अधिक महत्त्वपूर्ण गोष्टी अग्रस्थानी ठेवा
१ आपल्या आध्यात्मिक हितासाठी आवश्यक असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या आहेत बरे? शंकाच नको की यांत व्यक्तिगत अभ्यास, सभांची उपस्थिती, चिकाटीची प्रार्थना, श्रेयस्कर सहवास व ख्रिस्ती सेवा या गोष्टी अंतर्भूत असतील. आपल्या जीवनांत महत्त्वपूर्ण गोष्टी प्रथमस्थानी न ठेवता उत्तम आध्यात्मिक स्वास्थ्य राखणे शक्यच नाही.
२ तथापि, आपल्यापैकी सर्वांनाच देहवासनांविरुद्ध संघर्ष करावा लागतो आणि म्हणूनच आपल्याला शिस्तीचीही गरज आहे. (गलती. ५:१७) आपण कदापि असा विचार करू नये, की स्वहितांच्या मागे लागून आपल्याला पुष्कळ काही साध्य करता येईल. (यिर्म. १७:९) यास्तव, आपल्याला आपल्या अंतःकरणाचे संरक्षण करायचे असेल व मार्गभ्रष्ट व्हायचे नसेल तर नियमित आत्म-परीक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे.—नीति. ४:२३; २ करिंथ. १३:५.
३ तुमच्या अंतःकरणाचे परीक्षण करा: प्रामाणिकपणे काही प्रश्न स्वतःस विचारून तुम्ही हे करू शकता, जसे की: देवाचे वचन वाचण्याची मी उत्कट इच्छा बाळगतो का? (१ पेत्र २:२, ३) मंडळीच्या सर्व सभांना उपस्थित राहण्याचे महत्त्व मी जाणतो का? (इब्री. १०:२४, २५) मी प्रार्थनेत तत्पर आहे का? (रोम. १२:१२) आध्यात्मिक मनोवृत्ती असलेल्या लोकांसोबत सहवास राखण्याचा मी प्रयत्न करतो का? (रोम. १:११, १२) सुवार्ता घोषित करण्याची व्यक्तिगत बांधीलकी मला जाणवते का? (१ करिंथ. ९:१६) यांची विधायक उत्तरे दाखवून देतील, की अधिक महत्त्वपूर्ण गोष्टी अग्रस्थानी ठेवण्यास तुम्ही इच्छुक आहात.
४ तुमच्या दिनचर्येचे परीक्षण करा: वेळेचा उपयोग करण्यासंबंधी प्राथमिकता ठेवून तुम्ही तुमच्या अंतःकरणाच्या इच्छासक्तींचे सतत परीक्षण करणे जरूरीचे आहे. याचा अर्थ, बायबलचे तसेच टेहळणी बुरूज व सावध राहा! यांच्या प्रत्येक अंकाचे नियमित वाचन करण्यासाठी व सभांची तयारी करण्यासाठी वेळ नियोजित करणे. त्याचप्रमाणे, कुटुंब या नात्याने अभ्यास व प्रार्थना करण्यासाठी देखील वेळ काढणे जरुरीचे आहे. टीव्ही पाहण्यात अथवा इतर प्रकारच्या करमणुकीत आपण किती वेळ घालवतो त्यावर मर्यादा राखा. मंडळीच्या सर्व सभांना उपस्थित राहण्याचा निर्धार करा व आराखडा तयार करत असताना यास प्राधान्य द्या. प्रत्येक आठवडी संबंध कुटुंब मिळून क्षेत्र सेवेत सहभागी होण्याची योजना आखा.
५ यात कोणतीही शंका नाही, की आपल्या जीवनात अधिक महत्त्वपूर्ण गोष्टी अग्रस्थानी ठेवणे हे आनंदाचे एक कारण असल्याचे शाबीत होईल.