“धीराने फळ” उत्पन्न करणाऱ्या लोकांवर यहोवा प्रेम करतो
“तर, चांगल्या जमिनीवर पडलेले बी म्हणजे चांगल्या व प्रामाणिक मनाचे लोक. ते . . . धीराने फळ देतात.”—लूक ८:१५.
१, २. (क) सहसा लोक ऐकत नाही अशा क्षेत्रात सेवा करणाऱ्या बंधुभगिनींच्या उदाहरणामुळे आपल्याला प्रोत्साहन का मिळतं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) येशूने “स्वतःच्या गावात” प्रचारकार्य करण्याबद्दल काय म्हटलं? (तळटीप पाहा.)
सर्जिओ आणि ओलिंडा हे पायनियर जोडपं अमेरिकेत सेवा करतात. त्या दोघांनी वयाची ऐंशी ओलांडली आहे. काही काळापासून पाय दुखत असल्यामुळे त्यांना आता जास्त चालता येत नाही. पण ते दररोज सकाळी ७ वाजता शहरातील एका रहदारीच्या चौकापर्यंत चालत जातात. अनेक वर्षांपासून त्यांचा तो दिनक्रम आहे. तिथे ते एका बस स्टॉपजवळ उभे राहून ये-जा करणाऱ्यांना आपली प्रकाशने देतात. बरेच लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, पण तरी सर्जिओ आणि ओलिंडा तिथेच थांबतात आणि लोकांना पाहून स्मितहास्य करतात. मग दुपारी १२ वाजता ते हळूहळू चालत आपल्या घरी परततात. दुसऱ्या दिवशी आपल्या नित्यक्रमाप्रमाणे ते सकाळी ७ वाजता परत त्या बस स्टॉपवर जातात. असं ते आठवड्यातील सहा दिवस करतात आणि तेही बारा महिने.
२ लोक ऐकत नसले तरी, आपल्या स्थानिक क्षेत्रात बऱ्याच वर्षांपासून सेवाकार्य करणारे, सर्जिओ आणि ओलिंडासारखे अनेक बंधुभगिनी आहेत. कदाचित तुमच्या क्षेत्रातील बरेच लोकही ऐकणारे नसतील. अशा कठीण परिस्थितीतही तुम्ही धीराने सेवा करत असल्यामुळे आम्ही तुमची प्रशंसा करतो.a तुमच्या चांगल्या उदाहरणामुळे बऱ्याच बंधुभगिनींना खूप प्रोत्साहन मिळतं, अशा लोकांनाही जे बऱ्याच वर्षांपासून विश्वासाने सेवा करत आहेत. काही विभागीय पर्यवेक्षकांनी अशा बंधुभगिनींबद्दल काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या: “मी जेव्हा अशा विश्वासू बंधुभगिनींसोबत सेवा करतो, तेव्हा त्यांच्या उदाहरणामुळे मला खूप उत्तेजन मिळतं.” “त्यांच्या चांगल्या उदाहरणामुळे मला माझी सेवा धीराने आणि धैर्याने करायला खूप मदत होते.” “त्यांच्या उदाहरणामुळे मला उभारी मिळते.”
३. आपण कोणत्या तीन प्रश्नांवर चर्चा करणार आहोत? ते केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होईल?
३ या लेखात आपल्याला पुढील तीन प्रश्नांची उत्तरं मिळतील: सेवाकार्यात काही वेळा आपल्याला निराशा का येऊ शकते? फळ उत्पन्न करण्याचा काय अर्थ होतो? धीराने फळ उत्पन्न करत राहण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होईल? या प्रश्नांच्या उत्तरांवर मनन केल्यामुळे आपल्याला येशूने दिलेली प्रचारकार्याची कामगिरी करत राहायला प्रोत्साहन मिळेल.
आपण कोणत्या गोष्टीमुळे निराश होऊ शकतो?
४. (क) बऱ्याच यहुदी लोकांनी राज्याचा संदेश नाकारल्यामुळे पौलला कसं वाटलं? (ख) पौलला त्या लोकांबद्दल असं का वाटलं?
