मंडळीची पुस्तक अभ्यास व्यवस्था
भाग २: तयारी करण्याची व सहभागी होण्याची गरज
१ यहोवाचे वचन, सूज्ञान मिळवणाऱ्या व समज प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला धन्य म्हणते, कारण याचे प्रतिफळ मोठे आहे. (नीती. ३:१३, १४, १६-१८) आध्यात्मिक ज्ञान मोलवान व जीवन वाचविणारे आहे. ते ख्रिश्चनाला, देवाच्या वचनातून मिळविलेले ज्ञान, क्रियाशील भक्ती करण्यामध्ये लाभदायक रितीने वापरण्यासाठी, दरदिवशीच्या समस्या सोडविण्यासाठी, आणि जीवनातील आपले ध्येय कोणते राहावे याबद्दलचा निर्णय ठरविण्यासाठी साहाय्यक ठरते.
२ मंडळीच्या पुस्तक अभ्यासाची रचना देवाचे वचन शिकून घेऊन त्याचा अवलंब करण्यात साह्य देण्यासाठी व याद्वारे ज्ञान व आध्यात्मिक समज यात वाढ व्हावी या उद्देशाने केलेली आहे. तेव्हा, ज्ञान संपादावे म्हणून मंडळीच्या पुस्तक अभ्यासाला नियमाने उपस्थित राहणे हा आमच्या व्यक्तीगत कार्यक्रमाचा एक भाग असला पाहिजे.—नीती. ४:७-९.
चांगली तयारी करा
३ पहिल्या शतकातील मंडळीशी संबंध राखणाऱ्या काही जणांनी सत्य शिकून घेण्यामध्ये तसेच या प्रकाशात वाढत जाण्यामध्ये उत्साह दाखविला नव्हता. ते ख्रिस्तामध्ये बालकच राहिले व त्यामुळे ते नीतीमत्तेच्या वचनांशी अपरिचित असेच राहिले. (इब्री ५:११-१३) प्रेषित पौलाने मंडळीला उत्तेजन दिले की तिने “प्रौढतेप्रत प्रगमन” करावे. (इब्री ६:१) याचा अर्थ हा होतो की जेव्हा दुसरे सत्याविषयी चर्चा करतात तेव्हा त्याकडे वाजवीपेक्षा अधिक लक्ष दिले पाहिजे. आमची “स्पष्ट विचारसरणी” जागृत व्हावी म्हणून आम्ही विचार तसेच संशोधनाचे कार्य केले पाहिजे आणि स्वतःला आवेशाने पुढे नेले पाहिजे.—२ पेत्र ३:१, २; लूक १३:२४.
४ मंडळीच्या पुस्तक अभ्यासाची कसून तयारी केल्यास आमच्या समजबुद्धीत वाढ होते व साहित्याविषयी आम्हाला रस वाटू लागतो. प्रभावी तयारी ही परिच्छेदांचे वाचन व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अधोरेखित करणे यापलिकडे जाते. साहित्याची विशिष्ट अभिरुची, त्याच्या अर्थावर मनन आणि ते आम्हासाठी व्यक्तीशः केवढे मूल्य राखून आहे त्याचा विचार करुन जाणण्यासाठी वेळ जरुरीचा आहे. दिलेली वचने काढून वाचा व ती परिच्छेदातील मुद्यांशी कशी संबंधीत आहेत हे पडताळून बघा. ज्या शब्दांचा पूर्ण अर्थ समजत नाही तो एखाद्या शब्दकोशात बघा.
५ आम्हापैकी काहींना व्यक्तीगत अभ्यास मोठ्या प्रयासाचा वाटेल, आणि यासाठी वेळही लागतो; पण खरे म्हणजे तो किती लाभदायक ठरतो! अशा प्रकारचा उत्कट अभ्यास केल्याचा काय परिणाम घडतो त्याबद्दल पौल असे दर्शवितो की, “ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले व वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जडान्न आहे.” (इब्री ५:१४) असा व्यक्तीगत अभ्यास आम्हाला प्रौढ बनविण्यात मदत करतो. याचा फायदा हा की, जेव्हा आम्हाला निर्णय घ्यावे लागतात तेव्हा बरोबरचे कोणते मार्गाक्रमण घ्यावे ते ठरवता येते.
सहभागी व्हा
६ आम्ही प्रत्येक सभेत सहभाग घेतला पाहिजे. ते का? आम्ही तयारीनिशी दिलेले उत्तर हे केवळ आमच्या विश्वासाचे वक्तव्य नसून ते आमच्या बांधवांनाही प्रोत्साहन देते व त्यांची उभारणी करते. (रोम. १०:१०; इब्री. १०:२३-२५) मंडळीच्या पुस्तक अभ्यासात सक्रियपणे भाग घेणे हे देखील आमच्या आध्यात्मिक वाढीत महत्त्वाची भूमिका पार पाडते. अनुभवी लोक, मुले आणि नवीन आस्थेवाईक लोक या सर्वांनी मोकळेपणाने उत्तरे दिली तर सबंध गटाला विविध विवेचने ऐकण्याचा लाभ मिळतो. हे शैक्षणिक ठरते व सर्वांना तजेला मिळतो.—रा.से. ४/८६ पृ. ३.
७ आम्ही मंडळीच्या पुस्तक अभ्यासाची तयारी परिश्रमाने केल्यास तसेच सभेत मोकळेपणाने भाग घेतल्यास आमचा ज्ञानाचा शोध यशस्वी ठरेल आणि ‘देवाविषयीचे ज्ञान आम्हाला प्रकट होईल.’—नीती. २:४, ५.