पुन्हा सेवा करण्यास त्यांना मदत करा
१ प्रेषित पौलाने आपल्या सह-ख्रिश्चनांना संभाव्य आध्यात्मिक धोका असल्याचे ओळखून असे लिहिले: “तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे; कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे.” (रोम. १३:११) पौलाला आध्यात्मिकरित्या सुस्त झालेल्या त्याच्या बांधवांबद्दल चिंता होती; नव्याने कार्यहालचाल करण्यास त्यांना जागृत करण्याकरता तो उत्सुक होता.
२ या जुन्या जगाची रात्र सरून, आता नवीन जगाचा दिवस अगदी जवळ आला आहे असे निश्चितच म्हणता येऊ शकते. (रोम. १३:१२) सुवार्तेचे प्रचारक या नात्याने आपल्यासोबत संगती राखण्याचे सोडून दिलेल्या बांधवांबद्दल चिंता करण्याचे उचित कारण आपल्याजवळ आहे. एकट्या भारतात, मागील सेवा वर्षात, २३० पेक्षा अधिक प्रचारकांना पुन्हा एकदा सक्रिय करण्यात आले. आपण इतर निष्क्रिय जणांना पुन्हा यहोवाची सेवा करण्यास कशी मदत करू शकतो?
३ वडील काय करू शकतात: निष्क्रिय असलेल्या अनेकांनी सत्य त्यागलेले नाही; निरुत्साह, व्यक्तिगत समस्या, भौतिकवाद अथवा जीवनाच्या इतर चिंतांमुळे त्यांनी केवळ प्रचार करण्याचे थांबवले आहे. (लूक २१:३४-३६) शक्य असल्यास, त्यांना निष्क्रिय होण्याआधीच मदत करणे अत्युत्तम आहे. एखादा प्रचारक सेवा कार्यहालचालीचा अहवाल देण्यात अनियमित होतो, तेव्हा मंडळीच्या सचिवांनी मंडळीच्या पुस्तक अभ्यास चालकास जागृत केले पाहिजे. मेंढपाळकत्वाची भेट देण्याच्या व्यवस्था केल्या जाऊ शकतात. त्यांनी, समस्येमागील कारण आणि साहाय्य देण्याचे मार्ग ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.—पाहा सप्टेंबर १५, १९९३, टेहळणीबुरूज (इंग्रजी), पृष्ठे २०-३.
४ इतरजण कशाप्रकारे मदत करू शकतात: निष्क्रिय असलेली एखादी व्यक्ती आपल्या सर्वांना ठाऊक असेलच. कदाचित, आधी त्या व्यक्तीची आपल्याशी सलगी असेल. मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो? अगदी थोड्या वेळासाठी भेट देण्याकरता का जाऊ नये बरे. तुम्हाला त्यांची उणीव भासते हे त्यास सांगा. आनंदी व सकारात्मक असा. तो आध्यात्मिकरित्या आजारी आहे असे न सुचविता तुमची चिंता व्यक्त करा. उभारणीकारक अनुभवांचे किंवा मंडळीद्वारे साध्य करण्यात येत असलेल्या इतर चांगल्या गोष्टींचे कथन करा. त्याला उत्साहीपणे “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” या प्रांतीय अधिवेशनाबद्दल सांगा व उपस्थित राहण्याकरता उत्तेजन द्या. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मंडळीसोबत पुन्हा सहवास राखल्याने त्याला अधिक मदत मिळेल. सभांना जाताना त्यास साथ देण्याचा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवा. तुम्हाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल वडिलांना कळवा.
५ निष्क्रिय असलेली एखादी व्यक्ती सभांना येते तेव्हा, गतकाळात तिचा परिचय असलेल्या इतरांना पाहून तिला विचित्र वाटण्याची शक्यता आहे. “तुम्ही इतके दिवस कोठे होता?,” असे विचारू नका. त्याऐवजी, तिला स्वागत केल्यासारखे वाटू द्या. तुम्ही बोलत असताना तिला सामील करा. परिचय नसलेल्यांशी तिची ओळख करून द्या. सभेदरम्यान तिच्याजवळ बसा, व तिच्याजवळ गायनपुस्तक आणि अभ्यासले जाणारे साहित्य आहे याची खातरी करा. तिला पुन्हा येण्यास उत्तेजन द्या आणि आवश्यकता असल्यास, मदतीचा हात पुढे करा.
६ भटकलेल्यांकरता यहोवा व येशूला सस्नेह जिव्हाळा आहे व अशा व्यक्ती आध्यात्मिकरित्या बऱ्या होतात तेव्हा त्यांना आनंद होतो. (मला. ३:७; मत्त. १८:१२-१४) इतरांना यहोवाची सेवा पुन्हा करण्यामध्ये मदत देण्यात आपण यशस्वी झालो तर आपल्यालाही तोच आनंद मिळू शकतो.