४ तुमच्या क्षेत्रातील लोक राज्याचा संदेश ऐकत नसल्यामुळे तुम्ही कधी निराश झाला आहात का? असं असल्यास प्रेषित पौलच्या भावना तुम्ही समजू शकता. त्याने जवळपास ३० वर्षं प्रचारकार्य केलं आणि बऱ्याच लोकांना ख्रिस्ती बनण्यासाठी मदत केली. (प्रे. कार्ये १४:२१; २ करिंथ. ३:२, ३) असं असलं तरी फार कमी यहुदी लोक ख्रिस्ती बनले. बऱ्याच यहुदी लोकांनी त्याचं ऐकलंसुद्धा नाही, आणि काहींनी तर त्याचा छळदेखील केला. (प्रे. कार्ये १४:१९; १७:१, ४, ५, १३) त्यांच्या अशा वागण्यामुळे पौलला कसं वाटलं? त्याने म्हटलं: “मला भयंकर दुःख आहे आणि माझ्या अंतःकरणाला सतत वेदना होत आहेत.” (रोम. ९:१-३) त्याला असं का वाटलं? कारण त्याला प्रचारकार्य खूप आवडायचं आणि लोकांवर त्याचं प्रेम होतं. पौलला यहुदी लोकांबद्दल खूप आपुलकी होती आणि देवाची कृपा त्यांनी नाकारली यामुळे पौलला खूप दुःख झालं.
५. (क) प्रचारकार्य करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन कशामुळे मिळतं? (ख) सेवाकार्यात कधीकधी निराशा येणं स्वाभाविक का आहे?
५ पौलसारखंच आपल्यालाही लोकांबद्दल काळजी आहे आणि त्यांना मदत करायची इच्छा आहे. म्हणूनच आपण लोकांना प्रचार करतो. (मत्त. २२:३९; १ करिंथ. ११:१) आपल्या स्वतःच्या अनुभवावरून आपण सांगू शकतो की यहोवाची सेवा करणं हाच जीवनातील सर्वोत्तम मार्ग आहे. सत्य स्वीकारल्यामुळे लोकांचं जीवन कसं सुधारेल हे समजायला आपल्याला त्यांना मदत करायची आहे. म्हणूनच आपण त्यांना यहोवाबद्दल आणि त्याच्या उद्देशाबद्दल शिकून घेण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देतो. हे जणू असं आहे की आपण त्यांच्यासाठी एक सुंदर भेट आणून त्यांना कळकळून विनंती करत आहोत, की ‘ही भेट स्वीकारा.’ असं करूनही ते आपली भेट नाकारतात तेव्हा साहजिकच पौलसारखं आपल्यालाही ‘दुःख होतं.’ पण याचा अर्थ आपला विश्वास कमजोर आहे असं नाही, तर लोकांवर प्रेम असल्यामुळे आपल्याला असं वाटतं. त्यामुळे कधीकधी निराश वाटत असलं तरी आपण आपलं सेवाकार्य चालू ठेवतो. आपल्यालाही एलिना नावाच्या पायनियर बहिणीसारखंच वाटतं. ती मागील २५ वर्षांपासून पायनियर सेवा करत आहे. ती म्हणते: “प्रचारकार्य नक्कीच सोपं नाही, पण याच्याव्यतिरिक्त मी दुसरं कोणतंच काम केलं नसतं.”
फळ उत्पन्न करण्याचा काय अर्थ होतो?
६. आपण कोणत्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत?
६ आपण कोणत्याही क्षेत्रात प्रचार करत असलो तरी यशस्वी होऊ शकतो, ही खातरी आपण का बाळगू शकतो? या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपण ‘फळ देण्याबद्दल’ येशूने दिलेल्या दोन दृष्टान्तांवर आता चर्चा करू या. (मत्त. १३:२३) पहिला दृष्टान्त द्राक्षवेलीचा आहे.
