वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w19 जून पृ. २०-२५
  • तणावाचा सामना करण्यासाठी इतरांना मदत करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तणावाचा सामना करण्यासाठी इतरांना मदत करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • धीर दाखवा
  • दया दाखवा
  • इतरांचं सांत्वन करा
  • विधवांना त्यांच्या संकटांत मदत करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • “तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईन”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • रूथ आणि नामी
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • एकमेकांना एकनिष्ठ प्रेम दाखवत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
w19 जून पृ. २०-२५

अभ्यास लेख २६

तणावाचा सामना करण्यासाठी इतरांना मदत करा

“तुमच्या सर्वांच्या विचारांत एकता असावी, तसेच एकमेकांशी वागताना सहानुभूती, बंधुप्रेम, जिव्हाळा व नम्रता दाखवा.”—१ पेत्र ३:८.

गीत ५० देवाच्या प्रीतीचा आदर्श

सारांशa

१. आपण आपल्या प्रेमळ पित्याचं, यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो?

यहोवाचं आपल्या सर्वांवर खूप प्रेम आहे. (योहा. ३:१६) आणि आपल्या प्रेमळ पित्याचं अनुकरण करण्याची आपली इच्छा आहे. त्यामुळेच आपण सर्वांशी “वागताना सहानुभूती, बंधुप्रेम, जिव्हाळा” दाखवतो, “विशेषकरून विश्‍वासात असलेल्या” आपल्या बंधुभगिनींना. (१ पेत्र ३:८; गलती. ६:१०) आपल्या आध्यात्मिक कुटुंबातल्या सदस्यांना तणावाचा सामना करावा लागतो तेव्हा आपण त्यांना मदत केली पाहिजे.

२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

२ यहोवाच्या कुटुंबाचा भाग बनणाऱ्‍या प्रत्येकाला तणावपूर्ण परिस्थितींचा सामना करावा लागतो. (मार्क १०:२९, ३०) या दुष्ट व्यवस्थेचा शेवट जवळ येत असताना आपल्याला कदाचित आणखी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी आपण एकमेकांना मदत कशी करू शकतो? लोट, ईयोब आणि नामी यांच्या अहवालांमधून आपण काय शिकू शकतो त्यावर आता आपण चर्चा करू या. आपले भाऊ-बहीण आज सामना करत असलेल्या काही समस्यांबद्दलही आपण चर्चा करू या. या समस्यांना तोंड देण्यासाठी आपण त्यांना कशी मदत करू शकतो हे आपण पाहू या.

धीर दाखवा

३. दुसरे पेत्र २:७, ८ या वचनांनुसार लोटने कोणता चुकीचा निर्णय घेतला? त्याचे कोणते परिणाम झाले?

३ लोटने सदोम शहरात राहण्याचा निर्णय घेतला. पण तो निर्णय चुकीचा होता कारण तिथले लोक खूप अनैतिक होते. (२ पेत्र २:७, ८ वाचा.) तो भाग समृद्ध होता, पण तिथे राहण्याच्या निर्णयाचे वाईट परिणाम लोटला भोगावे लागले. (उत्प. १३:८-१३; १४:१२) त्याच्या पत्नीला ते शहर किंवा तिथले काही लोक इतके आवडू लागले की तिने यहोवाची आज्ञा मोडली. देवाने त्या भागावर अग्नी व गंधकाचा पाऊस पाडला तेव्हा तिचा मृत्यू झाला. लोटच्या दोन मुलींचाही विचार करा. सदोममध्ये राहणाऱ्‍या पुरुषांसोबत त्यांचं लग्न ठरलं होतं. पण त्या शहरासोबत त्या पुरुषांचाही नाश झाला. लोटला आपलं घर आणि संपत्ती गमवावी लागली; सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने आपल्या पत्नीला गमावलं. (उत्प. १९:१२-१४, १७, २६) या तणावपूर्ण काळात यहोवाने लोटच्या बाबतीत आपला धीर सोडला का? मुळीच नाही.

देवदूत लोट आणि त्याच्या कुटुंबाला सदोममधून बाहेर नेत आहेत

देवदूत लोट आणि त्याच्या कुटुंबाला सदोममधून बाहेर नेत आहेत (परिच्छेद ४ पाहा)

४. यहोवा लोटसोबत धीराने कसं वागला? (मुखपृष्ठावरील चित्र पाहा.)

