भाषण आणि वर्तन यांमध्ये कित्ता व्हा
१ प्रेषित पौलाने तीमथ्याला भाषण आणि वर्तन यांत कित्ता होण्यास आर्जवले. (१ तीम. ४:१२) आपणही उदाहरणशील भाषण आणि वर्तन प्रदर्शित केले पाहिजे, विशेषतः सेवाकार्यात सामील होताना कारण असे केल्याने आपण भेटणाऱ्यांच्या अंतःकरणाप्रत पोहंचतो की नाही हे ठरवले जाईल.
२ आपण शिष्टाचाराचे सर्व गुण त्याचप्रमाणे सभ्यता, विचारशीलता, नम्रता, शालीनता व व्यवहार चातुर्य देखील प्रदर्शित केले पाहिजे. हे गुण प्रतिबिंबित केल्याने, आपल्या कृती इतरांच्या भावनांवर कसा परिणाम करतात याची आपल्याला जाणीव असल्याचे आपण दाखवून देतो. सेवाकार्यातील शिष्टाचाराची तुलना भोजनात रुची आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांशी केली जाऊ शकते. त्यांच्याविना, आरोग्यकारक अन्न पांचट आणि बेचव लागू शकते. इतरांबरोबरच्या व्यवहारात शिष्टाचार न दाखवल्याने अशाच प्रकारचा परिणाम होऊ शकतो.—कलस्सै. ४:६.
३ भाषणात कित्ता व्हा: मैत्रिपूर्ण स्मित आणि मनापासूनचे अभिवादन सुवार्तेच्या आपल्या प्रस्तुतीतील महत्त्वपूर्ण घटक आहेत. उबदारपणा आणि प्रांजळपणा यांनी आपली प्रस्तावना आपण रुचकर बनवतो तेव्हा, आपल्याला घरमालकाविषयी खरोखर आस्था असल्याचे दाखवून देतो. तो बोलत असताना, काळजीपूर्वक ऐका आणि त्याच्या अभिप्रायाविषयी योग्य तो आदर प्रदर्शित करा. तुम्ही बोलत असताना, व्यवहार चातुर्याने आणि सुखकारक वाटेल अशा तऱ्हेने बोला.—पडताळा प्रे. कृत्ये ६:८.
४ अधूनमधून आपल्याला कठोर एवढेच काय तर कदाचित भांडखोर व्यक्ती देखील भेटते. आपली प्रतिक्रिया काय असावी? पेत्राने आपल्याला “सौम्यतेने व भिडस्तपणाने” बोलायला उद्युक्त केले. (१ पेत्र ३:१५; रोम. १२:१७, १८) येशूने म्हटले, की एखाद्या घरमालकाने राज्य संदेशाला निष्ठुरतेने नाकारल्यास आपण फक्त ‘आपल्या पायाची धूळ झटकून टाकली पाहिजे.’ (मत्त. १०:१४) अशा परिस्थितींमध्ये उदाहरणशील आचार प्रकट केल्यास कालांतराने विरोधकाचे हृदय पिघळू शकेल.
५ वर्तनात कित्ता व्हा: वर्दळ असलेल्या रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी सुवार्तेचा प्रचार करत असताना आपण विचारशील असावे, मोठ्याने बोलू नये अथवा आग्रह करू नये आणि ये-जा करणाऱ्या लोकांमध्ये अडथळा बनू नये हे आवश्यक आहे. आस्थेवाईक व्यक्तींच्या घरात असताना, त्यांच्या आदरातिथ्याबद्दल कदर व्यक्त करून विनयशील पाहुण्यांसारखी सभ्यता आणि उचित वर्तणूक राखणे आवश्यक आहे. आपल्यासोबत असणाऱ्या लहान मुलांनी घरमालक व त्याच्या मालकीच्या वस्तुंबद्दल आदर दाखवावा आणि आपण बोलत असताना सभ्य असावे व लक्ष द्यावे. मुले बेशिस्त असल्यास, वाईट छाप पाडली जाईल.—नीति. २९:१५.
६ आपल्या व्यक्तिगत पेहरावाने इतरांना हे स्पष्ट केले पाहिजे की आपण देवाच्या वचनाचे सेवक आहोत. वेशभूषा आणि केशभूषेच्या बाबतीत, आपण गबाळे व गचाळ नसावे तसेच डोळ्यात भरून येणारे व अमर्याद देखील नसावे. आपले स्वरूप नेहमीच सुवार्तेस शोभेल असे असावे. (पडताळा फिलिप्पैकर १:२७.) आपले स्वरूप आणि साधने यांकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्याने आपण इतरांना अडखळण्याचे अथवा आपल्या सेवाकार्यात दोष काढण्याचे कारण देणार नाही. (२ करिंथ. ६:३, ४) आपले उदाहरणशील भाषण व वर्तन राज्य संदेशाला एक आकर्षक मोल देऊन यहोवाला गौरव देतात.—१ पेत्र २:१२.