देवाच्या घरासाठी गुणग्राहकता दाखवा
१ बायबलच्या काळात, यहोवाने त्याच्या लोकांना नियमितरित्या त्याच्या घरात एकत्र जमण्यास आज्ञापिले होते. (लेवी. २३:२) या एकत्रीकरणांमुळे त्यांना देवाच्या वचनावर त्यांची मने केंद्रित करण्यास मदत मिळाली. त्यामुळे यहोवाच्या नियमांवर मनन, सहवास आणि चर्चा करण्यास वेळ पुरवला जात होता. त्यांची मने देवाच्या विचारांनी भरून गेली. त्यामुळे त्यांना आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त झाले. हे खरोखरच आनंदाचे प्रसंग होते. या योजनेने एकता आणि शुद्ध उपासनेला चालना दिली. आजही देवाच्या घरातील मेळावे कमी महत्त्वाचे नाहीत.
२ आपण सभांबद्दल गुणग्राहकता बाळगतो हे कसे दाखवू शकतो? काही मंडळ्यांमध्ये सभेच्या कमी उपस्थितीचा अहवाल देण्यात येतो. कधीकधी एखाद्या व्यक्तीची परिस्थिती त्यास सभेला उपस्थित राहण्याला आळा घालत असेल. परंतु तुम्ही तुलनात्मक दृष्ट्या क्षुल्लक समस्यांना नियमित सभेच्या उपस्थितीमध्ये अडथळा आणण्यास वाव देता का? काहीजण थोडीशी डोकेदुखी असल्यास किंवा दिवसभराच्या कामानंतर थकलेले असल्यास घरी राहण्याचे ठरवतील. इतरांना, भेटी देण्याची इच्छा असणाऱ्या ख्रिस्ती विश्वासात नसलेल्या नातेवाईकांचा पाहुणचार करणे बंधनकारक वाटेल. काहींनी तर, टीव्ही वरील आवडता कार्यक्रम किंवा खेळ पाहण्यासाठी सभा चुकवल्या आहेत. अशा परिस्थितींमध्ये दाखवलेले गुणग्राहकतेचे प्रमाण स्पष्टतः कोरहपुत्रांनी दाखवलेल्या मनःपूर्वक इच्छेप्रमाणे नाही: “माझ्या जिवाला परमेश्वराच्या [यहोवा, NW] अंगणाची उत्कंठा लागली असून तो झरत आहे.”—स्तोत्र ८४:२.
३ सभांमध्ये, आध्यात्मिक अन्न विपुलतेत पुरवले जात असले, तरी उपस्थित असणाऱ्या काहींना लक्ष देणे कठीण वाटते. ते कदाचित दिवास्वप्न पाहत असतील, दिवसातील चिंतांबद्दल विचार करत असतील किंवा डुलक्याही घेत असतील. पुष्कळांना, संक्षिप्त नोंदी घेतल्याने दक्ष राहण्यास आणि सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते असे आढळून आले आहे. गोष्टी लिहून घेतल्याने मनावर त्या माहितीचा ठसा उमटविला जातो. त्याशिवाय, आगाऊ तयारी करणे हे संपूर्ण लाभ घेण्याचे एक साधन आहे. चांगली तयारी केल्याने, आपण ‘विशेष लक्ष देऊ’ शकतो.—इब्री. २:१.
४ मुलांनी तसेच प्रौढांनी सभांमध्ये पुरवली जाणारी माहिती आत्मसात करून घेण्याची आवश्यकता आहे. पालकांनी मुलांना दंग राहण्यासाठी आणि शांत बसण्यासाठी खेळणी किंवा चित्र रंगवण्याची पुस्तके दिली तर मुले फारच मर्यादित गोष्टी शिकतील. मुलांना खेळण्यास, बोलण्यास, रडण्यास किंवा जवळपास बसलेल्या इतरांना त्रास होईल अशाप्रकारच्या कोणत्याही गोष्टी करण्यास अनुमती दिल्याने योग्य शिस्तीचा अभाव दिसून येतो. पालकांपैकी एकजण मुलासोबत येईल हे त्याला माहीत झाल्यावर, सभेदरम्यान पाणी पिण्यासाठी किंवा शौचालयात जाण्याच्या वारंवार व अनावश्यक फेऱ्या कमी होतील.
५ वक्तशीरपणा महत्त्वाचा आहे: कधीकधी, टाळता न येण्याजोग्या परिस्थितींमुळे सभेसाठी वेळेवर जाण्यास अडथळा येऊ शकतो. परंतु, नेहमीच सुरवातीच्या गीत आणि प्रार्थनेनंतर उशिरा आल्याने सभांच्या पवित्र उद्देशाबद्दल आदर दाखवण्याचा आणि इतरांना त्रास न देण्याच्या जबाबदारीचा अभाव प्रदर्शित होतो. हे लक्षात असू द्या की, मंडळीत बांधवांसोबत गायन व प्रार्थना करणे हा आपल्या उपासनेचा एक भाग आहे. उशीर करण्याची सवय ही बहुतेकवेळा चांगली व्यवस्था न केल्यामुळे किंवा आगाऊ योजना करण्यात अपयशी झाल्यामुळे परिणामित होते. वक्तशीर असल्याने आपण सभांबद्दल आदर व गुणग्राहकता बाळगत असल्याचे प्रदर्शित होते.
६ तो दिवस सतत जवळ येतो तसे, एकत्र येण्याची आवश्यकता अधिकच वाढू शकते. (इब्री. १०:२४, २५) आपण नियमित उपस्थिती, आगाऊ तयारी, वक्तशीरपणा, पूर्ण लक्ष दिल्याने आणि त्यानंतर शिकलेल्या गोष्टींचा अवलंब केल्याने आपली गुणग्राहकता प्रदर्शित करू या.