४ लोटने सदोम शहरात राहण्याचा चुकीचा निर्णय घेतला असला, तरी यहोवाने त्याच्यावर दया दाखवली आणि त्याला व त्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी देवदूतांना पाठवलं. त्या देवदूतांनी त्याला लगेच सदोम सोडून जाण्याची आज्ञा दिली. पण त्यांचं ऐकण्याऐवजी लोट “दिरंगाई” करू लागला. त्या देवदूतांना त्याला व त्याच्या कुटुंबाला हात धरून शहराबाहेर आणावं लागलं. (उत्प. १९:१५, १६) मग देवदूतांनी त्यांना डोंगरांकडे पळून जायला सांगितलं. पण यहोवाची आज्ञा पाळण्याऐवजी लोटने जवळच्या एका नगरांत जाण्याची इच्छा दर्शवली. (उत्प. १९:१७-२०) हे सर्व होत असतानाही यहोवाने धीराने लोटचं ऐकलं आणि त्याला त्या नगरात जाऊ दिलं. पण नंतर त्या नगरात राहण्याची भीती वाटत असल्यामुळे तो डोंगराळ भागात जाऊन राहू लागला. हा तोच भाग होता जिथे यहोवाने त्याला सुरुवातीला जायला सांगितलं होतं. (उत्प. १९:३०) यहोवाने लोटच्या बाबतीत खरंच किती धीर दाखवला! आपण यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो?

५-६. १ थेस्सलनीकाकर ५:१४ या वचनातील सल्ला आपण कसा लागू करू शकतो?

५ लोटसारखंच कदाचित आपल्या आध्यात्मिक कुटुंबातला एखादा सदस्य चुकीचे निर्णय घेईल आणि यामुळे त्याच्यावर संकट ओढवू शकतं. असं झालं तर आपली प्रतिक्रिया काय असणार? आपण कदाचित लगेच म्हणू की तो त्याच्या चुकीच्या निर्णयांचे फळ भोगत आहे आणि हे कदाचित खरंदेखील असेल. (गलती. ६:७) पण, अशा वेळी आपण यहोवाचं अनुकरण केलं पाहिजे आणि त्याने लोटला जशी मदत केली तशी मदत आपण त्या सदस्याला दिली पाहिजे. हे आपण कसं करू शकतो?

६ यहोवाने त्या देवदूतांना, लोटला फक्‍त इशारा देण्यासाठीच पाठवलं नव्हतं. तर त्याने त्यांना लोटला सदोम शहरावर येणाऱ्‍या संकटातून वाचवण्यासाठीही पाठवलं होतं. त्याच प्रकारे, जर आपला एखादा बांधव चुकीचा निर्णय घेत असेल तर त्याला सावध करणं हे आपलं काम आहे. पण यासोबतच आपण त्याला मदतदेखील केली पाहिजे. बायबलमधून मिळणारा सल्ला लागू करण्याच्या बाबतीत तो उशीर करत असला, तरी आपण धीर धरला पाहिजे. आपण त्या दोन देवदूतांसारखं असलं पाहिजे. आशा सोडून त्या बांधवापासून स्वतःला दूर करण्याऐवजी आपण त्याला मदत करण्यासाठी व्यावहारिक मार्ग शोधले पाहिजेत. (१ योहा. ३:१८) आपण जणू त्या बांधवाचा हात धरून त्याला बायबलचा सल्ला लागू करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.—१ थेस्सलनीकाकर ५:१४ वाचा.

७. यहोवाने लोटप्रती जसा दृष्टिकोन बाळगला त्याचं आपण अनुकरण कसं करू शकतो?

७ यहोवा खरंतर लोटच्या कमतरतांवर लक्ष केंद्रित करू शकला असता. पण, असं करण्याऐवजी त्याने त्याच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित केलं. त्याने पेत्रला, लोटचा एक नीतिमान व्यक्‍ती म्हणून उल्लेख करण्यासाठी प्रेरित केलं. यहोवा आपल्या चुका माफ करतो यासाठी आपण त्याचे किती आभारी आहोत! (स्तो. १३०:३) यहोवाने लोटप्रती जसा दृष्टिकोन बाळगला त्या बाबतीत आपण त्याचं अनुकरण करू शकतो का? आपण आपल्या बंधुभगिनींच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित केलं, तर मग आपण त्यांच्याशी आणखी धीराने व्यवहार करू. याचा चांगला परिणाम म्हणजे तेदेखील आपली मदत स्वीकारण्यासाठी तयार होऊ शकतात.

