पुनर्भेटी करण्यास धैर्य एकवटा
१ तुम्हाला पुनर्भेटी करावयास आवडतात का? अनेक प्रचारकांना आवडतात. सुरवातीला तुम्हाला जरा भीती वाटली असेल, विशेषतः पहिल्या भेटीत कमी आस्था दाखवलेल्या लोकांकडे पुन्हा जाताना तुम्हाला भीती वाटली असेल. पण पुनर्भेटीत ‘सुवार्ता सांगताना आपल्या देवाकडून तुम्ही धैर्य एकवटाल’ तेव्हा, हे कार्य किती सोपे व प्रतिफलदायी आहे हे पाहून तुम्हाला नवल वाटेल. (१ थेस्स. २:२) ते कसे?
२ खरे पाहता, पुनर्भेट व पहिली भेट यात एक महत्त्वपूर्ण फरक आहे. पुनर्भेट अनोळखी व्यक्तीला दिली जात नाही तर ओळखीच्या व्यक्तीला दिली जाते आणि सहसा अनोळखी व्यक्तीशी संभाषण करण्यापेक्षा ओळखीच्या व्यक्तीशी संभाषण करणे अधिक सोपे जाते. या कार्यात भाग घेतल्यामुळे येणाऱ्या समाधानकारक प्रतिफळांना पाहता, पुनर्भेटींमुळे फलदायक गृह बायबल अभ्यास सुरु करता येऊ शकतात.
३ घरोघरचे कार्य करण्यामध्ये, आपण पहिल्यांदा भेट दिली तेव्हा अनास्थेवाईकांकडे पुन्हा जाणे समाविष्ट आहे. मग आपण कशासाठी त्यांच्याकडे पुन्हा जात असतो? आपल्याला माहीत आहे, की लोकांची परिस्थिती नेहमी बदलते व पहिल्या भेटीत उदास किंवा विरोध करणारी व्यक्ती पुढच्या भेटीत आस्थेवाईक असल्याची आढळून येईल. ही गोष्ट लक्षात ठेवून आपण चांगली तयारी करतो व यहोवाच्या आशीर्वादाकरता प्रार्थना करतो जेणेकरून यावेळी आपल्या तोंडून असे काही निघेल ज्यामुळे ती व्यक्ती अनुकूल प्रतिसाद देईल.
४ आपल्या घरोघरच्या कार्यात, जर पहिल्यांदा काहीच आवड न दाखवलेल्या व्यक्तींना आपण स्वेच्छेने प्रचार केला, तर मग, राज्य संदेशात आस्था दाखवणाऱ्या व्यक्तींकडे आपण अधिक स्वेच्छेने पुन्हा भेट देऊ नये का?—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.
५ कोणा प्रचारकाने आपल्याकडे सहनशीलतेने पुनर्भेटी केल्या म्हणूनच आपल्यातील बहुतेक आज सत्यात आहेत. तुम्ही त्यांपैकी एक आहात तर, ‘त्या प्रचारकावर मी सुरवातीला कोणती छाप पाडली? मी राज्य संदेश ऐकल्याबरोबर लगेच स्वीकारला का? मी कदाचित त्याला उदास भासलो का?’ असे प्रश्न विचारू शकता. आपल्याकडे पुन्हा आलेल्या प्रचारकाने, आपण पुनर्भेटीच्या लायक आहोत असे समजून, ‘देवाकडून येणारे सर्व धैर्य एकवटून’ आपल्याला भेट दिली व आपल्याला सत्य शिकवू लागला. पण मग, सुरवातीला थोडीशी आस्था दाखवून नंतर आपल्याला टाळणाऱ्या व्यक्तीविषयी काय? पुढील अनुभव दाखवतो त्याप्रमाणे सकारात्मक मनोवृत्ती आवश्यक आहे.
