प्रचार करण्यास कोण पात्र आहे?
१ सेवेची बाब येते तेव्हा तुम्हाला कधी मोशेसारखे वाटले आहे का? तो म्हणाला: “हे प्रभू, मी बोलका नाही; पूर्वीहि नव्हतो, व तू आपल्या दासापाशी बोललास तेव्हापासूनहि नाही.” (निर्ग. ४:१०) तुम्हाला तसे वाटत असल्यास, तुम्ही बोलायला कचरत असाल. तथापि, येशूने ‘आपल्याला लोकांस उपदेश करण्याची व संपूर्ण साक्ष देण्याची आज्ञा दिली आहे.’ (प्रे. कृत्ये १०:४२) म्हणून, आपण सुवार्तेचे पात्र प्रचारक कसे बनतो?
२ आपले लौकिक शिक्षण किती आहे त्यावरून आपण सेवेकरता पात्र ठरत नसतो. पौलाने म्हटले, की ‘जगाच्या दृष्टीने ज्ञानी असलेल्या पुष्कळांचे पाचारण झालेले नाही’ आणि “ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे.” (१ करिंथ. १:२६; ३:१९) येशूने कामगार वर्गातूनच आपले प्रेषित निवडले—त्यापैकी निदान चार जणांचा तर मासेमारीचा व्यवसाय होता. प्रौढ धार्मिक पुढाऱ्यांनी त्यांना “निरक्षर व अज्ञानी इसम” म्हणून तुच्छ लेखले. प्रेषित, जगिक प्रमाणांनुसार प्रचार करण्यास अपात्र ठरत होते. तरीही, पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्राने निपुणतेने भाषण दिल्यामुळे ३,००० जण बाप्तिस्मा घेण्यास प्रवृत्त झाले!—प्रे. कृत्ये २:१४, ३७-४१; ४:१३.
३ यहोवा आपल्याला प्रचारासाठी पात्र ठरवतो: पौलाने असे सांगितले: “आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे.” (२ करिंथ. ३:५) यहोवा, जो बुद्धीचा उगम आहे त्याने लाखो लोकांस राज्याबद्दलच्या सत्याचा प्रचार इतरांना करण्याचे शिकवले आहे. (यश. ५४:१३) या कार्याचा प्रभावीपणा आणि फलदायीपणा, मागील वर्षी, जिवंत “शिफारसपत्रे” या नात्याने ज्या ३,३८,४९१ जणांचा बाप्तिस्मा झाला यांच्यामध्ये दिसून येतो. (२ करिंथ. ३:१-३) यहोवाकडून शिकलेल्या गोष्टींचा धैर्याने आणि खात्रीने प्रचार करण्यासाठी आपल्याकडे कारण आहे.
४ देवाच्या संघटनेने सेवकांसाठी एक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम प्रस्थापित केला आहे. शास्त्रवचने आणि बायबल अभ्यासाच्या वैविध्यपूर्ण साधनांद्वारे, आपल्याला प्रचारासाठी ‘पूर्ण व सज्ज होण्यासाठी’ शिकवले व प्रशिक्षण दिले जाते. (२ तीम. ३:१६, १७) संस्थेच्या प्रकाशनांमधील विद्वत्ता पाहून अनेकजण प्रभावित झाले आहेत. उदाहरणार्थ, एका स्विडिश नियतकालिकात असे म्हटले होते: “यहोवाचे साक्षीदार ज्या विश्वासाचा प्रचार करतात त्यामागे एक अद्भुत उच्च शिक्षणाची आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणावरील बायबल विद्वत्ता आहे.”
५ आपल्या पाच साप्ताहिक सभांमध्ये दिले जाणारे मार्गदर्शन, बायबल वाचन आणि अभ्यासाचा आपला कार्यक्रम, ईश्वरशासित सेवा प्रशालेतील सल्ला, अनुभवी सेवकांकडील व्यक्तिगत साहाय्य, तसेच सर्वात अधिक म्हणजे, यहोवाच्या पवित्र आत्म्याचे पाठबळ या सर्व गोष्टींमुळे आपण प्रचार करण्यास पूर्णपणे पात्र आहोत असा यहोवाचा आपल्याबद्दल दृष्टिकोन आहे याची आपण खात्री बाळगू शकतो. “देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहो.”—२ करिंथ. २:१७.
६ देव त्याच्या संघटनेद्वारे पुरवत असलेल्या ईश्वरशासित प्रशिक्षणाचा आपण पूर्ण फायदा घेतला, तर कचरण्याचे किंवा घाबरण्याचे काहीच कारण नाही. आपण हर्षाने इतरांना प्रचार करू शकतो व यहोवा आपल्या परिश्रमांना आशीर्वादित करील याची खात्री बाळगू शकतो.—१ करिंथ. ३:६.