दया दाखवा

८. एखाद्याप्रती दयेची भावना असल्यामुळे आपण काय करायला प्रेरित होऊ?

८ लोटसारखं चुकीचे निर्णय घेणं हे ईयोबच्या दुःखाचं कारण नव्हतं. पण ईयोबने जरी काही चुकीचे निर्णय घेतले नाहीत, तरी त्याला खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. त्याने अचानक आपली संपत्ती आणि समाजातील आपलं नाव गमावलं. तसंच, त्याची तब्येतही खालावली. याहून वाईट म्हणजे त्याने व त्याच्या पत्नीने त्यांच्या सर्व मुलांना मृत्यूमुळे गमावलं. ईयोबच्या तीन ढोंगी मित्रांनी या सर्व गोष्टींसाठी त्यालाच दोष दिला. ईयोबचे हे तीन मित्र त्याला दया दाखवण्यापासून का चुकले? याचं एक कारण म्हणजे त्यांनी परिस्थिती पूर्णपणे समजून घेतली नाही. यामुळे त्यांनी चुकीचे निष्कर्ष काढले आणि ईयोबला दोषी ठरवलं. अशा प्रकारची चूक आपण कशी टाळू शकतो? नेहमी लक्षात असू द्या की फक्‍त यहोवाच एखाद्या व्यक्‍तीच्या परिस्थितीला पूर्णपणे समजू शकतो. यामुळे दुःखात असलेली व्यक्‍ती जे काही बोलते ते लक्ष देऊन ऐका. आणि ऐकण्यासोबतच तिचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा. असं केल्यानंतरच आपल्याला त्या बांधवाला खऱ्‍या अर्थाने दया दाखवणं शक्य होईल.

९. दयेच्या भावनेमुळे आपण काय करणार नाही, आणि का?

९ दयेच्या भावनेमुळेच, आपण एखादी व्यक्‍ती ज्या समस्यांना तोंड देत आहे त्याबद्दल चुकीची माहिती पसरवणार नाही. इतरांच्या खासगी गोष्टी सर्वांना सांगणारा मंडळीसाठी उत्तेजन ठरत नाही, उलट यामुळे तो मंडळीत फुट पाडत असतो. (नीति. २०:१९; रोम. १४:१९) असं करण्याद्वारे तो दया दाखवत नाही, तर अविचारीपणे वागत असतो. आणि दुःखात असलेल्या व्यक्‍तीला त्याच्या शब्दांमुळे आणखी त्रास होऊ शकतो. (नीति. १२:१८; इफिस. ४:३१, ३२) याऐवजी आपण बांधवांमध्ये असलेल्या चांगल्या गुणांवर विचार केला पाहिजे आणि त्यांना संकटांचा सामना करण्यासाठी मदत केली पाहिजे.

एक निराश झालेला बांधव जेव्हा मर्यादेबाहेर बोलतो तेव्हा एक वडील शांतपणे त्याचं ऐकून घेतात; नंतर ती दोघं एकत्र चालायला जातात

बंधुभगिनी जर “मर्यादेबाहेर” काही बोलत असतील तर त्यांचं धीराने ऐका आणि योग्य वेळी त्यांना सांत्वन द्या (परिच्छेद १०-११ पाहा)c

१०. ईयोब ६:२, ३ या वचनांमधील शब्दांमधून आपण काय शिकतो?

१० ईयोब ६:२, ३ वाचा. काही प्रसंगी ईयोबचं बोलणं “मर्यादेबाहेर” गेलं. पण नंतर त्याने कबूल केलं की त्याचं बोलणं चुकीचं होतं. (ईयो. ४२:६) तणावपूर्ण समस्यांचा सामना करत असलेली एखादी व्यक्‍ती कदाचित ईयोबसारखंच मर्यादेबाहेर काही बोलून जाईल. अशा गोष्टी ज्यांबद्दल तिला नंतर पस्तावा होईल. अशा वेळी आपली प्रतिक्रिया काय असली पाहिजे? आपण तिची टीका करू नये, तर तिच्याशी दयेने वागावं. यहोवाने मानवांची रचना केली तेव्हा त्यांच्यावर समस्या आणि तणाव यावा अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यामुळे तीव्र स्वरूपाच्या तणावात असताना देवाच्या एखाद्या सेवकाने अविचारीपणे काही म्हटलं तर आपण त्यामागचं कारण समजून घेतलं पाहिजे. तो कदाचित यहोवाबद्दल किंवा आपल्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी बोलेल. असं झालं तर लगेच त्याच्यावर रागावू नका किंवा त्याला दोष देऊ नका.—नीति. १९:११.