७. (क) माळी, द्राक्षवेल आणि फांद्या कोणाला सूचित करतात? (ख) आपल्याला कोणत्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे?
७ योहान १५:१-५, ८ वाचा. येशूने आपल्या प्रेषितांना सांगितलं: “तुम्ही भरपूर फळ देता आणि माझे शिष्य असल्याचं सिद्ध करता, तेव्हा माझ्या पित्याचा गौरव होतो.” येशूने या दृष्टान्तात यहोवाला “माळी” आणि स्वतःला “खरा द्राक्षवेल” असं संबोधलं. तसंच, त्याने शिष्यांना “फांद्या” असं म्हटलं.b तर मग ख्रिस्ताच्या शिष्यांना जे फळ उत्पन्न करायचं आहे ते कशाला सूचित करतं? या दृष्टान्तात फळ काय आहे हे येशूने स्पष्टपणे सांगितलं नाही. पण फळ कशाला सूचित करतं हे ओळखण्यासाठी येशूने एका विशेष गोष्टीकडे लक्ष वेधलं.
८. (क) येशूने दिलेल्या दृष्टान्तात फळ देणं हे नवीन शिष्य बनवण्याला सूचित करत नाही असं का म्हणता येईल? (ख) आपल्याकडून अपेक्षा करताना यहोवा नेहमी कोणती गोष्ट लक्षात ठेवतो?
८ येशूने आपल्या पित्याबद्दल म्हटलं: “फळ न देणारी माझ्यातली प्रत्येक फांदी तो कापून टाकतो.” याचाच अर्थ आपण जर फळ उत्पन्न केले तरच आपण यहोवाचे सेवक बनू शकतो. (मत्त. १३:२३; २१:४३) म्हणून मग या दृष्टान्तात, फळ उत्पन्न करण्याचा अर्थ नवीन शिष्य बनवणं असा होऊ शकत नाही. (मत्त. २८:१९) कारण जर असं असेल तर मग जिथे लोक आपला संदेश ऐकत नाही, अशा ठिकाणी सेवा करणारे विश्वासू सेवक त्या फांद्यांसारखे ठरतील जे काहीच फळ देत नाहीत. पण यहोवा नक्कीच असा विचार करत नाही. आपण लोकांवर येशूचे शिष्य बनण्यासाठी दबाव टाकू शकत नाही. तसंच, यहोवा हा प्रेमळ देव आहे. आपल्याला अशक्य असणाऱ्या कोणत्याही गोष्टीची अपेक्षा तो आपल्याकडून कधीच करणार नाही. आपल्याला जे शक्य आहे त्याचीच तो अपेक्षा करतो.—अनु. ३०:११-१४.
९. (क) काय केल्याने आपण फळ उत्पन्न करतो? (ख) आता आपण कोणत्या दृष्टान्तावर चर्चा करणार आहोत?
९ तर मग फळ उत्पन्न करण्याचा नेमका अर्थ काय होतो? ही एक अशी गोष्ट असली पाहिजे जी करणं आपल्या सर्वांनाच शक्य होईल. यहोवाने आपल्या सर्व सेवकांना कोणतं काम दिलं आहे? इतरांना त्याच्या राज्याची सुवार्ता सांगण्याचं काम.c (मत्त. २४:१४) येशूने बी पेरणाऱ्याचा जो दृष्टान्त सांगितला त्यातून ही गोष्ट स्पष्ट होते. आता आपण त्या दृष्टान्तावर चर्चा करू या.
१०. (क) येशूच्या दृष्टान्तात बी आणि जमीन कशाला सूचित करतात? (ख) गव्हाच्या रोपातून काय उत्पन्न होतं?