६ एकदा दोन प्रचारक सकाळी सकाळीच रस्त्यावरील साक्षकार्य करताना एका तरुण बाईला भेटल्या जी बाबागाडीत एका मुलाला घेऊन चालली होती. त्या बाईने एक नियतकालिक घेतले आणि येत्या रविवारी दोघींना आपल्या घरी बोलवले. त्या दोघी ठरल्या वेळी गेल्या, पण ती बाई म्हणाली की तिच्याकडे बोलत बसायला वेळ नव्हता. परंतु, पुढील आठवड्यात तिला वेळ असेल असे तिने त्यांना आश्वासन दिले. ती त्यांना नक्की भेटेल की नाही याची बहिणींना शंका होती पण ते तिच्या घरी गेले तेव्हा ती बाई त्यांची वाटच पाहत होती. तिच्यासोबत अभ्यास चालू करण्यात आला आणि त्या स्त्रीची प्रगती आश्चर्य करण्याजोगी होती. लवकरच, ती नियमितरीत्या सभांना उपस्थित राहू लागली व क्षेत्र सेवेत भाग घेऊ लागली. आता तिने बाप्तिस्माही घेतला.
७ पहिल्या भेटीतच पाया घाला: यशस्वी पुनर्भेटीचा पाया सहसा पहिल्या भेटीतच घातला जातो. घरमालकाची विवेचने लक्षपूर्वक ऐका. त्यावरून तुम्हाला काय समजते? तो धार्मिक प्रवृत्तीचा आहे का? त्याला सामाजिक वादविषयांची चिंता आहे का? त्याला विज्ञान, इतिहास, पर्यावरण यात रस आहे का? भेटीच्या अंताला तुम्ही त्याला एक विचार-प्रवर्तक प्रश्न विचारू शकता व बायबल त्याचे कसे उत्तर देते त्याची चर्चा तुम्ही पुन्हा याल तेव्हा कराल असे सांगू शकता.
८ उदाहरणार्थ, परादीस पृथ्वीबद्दल बायबलचे अभिवचन घरमालकास आवडले तर त्याच विषयावर पुढे चर्चा करणे उचित ठरेल. निघण्याआधी, तुम्ही विचारू शकता: “देव हे अभिवचन पूर्ण करील याची आपण खात्री कशी बाळगू शकतो?” मग पुढे म्हणा: “कदाचित पुढच्या वेळी जेव्हा कुटुंबातील इतर मंडळी घरात असतील तेव्हा येऊन मी बायबलमधून तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर दाखवू शकेन.”
९ घरमालकाने एखाद्या विशिष्ट विषयावर आस्था दाखवली नसल्यास, आमची राज्य सेवाच्या मागील पानावरील सादरतांमध्ये दाखवलेल्या प्रश्नांपैकी एखादा प्रश्न तुम्ही विचारू शकता व त्या आधारावर पुढील चर्चा करू शकता.
१० अचूक लिखित नोंदी ठेवा: घरोघरच्या कार्याचे तुमचे नोंदपत्रक अचूक व पूर्ण असले पाहिजे. घरातून बाहेर पडण्याआधी घरमालकाचे नाव आणि पत्ता लिहून घ्या. घराचा क्रमांक किंवा रस्त्याचे नाव अमुक असेल असा अंदाज करू नका—माहिती बरोबर आहे की नाही त्याची खात्री करून घ्या. त्या व्यक्तीचे वर्णन लिहा. तुम्ही चर्चिलेल्या विषयाची, वाचलेल्या शास्त्रवचनांची, त्याला दिलेल्या कोणत्याही साहित्याची व पुन्हा आल्यावर ज्या प्रश्नाचे उत्तर देणार त्याची नोंद करा. पहिली भेट कोणत्या दिवशी व किती वाजता केली होती व पुन्हा केव्हा येणार तेही लिहा. आता ही पूर्ण नोंद जपून ठेवा, गमावू नका! ती एका सुरक्षित ठिकाणी ठेवा म्हणजे तुम्ही नंतर ती पडताळू शकता. त्या व्यक्तीबद्दल व दुसऱ्या भेटीत तुम्ही काय बोलणार त्यावर विचार करत राहा.