११. सल्ला देण्याच्या बाबतीत वडील अलीहूचं अनुकरण कसं करू शकतात?

११ तणावपूर्ण समस्यांचा सामना करत असलेल्या एखाद्या बांधवाला किंवा बहिणीला कधीकधी बायबलमधून सल्ला देण्याची गरज पडू शकते. (गलती. ६:१) अशांना वडील कशा प्रकारे मदत करू शकतात? त्यांनी या बाबतीत अलीहूचं अनुकरण केलं पाहिजे. त्याने ईयोबचं खूप धीराने ऐकून घेतलं. (ईयो. ३३:६, ७) ईयोबचे विचार पूर्णपणे समजून घेतल्यानंतरच अलीहूने त्याला सल्ला दिला. अलीहूचं अनुकरण करणारे वडीलही बंधुभगिनींचं लक्ष देऊन ऐकतात आणि त्यांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. असं केल्यामुळे सल्ला देताना ते सहज रीत्या त्यांच्या मनापर्यंत पोहोचू शकतात.

इतरांचं सांत्वन करा

१२. नामीवर तिच्या पतीच्या आणि दोन मुलांच्या मृत्यूचा काय परिणाम झाला?

१२ नामी ही यहोवावर प्रेम करणारी एक विश्‍वासू स्त्री होती. पण तिच्या पतीचा आणि दोन मुलांचा मृत्यू झाला, तेव्हा तिला आपलं नाव बदलून “मारा” असं ठेवायचं होतं. माराचा अर्थ कडू असा होतो. (रूथ १:३, ५, २०, २१) पण या कठीण परिस्थितीतही नामीची सून रूथ ही तिला जडून राहिली. रूथने तिला व्यावहारिक रीत्या तर मदत केलीच, पण यासोबतच तिने तिला आपल्या शब्दांतून सांत्वनही दिलं. रूथने नामीप्रती असलेलं आपलं प्रेम मनापासून व्यक्‍त केलं.—रूथ १:१६, १७.

१३. जोडीदाराला गमावणाऱ्‍या बंधुभगिनींना आपल्या मदतीची गरज का आहे?

१३ आपल्या आध्यात्मिक कुटुंबातला एखादा सदस्य आपल्या विवाह जोडीदाराला मृत्यूमध्ये गमावतो, तेव्हा त्याला आपल्या मदतीची गरज पडते. एका जोडप्याची तुलना आपण जवळजवळ वाढलेल्या दोन झाडांशी करू शकतो. जसजशी वर्षं सरतात तसतशी या झाडांची मुळं एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतून जातात. यामुळे जेव्हा एका झाडाला उपटून टाकण्यात येतं, तेव्हा दुसऱ्‍या झाडावर याचा खूप वाईट परिणाम होतो. त्याच प्रकारे जेव्हा एखादी व्यक्‍ती आपल्या जोडीदाराला गमावते, तेव्हा तिला बऱ्‍याच काळापर्यंत दुःखाला सामोरं जावं लागू शकतं. पौलाb नावाच्या बहिणीचे पती अचानक वारले. ती म्हणते: “माझं जीवन पूर्णपणे बदलून गेलं आणि मला खूप आशाहीन वाटलं. मी माझ्या सर्वात चांगल्या मित्राला गमावलं. मी त्यांना मनातलं सर्वकाही सांगायचे. माझ्या आनंदात आणि कठीण काळात त्यांनी मला नेहमी साथ दिली. त्यांनी नेहमी माझ्या चिंता, समस्या धीराने ऐकून घेतल्या. पण ते गेले आणि मला असं वाटलं की जणू माझ्या मनाचे दोन तुकडे झालेत.”

एक जोडपं जेव्हा एका बांधवाला त्याचा आणि त्याच्या मृत पत्नीचा फोटो दाखवतं तेव्हा त्याला सांत्वन मिळतं

ज्या लोकांनी आपल्या जोडीदाराला गमावलं आहे त्यांना आपण कशी मदत करू शकतो? (परिच्छेद १४-१५ पाहा)d

१४-१५. जोडीदाराला गमावलेल्या व्यक्‍तीला आपण सांत्वन कसं देऊ शकतो?

