जीवन कथा
यहोवाला सर्वकाही शक्य आहे
“मृत्यू कायमचा काढून टाकला जाईल इतकंच नाही, तर मृत लोकांना जिवंतही केलं जाईल.” बसमधून प्रवास करताना एका स्त्रीचे हे शब्द माझ्या बायकोच्या, मायरॅमबुबूच्या कानावर पडले. तिला याविषयी आणखीन जाणून घेण्याची खूप उत्सुकता लागली. जेव्हा बस थांबली आणि सर्व प्रवासी उतरले तेव्हा ती त्या स्त्रीशी बोलण्यासाठी तिच्या मागे जाऊ लागली. त्या स्त्रीचं नाव होतं एपन मॅमबेटसॅडीकोवा. ती एक यहोवाची साक्षीदार होती. त्या काळी साक्षीदारांशी बोलणं खूप धोकेदायक होतं. पण नंतर आम्ही एपनकडून जे शिकलो, त्यामुळे आमचं जीवनच बदलून गेलं.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम
माझा जन्म १९३७ मध्ये एका कॉल्कहोजवर झाला. कॉल्कहोज म्हणजे असं शेत जिथे सामुदायिक शेती केली जाते. हे किर्गिझस्तान देशात टोकमॅक शहराजवळ होतं. माझं कुटुंब किर्गिझ असून, आम्ही किर्गिझ भाषा बोलायचो. माझे आई-वडील सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात शेतमजुराचं काम करायचे. मजुरांना रोजचं जेवण दिलं जायचं, पण वर्षातून एकदाच त्यांना रोख मजुरी दिली जायची. यामुळे माझ्या आईला माझा आणि माझ्या बहिणीचा सांभाळ करणं फार कठीण गेलं. मी फक्त पाच वर्षंच शिक्षण घेतलं. त्यानंतर मीही कॉल्कहोजवर काम करू लागलो.
टेस्की आला-तौ पर्वतरांगा
मी राहत असलेल्या ठिकाणी खूप गरिबी होती. त्यामुळे आमच्या गरजा भागवण्यासाठी आम्हाला खूप कष्टाचं काम करावं लागायचं. तरुण असताना मी खरंतर कधीच जीवनाच्या उद्देशाबद्दल किंवा भविष्याबद्दल विचार केला नव्हता. तसंच यहोवा देवाबद्दल आणि त्याच्या उद्देशाबद्दल जाणून घेतल्यामुळे माझं जीवन बदलून जाईल याचाही मी कधीच विचार केला नव्हता. हा आनंदाचा संदेश किर्गिझस्तानपर्यंत कसा पोहोचला आणि तो सर्वांना कसा समजला हे जाणून घेणं खूप उल्लेखनीय आहे. याची सुरुवात मी जिथे राहत होतो तिथून, म्हणजे उत्तर किर्गिझस्तानमधून झाली.
पूर्वी हद्दपार झालेल्यांनी किर्गिझस्तानमध्ये प्रचार केला
१९५६ सालादरम्यान यहोवा देवाविषयीचं सत्य किर्गिझस्तानमध्ये रुजू लागलं. पण त्या वेळी लोकांवर साम्यवादी विचारसरणीचा पगडा होता. आणि आता त्यांना सत्य शिकवायचं होतं. आताचं किर्गिझस्तान, तेव्हा यूनियन ऑफ सोवियत सोशलिस्ट रिपब्लिक्स (यूएसएसआर) याच्या ताब्यात होतं. संपूर्ण यूएसएसआरमध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी राजनैतिक कार्यांत तटस्थ भूमिका घेतली होती. (योहान १८:३६) यामुळे साम्यवादी राष्ट्राच्या शत्रूंप्रमाणे त्यांचा छळ करण्यात आला. पण कोणतीच विचारसरणी देवाच्या वचनाला प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकत नव्हती. मी माझ्या संपूर्ण जीवनकाळात एक मोलाचा धडा शिकलो. तो म्हणजे यहोवाला “सर्वकाही शक्य आहे.”—मार्क १०:२७.