११ तुमचे उद्देश काय आहेत हे जाणून घ्या: सर्वप्रथम, प्रेमळ व मैत्रीपूर्ण पद्धतीने घरमालकास निश्चिंत करण्याचा होता होईल तितका प्रयत्न करा. व्यक्ती या नात्याने तुम्हाला त्याच्यामध्ये आस्था आहे हे त्याला दाखवा, पण फाजील जिज्ञासू होऊ नका. मग, मागील भेटीत तुम्ही त्याला विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाची आठवण करून द्या. त्याचे मत लक्षपूर्वक ऐका आणि त्याच्या मताविषयी प्रामाणिकपणे कृतज्ञता व्यक्त करा. त्यानंतर, बायबलचा दृष्टिकोन व्यावहारिक का आहे ते दाखवा. शक्य असल्यास, सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातील एखाद्या संबंधित विचाराकडे त्याचे लक्ष आकर्षित करा. बायबल अभ्यास चालू करणे हा पुनर्भेट करण्यामागे तुमचा मुख्य उद्देश आहे हे लक्षात ठेवा.
१२ ज्ञान पुस्तकातील सरळपणाने आपल्यातील अनेकांना, बायबल अभ्यासांमध्ये विद्यार्थ्यांना सभांना उपस्थित राहण्याचे व यहोवाच्या संघटनेशी संगती करण्याचे उत्तेजन देण्यासाठी धैर्य एकवटण्यास प्रेरित केले आहे. गत काळात, आपल्यासोबत संगती करण्याचे आमंत्रण देण्याआधी काही काळापर्यंत त्यांच्यासोबत अभ्यास करेपर्यंत थांबून राहण्याची आपली प्रवृत्ती होती. आता, अनेक विद्यार्थी अभ्यास करण्यास चालू केल्या केल्या सभांना उपस्थित राहत आहेत व त्यामुळे ते जलद प्रगती करत आहेत.
१३ एकदा एका जोडप्याने एका सहकर्मचाऱ्याला अनौपचारिक साक्ष दिली. सत्यामध्ये त्याने आस्था व्यक्त केल्यावर त्यांनी त्याच्यासमोर ज्ञान पुस्तकातून बायबल अभ्यास करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याच वेळी त्यांनी त्याला सांगितले की त्याने सभांना उपस्थित राहिले पाहिजे जेथे त्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली जातील. त्या मनुष्याने अगदी आनंदाने अभ्यास करण्याचे आमंत्रण स्वीकारले, एवढेच नव्हे तर त्याने आठवड्यातून दोनदा अभ्यास केला व नियमितरीत्या राज्य सभागृहात होणाऱ्या सभांना उपस्थित राहू लागला.
१४ देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकाचा उपयोग करा: “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” या प्रांतीय अधिवेशनांत देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक मिळाले. देवभीरू लोकांचा शैक्षणिक दर्जा कितीही असला तरी, त्यांच्यासोबत बायबल अभ्यास चालू करण्यासाठी हे माहितीपत्रक अतिशय उपयोगी आहे. त्यामध्ये, बायबलच्या मूलभूत शिकवणुकींचा बहुव्यापक अभ्यासक्रम आहे. देवाचे ज्ञान विदित करण्याकरता हे प्रकाशन अतिशय प्रभावकारी साधन ठरेल. ते सत्याचे वर्णन इतक्या स्पष्ट व सरळपणे करते की वास्तविकतेत आपण सर्व जण देवाच्या अपेक्षा इतरांना शिकवण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो. कदाचित, अनेक प्रचारकांना या माहितीपत्रकाद्वारे बायबल अभ्यास चालवण्याचा विशेषाधिकार मिळेल.
