

१ बायबलच्या काळात कारभाऱ्‍याचे काम मोठ्या विश्‍वासाचे काम असायचे. अब्राहामाने आपला पुत्र, इसहाक याच्यासाठी एक पत्नी पाहण्याची कामगिरी आपल्या कारभाऱ्‍यावर सोपवली. (उत्प. २४:१-४) परिणामस्वरूपी, अब्राहामाचा वंश पुढे चालू राहील हे सुनिश्‍चित करण्यास हा कारभारी जबाबदार होता. किती मोठी ही जबाबदारी! “कारभारी म्हटला की, तो विश्‍वासू असला पाहिजे,” असे जे प्रेषित पौलाने म्हटले त्यात आश्‍चर्य ते काय!—१ करिंथ. ४:२.

ख्रिस्ती कारभार

२ बायबलमध्ये ख्रिस्ती सेवेच्या काही पैलूंचे वर्णन कारभार असे करण्यात आले आहे. उदाहरणार्थ प्रेषित पौल, “देवाची जी कृपा तुम्हासाठी मला दिली होती तिच्या कारभाराविषयी” इफिसकरांशी बोलला. (इफिस. ३:२, पं.र.भा.; कलस्सै. १:२५) राष्ट्रांना सुवार्ता विदित करण्याची नेमणूक, विश्‍वासाने हाताळण्याजोगा एक कारभार असल्याचे त्याने समजले. (प्रे. कृत्ये ९:१५; २२:२१) प्रेषित पेत्राने आपल्या अभिषिक्‍त बांधवांना लिहिले: “कुरकुर न करिता एकमेकांचा पाहुणचार करा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्‍यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा.” (१ पेत्र ४:९, १०; इब्री. १३:१६) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांपाशी जी काही भौतिक मालमत्ता होती ती यहोवाच्या अपात्री कृपेमुळेच त्यांना लाभली होती. म्हणूनच, ते त्या मालमत्तेचे कारभारी असून एका ख्रिस्ती मार्गाने त्यांनी तिचा उपयोग करावयाचा होता.

३ आज यहोवाचे साक्षीदार, सदर बाबींसंबंधी समान दृष्टिकोन बाळगतात. त्यांनी यहोवा देवाला स्वतःचे समर्पण केले आहे आणि त्यांच्यापाशी असलेले सर्वकाही—त्यांचे जीवन, त्यांचे शक्‍तिसामर्थ्य, त्यांची भौतिक मालमत्ता—‘देवाच्या नानाविध कृपेचे’ अनेक प्रतिफळ असल्याचे ते समजतात. चांगले कारभारी या नात्याने, आपण ज्याप्रकारे या गोष्टींचा उपयोग करतो त्याचा हिशेब आपल्याला देवाला द्यायचा आहे अशी भावना ते मनी बाळगतात. याशिवाय, त्यांना सुवार्तेचे ज्ञान दिले गेले आहे. ही देखील एक ठेव असून होता होईल तितक्या उत्तम तऱ्‍हेने, म्हणजे देवाच्या नावाचा महिमा करण्यासाठी आणि सत्याचे ज्ञान प्राप्त करण्यात इतरांची मदत करण्यासाठी ते या ज्ञानाचा उपयोग करू इच्छितात.—मत्त. २८:१९, २०; १ तीम. २:३, ४; २ तीम. १:१३, १४.

४ कारभारी या नात्याने यहोवाचे साक्षीदार आपल्या जबाबदाऱ्‍या कशा पार पाडत आहेत? वार्षिक अहवाल दाखवून देतो, की केवळ मागच्या एका वर्षात ‘राज्याच्या सुवार्तेचा’ प्रचार करण्यात जगभर त्यांनी एक लाखाहून अधिक तास खर्च केले आणि आस्थेवाईक लोकांसोबत ४५,००,००० हून अधिक गृह बायबल अभ्यास संचालित केले. (मत्त. २४:१४) जगव्याप्त कार्याकरता व स्थानीय राज्य सभागृहांना पाठबळ देण्याकरता ते देत असलेल्या उदार देणग्यांवरून, प्रवासी पर्यवेक्षकांना व इतरांना ते दाखवत असलेल्या आदरातिथ्यावरून तसेच गरजवंतांप्रती—जसे की सशस्त्र संघर्षांच्या बळींप्रती—दाखवलेल्या अनन्यसाधारण कृपेवरून यहोवाचे कारभारी या नात्याने त्यांचा विश्‍वासूपणा दिसून येतो. एक समूह या नात्याने खरे ख्रिस्ती धन्याच्या मालमत्तेचा उत्तम सांभाळ करत आहेत.