१० लूक ८:५-८, ११-१५ वाचा. बी पेरणाऱ्याचा दृष्टान्त देताना येशूने सांगितलं की बी हे “देवाचं वचन”, म्हणजेच देवाच्या राज्याबद्दलचा संदेश याला सूचित करतं. जमीन एका व्यक्तीच्या मनाला सूचित करते. जे बी चांगल्या जमिनीवर पडलं ते मुळावलं, त्याला अंकुर फुटला आणि मग त्याचं रोप बनलं. मग त्याने “शंभरपट फळ दिलं.” जर ते रोप गव्हाचं असेल, तर त्याचं फळ काय असणार? त्याला छोटं रोप येणार का? नाही, तर त्यातून गव्हाचे दाणे मिळतील. दुसऱ्या शब्दात त्यातून बिया मिळतील आणि नंतर त्या वाढून त्यांची रोपं तयार होतील. या दृष्टान्तात, एका बीमुळे १०० बिया उत्पन्न झाल्या. यातून आपण आपल्या सेवाकार्याबद्दल काय शिकतो?
आपण “धीराने फळ” कसं उत्पन्न करू शकतो? (परिच्छेद ११ पाहा)
११. (क) बी पेरणाऱ्याचा दृष्टान्त आपल्याला सेवाकार्याबद्दल काय शिकवतो? (ख) आपण बी कसं उत्पन्न करू शकतो?
११ आपल्या ख्रिस्ती आईवडिलांनी किंवा इतर साक्षीदारांनी आपल्याला देवाच्या राज्याबद्दल पहिल्यांदा सांगितलं, तेव्हा जणू त्यांनी आपल्या मनात बी पेरलं होतं. आपण आनंदाने तो संदेश स्वीकारला हे पाहून त्यांना नक्कीच खूप आनंद झाला असेल. पेरलेलं बी आपल्या मनात वाढत गेलं आणि शेवटी ते फळ देण्यासाठी तयार झालं. आपण आधी पाहिलं की गव्हाचं रोप नवीन रोपं उत्पन्न करत नाही, तर त्यातून आपल्याला बी मिळतं. तसंच, आपण नवीन शिष्य बनवत नाही, तर बी उत्पन्न करतो.d याचा काय अर्थ होतो? आपण जेव्हा-जेव्हा देवाच्या राज्याबद्दल कोणाला प्रचार करतो, तेव्हा-तेव्हा जणू आपण आपल्या मनात जे बी पेरलं होतं ते बहुगुणित करतो आणि इतरांच्या मनात पेरतो. (लूक ६:४५; ८:१) म्हणजे आपण जर देवाच्या राज्याचा प्रचार करत राहिलो, तर आपण “धीराने फळ” देत आहोत असा याचा अर्थ होईल.
१२. (क) द्राक्षवेलीच्या आणि बी पेरणाऱ्याच्या दृष्टान्तांतून आपण काय शिकतो? (ख) या दृष्टान्तांतील धडा समजल्यामुळे तुम्हाला यहोवाबद्दल कसं वाटतं?
१२ द्राक्षवेलीच्या आणि बी पेरणाऱ्याच्या दृष्टान्तांतून आपण काय शिकतो? आपण शिकतो की फळ उत्पन्न करणं हे लोक आपला संदेश ऐकतात की नाही, यावर अवलंबून नाही. तर आपण प्रचार करत राहतो की नाही यावर ते अवलंबून आहे. पौलनेही या गोष्टीला दुजोरा दिला. त्याने म्हटलं: “प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कार्याप्रमाणे प्रतिफळ मिळेल.” (१ करिंथ. ३:८) यहोवा आपल्याला आपण करत असलेल्या कार्यासाठी प्रतिफळ देतो, त्या कार्याच्या परिणामांसाठी नाही. मागील २० वर्षांपासून पायनियर सेवा करणारी मटिलडा नावाची बहीण म्हणते: “यहोवा आपले प्रयत्न पाहून आपल्याला प्रतिफळ देतो हे समजल्यामुळे मला मनापासून समाधान वाटतं.”
आपण धीराने फळ उत्पन्न कसं करत राहू शकतो?
१३, १४. रोमकर १०:१, २ या वचनांनुसार पौलने कोणत्या कारणांमुळे प्रचार करण्याचं थांबवलं नाही?