१५ ज्ञान पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे तितका वेळ नाही अशी समज असलेले लोक अपेक्षा माहितीपत्रकाच्या संक्षिप्त सत्रांद्वारे अभ्यास करण्यास तयार होतील. ते जे काही शिकत आहेत त्यामुळे ते पुलकित होतील! दोन अथवा तीन पानांतच त्यांना, देव कोण आहे? दियाबल कोण आहे? देवाचा पृथ्वीबद्दल काय उद्देश आहे? देवाचे राज्य काय आहे? तुम्हाला खरा धर्म कसा मिळू शकतो? यासारख्या अनेक शतकांपासून लोकांना बुचकळ्यात पाडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. ते माहितीपत्रक सत्य अगदी सोप्या शब्दांत मांडत असले तरी, त्याचा संदेश शक्तिशाली आहे. त्यात ते मुख्य मुद्दे आहेत ज्यांची उजळणी वडीलजन बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांसोबत करतील व ज्ञान पुस्तकाच्या कसून अभ्यासाकरता ते प्राथमिक साधन ठरू शकेल.
१६ पुनर्भेटीत अभ्यास सादर करण्याकरता तुम्ही असे म्हणू शकता: “तुम्हाला माहीत होते का, की काही मिनिटांमध्येच तुम्हाला एका महत्त्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर मिळू शकते?” मग, माहितीपत्रकातील एखाद्या अध्यायाच्या सुरवातीला असलेला एखादा प्रश्न विचारा. जसे की, चर्चला जाणाऱ्या व्यक्तीकडे तुम्ही पुनर्भेट करीत असल्यास तुम्ही म्हणू शकता: “येशूने गत काळात लोकांना बरे केले हे आपल्याला माहीत आहे. पण भवितव्यात येशू रोग्यांसाठी, वृद्ध जनांसाठी, मृतांसाठी काय करील?” यांची उत्तरे ५ व्या पाठात सापडतील. धार्मिक प्रवृत्तीच्या कोणत्याही मनुष्याची, “देव सर्वच प्रार्थना ऐकतो का?” या प्रश्नाने उत्सुकता वाढू शकेल. त्याचे उत्तर ७ व्या पाठात आहे. कौटुंबिक सदस्यांना “पालक आणि मुलांकडून देव काय अपेक्षितो?” हे जाणून घेण्यास आवडेल. ८ व्या पाठाचा अभ्यास केल्यावर त्यांना त्याचे उत्तर मिळेल. इतरही प्रश्न आहेत: ११ व्या पाठात “मृत जिवंतांना इजा पोहंचवू शकतात का?” या प्रश्नाचे स्पष्टीकरण दिले आहे; “ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे इतके धर्म का आहेत?” हा १३ व्या पाठात चर्चिलेला प्रश्न; आणि “देवाचा मित्र होण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे?” हा १६ व्या पाठातील प्रश्न.
१७ इतर भाषा बोलणाऱ्यांना मदत करा: इतर भाषा बोलणाऱ्या घरमालकांविषयी काय? शक्य असल्यास, त्यांना जी भाषा चांगल्याप्रकारे येते तीत त्यांना शिकवले तर बरे होईल. (१ करिंथ. १४:९) तुमच्या मंडळीत कदाचित घरमालकाची भाषा बोलणारे एक अथवा अधिक प्रचारक असल्यास घरमालकाशी त्यांची ओळख करून दिल्यावर त्यांनाच तो अभ्यास पुढे चालवण्यास तुम्ही सांगू शकता. कदाचित त्या भाषेची जवळपास एखादी मंडळी अथवा पुस्तक अभ्यास गटही असू शकतो. जवळपास मंडळ्या किंवा गट नसल्यास व घरमालकाची भाषा बोलणारा कोणी स्थानिक प्रचारकही नसल्यास, प्रचारक दोन भाषांतील अपेक्षा माहितीपत्रकाचा उपयोग करून घरमालकासोबत अभ्यास करण्याचा प्रयत्न करू शकतो.