१४ मृत्यूमुळे आपल्या जोडीदाराला गमावलेल्या बंधुभगिनींना आपण सांत्वन कसं देऊ शकतो? सांत्वन देण्यासाठी आपण सर्वात आधी त्यांच्याशी बोललं पाहिजे. आपल्याला कदाचित काय बोलावं हे सुचत नसेल, किंवा अवघडल्यासारखं वाटत असेल तरीदेखील आपण बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आधी उल्लेख केलेली पौला म्हणते: “मला जाणीव आहे ही एखाद्याचा मृत्यू झाला की लोकांना काय बोलावं हे सुचत नाही. त्यांना काळजी वाटते की त्यांच्या बोलण्यामुळे समोरच्याचं दुःख कदाचित आणखी वाढेल. पण लोक जेव्हा काहीच बोलत नाही तेव्हा त्याचा जास्त त्रास होतो.” आपण काहीतरी खूपच प्रभावी बोलावं अशी दुःखात असलेल्या व्यक्‍तीची आपल्याकडून मुळीच अपेक्षा नसते. पौला म्हणते: “माझे मित्र मला म्हणायचे, ‘ऐकून खूप वाईट वाटलं’ आणि इतकं बोलल्यानेही मला खूप बरं वाटायचं.”

१५ विल्यम नाव असलेल्या बांधवाच्या पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. ते म्हणतात: “इतर जण माझ्या पत्नीच्या चांगल्या आठवणी मला सांगतात तेव्हा मला खूप बरं वाटतं. मला याची खात्री पटते की सर्व तिच्यावर खूप प्रेम करायचे आणि तिचा आदर करायचे. अशा प्रकारच्या आधारामुळे मला खूप मदत झाली. त्यांच्या शब्दांमुळे मला खूप सांत्वन मिळालं. माझी पत्नी माझ्यासाठी मौल्यवान होती आणि ती माझ्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग होती.” बियान्का नावाच्या बहिणीने आपल्या पतीला गमावलं. ती म्हणते: “इतर जण माझ्यासोबत प्रार्थना करतात आणि वचनांतून काही सांगतात तेव्हा मला खूप सांत्वन मिळतं. ते माझ्या पतीबद्दल बोलतात तेव्हा मला खूप बरं वाटतं, आणि मी जेव्हा त्यांच्याबद्दल बोलते तेव्हा ते माझं ऐकूनही घेतात.”

१६. (क) शोक करणाऱ्‍या व्यक्‍तीला आपण कशी मदत करू शकतो? (ख) याकोब १:२७ नुसार आपल्यावर कोणती जबाबदारी आहे?

१६ जसं रूथ आपल्या सासूला, नामीला जडून राहिली तसंच आपल्याला आपल्या शोक करणाऱ्‍या बंधुभगिनींना सतत मदत करत राहण्याची गरज आहे. आधी उल्लेख केलेली पौला म्हणते: “माझे पती वारले, तेव्हा बऱ्‍याच जणांनी घरी येऊन मला मदत केली. मग काही काळानंतर सर्व जण आपआपल्या जीवनात व्यस्त झाले. पण या घटनेमुळे माझं जीवन पूर्णपणे बदलून गेलं होतं. खरंतर दुःखात असलेल्या व्यक्‍तीला सतत मदतीची गरज पडते, मग ती काही महिन्यांपर्यंत किंवा काही वर्षांपर्यंतही असू शकते. आणि या गोष्टीची जाणीव इतरांना झाली तर खूप बरं होईल.” अर्थात प्रत्येक व्यक्‍ती सारखी नसते. काही लोक लगेच आपली परिस्थिती स्वीकारून जीवनात पुढे वाटचाल करतात. पण इतर काहींच्या बाबतीत त्यांच्या जोडीदारासोबत केलेली प्रत्येक गोष्टीची आठवण ही त्यांना दुःख देऊन जाते. प्रत्येक व्यक्‍ती वेगवेगळ्या प्रकारे आपलं दुःख व्यक्‍त करते. आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की अशा बंधुभगिनींना सांत्वन पुरवण्याचा बहुमान व जबाबदारी यहोवाने आपल्याला दिली आहे.—याकोब १:२७ वाचा.

१७. एखाद्या व्यक्‍तीचा विवाहसोबती तिला सोडून जातो तेव्हा तिला आपल्या मदतीची गरज का पडते?

