इतरांसोबत कार्य केल्याने प्राप्त होणारे आशीर्वाद
१ इतरांसोबत सेवाकार्यात काम केल्याने आनंद लुटण्याजोगे लाभ आहेत असे तुम्हाला वाटते का? येशूने तसे केले. पीक फार होते आणि कामकरी थोडे होते, तरी त्याने ७० शिष्यांना क्षेत्रात “दोघे दोघे” असे पाठवले. “ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे” प्रचार करण्यात त्या सर्वांनी किती फलदायक वेळ घालवला!—लूक १०:१, १७; मत्त. ९:३७.
२ इतरांसोबत कार्य करणे हे उद्दीपित करणारे आहे. काहीजण बुजऱ्या स्वभावाचे असतात आणि त्यांना अनोळखी व्यक्तींशी बोलणे कठीण जाते. आपल्या शेजारी कोणीतरी असल्यामुळे, देवाचे वचन धैयाने सांगण्यास आपल्याला आत्मविश्वास मिळतो. आपल्यासोबत कोणी असल्यास, आपल्याला प्रशिक्षित केल्याप्रमाणे कार्य करण्यास सोपे होईल. (नीती. २७:१७) एका सुज्ञ पुरुषाने म्हटले: “एकट्यापेक्षा दोघे बरे.”—उप. ४:९.
३ विविध प्रचारक आणि पायनियरांसोबत कार्य करणे चांगले आहे. प्रेषित पौलाच्या सेवेतील साथीदारांमध्ये सीला, तीमथ्य आणि योहान मार्क यांचा समावेश होता व सोबत प्रचार करताना त्यांनी पुष्कळ आशीर्वादांचा आनंद लुटला. आजही तीच गोष्ट खरी असू शकते. पुष्कळ वर्षांपासून सत्यात असणाऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही कार्य केले आहे का? साक्ष देण्यातील तिचे कौशल्य पाहिल्यावर, तुम्ही कदाचित काही चांगल्या कल्पना शिकल्या असाल ज्यामुळे तुम्हाला सुधारणा करण्यास मदत मिळाली असेल. तुलनात्मक दृष्ट्या नवीन असणाऱ्या प्रचारकांसोबत तुम्ही कार्य केले आहे काय? तर मग कदाचित तुम्ही जे काही शिकलात त्याची सहभागिता केली असेल व अशाप्रकारे त्यांना अधिक परिणामकारक होण्यात आणि त्यांच्या सेवाकार्यात अधिक आनंद मिळवण्यास त्यांची मदत केली असेल.
४ तुम्ही सध्या एखादा बायबल अभ्यास चालवत आहात का? असे असल्यास, एखाद्या वडिलांना किंवा विभागीय पर्यवेक्षकांना तुमच्यासोबत येण्यास आमंत्रण का देऊ नये बरे? आपल्या बायबल विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांशी परिचित व्हावे हे फायदेकारक आहे. वडिलांच्या उपस्थितीत तुम्ही बायबल अभ्यास चालवण्यास कचरत असाल, तर कदाचित ते चालवण्यास इच्छुक असतील आणि तुम्हाला निरीक्षण करण्यास वाव देतील. त्यानंतर, विद्यार्थ्याने जलद गतीने प्रगती करण्यासाठी तुम्ही कशी मदत करू शकता याबद्दलच्या सूचना त्यांना मोकळेपणाने विचारा.
५ इतरांसोबत कार्य करताना उत्तेजनात्मक साथीदार असा. क्षेत्राच्या विवेचनांबद्दल सकारात्मक असा. इतरांबद्दल कधीही चहाडी किंवा मंडळीच्या योजनांबद्दल कुरकुर करू नका. सेवाकार्यावर आणि यहोवाकडील आशीर्वादांवर तुमचे लक्ष केंद्रित करा. तुम्ही तसे केल्यास दोघेही, तुम्ही व तुमचे साथीदार आध्यात्मिकरित्या ताजेतवाने होऊन घरी परताल.
६ तुमच्या परिस्थितींमुळे इतर बंधू व भगिणींशी नियमितपणे कार्य करणे तुम्हाला कठीण असेल. तथापि, शक्य असल्यास दुसऱ्या एखाद्या प्रचारकासोबत काही वेळासाठी कार्य करण्याची योजना का करू नये? तुम्हा दोघांनाही आशीर्वाद प्राप्त होतील!—रोम. १:११, १२.