१८ एका इंग्रजी भाषिक प्रचारकाने, व्हिएतनामी भाषा बोलणारा मनुष्य आणि थाई भाषा बोलणाऱ्या त्याच्या पत्नीसोबत अभ्यास चालू केला. अभ्यासादरम्यान इंग्रजी, व्हिएतनामी व थाई भाषांतील प्रकाशनांचा व बायबलांचा उपयोग केला जात होता. भाषेचा अडथळा सुरवातीला प्रचारकाला आव्हान वाटला पण तो लिहितो: “त्या जोडप्याने त्वरित आध्यात्मिक प्रगती केली. त्यांनी आपल्या दोन मुलांसह सभांना उपस्थित राहण्याची गरज ओळखली व ते रोज रात्री कुटुंब या नात्याने बायबलचे वाचन करतात. त्यांची सहा वर्षीय मुलगी स्वतः एक बायबल अभ्यास संचालन करते.”
१९ इतर भाषा बोलणाऱ्या लोकांचा अभ्यास घेताना, घाईने बोलू नका, स्पष्ट बोला व सोपे शब्द व वाक्यप्रचार वापरा. परंतु, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, इतर भाषा बोलणाऱ्या लोकांना आदराने वागवले पाहिजे. त्यांना लहान मुलांसारखे वागवू नका.
२० अपेक्षा माहितीपत्रकातील सुंदर चित्रांचा चांगला उपयोग करा. “एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे आहे,” तर माहितीपत्रकातील अनेक चित्रे घरमालकासाठी माहितीपूर्ण ठरतील. घरमालकास स्वतःच्या बायबलमधून वचने वाचण्यास उत्तेजन द्या. तुम्ही अभ्यास अशा वेळी घेऊ शकत असाल जेव्हा कुटुंबातील एखादा सदस्य तुम्ही बोलत असलेल्या भाषेचे भाषांतर करू शकेल तर घरमालकाचा खूपच फायदा होईल, यात काहीच संशय नाही.—पाहा आमची राज्य सेवा, नोव्हेंबर १९९०, पृष्ठे ३-४; एप्रिल १९८४, पृष्ठ ८.
२१ विलंब न लावता पुनर्भेटी करा: पुनर्भेट करण्याआधी तुम्ही किती वेळ थांबावे? काही प्रचारक पहिल्या भेटीनंतर एक अथवा दोन दिवसातच भेट देतात. इतरजण तर त्याच दिवशी जातात! हे फारच लवकर होत नाही का? सहसा, घरमालकांना त्याबद्दल काही वाटत नाही. पण, पुनर्भेट करणाऱ्या प्रचारकालाच धैर्यासह सकारात्मक मनोवृत्ती विकसित करण्याची अनेकदा गरज असते. पुढील अनुभवांचा विचार करा.
२२ एका १३ वर्षीय प्रचारकाने घरोघरचे कार्य करीत असताना दोन स्त्रियांना एकत्र येताना पाहिले. जेथे कोठे लोक भेटतात तेथे त्यांना प्रचार करण्याच्या उत्तेजनाची जाणीव असल्यामुळे तो त्या स्त्रियांकडे गेला. त्यांनी राज्य संदेशामध्ये आस्था दाखवली आणि प्रत्येकीने ज्ञान पुस्तक घेतले. त्या तरुण बांधवाने त्यांचा पत्ता लिहून घेतला व दोन दिवसांनंतर त्यांच्याकडे गेला व प्रत्येकीसोबत बायबल अभ्यास चालू केला.