१३ “धीराने फळ” उत्पन्न करत राहण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? आपण पौलच्या उदाहरणाचं जवळून परीक्षण करू या. यहुदी लोकांनी राज्याचा संदेश नाकारल्यामुळे पौल निराश झाला होता हे आपण जाणतो. पण यामुळे त्यांना प्रचार करत राहण्याचं पौलने थांबवलं नाही. त्या यहुदी लोकांबद्दल त्याच्या भावना काय होत्या हे त्याने सांगितलं. त्याने म्हटलं: “इस्राएलचे तारण व्हावे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी मी देवाकडे याचनासुद्धा करतो. कारण त्यांच्याविषयी मी स्वतः साक्ष देतो, की त्यांना देवाविषयी आवेश तर आहे, पण तो अचूक ज्ञानानुसार नाही.” (रोम. १०:१, २) पौल त्या लोकांना प्रचार का करत राहिला?
१४ वचनाच्या सुरुवातीला पौलने म्हटलं की यहुदी लोकांना प्रचार करण्याची त्याची “मनापासून इच्छा आहे.” त्याला मनापासून वाटत होतं की त्यांचा बचाव व्हावा. (रोम. ११:१३, १४) नंतर त्याने म्हटलं की तो त्यांच्यासाठी “देवाकडे याचनासुद्धा करतो.” प्रत्येक यहुद्याने राज्याच्या संदेशाचा स्वीकार करावा अशी विनंती पौलने यहोवाला केली. नंतर पौलने म्हटलं की “त्यांना देवाविषयी आवेश” आहे. पौलने त्या लोकांमध्ये चांगल्या गोष्टी पाहिल्या आणि ते यहोवाची सेवा करू शकतात हेही त्याने पाहिलं. त्याला जाणीव होती की हे आवेशी यहुदीसुद्धा त्याच्यासारखंच ख्रिस्ताचे आवेशी सेवक बनू शकतात.
१५. आपण पौलचं अनुकरण कसं करू शकतो? उदाहरणं द्या.
१५ आपण पौलचं अनुकरण कसं करू शकतो? सर्वात आधी “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” असलेल्या लोकांना शोधायची आपली मनापासून इच्छा असली पाहिजे. मग प्रचार करताना चांगल्या मनाच्या लोकांनी आपला संदेश ऐकावा यासाठी आपण यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. (प्रे. कार्ये १३:४८; १६:१४) जवळपास ३० वर्षांपासून पायनियर सेवा करणाऱ्या सिलव्हाना या बहिणीनेही हेच केलं आहे. ती म्हणते की “क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या घरी जाण्याआधी मी यहोवाला प्रार्थना करते आणि सकारात्मक वृत्ती ठेवण्यासाठी मदत मागते.” आपल्या संदेशात आवड असणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी देवदूतांनी आपल्याला मदत करावी यासाठीही आपण प्रार्थना केली पाहिजे. (मत्त. १०:११-१३; प्रकटी. १४:६) रॉबर्ट नावाचा बांधव ३० पेक्षा जास्त वर्षांपासून पायनियर सेवा करत आहे. तो म्हणतो, “देवदूतांना माहीत आहे की घरमालकाच्या जीवनात काय चाललं आहे, यामुळे त्यांच्यासोबत मिळून सेवाकार्य करणं हे खरंच रोमांचक आहे.” यानंतर आपण लोकांमधल्या चांगल्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतो आणि ते यहोवाची सेवा करू शकतात हा दृष्टिकोन बाळगतो. ५० पेक्षा जास्त वर्षांआधी बाप्तिस्मा घेतलेले कार्ल नावाचे बांधव म्हणतात: “एखादी व्यक्ती प्रामाणिक मनाची आहे का हे पाहण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो, कदाचित तिचं स्मितहास्य, तिने विचारलेला एखादा प्रामाणिक प्रश्न, किंवा मग ती आपलं लक्ष देऊन ऐकते ही सर्व प्रामाणिक असण्याची छोटी-छोटी चिन्ह आहेत.” आपण या गोष्टी केल्या तर पौलप्रमाणे आपणही “धीराने फळ” उत्पन्न करत राहू.