एमील यानत्झेन
किर्गिझस्तानमध्ये यहोवाच्या साक्षीदारांचा छळ झाला. पण यामुळे त्यांची वाढही झाली. ही वाढ कशी झाली? यूएसएसआरमध्ये साइबीरिया या भागाचा समावेश होता. तिथे हद्दपार केलेल्या राष्ट्राच्या शत्रूंना ठेवलं जायचं. जेव्हा हद्दपार झालेल्या लोकांना सोडलं, तेव्हा त्यांपैकी अनेक जण किर्गिझस्तानला आले आणि इथे त्यांनी सत्याचं बी पेरलं. अशांपैकी एक होता एमील यानत्झेन. एमीलचा जन्म १९१९ साली किर्गिझस्तानमध्ये झाला होता. त्याला मजूर छावणीमध्ये पाठवण्यात आलं. तिथे त्याची भेट साक्षीदारांशी झाली. त्याने सत्य स्वीकारलं आणि १९५६ मध्ये तो आपल्या घरी परत आला. मी राहत असलेल्या सोकुलूक या ठिकाणाजवळ एमील राहू लागला. १९५८ साली किर्गिझस्तानमध्ये सोकुलूक इथे पहिली मंडळी स्थापित झाली.
विक्टर विन्टर
याच्या एक वर्षानंतर विक्टर विन्टर नावाचा बांधव सोकुलूकला आला. या विश्वासू बांधवाला एका नंतर एक अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तटस्थ राहिल्यामुळे त्याला तीन वर्षांची शिक्षा दोनदा झाली. त्यानंतर त्याने दहा वर्षं तुरुंगात काढली आणि पाच वर्षांसाठी त्याला हद्दपार करण्यात आलं. इतका छळ होऊनही खऱ्या उपासनेला वाढण्यापासून कोणतीही गोष्ट रोखू शकली नाही.
मी राहत असलेल्या ठिकाणी सत्य पोहोचलं
एडवार्ड वॉरटर
१९६३ पर्यंत किर्गिझस्तानमध्ये एकूण १६० साक्षीदार झाले होते. त्यांच्यापैकी अनेक जण जर्मनी, युक्रेन आणि रशिया इथले होते. त्यांपैकी एक होता एडवार्ड वॉरटर. त्यालाही हद्दपार करण्यात आलेलं आणि त्याचा बाप्तिस्मा १९२४ साली जर्मनीमध्ये झाला होता. १९४० मध्ये त्याला नात्झी लोकांनी छळ छावणीत पाठवलं. याच्या काही काळानंतर यूएसएसआरमध्ये साम्यवादी लोकांनी एडवार्डला हद्दपार केलं. मग १९६१ मध्ये हा विश्वासू बांधव कॅन्ट या शहरात राहायला आला. हे शहर मी राहत असलेल्या ठिकाणाजवळ होतं.
एलीझाबेथ फॉट; अक्सामाय सुलतानालीयवा
एलीझाबेथ फॉट ही यहोवाची विश्वासू सेवकसुद्धा कॅन्ट शहरात राहायची. ती शिवणकाम करून आपलं घर चालवायची. ती आपल्या कामात खूप हुशार असल्यामुळे अनेक जण, जसं की डॉक्टर, शिक्षक तिच्याकडून कपडे शिवून घ्यायचे. तिच्याकडून कपडे शिवून घेणाऱ्यांपैकी एक होती अक्सामाय सुलतानालीयवा. तिचा नवरा सरकारी वकिलांच्या कार्यालयात एक अधिकारी होता. एकदा कपडे शिवण्यासाठी अक्सामाय एलीझाबेथकडे आली. तेव्हा तिने जीवनाबद्दल आणि मृतांच्या स्थितीबद्दल एलीझाबेथला अनेक प्रश्न विचारले. एलीझाबेथने तिच्या प्रश्नांची उत्तरं सरळ बायबलमधून दिली. पुढे जाऊन अक्सामाय एक आवेशी प्रचारक बनली.
निकोलाय चीम्पोइश
त्यादरम्यान मॉल्डोवा इथे राहणारे निकोलाय चीम्पोइश यांना विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. त्यांनी जवळजवळ ३० वर्षं सेवा केली. निकोलाय फक्त मंडळींनाच भेट देत नव्हते, तर साहित्यांच्या नकला करून त्यांचं वाटप करायचे. त्यांचं हे काम अधिकाऱ्यांना माहीत होतं. निकोलायला धीर मिळावा यासाठी एडवार्ड वॉरटर याने त्याला प्रोत्साहनदायक सल्ला दिला. ते म्हणाले: “जेव्हा अधिकारी तुला प्रश्न विचारतील तेव्हा त्यांना सांग की आम्हाला आमचं साहित्य ब्रुकलिन इथे असलेल्या आमच्या मुख्यालयाकडून मिळतं. केजीबी अधिकाऱ्याच्या नजरेला नजर मिळवून बोल. तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही.”—मत्त. १०:१९.
या संभाषणानंतर लगेच कॅन्ट इथल्या केजीबीच्या मुख्यालयात निकोलायला बोलवण्यात आलं. तिथे आलेला अनुभव सांगताना तो म्हणतो: “तुम्ही साहित्य कुठून आणता असं अधिकाऱ्याने विचारलं. मी म्हटलं ब्रुकलिनवरून. यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे त्याला कळलंच नाही. त्यामुळे त्याने मला सोडून दिलं आणि त्यानंतर परत कधीच बोलवलं नाही.” असे निर्भयी साक्षीदार उत्तर किर्गिझस्तानमध्ये म्हणजे मी राहत असलेल्या भागात सावधगिरीने आनंदाच्या संदेशाची घोषणा करत राहिले. शेवटी १९८१ मध्ये यहोवाविषयी असलेलं मौल्यवान सत्य माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचलं. सर्वात आधी माझ्या बायकोला, मायरॅमबुबूला हा संदेश कळला.
माझ्या बायकोने लगेच सत्य ओळखलं
मायरॅमबुबू किर्गिझस्तानमधल्या नरिन या भागातली आहे. १९७४ सालच्या ऑगस्ट महिन्यात ती एकदा माझ्या बहिणीला भेटायला आली होती. तिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो. मला मायरॅमबुबू बघताच क्षणी आवडली आणि त्याच दिवशी आम्ही लग्न केलं.
एपन मॅमबेटसॅडीकोवा
१९८१ सालच्या जानेवारी महिन्यात बाजारात जाण्यासाठी बसमधून प्रवास करताना काही शब्द मायरॅमबुबूच्या कानावर पडले. ते शब्द या लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत. माझ्या बायकोला याविषयी आणखीन जाणून घ्यायचं होतं. म्हणून तिने त्या स्त्रीला तिचं नाव व पत्ता द्यायला सांगितला. तिने मायरॅमबुबूला तिचं नाव एपन असं सांगितलं. पण ती सावध होती कारण १९८० च्या काळातही साक्षीदारांच्या कार्यांवर बंदी होती. त्यामुळे स्वतःचा पत्ता देण्याऐवजी एपनने आमच्या घरचा पत्ता घेतला. माझी बायको जेव्हा घरी आली तेव्हा ती खूप उत्साहात होती.
ती म्हणाली: “मी आज खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या. एका स्त्रीने मला सांगितलं की लवकरच अशी वेळ येणार आहे जेव्हा लोक कधीच मरणार नाहीत. आणि जंगली प्राणी पाळीव प्राण्यांप्रमाणे होतील.” मला तर ती एक काल्पनिक कथा वाटत होती. ती पुढे म्हणाली: “ती येईल तेव्हा याबद्दल आपल्याला सविस्तर सांगेल.”
एपन आमच्याकडे तीन महिन्यांनंतर आली. पुढे ती आम्हाला भेट देत राहिली आणि यादरम्यान आम्हाला किर्गिझ लोकांमधल्या पहिल्या साक्षीदारांना भेटण्याची संधी मिळाली. या साक्षीदारांनी आम्हाला यहोवा आणि मानवजातीसाठी असणाऱ्या संकल्पाविषयीचे बरेच अद्भुत सत्य सांगितले. त्यांनी आम्हाला फ्रॉम पॅरडाईज लॉस्ट टू पॅरडाईज रिगेन्डa या पुस्तकातून शिकवलं. पण तेव्हा टोकमॅकमध्ये या पुस्तकाची एकच प्रत होती, म्हणून मग आम्ही त्याची एक नक्कल तयार करून घेतली.
सर्वात आधी शिकलेल्या गोष्टींपैकी एक होती उत्पत्ति ३:१५ ची भविष्यवाणी. देवाच्या राज्याचा राजा, येशू ख्रिस्त याद्वारे ही भविष्यवाणी पूर्ण होईल. हा संदेश इतका महत्त्वपूर्ण असल्यामुळे तो सर्वांपर्यंत पोहोचायलाच हवा होता. आणि यामुळेच राज्याचा संदेश इतरांना सांगण्यासाठी आम्ही प्रेरित झालो. (मत्तय २४:१४) पुढे बायबलमुळे आमचं जीवन बदलत गेलं.
सभांवर आणि बाप्तिस्मा घेण्यावर बंदी
टोकमॅक शहरात एका बांधवाने आम्हाला लग्नाचं आमंत्रण दिलं. लग्नाला गेल्यावर मला आणि माझ्या बायकोला लक्षात आलं की साक्षीदारांची वागणूक इतर लोकांपेक्षा फार वेगळी आहे. लग्नात दारू नव्हती आणि सर्वकाही सुव्यवस्थित होतं. आम्ही आजपर्यंत हजर राहिलेल्या लग्न समारंभांपेक्षा हा समारंभ अगदी वेगळा होता. इतर लग्नात आम्ही लोकांना खूप दारू पिऊन धिंगाणा घालताना आणि शिवीगाळ करताना पाहिलं होतं.
आम्ही टोकमॅक मंडळीच्या काही सभांनादेखील हजर राहिलो. हवामान लक्षात घेऊन त्या सभा जंगलात भरवल्या जायच्या. पोलिसांची साक्षीदारांवर पाळत आहे हे बंधुभगिनींना माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी एका बांधवाला पहारा देण्यासाठी नेमलं होतं. हिवाळ्यात आम्ही सभांसाठी घरात भेटायचो. बऱ्याच वेळा पोलीस तिथे यायचे. आम्ही काय करत आहोत हे विचारायचे. माझा आणि मायरॅमबुबूचा बाप्तिस्मा १९८२ साली जुलै महिन्यात चू नावाच्या नदीत झाला. त्या वेळी आम्हाला खूप सावध राहून बाप्तिस्मा घ्यावा लागला. (मत्त. १०:१६) बांधव जंगलात एकत्र पोहोचण्याऐवजी थोड्या-थोड्या संख्येने तिथे पोहोचले. मग आम्ही राज्य गीत गायलं आणि बाप्तिस्म्याचं भाषण ऐकलं.
आम्ही सेवाकार्य वाढवण्याच्या संधीचा फायदा करून घेतला
१९८७ मध्ये एका बांधवाने मला बालीक्तशाय शहरात सत्याबद्दल आवड दाखवणाऱ्या एका व्यक्तीला भेटायला सांगितलं. आमच्या घरून ट्रेनने तिथे पोहोचायला जवळजवळ चार तासांचा प्रवास करावा लागायचा. बालीक्तशायला प्रचार करण्यासाठी वारंवार गेल्यामुळे आम्हाला समजलं की तिथल्या बऱ्याच लोकांना सत्य शिकण्याची आवड आहे. सेवाकार्य वाढवण्याची ही आमच्यासाठी एक संधी होती.
मी आणि मायरॅमबुबू नेहमीच बालीक्तशायला जायचो. बऱ्याच वेळा शनिवार-रविवार आम्ही तिथेच राहायचो, प्रचार करायचो आणि सभाही चालवायचो. तिथे आपल्या साहित्यांची मागणी खूप वाढली. आम्ही हे साहित्य मीशॉकमधून आणायचो. मीशॉक म्हणजे बटाट्याची गोणी. प्रत्येक महिन्याला दोन गोण्या भरून साहित्य नेलं जायचं. पण तेही कमी पडायचं. बालीक्तशायहून ट्रेनमधून येताना आणि जातानासुद्धा आम्हाला प्रवाश्यांना साक्ष देण्याची संधी मिळायची.
आम्ही बालीक्तशायला पहिल्यांदा गेलो त्याच्या आठ वर्षांनंतर म्हणजे १९९५ मध्ये तिथे एक मंडळी स्थापित झाली. त्या वेळी टोकमॅक ते बालीक्तशायच्या प्रवासाला खूप पैसे लागायचे. आमच्याकडे जास्त पैसे नव्हते. मग आम्ही सगळा खर्च कसा भागवला? एक बांधव नेहमी आम्हाला खर्चासाठी थोडे पैसे द्यायचा. सेवाकार्य वाढवण्याची आमची इच्छा यहोवाने ओळखली आणि स्वर्गाची “आकाशकपाटे” आमच्यासाठी उघडली. (मला. ३:१०) खरंच, यहोवाला सर्वकाही शक्य आहे!
सेवाकार्यात आणि कुटुंबासोबत व्यस्त
१९९२ साली मला वडील म्हणून नेमण्यात आलं. किर्गिझ पार्श्वभूमीतून आलेला मी पहिला वडील होतो. मी ज्या टोकमॅक मंडळीत जायचो तिथे सेवेचे नवीन दार उघडले. शैक्षणिक संस्थेतल्या बऱ्याच तरुण किर्गिझ विद्यार्थ्यांसोबत आम्ही बायबल अभ्यास करायचो. या विद्यार्थ्यांमधला एक आज शाखा समितीचा सदस्य आहे आणि आणखी दोन जण खास पायनियर म्हणून सेवा करत आहेत. आम्ही सभांमधल्या बंधुभगिनींनाही मदत केली. १९९० च्या सुरुवातीच्या काळात आपले साहित्य रशियन भाषेत उपलब्ध होऊ लागले आणि त्याच भाषेत सभाही होऊ लागल्या. मंडळीत बरेच किर्गिझ भाषीय लोक येऊ लागले. लोकांना सत्य आणखीन चांगल्या प्रकारे समजावं म्हणून मी किर्गिझ भाषेत सभांचं अनुवाद करायचो.
१९८९ साली मी माझ्या बायको आणि आठ मुलांबरोबर
मी आणि मायरॅमबुबू आमच्या मुलांचं पालनपोषण करण्यातही व्यस्त असायचो. आम्ही आमच्या मुलांना प्रचाराला आणि सभांना घेऊन जायचो. आमची मुलगी गुलसायरा १२ वर्षांची असतानाच तिला रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांशी बोलायला आणि त्यांना बायबलबद्दल सांगायला आवडायचं. आमच्या मुलांना वचनं तोंडपाठ करायला आवडायचं. अशा प्रकारे आमची मुलं आणि नातवंडं मंडळीच्या कामात व्यस्त असायची. आम्हाला ९ मुलं आणि ११ नातवंडं आहेत. यांपैकी १६ जण यहोवाची सेवा करत आहेत किंवा आपल्या आई-वडिलांसोबत सभांना जात आहेत.
कमालीचे बदल
१९५० च्या दशकात ज्या प्रिय बंधू-भगिनींनी आमच्या क्षेत्रात यहोवाची सेवा सुरू केली, त्यांना ही झालेली वाढ पाहून खरंच खूप आश्चर्य होईल. १९९० च्या काळापासून आम्हाला आनंदाचा संदेश सांगण्याचं जास्त स्वातंत्र्य मिळालं आहे. तसंच, आम्ही मोठ्या संख्येने एकत्रही येऊ शकतो.
सेवाकार्यात माझ्या बायकोसोबत
१९९१ मध्ये अल्मा अता या ठिकाणी झालेल्या पहिल्या अधिवेशनाला मी आणि माझी बायको हजर राहिलो. अल्मा अता याला आज अल्माटी असं म्हणतात. हे किर्गिझस्तानमध्ये आहे. १९९३ साली किर्गिझस्तानमधल्या बांधवांनी पहिल्यांदा बिश्केक इथल्या स्पार्टक स्टेडियममध्ये एका अधिवेशनाचं आयोजन केलं. अधिवेशनाआधी प्रचारकांनी एक आठवडा स्टेडियम स्वच्छ करण्यात घालवला. हे पाहिल्यावर स्टेडियमचा अधिकारी इतका खूश झाला की त्याने आमच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी काहीच पैसे घेतले नाहीत.
१९९४ मध्ये आम्ही आणखीन एक शिखर गाठलं, ते म्हणजे किर्गिझ भाषेतलं पहिलं साहित्य या वर्षी छापण्यात आलं. आता साहित्यांचं भाषांतर नियमितपणे किर्गिझ भाषेत केलं जातं. हे काम बिश्केक इथल्या शाखा कार्यालयातल्या भाषांतरकारांच्या गटाद्वारे केलं जातं. नंतर, १९९८ साली किर्गिझस्तानमध्ये साक्षीदारांच्या कार्याला कायदेशीर मान्यता मिळाली. संघटना वाढली आहे आणि आज आम्ही ५,००० पेक्षा जास्त प्रचारक आहोत. आज किर्गिझस्तानमध्ये एकूण ८३ मंडळ्या आणि २५ गट आहेत. हे चीनी, इंग्लीश, रशियन, रशियन संकेत भाषा, तुर्की, वीगुर आणि उझबेक या भाषांमध्ये आहेत. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले हे प्रिय बंधूभगिनी एकतेने यहोवाची सेवा करतात. हे सर्व कमालीचे बदल घडवून आणणं केवळ यहोवालाच शक्य होतं.
यहोवाने माझं जीवनही बदललं. माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आणि मला फक्त पाच वर्षंच शाळेत जातं आलं. असं असलं तरी यहोवाने मला वडील म्हणून सेवा करण्यासाठी निवडलं. तसंच, माझ्यापेक्षा जास्त शिक्षण झालेल्यांना बायबलचं मौल्यवान सत्य सांगण्याचीही संधी दिली. खरंच, यहोवा विलक्षण गोष्टी घडवून आणतो! जीवनात आलेल्या अनुभवांमुळे मला यहोवाला एकनिष्ठ राहून त्याच्याविषयी इतरांना सांगण्याची प्रेरणा मिळते, कारण त्याला “सर्वकाही शक्य आहे.”—मत्त. १९:२६.
a हे पुस्तक यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलं होतं; सध्या ते छापलं जात नाही.