२३ एक भगिनी पुढील आठवडी भेट देण्याची व्यवस्था करते. पण, पहिली भेट देऊन दोन दिवस उलटल्यावर घरमालकिणीसोबत चर्चिलेल्या विषयाचे एक नियतकालिक देण्याकरता ती सहज तिच्याकडे जाते. ती तिला म्हणते: “मी हा लेख पाहिला आणि मला वाटले तुम्हालाही तो वाचायला आवडेल. मी आता बोलत बसू शकत नाही पण ठरल्याप्रमाणे मी बुधवारी दुपारी येईन. मी तेव्हा आले तर तुम्हाला काही हरकत तर नाही ना?”
२४ एखादी व्यक्ती सत्यामध्ये आस्था दाखवते तेव्हा, तिला या नाही तर त्या मार्गाने विरोधाचा सामना करावा लागेल याची आपल्याला खात्री आहे. पहिली भेट दिल्यानंतर लागलीच दुसरी भेट दिल्याने ती व्यक्ती नातेवाईकांकडून, निकटच्या मित्रांकडून व इतरांकडून येणाऱ्या कोणत्याही दबावात टिकून राहण्यास समर्थ होईल.
२५ सार्वजनिक ठिकाणी भेटणाऱ्यांनी दाखवलेली आस्था वाढवा: आपल्यातील अनेकांना रस्त्यांवर, वाहने उभी करण्याच्या जागी, सार्वजनिक परिवहन, शॉपींग सेंटर्समध्ये, बागेत व इतरत्र प्रचार करायला आवडते. साहित्य सादर करण्यासोबत आपण आस्थाही वाढवली पाहिजे. या उद्देशास्तव, आपण भेटणाऱ्या प्रत्येक आस्थेवाईक व्यक्तीचे नाव, पत्ता आणि शक्य असल्यास दूरध्वनी क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही माहिती मिळवणे तुम्हाला वाटते तितते कठीण नाही. संभाषण समाप्त होण्याआधी, तुमचे नोंदपुस्तक काढा व विचारा: “आपले हे संभाषण पुढे चालू ठेवता येईल का?” किंवा म्हणा: “माझी इच्छा आहे की तुम्ही एक लेख वाचावा जो तुम्हाला आवडेल असे मला वाटते. तो मी तुमच्या घरी किंवा कार्यालयात आणला तर चालेल का?” एक बांधव फक्त असे विचारतो: “तुमचा फोन नंबर काय आहे जेणेकरून मी तुमच्याशी बोलू शकेन?” त्याने दिलेल्या अहवालानुसार, तीन महिन्यांदरम्यान तीन व्यक्तींना सोडून इतर सर्व लोकांनी त्याला आनंदाने आपला दूरध्वनी क्रमांक दिला.
२६ आस्थेचा शोध घेऊन ती वाढवण्यासाठी दूरध्वनीचा उपयोग करा: कडक सुरक्षा असलेल्या इमारतींमधील लोकांप्रत पोहंचण्याकरता एक पायनियर भगिनी दूरध्वनीचा उपयोग करते. ती पुनर्भेटीही अशाच प्रकारे करते. पहिल्या भेटीत ती म्हणते: “मला माहीत आहे तुम्ही मला ओळखत नाही. बायबलमधील एक विचार सांगण्यासाठी मी तुमच्या क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. तुम्हाला थोडासा वेळ असेल तर मी तुम्हाला . . . येथील एक अभिवचन वाचून दाखवू इच्छिते.” शास्त्रवचन वाचल्यावर ती म्हणते: “ती वेळ आपल्याला पाहावयास मिळाली तर किती चांगले होईल नाही का? तुम्हाला हे वाचून दाखवायला मला आवडले. तुम्हालाही आवडले असल्यास, मी पुन्हा फोन करून दुसऱ्या एका शास्त्रवचनाची चर्चा करीन.”
२७ दुसऱ्यांदा फोन करताना ती घरमालकाला, गेल्या वेळच्या त्यांच्या संभाषणाची आठवण करून देते व म्हणते की सर्व दुष्टाई निघून गेल्यावर कोणती परिस्थिती असेल त्याबद्दल ती बायबलमधून त्यांना काही वाचून दाखवू इच्छिते. मग ती घरमालकासोबत बायबल आधारित संक्षिप्त चर्चा करते. अशा अनेक दूरध्वनी संभाषणांनंतर ३५ लोकांनी तिला त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले व सात गृह बायबल अभ्यास चालू करण्यात आले! पावसाळ्यात चिखलामुळे किंवा पाण्याने रस्ते तुडुंब भरल्यामुळे अथवा आजारपणामुळे तुम्हाला आस्थेवाईक लोकांना पुनर्भेटी देण्यास काहीवेळा कठीण वाटते का? तर, शक्य असल्यास दूरध्वनीने त्यांच्याशी संपर्क साधण्यास काही हरकत आहे का?
२८ व्यापारी क्षेत्रात दाखवलेल्या आस्थेचा मागोवा घ्या: दुकानादुकानातून नियतकालिकांचे वाटप करण्याच्या कार्यात पुष्कळ काही गोवलेले आहे. अनेक दुकानदारांना सत्यामध्ये प्रांजळ आस्था असते, ती आस्था वाढवली पाहिजे. काही बाबतीत, दुकानातच किंवा त्यांच्या कार्यालयातच त्यांच्याशी बायबलची चर्चा करणे किंवा अभ्यास घेणे शक्य असते. इतर बाबतीत, दुपारच्या सुटीत किंवा इतर सोयीस्कर वेळेला तुम्ही आणि आस्थेवाईक व्यक्ती भेटू शकता.
२९ एकदा एक प्रवासी पर्यवेक्षक एका लहानशा किराणा मालाच्या दुकानाच्या मालकाशी बोलत होते व बायबल अभ्यास कसा घेतला जातो त्याचे प्रदर्शन दाखवण्याची परवानगी मागितली. हे प्रदर्शन किती वेळाचे असेल असे त्या दुकानदाराने विचारले तेव्हा प्रवासी पर्यवेक्षकांनी सांगितले की फक्त १५ मिनिटांचे. दुकानदाराने लागलीच, “दुकान २० मिनिटांनी पुन्हा उघडले जाईल,” असा फलक दारावर लावला, खुर्च्या मांडल्या आणि दोघांनी ज्ञान पुस्तकातून पहिल्या पाच परिच्छेदांची चर्चा केली. या प्रांजळ मनुष्याला जी माहिती समजली त्यामुळे तो इतका प्रभावित झाला की त्या रविवारी तो जाहीर सभा आणि टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या अभ्यासाला उपस्थित राहिला व पुढील आठवडी अभ्यास चालू ठेवण्यास राजी झाला.
३० व्यापारी क्षेत्रात अभ्यास सादर करण्याकरता तुम्ही म्हणू शकता: “आमच्या अभ्यास कार्यक्रमाचे प्रदर्शन करण्याकरता फक्त १५ मिनिटांची गरज आहे. तुमच्या सोयीचे असल्यास, ते कसे असते हे तुम्हाला दाखवण्यास मला आवडेल.” सांगितलेल्या वेळेतच संपवा. व्यापारी क्षेत्रात जास्त वेळ चर्चा करणे शक्य नसल्यास, दुकानदाराच्या घरी जाणे उचित असेल.
३१ साहित्य घेतलेले नसले तरी पुन्हा भेट द्या: साहित्य घेतलेले असले किंवा नसले तरी, थोडीशी आस्था दिसल्यास पुनर्भेट करणे आवश्यक आहे. अर्थात, घरमालकाला राज्य संदेशात आस्था नाही हे स्पष्ट झाल्यावर दुसरीकडे प्रयत्न करणे बरे राहील.
३२ दारोदारचे कार्य करताना, एक भगिनी एका स्त्रीला भेटली जी अतिशय मैत्रिपूर्ण होती पण तिने अगदी ठामपणे नियतकालिके नाकारली. प्रचारक लिहिते: “मी खूप दिवस तिच्याबद्दल विचार केला आणि मग मी तिच्याशी पुन्हा बोलले पाहिजे असे मला वाटले.” त्या भगिनीने प्रार्थना केली, धैर्य एकवटले व त्या स्त्रीचे दार वाजवले. घरमालकिणीने तिला आत येण्यास सांगितले तेव्हा तिला किती आनंद वाटला. बायबल अभ्यास चालू करण्यात आला व दुसऱ्या दिवशीही अभ्यास झाला. कालांतराने, ती घरमालकीण सत्यात आली.
३३ होता होईल तितके साध्य करण्यासाठी पूर्वयोजना करा: दर आठवडी पुनर्भेट करण्यात काही वेळ खर्च केला पाहिजे अशी शिफारस केली जाते. सुयोजना केल्यास पुष्कळ काही साध्य करता येते. तुम्ही जेथे घरोघरी कार्य करणार आहात त्या क्षेत्रातील पुनर्भेटी करण्याची योजना करा. साक्षकार्य केल्यानंतर पुनर्भेट करण्याकरता वेळ काढा. गट या नात्याने कार्य करता तेव्हा तुमच्याबरोबर इतरांनाही पुनर्भेटीला घेऊन जा व तुम्हीही त्यांच्या पुनर्भेटींना जा जेणेकरून प्रत्येक जण एकमेकांच्या कौशल्यातून व अनुभवातून काही तरी शिकू शकतो.
३४ पुनर्भेटी करण्यात व गृह बायबल अभ्यास सुरू करण्यात यश मिळालेल्यांचे म्हणणे आहे, की लोकांमध्ये खरोखरच आस्था दाखवणे तसेच भेट दिल्यावरही त्यांच्याबद्दल विचार करणे महत्त्वाचे आहे. तसेच, चर्चेसाठी अपीलकारक बायबल विषय असणे व पहिली भेट संपण्याआधी पुनर्भेटीचा पाया घालणे आवश्यक आहे. याशिवाय, दाखवलेल्या आस्थेचा लागलीच मागोवा घेणे महत्त्वाचे आहे. बायबल अभ्यास चालू करण्याचा आपला उद्देश मनात सतत बाळगणे आवश्यक आहे.
३५ पुनर्भेटीत यश मिळवण्यासाठी धैर्य हा गुण महत्त्वाचा आहे. धैर्य कसे मिळवले जाते? प्रेषित पौल उत्तरतो, की इतरांना सुवार्तेची घोषणा करण्यासाठी आपल्याला “देवाकडून” मिळालेले ‘धैर्य एकवटल्याने’ ते मिळवता येते. या क्षेत्रात तुम्हाला प्रगती करायची आहे तर यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना करा. मग, तुमच्या प्रार्थनांच्या सुसंगतेत, दाखवलेल्या आस्थांचा मागोवा घ्या. यहोवा तुमच्या प्रयत्नांवर नक्कीच आशीर्वाद देईल!
पुनर्भेट करण्यात यशस्वी कसे होता येईल
◼ लोकांमध्ये प्रामाणिक व्यक्तिगत आस्था दाखवा.
◼ चर्चेसाठी अपीलकारक बायबल विषय निवडा.
◼ लागोपाठच्या प्रत्येक भेटीसाठी पाया स्थापित करा.
◼ बाहेर निघाल्यावरही त्या व्यक्तिबद्दल विचार करत राहा.
◼ आस्थेचा मागोवा घेण्याकरता एक अथवा दोन दिवसांनी पुन्हा जा.
◼ बायबल अभ्यास चालू करणे हा तुमचा उद्देश आहे हे लक्षात ठेवा.
◼ या कार्याकरता धैर्य एकवटण्यासाठी प्रार्थना करा.