“आपला हात आवरू नको”
१६, १७. (क) उपदेशक ११:६ या वचनातून आपण कोणता धडा शिकतो? (ख) जे लोक आपल्याला प्रचार करताना पाहतात त्यांच्यावर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो?
१६ आपल्या प्रचारकार्याचा लोकांवर चांगला परिणाम होतो हे आपण कधीही विसरू नये. मग लोक आपला संदेश ऐकत नसले तरीही. (उपदेशक ११:६ वाचा.) प्रचार करताना लोकांचं आपल्याकडे लक्ष असतं. आपले कपडे नीटनेटके आहेत आणि आपण नम्रतेने, आपुलकीने बोलतो हे लोक पाहतात. याचा त्यांच्यावर चांगला परिणाम होऊ शकतो आणि जे लोक आपल्याबद्दल नकारात्मक विचार करतात, तेही कदाचित पुढे जाऊन आपला संदेश ऐकायला तयार होऊ शकतात. ही गोष्ट लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या सर्जिओ आणि ओलिंडा यांच्याबाबतीत खरी ठरली.
१७ सर्जिओ म्हणतात: “एकदा आजारी असल्यामुळे आम्ही काही दिवस चौकात प्रचारकार्याला जाऊ शकलो नाही. आम्ही परत गेलो तेव्हा अनेकांनी आम्हाला विचारलं, ‘काय झालं होतं? बरेच दिवस दिसला नाहीत.’” ओलिंडा हसत सांगते: “काही बस ड्रायव्हरनी आम्हाला हात केला, तर काहींनी बसमधूनच मोठ्याने ओरडून म्हटलं, ‘खूप चांगलं काम करता तुम्ही!’ काहींनी तर आमच्याकडे मासिकंही मागितली.” सर्जिओ आणि ओलिंडाला खूप आश्चर्य वाटलं, जेव्हा एक व्यक्ती त्यांच्याजवळ आली आणि तिने त्यांना पुष्पगुच्छ देऊन ते करत असलेल्या कामासाठी त्यांचे आभार मानले.
१८. “धीराने फळ” उत्पन्न करत राहण्याचा निर्धार तुम्ही का केला आहे?
१८ आपण जर ‘हात न आवरता’ इतरांना राज्याचा आनंदाचा संदेश सांगत राहिलो, तर “सर्व जगात” हा संदेश घोषित करण्याच्या कामात आपण एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असू. (मत्त. २४:१४) सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपण हे काम करून यहोवाचं मन आनंदित करत आहोत या जाणीवेने आपल्याला खूप समाधान मिळेल. जे लोक “धीराने फळ” उत्पन्न करतात त्यांच्यावर यहोवा खूप प्रेम करतो.
a येशूनेदेखील म्हटलं की “स्वतःच्या गावात” प्रचार करणं सोपं नाही. ही गोष्ट त्याच्या सेवाकार्याबद्दलच्या चारही अहवालांत आपल्याला वाचायला मिळते.—मत्त. १३:५७; मार्क ६:४; लूक ४:२४; योहा. ४:४४.
b या दृष्टान्तात फांद्या अशा लोकांना सूचित करतात ज्यांना स्वर्गात जाण्याची आशा आहे. असं असलं तरी यातील धडे सर्व ख्रिश्चनांना लागू होतात.
c ‘फळ देणं’ हे “आत्म्याचे फळ” उत्पन्न करण्यालाही सूचित करू शकतं. पण या आणि पुढील लेखात “ओठांचे फळ”, म्हणजेच राज्याची सुवार्ता सांगण्यावर जोर दिला आहे.—गलती. ५:२२, २३; इब्री १३:१५.
d इतर प्रसंगी येशूने बी पेरणं आणि कापणी करणं या उदाहरणांचा उपयोग शिष्य बनवण्याच्या कार्याला सूचित करण्यासाठी केला.—मत्त. ९:३७; योहा. ४:३५-३८.