सर्व माणसांचे तारण व्हावे
१ “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे,” अशी यहोवाची इच्छा आहे. (१ तीम. २:४) आनुवंशिकता, पार्श्वभूमी आणि परिस्थितीचा लोकांवर प्रभाव पडत असला तरी त्यांच्याकडे इच्छास्वातंत्र्य आहे आणि आपण आपले जीवन कशाप्रकारे उपयोगात आणावे याची ते निवड करू शकतात. चांगल्या गोष्टी करण्याद्वारे ते जिंवत राहू शकतात किंवा वाईट गोष्टी करण्याद्वारे स्वतःवर नाश ओढवून घेऊ शकतात. (मत्त. ७:१३, १४) आपण लोकांकडे राज्याची सुवार्ता घेऊन जातो तेव्हा या गोष्टीचा आपल्या दृष्टिकोनावर कसा परिणाम होतो?
२ एखाद्या मनुष्याची सत्यातील आस्था राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमी अथवा सामाजिक स्थान वगैरे बाबींवर अवलंबून आहे, असा अंदाज काढू नये. कमी किंवा जास्त शिक्षण झालेल्यांना तसेच राजकीय कामांत गुंतलेल्यांना, धंदेवाईकांना, नास्तिकांना, अज्ञेयवाद्यांना आणि कुप्रसिद्ध अपराध्यांना देखील सत्य अपीलकारक वाटू शकते. सर्व पार्श्वभूमींतील आणि सामाजिक स्तरांतील लोकांनी आपल्या गतकाळातील आचारणात बदल केला आहे आणि देवाच्या नवीन जगात जीवन प्राप्त करण्याची ते वाट पाहत आहेत. (नीति. ११:१९) यामुळे, समाजातील प्रत्येक क्षेत्रातील लोकांना राज्याचा संदेश देण्याकरता आपण कांकू करता कामा नये.
३ पुढील उदाहरणे पाहा: आपल्या सावत्र वडलांना जिवानिशी मारण्याची एका मनुष्याने मनात खूणगाठ बांधली पण त्याने तसे केले नाही. त्यानंतर आत्महत्या करण्याचे त्याने ठरवले परंतु तेही त्याला जमले नाही. चोरी आणि मादक पदार्थांची ने-आण केल्यामुळे त्याला तुरुंगात डांबण्यात आल्यानंतर त्याचा विवाह देखील मोडकळीस आला. आज हा मनुष्य प्रामाणिकपणे जीवन जगत आहे आणि आपल्या वैवाहिक जीवनाचा तसेच आपल्या सावत्र वडलांसोबत्याच्या जिव्हाळ्याच्या नातेसंबंधाचा आस्वाद घेत आहे. हा बदल कोणत्या गोष्टीमुळे झाला? त्याने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास केला आणि शिकलेल्या गोष्टी कार्यात उतरवल्या. तो तारणासाठी पात्र नाही, असे यहोवाला त्याच्याविषयी वाटले नाही.
४ एका युवतीला टिव्ही कार्यक्रमातील नटी, अशी प्रसिद्धी मिळाली असतानाही ती आनंदी नव्हती. परंतु साक्षीदारांच्या उत्तम नैतिक वर्तणुकीने प्रभावित होऊन तिने बायबल अभ्यास स्वीकारला आणि राज्याच्या सुवार्तेबद्दल शिकविण्यासाठी लोकांना मदत करण्याचे देखील तिने आरंभिले. दारोदारच्या सेवाकार्यात ती ज्या-ज्याठिकाणी गेली त्या-त्याठिकाणी लोकांनी तिला ओळखले, परंतु लोकांनी आपल्याला नटी म्हणून ओळखण्यापेक्षा यहोवाची साक्षीदार म्हणून ओळखावे, अशी आपली इच्छा असल्याचे तिने आनंदाने सांगितले.
५ टेहळणी बुरूज वर्गणीदारासोबत बायबल अभ्यास घेण्याची व्यवस्था एका महिला साक्षीदाराने केली तेव्हा वर्गणीदाराच्या शेजारणीने त्याविषयी ऐकले आणि ती देखील अभ्यासाला बसू लागली. या शेजारणीने लगेचच सत्याचा अंगीकार केला कारण या सत्याचा ती पुष्कळ काळापासून शोध घेत होती! तिने आणि तिच्या पतीने आधी मान्य केलेला घटस्फोटाचा हुकूम आता त्यांनी रद्द केला आणि त्यांची दिलजमाई झाली. ती स्त्री ज्योतिषशास्त्रात पूर्णपणे बुडून गेली होती आणि आत्मिकवादी संप्रदायांशी देखील तिचा संबंध होता परंतु पिशाच्चवादाशी संबंधित असलेली आपल्याजवळील महागडी पुस्तके आणि इतर सर्व वस्तू तिने तत्काळ फेकून दिल्या. लवकरच ती सभांना येऊ लागली आणि तिला प्राप्त झालेल्या या नवीन विश्वासाबद्दल आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना सांगू लागली. आता ती इतरांना उत्साहाने साक्ष देते.
६ आपण एखाद्याच्या बाबतीत आधीच निर्णय घेऊ नये. उलटपक्षी, आपण सर्व ठिकाणच्या लोकांना आवेशाने सुवार्ता सांगू या. ‘हृदय पाहणारा’ यहोवा “सर्व माणसांचा . . . तारणारा” होईल, असा विश्वास बाळगण्याचे आपल्याकडे सबळ कारण आहे.—१ शमु. १६:७; १ तीम. ४:१०.