१७ काही लोक आपला विवाह मोडून आपल्या जोडीदाराला एकटं सोडून जातात. अशा वेळी त्या जोडीदाराला खूप तीव्र दुःखाचा आणि तणावाचा सामना करावा लागू शकतो. जॉइस नावाच्या बहिणीचे पती तिला सोडून दुसऱ्‍या एका स्त्रीसोबत राहू लागले. ती म्हणते: “पतीच्या मृत्यूमुळे मला जितकं दुःख झालं नसतं, तितकं दुःख मला घटस्फोटामुळे झालं. एखाद्या अपघातात किंवा आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला असता तर यात त्यांचा दोष नसता, कारण या गोष्टींवर त्यांचं नियंत्रण नसतं. पण या बाबतीत माझ्या पतीने मला सोडून जायचं स्वतः निवडलं. माझी काहीच किंमत नाही असं मला वाटलं.”

१८. जोडीदाराला गमावलेल्या बंधुभगिनींना मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो?

१८ आपल्या जोडीदाराला गमावलेल्या बंधुभगिनींना आपण व्यावहारिक रीत्या मदत करतो, तेव्हा आपण त्यांच्याप्रती असलेलं आपलं प्रेम व्यक्‍त करत असतो. एकटं असल्यामुळे आता त्यांना चांगल्या मित्रांची खूप गरज असते. (नीति. १७:१७) तुम्ही त्यांचे मित्र आहात हे तुम्ही कसं दाखवू शकता? तुम्ही त्यांना घरी जेवायला बोलवू शकता. तुम्ही कदाचित एकत्र मिळून काही मनोरंजन करू शकता किंवा सेवेत त्यांच्यासोबत जाऊ शकता. तसंच, काही वेळा तुम्ही त्यांना तुमच्या कौटुंबिक उपासनेसाठीही बोलवू शकता. असं केल्यामुळे तुम्ही यहोवाचं मन आनंदित कराल. कारण बायबल आपल्याला सांगतं की यहोवा “भग्नहृदयी लोकांच्या” जवळ असतो आणि तो “विधवांचा” रक्षक आहे.—स्तो. ३४:१८; ६८:५.

१९. १ पेत्र ३:८ मधील शब्द लक्षात घेता तुम्ही कोणता निर्धार केला आहे?

१९ लवकरच देवाचं राज्य पृथ्वीवर राज्य करू लागेल आणि तेव्हा “पूर्वीच्या कष्टांचा विसर” पडेल. “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत” अशा काळाची आपण सर्वच खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. (यश. ६५:१६, १७) पण तो दिवस येईपर्यंत आपण एकमेकांना मदत करत राहू या. आणि आपल्या शब्दांद्वारे व कार्यांद्वारे दाखवू या की आपलं आपल्या आध्यात्मिक कुटुंबावर खूप प्रेम आहे.—१ पेत्र ३:८ वाचा.

तुमचं उत्तर काय असेल?

  • यहोवाने लोट आणि ईयोबला ज्या पद्धतीने मदत केली त्यावरून आपण काय शिकतो?

  • नामीच्या अनुभवातून आपण काय शिकतो?

  • आता ज्यांचे विवाहसोबती त्यांच्यासोबत नाहीत अशा बंधुभगिनींना आपण मदत कशी पुरवू शकतो?

गीत २८ नवे गीत

a लोट, ईयोब आणि नामी यांनी विश्‍वासूपणे यहोवाची सेवा केली. पण त्यांनाही जीवनात काही प्रसंगी तणावाचा सामना करावा लागला. त्यांच्या अनुभवातून आपण काय शिकू शकतो याबद्दल या लेखात सांगितलं आहे. समस्यांचा सामना करणाऱ्‍या आपल्या बंधुभगिनींना धीर आणि दया दाखवणं का गरजेचं आहे हेदेखील आपण पाहणार आहोत. तसंच, अशा बंधुभगिनींना सांत्वन देणंही गरजेचं का आहे यावरही आपण चर्चा करू.

b या लेखात नावं बदलण्यात आली आहेत.

c चित्रांचं वर्णन: एक बांधव खूप अस्वस्थ आहे आणि “मर्यादेबाहेर” बोलतो. एक वडील त्याचं लक्ष देऊन ऐकत आहेत. नंतर,  तो बांधव शांत झाल्यावर ते वडील त्याला प्रेमळपणे सल्ला देतात.

d चित्रांचं वर्णन: एका बांधवाने नुकतंच आपल्या पत्नीला मृत्यूमुळे गमावलं आहे. एक जोडपं या बांधवासोबत वेळ घालवत आहे. ते तिच्याबद्दलच्या चांगल्या आठवणी सांगत आहेत आणि काही फोटोही पाहत आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा