वाढ होण्यासाठी यहोवावर विसंबून राहा
१ वाढ होण्यासाठी यहोवावर विसंबून राहण्याची गरज जाणणाऱ्या एका कर्तव्यनिष्ठ पायनियरने लिहिले: “आयुष्यात पहिल्यांदाच एक नवीन मंडळी स्थापन करण्याचा अद्वितीय आनंद मी अनुभवला. दोन वर्षं चिकाटीचं कार्य, अखंड प्रार्थना आणि ‘वाढविणारा’ यहोवा याच्यावरील भरवसा यांमुळंच हे शक्य झालं.” (१ करिंथ. ३:५-९) आध्यात्मिकतेकडे कल असलेल्या लोकांचा शोध घेताना आपली सेवा फलदायी व्हावयाची असल्यास आपल्यालाही देवाच्या पाठबळाची गरज आहे.—नीति. ३:५, ६.
२ वाढीसाठी मशागत आवश्यक: सत्याचे बीज वाढायचे असल्यास त्याची मशागत करणे आवश्यक आहे. पहिल्या भेटीनंतर लगेच एकदोन दिवसांतच पुन्हा भेट घेतल्याने अनेकदा उत्तम परिणाम पदरी पडतात. उबदार व मैत्रीपूर्ण असा. दुसऱ्या व्यक्तीला सुखावह वाटू द्या. स्वतःच बोलत राहू नका. त्याला तुमचा परिचय करून घ्यायची संधी द्या व एक व्यक्ती या नात्याने तुम्हाला त्याच्याबद्दल आस्था वाटते हे देखील प्रदर्शित करा.
३ जुलैपासून ऑगस्टपर्यंत आपल्याला भेटणाऱ्या लोकांना वैविध्यपूर्ण माहितीपत्रके सादर करण्यावर आपण जास्त लक्ष देणार आहोत. तथापि, दाखवलेल्या आस्थेचा व केलेल्या वाटपांचा मागोवाही आपण घेतला पाहिजे. पुनर्भेटी करून व बायबल अभ्यास सादर करून आपण तसे करू शकतो. (मत्त. २८:१९, २०) यास्तव, अभ्यास संचालित करण्यासाठी अपेक्षा माहितीपत्रकाचा उपयोग केला जाऊ शकतो. यासाठी पुढील चार सूचना तुम्हाला सहायक ठरू शकतील.
४ जगाच्या बिकट परिस्थितीमुळे चिंतातूर असलेल्या एखाद्या व्यक्तीशी तुम्ही बोलला असल्यास, पुढीलप्रमाणे काही म्हणून तुम्ही तुमचे संभाषण ताजे करू शकता:
▪ “मानवी समाजात नैतिक मूल्यांची घसरण झाली आहे त्याबद्दल माझ्याप्रमाणं तुम्हीही चिंतातूर असाल असं मला वाटतं. घरातील हिंसाचारामुळं मुलांशी, पालकांशी व वैवाहिक सोबत्यांशी दुर्व्यवहार झाल्याच्या दुःखद बातम्या आपल्या कानावर येत असतात. आणि असं दिसतं जणू, आपल्या स्वार्थी इच्छा तृप्त करण्यासाठी लबाडी करणं किंवा चोरी करणं यांविषयी लोकांना काहीएक वाटत नाही. लोक ज्याप्रकारे जीवन व्यतीत करतात त्याचा देवाला काही फरक पडतो असं तुम्हाला वाटतं का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] देवानं मानवाला, जगण्यासाठी काही दर्जे घालून दिले आहेत आणि खरं तर ते आपल्याकरता मुळीच भारी नाहीत.” १ योहान ५:३ वाचा. मग अपेक्षा माहितीपत्रक सादर करा व पाठ १० उघडा. त्यातील पहिला परिच्छेद वाचा. परिच्छेद २-६ च्या सुरवातीस तिरप्या अक्षरांत असलेल्या शब्दांकडे व वाक्यांशांकडे लक्ष वेधा; मग घरमालकास विचारा, की यांपैकी कोणते कृत्य समाजाला सर्वात घातक असल्याचे त्याला अथवा तिला वाटते. संबंधित परिच्छेद वाचा व संधी मिळेल तशी एक किंवा दोन शास्त्रवचने वाचून दाखवा. परिच्छेद ७ वाचून समारोप करा व पुढील चर्चेसाठी पुन्हा भेट घेण्याची व्यवस्था करा.
५ आपल्या कुटुंबाविषयी चिंता असलेल्या लोकांशी तुमची गाठ पडल्यास तुम्ही यासारखे काही म्हणू शकता:
▪ “एका यशस्वी कौटुंबिक जीवनासाठी लागणारी साधने, निर्माणकर्ता पुरवू शकेल अशी अपेक्षा करणं योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का?” प्रतिसादासाठी वाव द्या. अपेक्षा माहितीपत्रक दाखवा, पाठ ८ उघडून असे स्पष्टीकरण द्या, की कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी यात बायबलची तत्त्वे दिलेली आहेत. त्यापासून सर्वाधिक फायदा मिळवण्यासाठी माहितीपत्रकाचा बायबलसह उपयोग कसा केला जाऊ शकतो ते प्रदर्शित करण्याचा प्रस्ताव मांडा. माहितीपत्रकातील पृष्ठ २ वर आढळणाऱ्या सूचनांचा अवलंब करा. पाठाचा उर्वरित भाग अभ्यासण्यासाठी अथवा तो पूर्ण झाला असल्यास घरमालक माहितीपत्रकातून निवडेल त्या दुसऱ्या पाठाचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा भेट घेण्याची योजना आखा.
६ आपला बायबल अभ्यासक्रम प्रस्तुत करण्यासाठी तुम्हाला कदाचित वापरता येईल असा एक थेट प्रस्ताव येथे दिला आहे. “अपेक्षा” माहितीपत्रक दाखवून असे म्हणा:
▪ “या माहितीपत्रकात, बायबलच्या मूलभूत शिकवणुकी सामावणारा एक व्यापक अभ्यासक्रम आहे. अनेक दशकांपासून लोकांना त्रस्त केलेल्या प्रश्नांची उत्तरं, प्रत्येक पृष्ठावर तुम्हाला आढळतील. उदाहरणार्थ, पृथ्वीकरता देवाचा काय उद्देश आहे?” पाठ ५ उघडा व पाठाच्या सुरवातीला दिलेले प्रश्न वाचा. घरमालकाला विचारा यांपैकी कोणता प्रश्न त्याला खास आस्थेचा वाटतो आणि मग त्यासंबंधित असलेले विशिष्ट परिच्छेद वाचा व यथोचित शास्त्रवचनेही पडताळा. स्पष्टीकरण द्या, की इतर प्रश्नांची समाधानकारक उत्तरेही याप्रमाणेच अगदी सहजासहजी मिळवता येतात. तुम्ही दुसऱ्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुन्हा याल असे सूचित करा.
७ किंवा बायबल अभ्यास सुरू करण्याची एक साधीसोपी पद्धत वापरण्याचा कदाचित तुम्ही प्रयत्न करू शकाल; तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “तुम्हाला हे माहीत आहे का, की केवळ काही मिनीटांतच तुम्हाला एका महत्त्वपूर्ण प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल? उदाहरणार्थ, . . .” माहितीपत्रकातील एखाद्या पाठाच्या सुरवातीला आढळणारा एक प्रश्न विचारा, अर्थात असा प्रश्न जो व्यक्तीला अपीलकारक वाटेल. कोणते प्रश्न विचारावेत याची थोडीफार कल्पना येण्यासाठी मार्च १९९७ ची आमची राज्य सेवा यातील “पुनर्भेटी करण्यास धैर्य एकवटा” या पुरवणीतले परिच्छेद १५ व १६ पाहा.
८ पुनर्भेटी करण्याचे व बायबल अभ्यास संचालित करण्याचे आव्हान आनंदाने स्वीकारणे हा देवाचे “सहकारी” होण्याचाच एक भाग आहे. (१ करिंथ. ३:९) दाखवलेली आस्था विकसित करण्यासाठी आपण कसोशीने प्रयास करतो व वाढ होण्यासाठी यहोवावर विसंबून राहतो तेव्हा दुसऱ्या कोणत्याही कार्याने कदाचित मिळू शकणार नाही असे खरे समाधान आपल्याला प्राप्त होईल.