“विश्‍वासू व विचारशील कारभारी”

५ केवळ वैयक्‍तिक पातळीवरचाच नव्हे, तर संघटनात्मक पातळीवरचा देखील कारभार आहे. येशूने पृथ्वीवरील अभिषिक्‍त ख्रिस्ती मंडळीला, “विश्‍वासू व विचारशील कारभारी” म्हटले. (लूक १२:४२) “शिधासामुग्री” पुरवणे व सुवार्तेच्या आंतरराष्ट्रीय प्रचार कार्यात नेतृत्व करणे ही या ‘विश्‍वासू कारभाऱ्‍याची’ जबाबदारी आहे. (प्रकटी. १२:१७) यासंबंधी, जगव्याप्त कार्यासाठी दिल्या जात असलेल्या अनुदानांचा उपयोग ज्याप्रकारे केला जातो त्यासाठी नियमन मंडळाचे प्रतिनिधित्त्व करणारा विश्‍वासू कारभारी वर्ग जबाबदार आहे. अशा सर्व देणग्या विश्‍वासाच्या आधारावर केल्या जातात आणि ज्या उद्देशास्तव त्या केल्या जातात केवळ त्यासाठीच त्यांचा उपयोग केला जातो तसेच त्या सुज्ञपणे, किफायतशीरपणे आणि परिणामकारकपणे वापरल्या जातात हे सुनिश्‍चित करण्यास “विश्‍वासू व विचारशील कारभारी” जबाबदार आहे.

६ अनुदान केलेल्या निधीचा सुज्ञपणे उपयोग केल्याचे एक उदाहरण, २० व्या शतकादरम्यान यहोवाच्या साक्षीदारांच्या छपाई कार्यात झालेल्या वाढीवरून दिसते. बायबल व बायबल साहित्यांच्या—नियतकालिके, पुस्तके, माहितीपत्रके, पुस्तिका, पत्रिका आणि राज्य वार्ता—वितरणाने या “शेवटल्या काळी” ‘सुवार्तेचा’ प्रसार करण्यात एक प्रमुख भूमिका पार पाडली आहे. (मार्क १३:१०; २ तीम. ३:१) ‘देवाच्या घरच्यांना’ व त्यांच्या सोबत्यांना अर्थात ‘दुसऱ्‍या मेंढरांतील’ ‘मोठ्या लोकसमुदायाला’ “यथाकाळी खावयास” देण्यासाठी टेहळणी बुरूज एक प्रमुख साधन ठरले आहे.—इफिस. २:१९; योहा. १०:१६; प्रकटी. ७:९; मत्त. २४:४५.

७ सुरवातीला, यहोवाच्या साक्षीदारांचे सर्व साहित्य व्यावसायिक मुद्रकांकडून छापले जायचे. परंतु, यहोवाच्या सेवकांनी स्वतःच छपाई केल्यास ते अधिक कार्यक्षम व किफायतशीर ठरेल असा निर्णय १९२० च्या दशकादरम्यान घेण्यात आला. सन १९२० मध्ये ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील छपाई कार्याची एका लहान प्रमाणात सुरवात होऊन कालांतराने ते कमालीचे वाढले. सन १९६७ पर्यंत, छपाई सुविधांसाठी चक्क १२,३८,२३० चौरस फूट क्षेत्रफळाचा वापर केला जाऊ लागला. इतर देशांमध्येही छपाई कार्य सुरू झाले होते, पण त्यांपैकी अनेक देशांतील छपाई कार्य दुसऱ्‍या महायुद्धामुळे खंडित झाले.

८ संयुक्‍त संस्थानांतील छपाई कार्य कितीही वाढले तरीही सबंध जगाला पुरवठा करण्याइतपत ते मोठे नव्हते. यास्तव मग, युद्धानंतरच्या काळांत इंग्लंड, कॅनडा, ग्रीस, डेन्मार्क, दक्षिण आफ्रिका, पश्‍चिम जर्मनी व स्वित्झर्लंड यांसोबतच इतर राष्ट्रांमध्ये छपाई कार्य सुरू झाले किंवा मग ते आधीपासून सुरू झाले होते. सन १९७० दशकाच्या सुरवातीला देखील ऑस्ट्रेलिया, घाना, जपान, नायजेरिया, फिनलंड, फिलिपाईन्स आणि ब्राझीलची देखील या यादीत भर पडली. यांच्यापैकी काही राष्ट्रे बाईंड केलेली पुस्तकेही छापू लागली. सन १९७० च्या दशकाच्या सुरवातीला, छपाई कार्यात स्थानीय बांधवांची मदत करण्यासाठी गिलियड मिशनऱ्‍यांना छपाई कौशल्यांत प्रशिक्षित करून यांपैकी काही देशांत पाठवण्यात आले.

९ सन १९८० च्या दशकादरम्यान, नियतकालिके छापणाऱ्‍या राष्ट्रांनी ५१ वा उच्चांक गाठला.a धन्याच्या मालमत्तेचा किती उत्तम उपयोग! राज्य कार्याच्या वाढीचा किती हा सबळ पुरावा! आणि ‘आपल्या [मौल्यवान] द्रव्याने यहोवाचा सन्मान करणाऱ्‍या’ लक्षावधी वैयक्‍तिक साक्षीदारांच्या उदार पाठबळाची किती ही शक्‍तिशाली ग्वाही! (नीति. ३:९) अशा प्रकारे, यहोवाने नानाविध प्रकारे जे काही देऊन त्यांना आशीर्वादित केले त्याचे चांगले कारभारी असल्याचे त्यांनी शाबीत केले.

पद्धतीत बदल

१० सन १९७० च्या दशकादरम्यान आणि १९८० दशकाच्या सुरवातीला छपाई कार्याच्या तंत्रात प्रचंड प्रगती झाली आणि यहोवाचे साक्षीदार नवनवीन छपाई तंत्रे वापरू लागले. यापूर्वी, त्यांनी छपाईसाठी पारंपरिक लेटरप्रेस स्टाईल वापरली होती. अत्याधुनिक ऑफसेट मुद्रण पद्धतीचा ते वापर करू लागले तसा हळुवारपणे यात बदल घडून आला. परिणामस्वरूप, जुन्या लेटरप्रेसवर दुरंगी (काळा आणि त्यासोबत दुसरा एखादा रंग) चित्रांऐवजी आता चौरंगी चित्रांची सुंदर प्रकाशने उत्पन्‍न होत आहेत. पुढे, कॉम्प्युटर तंत्राने सबंध छपाईपूर्व क्रियाच (छपाईची तयारी) बदलून टाकली. यहोवाच्या साक्षीदारांनी मल्टीलँग्वेज इलेक्ट्रॉनिक फोटोटाईपसेटींग सिस्टम (मेप्स), अर्थात एक कॉम्प्युटराईझड पद्धत निर्माण केली आणि सध्या ही पद्धत ३७० भाषांतील छपाई कार्यास आधारभूत आहे. इतक्या भाषांत कार्य करण्याच्या क्षमतेच्या बाबतीत कोणताही व्यावसायिक प्रोग्राम मेप्सचा हात धरू शकत नाही.

