वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w18 जानेवारी पृ. २२-२६
  • कोणावर प्रेम केल्याने खरा आनंद मिळतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कोणावर प्रेम केल्याने खरा आनंद मिळतो?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवावर प्रेम करणारे की स्वतःवर?
  • स्वर्गात धन एकत्र करणारे की पृथ्वीवर?
  • यहोवावर प्रेम करणारे की चैनीवर?
  • आपण आनंदी कसं होऊ शकतो?
  • प्रीतीने तुमची उन्‍नती होत जावी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याचा अर्थ काय?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • तुमच्यावर प्रीती करणाऱ्‍या देवावर प्रेम करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • तुमचं प्रेम थंड होऊ देऊ नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
w18 जानेवारी पृ. २२-२६
स्वतःवर खूप प्रेम करणारी एक स्त्री; चैनीच्या गोष्टी आवडतात असा एक माणूस; मोठ्या पार्टीत रंगलेले काही जण

कोणावर प्रेम केल्याने खरा आनंद मिळतो?

“ज्या लोकांचा देव परमेश्‍वर [यहोवा, NW] आहे ते धन्य!”—स्तो. १४४:१५.

गीत क्रमांक: २८, २५

तुमचं उत्तर काय असेल?

  • आपण स्वतःवर खूप जास्त प्रेम करण्याचं कसं टाळू शकतो?

  • पैशावर प्रेम करणारे लोक आनंदी का नसतात?

  • चैनीला आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे आपण कसं ठरवू शकतो?

१. आज आपण एका खास काळात जगत आहोत असं का म्हणता येईल?

आपण मानवी इतिहासातल्या एका खास काळात जगत आहोत. बायबलमध्ये भविष्यवाणी केल्यानुसार यहोवा “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा” बोलणाऱ्‍या लोकांना आज एकत्र करत आहे. आज या ८० लाखांपेक्षा जास्त लोकांनी मिळून एक “बलाढ्य राष्ट्र” बनलं आहे. ते दिवस-रात्र आनंदाने यहोवाची पवित्र सेवा करत आहेत. (प्रकटी. ७:९, १५; यश. ६०:२२) आज देवावर आणि एकमेकांवर प्रेम करणाऱ्‍या लोकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. मानवी इतिहासात असं आधी कधीच घडलं नव्हतं.

२. देवावर प्रेम न करणारे लोक कोणत्या चुकीच्या गोष्टीवर प्रेम करतात? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

२ पण बायबल हेदेखील सांगतं की आपल्या काळात देवावर प्रेम न करणारे लोकही असतील. हे लोक चुकीच्या गोष्टींवर प्रेम करतील आणि हे प्रेम स्वार्थी असेल. प्रेषित पौलने म्हटलं, की शेवटल्या दिवसांत लोक “स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे” आणि “देवापेक्षा चैनीची आवड” धरणारे असतील. (२ तीम. ३:१-४) स्वतःच्या इच्छांवर प्रेम करणं, देवावर प्रेम करण्याच्या अगदी विरुद्ध आहे. स्वतःची स्वार्थी ध्येयं पूर्ण करण्यामागे लागल्यामुळे एका व्यक्‍तीला वाटू शकतं की ती आनंदी होईल. पण असं केल्यामुळे ती कधीच आनंदी होऊ शकत नाही. याऐवजी अशा मनोवृत्तीमुळे लोक स्वार्थी होतात आणि त्याचा इतरांवर विपरीत परिणाम होतो.

३. आपण या लेखात काय पाहणार आहोत? आणि का?

३ शेवटल्या दिवसांत अशा प्रकारची स्वार्थी मनोवृत्ती सर्वसामान्य होईल आणि याचा ख्रिश्‍चनांना धोका असू शकतो हे प्रेषित पौलला माहीत होतं. त्यामुळे त्याने ख्रिश्‍चनांना अशा प्रकारचं प्रेम दाखवणाऱ्‍या लोकांपासून “दूर राहा” अशी ताकीद दिली. (२ तीम. ३:५) पण आपण अशी चुकीची मनोवृत्ती बाळगणाऱ्‍या लोकांना पूर्णपणे टाळू शकत नाही. तर मग, अशी चुकीची मनोवृत्ती टाळून प्रेम करणाऱ्‍या यहोवा देवाचं मन आनंदित करण्यासाठी आपण कोणती पावलं उचलू शकतो? हे समजून घेण्यासाठी यहोवा आपल्याकडून ज्या प्रेमाची अपेक्षा करतो त्यात, आणि २ तीमथ्य ३:२-४ मध्ये सांगितलेल्या प्रेमात काय फरक आहे याचं आपण परीक्षण करू या. हे परीक्षण केल्यामुळे आपल्याला कळेल की आपण आणखी चांगल्या प्रकारे यहोवावर प्रेम कसं करू शकतो. त्यामुळे आपल्याला खरा आनंद आणि समाधान मिळेल.

देवावर प्रेम करणारे की स्वतःवर?

४. स्वतःवर काही प्रमाणात प्रेम करणं चुकीचं नाही असं का म्हणता येईल?

४ पौलने म्हटलं की लोक “स्वतःवर प्रेम करणारे” बनतील. पण याचा असा अर्थ होतो का, की स्वतःवर प्रेम करणं चुकीचं आहे? नाही, उलट स्वतःवर प्रेम करणं हे अगदी स्वाभाविक आणि गरजेचं आहे. यहोवाने आपली रचनाच तशी केली आहे. येशूने म्हटलं: “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम कर.” (मार्क १२:३१) खरंतर स्वतःवर प्रेम केल्याशिवाय आपण इतरांवर प्रेम करूच शकत नाही. बायबलमध्ये असंदेखील सांगितलं आहे की “पती जसे स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात तसेच त्यांनी आपल्या पत्नीवरही प्रेम करावे. जो मनुष्य आपल्या पत्नीवर प्रेम करतो तो स्वतःवर प्रेम करतो; कारण कोणताही मनुष्य स्वतःच्या शरीराचा द्वेष करत नाही; उलट, तो त्याचे पालनपोषण करतो.” (इफिस. ५:२८, २९) या वचनांवरून हे स्पष्टच आहे की स्वतःवर काही प्रमाणात प्रेम करणं चुकीचं नाही.

स्वतःवर खूप प्रेम करणारी एक स्त्री

५. स्वतःवर खूप प्रेम करणारी व्यक्‍ती कशी असते?

५ पण २ तीमथ्य ३:२ मध्ये ज्या प्रेमाबद्दल सांगितलं आहे ते प्रेम स्वाभाविक आणि योग्य नाही. ते खरंतर स्वार्थी आहे. एक व्यक्‍ती जेव्हा स्वतःवर खूप प्रेम करते, तेव्हा ती स्वतःबद्दल गरजेपेक्षा जास्त विचार करत असते. (रोमकर १२:३ वाचा.) तिला इतरांची मुळीच काळजी नसते, तर ती फक्‍त स्वतःचाच विचार करते. काही चूक झाली तर जबाबदारी स्वीकारण्याऐवजी अशी व्यक्‍ती सहसा इतरांना दोष देते. अशी व्यक्‍ती कधीच आनंदी नसते.

६. देवावर प्रेम केल्यामुळे कोणते फायदे होतात?

६ बायबलचे काही विद्वान असं म्हणतात, की या वचनात पौलने स्वतःवर प्रेम करण्याचा उल्लेख आधी केला कारण त्यामुळे वाईट गुण उत्पन्‍न होतात. या वाईट गुणांचा त्याने वचनात पुढे उल्लेख केला. याच्या अगदी उलट देव आपल्याकडून अपेक्षा करतो त्या प्रेमामुळे आपल्यात चांगले गुण उत्पन्‍न होतात. या प्रेमात आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्‍वास, सौम्यता आणि आत्मसंयम हे गुण समाविष्ट आहेत. (गलती. ५:२२, २३) स्तोत्रकर्त्याने म्हटलं: “ज्या लोकांचा देव परमेश्‍वर [यहोवा, NW] आहे ते धन्य!” (स्तो. १४४:१५) यहोवा हा आनंदी देव आहे आणि त्याची उपासना करणारे लोकही आनंदी असतात. आज बरेच लोक स्वतःवरच खूप जास्त प्रेम करतात आणि स्वतःचाच विचार करतात. पण त्यांच्या तुलनेत यहोवाचे उपासक आनंदी आहेत कारण ते नेहमी इतरांना मदत करतात.—प्रे. कार्ये २०:३५.

सेवाकार्य करताना एक बहीण

स्वतःवर प्रेम करण्याचं आपण कसं टाळू शकतो? (परिच्छेद ७ पाहा)

७. देवावर आपण किती प्रेम करतो याचं परीक्षण करण्यासाठी कोणते प्रश्‍न आपल्याला मदत करतील?

७ आपलं देवावर जास्त प्रेम आहे की स्वतःवर, हे आपण कसं ओळखू शकतो? बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्याकडे लक्ष द्या: “भांडखोर वृत्तीने किंवा अहंकाराने कोणतीही गोष्ट करू नका, तर नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा, आणि फक्‍त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका, तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.” (फिलिप्पै. २:३, ४) आपण स्वतःला पुढील प्रश्‍न विचारू शकतो: ‘मी हा सल्ला लागू करत आहे का? यहोवा माझ्याकडून अपेक्षा करतो ते करण्याचा मी प्रयत्न करत आहे का? मंडळीमध्ये आणि प्रचारकार्यात इतरांना मदत करण्यासाठी मी संधी शोधतो का?’ आपल्या वेळेचा आणि शक्‍तीचा वापर, इतरांना मदत करण्यासाठी करणं नेहमीच सोपं नसतं. कदाचित त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल आणि आपल्याला आवडणाऱ्‍या काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. पण आपण जे काही प्रयत्न करू ते व्यर्थ जाणार नाहीत. कारण असं करून आपण या विश्‍वाचा सर्वोच्च अधिकारी यहोवा याचं मन आनंदित करत असू. यापेक्षा आनंद देणारी दुसरी कोणतीच गोष्ट नाही!

८. देवावर प्रेम असल्यामुळे काही ख्रिश्‍चनांनी काय केलं आहे?

८ आज बऱ्‍याच ख्रिश्‍चनांनी जगात नाव मिळवून खूप पैसा कमवण्याच्या संधींचा त्याग केला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, देवावर असलेलं प्रेम आणि त्याची पूर्णपणे सेवा करण्याची इच्छा. एरिका नावाची बहीण एक डॉक्टर आहे. पण या व्यवसायात जास्त वेळ देण्याऐवजी तिने पायनियर सेवा करण्याचं निवडलं. तिच्या पतीसोबत तिने बऱ्‍याच देशांमध्ये सेवा केली आहे. ती म्हणते: “नवीन भाषा शिकून इतर देशांमध्ये सेवा करताना आलेले अनुभव, तिथल्या बांधवांसोबत झालेली मैत्री यांमुळे आमचं जीवन आनंदाने भरून गेलं आहे.” एरिका आजही डॉक्टर म्हणून काम करते, पण ती जास्तीत जास्त वेळ आणि शक्‍ती इतरांना यहोवाबद्दल शिकवण्यासाठी आणि बंधुभगिनींना मदत करण्यासाठी वापरते. ती म्हणते की असं केल्यामुळे तिला “खरा आनंद आणि समाधान मिळतं.”

स्वर्गात धन एकत्र करणारे की पृथ्वीवर?

चैनीच्या गोष्टी आवडतात असा एक माणूस

९. पैशावर प्रेम करणारी व्यक्‍ती जीवनात आनंदी का नसते?

९ पौलने म्हटलं की लोक “पैशावर प्रेम करणारे” होतील. आयर्लंड देशात काही वर्षांपूर्वी एक पायनियर एका माणसाला देवाबद्दल सांगत होता. बोलत असताना त्या माणसाने खिशातून पैसे काढले आणि म्हटलं: “हाच माझा देव आहे!” बरेच लोक सहसा असं बोलून दाखवत नसले, तरी त्यांच्या मनात हीच गोष्ट असते. त्यांचं पैशावर आणि त्यामुळे घेता येणाऱ्‍या वस्तूंवर प्रेम असतं. पण बायबल आपल्याला इशारा देतं: “ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही; जो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ घडत नाही.” (उप. ५:१०) पैशावर प्रेम करणारी व्यक्‍ती कधीच समाधानी नसते. तिला नेहमी आणखी पैसा हवा असतो आणि ती आपलं सारं आयुष्य ते मिळवण्यातच घालवून देते. यामुळे ती स्वतःवर खूप दुःखं ओढवून घेते.—१ तीम. ६:९, १०.

१०. बायबल श्रीमंती आणि गरिबी याबद्दल काय म्हणतं?

१० हे खरं आहे की आपल्या सर्वांनाच पैशाची गरज आहे. पैसा आपल्याला काही प्रमाणात सुरक्षा देतो. (उप. ७:१२) पण आपल्याजवळ मूलभूत गरजा पूर्ण करण्याइतकाच पैसा असला, तरीही आपण आनंदी राहू शकतो का? हो आपण तेव्हाही आनंदी राहू शकतो. (उपदेशक ५:१२ वाचा.) याकेचा मुलगा आगूरने अशी प्रार्थना केली: “दारिद्र्‌य किंवा श्रीमंती मला देऊ नको; मला आवश्‍यक तेवढे अन्‍न खावयास दे.” या व्यक्‍तीला दरिद्री किंवा खूप गरीब का व्हायचं नव्हतं हे समजण्यासारखं आहे. त्याने म्हटलं की यामुळे त्याला चोरी करण्याचा मोह होऊ शकतो आणि या कृत्यामुळे त्याच्या हातून यहोवाचा अनादर होईल. पण मग त्याने असं का म्हटलं की त्याला श्रीमंती नको? याचं कारण देत तो म्हणाला: “माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करेन, आणि परमेश्‍वर कोण आहे, असे म्हणेन.” (नीति. ३०:८, ९) देवाऐवजी पैशावर जास्त भरवसा ठेवणारे लोक तुम्ही नक्कीच पाहिले असतील.

११. येशूने पैशांबद्दल काय म्हटलं?

११ पैशावर प्रेम करणारी व्यक्‍ती कधीच देवाचं मन आनंदी करू शकत नाही. येशूने म्हटलं: “कोणीही दोन मालकांची सेवा करू शकत नाही; कारण तो एकतर एका मालकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्‍यावर प्रेम करेल; किंवा एका मालकाशी एकनिष्ठ राहून दुसऱ्‍याला तुच्छ लेखेल. तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.” त्याने असंही म्हटलं: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, जिथे कसर व गंज लागून ती नष्ट होते आणि चोर घरफोडी करून ती लुटतात. त्याऐवजी स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा; तिथे कसर व गंज लागून ती नष्ट होत नाही आणि चोर घरफोडी करून ती लुटत नाहीत.”—मत्त. ६:१९, २०, २४.

१२. आपलं जीवन साधं ठेवल्यामुळे यहोवाची सेवा करण्यात कशी मदत होऊ शकते? एक उदाहरण द्या.

१२ आज यहोवाचे बरेच सेवक आपल्या जीवनात बदल करून आपलं जीवन साधं ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं केल्यामुळे त्यांना यहोवाची सेवा करण्यासाठी जास्त वेळ मिळतो आणि या सेवेमुळे त्यांना आनंदही होतो. अमेरिकेत राहणाऱ्‍या जॅकने आपल्या पत्नीसोबत पायनियर सेवा करण्यासाठी आपलं मोठं घर आणि व्यवसाय विकला. तो म्हणतो: “आमचं घर खूप सुंदर आणि शहराबाहेर निसर्गरम्य ठिकाणी होतं. आमच्यासाठी ते विकणं सोपं नव्हतं.” कामाचा ताण असल्यामुळे घरी आल्यावर त्याची चिडचिड व्हायची. बरीच वर्षं असं चालू राहिलं. तो म्हणतो: “माझी बायको पायनियरींग करायची आणि ती नेहमी आनंदी असायची. ती म्हणायची, ‘माझ्या बॉससारखा दुसरा कोणीच नाही!’ आता मी पण पायनियर झाल्यामुळे आम्ही दोघंही एकाच बॉसची, यहोवाची सेवा करत आहोत.”

दानपेटीत दान टाकताना

पैशावर प्रेम करण्याचं आपण कसं टाळू शकतो? (परिच्छेद १३ पाहा)

१३. पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगण्यास आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते?

१३ पैशाबद्दल आपला दृष्टिकोन योग्य आहे की नाही, याचं परीक्षण करताना आपण स्वतःला पुढील प्रश्‍न विचारू शकतो: ‘बायबलमध्ये पैशाबद्दल जे सांगितलं आहे त्याचं मी पालन करतोय, हे मी घेतलेल्या निर्णयांतून दिसून येतं का? पैसा कमवणं हीच माझ्या जीवनातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे का? यहोवासोबतचा, इतरांसोबतचा नातेसंबंध यापेक्षा मी भौतिक गोष्टी मिळवणं याला जास्त महत्त्व देतो का? यहोवा माझ्या गरजा पुरवेल याची मला पूर्ण खात्री आहे का?’ या प्रश्‍नांची प्रामाणिकपणे उत्तरं दिल्यामुळे आपल्याला परीक्षण करायला मदत होईल. यहोवा त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍यांना कधीच निराश करणार नाही याची आपण पूर्ण खात्री बाळगू शकतो.—मत्त. ६:३३.

यहोवावर प्रेम करणारे की चैनीवर?

१४. चैन करण्याबद्दल योग्य दृष्टिकोन काय आहे?

१४ बायबलमध्ये शेवटल्या दिवसांबद्दल असंदेखील म्हटलं आहे की लोक “चैनीची आवड” धरणारे असतील. आपण आधी पाहिलं की स्वतःवर काही प्रमाणात प्रेम करणं चुकीचं नाही. तसंच, पैसे कमवणं मुळात चुकीचं नाही. त्याप्रमाणेच जीवनात काही प्रमाणात चैन किंवा मौजमजा करणंही चुकीचं नाही. काही लोक असा विचार करतात की मौजमजा करणं पूर्णपणे चुकीचं आहे. पण याउलट यहोवाची इच्छा आहे की आपण योग्य प्रमाणात मौजमजा करावी. बायबल देवाच्या सेवकांना असं उत्तेजन देतं: “जा, तू आनंदाने आपली भाकर खा; हर्षभराने आपला द्राक्षारस पी; कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे.”—उप. ९:७.

मोठ्या पार्टीत रंगलेले काही जण

१५. “चैनीची आवड” असणारे याचा काय अर्थ होतो?

१५ दुसरे तीमथ्य ३:४ मध्ये अशा लोकांबद्दल सांगितलं आहे जे चैनीवर प्रेम करतात आणि त्यांच्या जीवनात देवाला कोणतंच स्थान नसतं. या वचनात म्हटलं आहे की लोक “देवापेक्षा चैनीची आवड” धरतात, म्हणजेच ते मौजमजेवर जास्त प्रेम करतात. पण याचा अर्थ या लोकांचं देवावर काही प्रमाणात प्रेम आहे असा होत नाही. एका विद्वानाने म्हटलं: “या वचनाचा असा मुळीच अर्थ होत नाही, की हे लोक देवावर काही प्रमाणात प्रेम करतात. तर याचा अर्थ, या लोकांचं देवावर जराही प्रेम नाही असा होतो.” चैनीवर प्रेम करणाऱ्‍या लोकांसाठी ही एक सक्‍त ताकीद आहे. अशा लोकांबद्दल बायबल सांगतं की ते “चैनबाजी यात गुरफटले” जातात.—लूक ८:१४.

१६, १७. चैन करण्याच्या बाबतीत येशूने एक चांगलं उदाहरण कसं ठेवलं?

१६ चैन करण्याबद्दल योग्य दृष्टिकोन काय आहे हे येशूने स्वतःच्या उदाहरणावरून दाखवलं. बायबल सांगतं की येशू “मोठी मेजवानी” आणि “लग्नाची मेजवानी” यांना गेला. (लूक ५:२९; योहा. २:१-१०) त्या लग्नात पुरेसा द्राक्षारस नव्हता म्हणून त्याने चमत्कार करून पाण्याचा द्राक्षारस बनवला. दुसऱ्‍या एका प्रसंगी, जेव्हा लोकांनी खाण्या-पिण्याबद्दल येशूवर टीका केली, तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितलं की त्या लोकांचा दृष्टिकोन संतुलित नाही.—लूक ७:३३-३६.

१७ असं असलं तरी येशूने चैनीला, मौजमजेला आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट बनू दिली नाही. त्याने यहोवाला आपल्या जीवनात पहिल्या स्थानी ठेवलं आणि इतरांना मदत करण्यासाठी शक्य तितकं केलं. मानवजातीला वाचवण्यासाठी त्याने खूप वेदना सहन करून आपला जीव दिला. त्याचं अनुकरण करण्याची इच्छा दाखवणाऱ्‍यांना त्याने म्हटलं: “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमचा अपमान व छळ करतात आणि तुमच्यावर सर्व प्रकारचे खोटे आरोप लावतात तेव्हा तुम्ही सुखी आहात. हर्ष करा आणि अतिशय आनंदित व्हा, कारण स्वर्गात तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल; तुमच्या अगोदर होऊन गेलेल्या संदेष्ट्यांचाही त्यांनी असाच छळ केला होता.”—मत्त. ५:११, १२.

एकत्र मिळून गीत गाताना

चैनीवर प्रेम करण्याचं आपण कसं टाळू शकतो? (परिच्छेद १८ पाहा)

१८. मौजमजेला आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे आपण कसं ठरवू शकतो?

१८ चैन, मौजमजा यावर आपलं किती प्रेम आहे, हे आपण कसं ओळखू शकतो? आपण पुढील प्रश्‍नांद्वारे आत्मपरीक्षण करू शकतो: ‘सभा, प्रचारकार्य यांपेक्षा मनोरंजन माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे का? देवाची सेवा करता यावी यासाठी मला आवडणाऱ्‍या काही गोष्टींचा त्याग करायला मी तयार असतो का? मनोरंजन निवडताना यहोवाला त्याबद्दल काय वाटेल याचा मी विचार करतो का?’ आपलं यहोवावर प्रेम आहे आणि आपल्याला त्याचं मन आनंदित करायची इच्छा आहे. म्हणून ज्या गोष्टींबद्दल स्पष्टपणे सांगितलं आहे त्या गोष्टी आपण पूर्णपणे टाळतो. पण यासोबतच ज्या गोष्टींबद्दल आपल्या मनात शंका आहे, अशा गोष्टीही आपण टाळलेल्याच बऱ्‍या.—मत्तय २२:३७, ३८ वाचा.

आपण आनंदी कसं होऊ शकतो?

१९. आज बऱ्‍याच लोकांना खरा आनंद मिळवणं शक्य का नाही?

१९ मागील ६००० पेक्षा जास्त वर्षांपासून सैतानाच्या जगाने मानवांचा छळ केला आहे. या दुष्ट व्यवस्थेच्या शेवटल्या काळात आज बरेच लोक स्वतःवर, पैशावर आणि चैन करण्यावरच आपलं लक्ष केंद्रित करतात. त्यांना काय मिळू शकतं याचाच ते विचार करतात आणि स्वतःच्या स्वार्थी इच्छा पूर्ण करणं हे त्यांच्या जीवनाचं ध्येय बनलं आहे. पण असे लोक जीवनात कधीच आनंदी होऊ शकत नाहीत! याच्या अगदी उलट, बायबल सांगतं: “ज्याच्या साहाय्याकरता याकोबचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्‍वर यावर आहे, तो धन्य.”—स्तो. १४६:५.

२०. देवावर प्रेम केल्यामुळे तुम्हाला कसा आनंद मिळाला आहे?

२० यहोवाचे सेवक त्याच्यावर मनापासून प्रेम करतात. या सेवकांमध्ये दरवर्षी नवीन लोकांची भर पडत आहे आणि तेदेखील यहोवावर मनापासून प्रेम करायला शिकतात. देवाचं राज्य शासन करत आहे याचा हा स्पष्ट पुरावा आहे. हे राज्य लवकरच या पृथ्वीवर अनेक आशीर्वादांचा वर्षाव करेल. आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही असे आशीर्वाद! आपण यहोवाच्या इच्छेनुसार कार्य करतो तेव्हा त्याला आनंद होतो आणि त्यामुळे आपल्यालादेखील खरं समाधान मिळतं. यहोवावर प्रेम करणारे सदासर्वकाळ आनंदी राहतील! पण स्वार्थी प्रेमामुळे कोणते वाईट गुण उत्पन्‍न होतात? या प्रश्‍नाचं उत्तर आपण पुढच्या लेखात पाहू. तसंच, हे वाईट गुण देवाच्या सेवकांमध्ये असणाऱ्‍या चांगल्या गुणांच्या विरुद्ध कसे आहेत हेदेखील आपण पाहू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा