प्रश्न पेटी
▪ ईश्वरशासित सेवा प्रशाला ग्रंथालयात कोणती प्रकाशने ठेवावीत?
देवाच्या लोकांच्या फायद्यास्तव मुबलक आध्यात्मिक प्रकाशने पुरवलेली आहेत. अनेक प्रचारकांजवळ ही सर्वच प्रकाशने नसल्यामुळे राज्य सभागृहातील ईश्वरशासित सेवा प्रशाला ग्रंथालय, कदाचित अन्यथा उपलब्ध नसणाऱ्या प्रकाशनांतून संशोधन करण्याचे एक माध्यम पुरवते. यास्तव, ते वैविध्यपूर्ण बायबल भाषांतरांनी, संस्थेची चालू प्रकाशने, आमची राज्य सेवा याच्या प्रती, टेहळणी बुरूज व सावध राहा! यांचे बांधणी केलेले खंड आणि टेहळणी बुरूज प्रकाशनांच्या सूची यांनी सुसज्जित केलेले असावे. तसेच, एक उत्तम प्रकारचा आधुनिक शब्दकोशही असावा. उपलब्ध असल्यास, विश्वकोश, ॲटलास अथवा व्याकरण आणि इतिहासाची संदर्भ पुस्तके कदाचित उपयुक्त ठरतील. तथापि, आपला अधिकतर भर, ‘विश्वासू आणि बुद्धीमान दासाने’ पुरवलेल्या प्रकाशनांवर असावा.—मत्त. २४:४५.
काही प्रसंगी असा अहवाल मिळाला आहे, की ईश्वरशासित सेवा प्रशाला ग्रंथालयात आक्षेपार्ह पुस्तके ठेवण्यात आली आहेत. कथा साहित्य, बायबलवर अतिरेक टीकात्मक विवेचने मांडणारी पुस्तके अथवा तत्त्वज्ञान किंवा पिशाचास्तित्ववाद यांवरील पुस्तके ठेवणे उचित नसेल. ईश्वरशासित सेवा प्रशाला ग्रंथालयात केवळ अशाच साहित्यास जागा असावी ज्यामुळे त्याचा उपयोग करणाऱ्यांना अखंड आध्यात्मिक वृद्धी करणे शक्य होईल.—१ तीम. ४१५.
ह्या ग्रंथालयाकरता प्रशाला पर्यवेक्षक जबाबदार असले तरी, ग्रंथालयाची देखरेख करण्यात त्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या एखाद्या बांधवास नेमले जाऊ शकते. ग्रंथालयात अद्ययावत साहित्य ठेवले जात असल्याकडे, तसेच जसजशी नवीन पुस्तके उपलब्ध होतात तसतशी त्यांचीही त्यात भर पडत असल्याकडे त्याने लक्ष द्यावे. प्रत्येक पुस्तकाच्या आतील आवरणावर पुस्तक ज्या मंडळीच्या मालकीचे आहे त्या मंडळीचे नाव सुस्पष्टपणे लिहिण्यात यावे. पुस्तकांची दुरुस्ती अथवा त्यांच्या बदली दुसरी पुस्तके ठेवण्याची गरज आहे का यासाठी प्रत्येक वर्षी त्यांची पाहणी केली जावी.
ग्रंथालयाची काळजी घेण्यात सगळेचजण सहकार्य करू शकतात. पुस्तके हाताळताना तसेच त्यांचा वापर करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. मुलांना त्यांच्याशी खेळू देऊ नये तसेच, त्यांच्यावर कोणीही खुणा करता कामा नये. राज्य सभागृहातून पुस्तके घेऊन न जाण्यासंबंधीचे एक ठळक चिन्ह स्मरणिका म्हणून ग्रंथालयात लावण्यात यावे.
सतत नवनवीन मंडळ्यांची स्थापना होत असल्यामुळे हे साहजिकच आहे, की पुष्कळशी ग्रंथालये आकारमानाने लहानच असतात. ज्या प्रचारकांजवळ आपली जुनी प्रकाशने आहेत ती मंडळीला दान करण्याचा ते विचार करू शकतात. यदाकदाचित अथवा जेव्हाकेव्हा उपलब्ध असेल तेव्हा वडील, संस्थेच्या टेहळणी बुरूजच्या बांधलेल्या खंडांच्या पुनर्मुद्रित आवृत्त्या मागवू शकतात. अशाप्रकारे, ईश्वरशासित सेवा प्रशाला ग्रंथालय ज्ञान, बुद्धी आणि समज प्रदान करणारे, देवाच्या वचनातील गुप्त निधि शोधून काढण्यास सर्वांची मदत करण्यास अत्यंत उपयुक्त ठरेल.—नीति. २:४-६.