११ मेप्स कॉम्प्युटर तंत्राच्या साह्‍याने व इलेक्ट्रॉनिक मेलसारख्या इतर नवीन पद्धतींचा वापर केल्यामुळे यथाकाळी अन्‍न उत्पन्‍न करण्यात प्रगतीचा आणखीन एक मोठा टप्पा गाठण्यात आला. यापूर्वी, जुन्या तंत्रामुळे इंग्रजी भाषांतील माहिती कितीतरी महिन्यांनंतर आणि काही वेळा तर कितीतरी वर्षांनंतर इतर भाषांत उपलब्ध व्हायची. आता एकाच वेळी टेहळणी बुरूज ११५ भाषांमध्ये व सावध राहा! ६२ भाषांमध्ये प्रकाशित होते. याचा अर्थ, दर आठवडी यहोवाच्या साक्षीदारांच्या टेहळणी बुरूज अभ्यासाला उपस्थित राहणारे जगभरातील ९५ टक्क्यांहून अधिक लोक एकाच वेळी एकसारखेच साहित्य विचारात घेतात. किती मोठा आशीर्वाद! नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक केल्यामुळे धन्याच्या मालमत्तेचा निश्‍चितच उत्तम उपयोग झाला आहे!

विविध संघटनात्मक गरजा

१२ या नवीन छपाई पद्धतींमुळे, यहोवाच्या साक्षीदारांच्या जगव्याप्त छपाई कार्याच्या संघटनात्मक गरजा बदलल्या. जुन्या लेटरप्रेसपेक्षा वेब ऑफसेट मुद्रण यंत्रे अधिक जलद असली तरी ती अतिशय महागडी आहेत. लिखाण, भाषांतर, कला आणि चित्रलेखनासारख्या संबंधित कार्यांना पाठबळ देणाऱ्‍या कॉम्प्युटर पद्धतींची कार्यक्षमता जुन्या पद्धतींपेक्षा कितीतरी अधिक आहे; पण त्या देखील अधिक महागड्या आहेत. लवकरच असे दिसून आले, की ५१ राष्ट्रांमध्ये नियतकालिकांची छपाई करणे नक्कीच किफायतशीर नव्हते. यास्तव, १९९० च्या दशकात, ‘विश्‍वासू कारभाऱ्‍याने’ या बाबींचे पुनरावलोकन केले. निष्कर्ष काय निघाला?

१३ अभ्यासांनी सूचित केले, की छपाई कार्याचे एकीकरण केल्यास, यहोवाच्या साक्षीदारांनी तसेच त्यांच्या सोबत्यांनी दान केलेल्या ‘मौल्यवान द्रव्याचा’ अधिक परिणामकारकपणे उपयोग केला जाईल. म्हणून मग, छपाई शाखांच्या संख्येत हळुवारपणे घट करण्यात आली. पूर्व आणि पश्‍चिम युरोपमधील अनेक देशांचे तसेच पूर्वी स्वतः छपाई करणाऱ्‍या अनेक देशांचे नियतकालिक व साहित्य छपाई कार्य सध्या जर्मनी करत आहे. आफ्रिकेच्या काही भागांना तसेच आग्नेय युरोप व त्यासोबतच ग्रीस आणि अल्बेनियाला इटलीकडून पुरवठा होतो. आफ्रिकेत नियतकालिक छपाई कार्य केवळ नायजेरिया व दक्षिण आफ्रिकेत होते. सबंध जगभरात अशाच प्रकारचे एकीकरण झाले आहे.

तोलण्याजोग्या बाबी

१४ जुलै १९९८ पर्यंत ऑस्ट्रीया, ग्रीस, झेकोस्लोव्हाकिया, डेन्मार्क, नेदरलँड्‌स, फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि हंगेरी यांसोबतच अनेक युरोपियन राष्ट्रांतील नियतकालिक छपाई बंद झालेली असेल. युरोपच्या छपाई कार्याचा भार इटली, जर्मनी, फिनलंड, ब्रिटन, स्पेन आणि स्वीडन उचलेल. कोणती राष्ट्रे छपाई स्थळे म्हणून कार्यरत राहतील आणि कोणती बंद पडतील हे कशाच्या आधारावर ठरवण्यात आले होते? धन्याच्या मालमत्तेचा सुज्ञपणे सांभाळ करण्याच्या आपल्या आज्ञेच्या बरहुकूम ‘विश्‍वासू कारभाऱ्‍याने’ चोखंदळपणे प्रत्येक स्थळातील छपाई खर्चाचा तसेच संबंधित वितरण खर्चाचा अंदाज काढला. सर्वात अनुकूल वैध परिस्थितींत साहित्याची छपाई व वितरण होऊ शकेल की नाही हे अजमावण्यासाठी त्याने प्रत्येक राष्ट्राच्या कायद्यांचे परिक्षणही केले.

१५ काही राष्ट्रांतील छपाई कार्य बंद करून इतर राष्ट्रांत या कार्याचे एकीकरण करण्यात आले ते मुख्यतः व्यावहारिकतेमुळे. एका राष्ट्राने इतर अनेक देशांसाठी साहित्य छापणे अधिक सोयीस्कर असून महागड्या यंत्राचा उत्तम वापरही होतो. जेथे स्वस्ताई आहे, माल उपलब्ध आहे आणि माल वाहून नेण्याची सोय आहे अशा ठिकाणी आता छपाई कार्य केले जाते. अशाप्रकारे, धन्याच्या मालमत्तेचा योग्यप्रकारे उपयोग केला जात आहे. पण, एखाद्या राष्ट्रातील छपाई कार्य बंद करणे म्हणजे तेथील प्रचार कार्य थांबविले जाईल असा त्याचा अर्थ होत नाही. अशा राष्ट्रांत छापील साहित्याच्या भरघोस साठ्याचा पुरवठा होत राहील आणि तेथील यहोवाचे शेकडो-हजारो साक्षीदार आवेशाने आपल्या शेजाऱ्‍यांना “शांतीची सुवार्ता” सांगत राहतील. (इफिस. २:१७) शिवाय, या पुनर्संघटनेमुळे आर्थिक लाभांखेरीज इतर फायदेही निष्पन्‍न झाले आहेत.

१६ केवळ एका फायद्याचाच उल्लेख करायचा झाल्यास ग्रीस, डेन्मार्क, नेदरलंड्‌स आणि स्वित्झर्लंड येथील बहुतेक आधुनिक छपाई यंत्रे नायजेरिया व फिलिपाईन्सला पाठवण्यात आली आहेत. युरोपियन राष्ट्रांतील कुशल छपाई यंत्र चालकांनी ही यंत्रे तेथे नेऊन तेथील स्थानीय चालकांना त्यांच्या कार्याचे प्रशिक्षण देण्याचे आमंत्रण स्वीकारले. यास्तव, इतर देशांप्रमाणेच त्या राष्ट्रांना देखील आता त्याचप्रकारची उच्च प्रतीची नियतकालिके मिळत आहेत.

१७ दुसऱ्‍या एका फायद्याचा विचार करा: सध्या ज्या मूठभर देशांत छपाई कार्य चालू आहे केवळ त्या देशांनाच नियतकालिक छपाईचा खर्च उचलावा लागतो. परिणामस्वरूप, ज्या देशांतील छपाई कार्य थांबविण्यात आले आहे तेथील साधनसामग्रीचा उपयोग राज्य सभागृहे बांधणे आणि गरीब देशांतील आपल्या बांधवांच्या गरजा भागवणे यांसारख्या इतर कार्यांसाठी आता केला जातो. अशाप्रकारे, धन्याच्या मालमत्तेचा चोखंदळ उपयोग करणे म्हणजे पौलाने करिंथकरांना लिहिलेले शब्द अधिक प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय स्थरावर लागू केले जाऊ शकतात: “दुसऱ्‍यांचा भार हलका करण्याकरिता तुमच्यावर भार घालावा असे नाही. तर हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या वैपुल्यांतून त्यांची गरज भागावी, . . . अशी ही समानता व्हावी.”—२ करिंथ. ८:१३, १४.

१८ या एकीकरणामुळे, जगभरातील यहोवाचे साक्षीदार एकमेकांच्या अधिकच जवळ आले आहेत. पूर्वी डेन्मार्कचे साक्षीदार स्वतःच आपल्या नियतकालिकांची छपाई करत असले तरीही आता जर्मनीमध्ये यांची छपाई करण्यात त्यांना काहीच अडचण दिसत नाही. उलट आपल्या जर्मन बांधवांनी केलेल्या सेवेसाठी ते कृतज्ञ आहेत. डेन्मार्कला—किंवा मग रशिया, युक्रेन व इतर देशांना साहित्य पुरवण्याकरता आपल्या अनुदानांचा उपयोग केला जात आहे या गोष्टीची जर्मनीतील यहोवाच्या साक्षीदारांना खंत वाटते का? मुळीच नाही! उलट त्यांना याचा आनंद होता, की त्या देशांतील त्यांच्या बांधवांच्या अनुदानांचा आता इतर आवश्‍यक कार्यांसाठी उपयोग केला जाऊ शकतो.

मालमत्ता सांभाळणे

१९ जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रत्येक राज्य सभागृहात, “संस्थेच्या जगव्याप्त कार्यासाठी अनुदान—मत्तय २४:१४,” असे लिहिलेली एक अनुदान पेटी असते. या पेट्यांत स्वेच्छेने टाकलेली अनुदाने गरज असलेल्या ठिकाणी उपयोग करण्यास उपलब्ध असतात. अनुदानांचा उपयोग कसा केला जावा हा निर्णय ‘विश्‍वासू कारभारी’ घेतो. यास्तव, एका मंडळीतील अनुदान पेटीत टाकलेल्या अनुदानाचा, शेकडो किलोमीटर दूर असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या दुसऱ्‍या एखाद्या मंडळीच्या कार्यास पाठबळ देण्याकरता कदाचित उपयोग केला जाईल. तुफान, झंझावात, भूकंप आणि यादवी युद्धे यांनी पीडित असलेल्या सहविश्‍वासूंना तातडीचे साह्‍य पुरवण्यासाठी अनुदानांचा उपयोग केला गेला आहे. शिवाय, देशभरातील खास पूर्ण-वेळेच्या सेवेत असणाऱ्‍यांना आधार देण्यासाठी देखील अशा देणग्यांचा उपयोग केला जात आहे.

२० एक सर्वसामान्य नियम म्हणून यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांत महिन्यातून केवळ एकदा आणि तेही केवळ काही मिनिटेच आर्थिक बाबींचा उल्लेख केला जातो. राज्य सभागृहांत किंवा संमेलनांत दान पात्रे फिरवली जात नाहीत. वैयक्‍तिकांकडून निधीची मागणी केली जात नाही. निधी उभारण्यासाठी कोणाचाही उपयोग केला जात नाही. ज्यांना जगव्याप्त कार्याला पाठबळ देण्याची इच्छा आहे ते वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीला अनुदान कसे पाठवू शकतात याचे स्पष्टीकरण देणारा केवळ एक लेख वर्षातून एकदा सामान्यतः टेहळणी बुरूज नियतकालिकेत असतो. सावध राहा! नियतकालिकात संस्थेच्या अर्थव्यवस्थेचा नियमितपणे उल्लेख केला जात नाही. मग, सुवार्तेचा प्रचार करण्याचे प्रचंड जगव्याप्त कार्य, आवश्‍यक राज्य सभागृहे बांधणे, खास पूर्ण-वेळेच्या सेवेत असणाऱ्‍यांना सांभाळणे आणि गरजवंत ख्रिश्‍चनांना साह्‍य करणे, हे सगळे कसे काय साध्य होते बरे? यहोवाने आश्‍चर्यकारक रीतीने औदार्याच्या आत्म्यानिशी आपल्या लोकांना आशीर्वादित केले आहे. (२ करिंथ. ८:२) ही संधी साधून, आपल्या ‘मौल्यवान द्रव्याने यहोवाचा सन्मान करण्यात’ ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. ‘विश्‍वासू कारभारी,’ धन्याच्या मालमत्तेची देखरेख करत राहील या विषयी ते विश्‍वस्त राहू शकतात. आणि जगव्याप्त कार्याच्या विस्तारासाठी केलेल्या सर्व व्यवस्था यहोवा असेच आशीर्वादित करत राहो अशीच आमची प्रार्थना आहे.

[तळटीप]

a यांपैकी सात देशांत, व्यावसायिक मुद्रकांकडून छपाई कार्य केले जात होते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा