अरिमथाई इथला योसेफ ठाम भूमिका घेतो
रोमी राज्यपालासमोर जाऊन बोलण्याचं धैर्य आपल्यात कुठून आलं, हे स्वतः अरिमथाई इथल्या योसेफलासुद्धा समजलं नाही. कारण, पंतय पिलात हा मुळात अतिशय अडेल वृत्तीचा मनुष्य होता. पण, येशूचा योग्य प्रकारे दफनविधी करता यावा म्हणून, कोणालातरी पिलातकडे जाऊन येशूच्या मृतदेहासाठी विनंती करावी लागणार होती. योसेफला कदाचित वाटलं असावं, की पंतय पिलातला भेटून ही विनंती करणं अतिशय कठीण जाईल. पण, ते तितकं कठीण गेलं नाही. कारण, येशू खरोखरच मेला असल्याची पिलातने एका अधिकाऱ्याकडून खातरी करून घेतली आणि योसेफची विनंती लगेच मान्य केली. त्यानंतर, जड अंतःकरणाने योसेफ, येशूला जिथे मृत्युदंड देण्यात आला होता त्या ठिकाणाकडे घाईघाईने जायला निघाला.—मार्क १५:४२-४५.
अरिमथाई इथला योसेफ नेमका कोण होता?
येशूशी त्याचा काय संबंध होता?
आणि त्याने जे केलं ते इतकं विशेष का आहे?
न्यायसभेचा सदस्य
मार्कच्या शुभवर्तमानात योसेफचा उल्लेख, “न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य,” असा करण्यात आला आहे. या ठिकाणी, न्यायसभा असं जे म्हटलं आहे ते सन्हेद्रिनला, म्हणजेच यहुदी उच्च न्यायालयाला आणि सर्वोच्च व्यवस्थापक मंडळाला सूचित करतं. (मार्क १५:१, ४३) यावरून असं म्हणता येईल, की योसेफ यहुदी पुढाऱ्यांपैकी एक होता आणि त्यामुळेच तो रोमी राज्यपाल, पिलात याला जाऊन भेटू शकला असेल. शिवाय, योसेफ एक श्रीमंत मनुष्य होता, याचंही आपल्याला आश्चर्य वाटत नाही.—मत्त. २७:५७.
येशूला आपला राजा म्हणून स्वीकारण्याचं धैर्य तुमच्यात आहे का?
यहुदी न्यायसभा सामूहिक रीत्या येशूच्या विरोधात होती आणि न्यायसभेच्या सदस्यांनी मिळून येशूला ठार मारण्याचा कट रचला होता. पण, योसेफ मात्र “एक चांगला व नीतिमान मनुष्य होता.” (लूक २३:५०) न्यायसभेच्या बऱ्याच सदस्यांपेक्षा तो फार वेगळा होता. तो प्रामाणिक आणि नैतिक जीवन जगणारा मनुष्य होता. तसंच, तो देवाच्या आज्ञांचं पालन करण्याचा शक्य तितका प्रयत्नही करत होता. शिवाय बायबल म्हणतं, की तो “देवाच्या राज्याची वाट पाहत होता.” यावरून, तो येशूचा शिष्य का बनला असावा हे आपण समजू शकतो. (मार्क १५:४३; मत्त. २७:५७) पण, खासकरून खरेपणा आणि न्यायीपणा प्रिय असल्यामुळे तो येशूच्या संदेशाकडे आकर्षित झाला असावा.
गुप्त शिष्य
योहान १९:३८ म्हणतं: “योसेफ येशूचा शिष्य होता, पण ही गोष्ट त्याने यहुद्यांच्या भीतीमुळे गुप्त ठेवली होती.” योसेफला नेमकी कशाची भीती वाटत होती? यहुदी लोक येशूचा किती तिरस्कार करतात हे त्याला चांगलं माहीत होतं. तसंच, येशूवर विश्वास असल्याचं उघडपणे कबूल करणाऱ्या व्यक्तीला, सभास्थानातून बहिष्कृत करण्याच्या यहुद्यांच्या ठाम निश्चयाबद्दलही त्याला पूर्ण कल्पना होती. (योहा. ७:४५-४९; ९:२२) बहिष्कृत केलेल्या व्यक्तीचा इतर यहुदी तिरस्कार करायचे, तिला टाळायचे आणि वाळीत टाकल्यासारखं तिच्याशी वागायचे. त्यामुळे, येशूवर आपला विश्वास आहे असं उघडपणे कबूल करण्यास योसेफ घाबरत होता. त्याने येशूवर विश्वास असल्याचं कबूल केलं असतं, तर त्याला आपलं पद आणि प्रतिष्ठा गमवावी लागली असती.
अर्थात, असा पेचप्रसंग केवळ योसेफसमोरच होता असं नाही. योहान १२:४२ या वचनानुसार, “अधिकाऱ्यांपैकीही बऱ्याच जणांनी त्याच्यावर [येशूवर] विश्वास ठेवला, पण परूशी आपल्याला सभास्थानातून बहिष्कृत करतील, अशी भीती वाटत असल्यामुळे त्यांनी त्याला उघडपणे स्वीकारले नाही.” अशाच पेचात सापडलेला आणखी एक मनुष्य म्हणजे निकदेम. निकदेम हासुद्धा यहुदी न्यायसभेचा एक सदस्य होता.—योहा. ३:१-१०; ७:५०-५२.
हे खरं आहे, की योसेफ येशूचा एक शिष्य होता. पण, ही गोष्ट तो उघडपणे कबूल करत नव्हता. येशूने स्पष्ट शब्दांत जे म्हटलं होतं ते विचारात घेता ही नक्कीच एक गंभीर समस्या होती. कारण येशूने म्हटलं होतं: “जो कोणी माझ्यावर विश्वास असल्याचं लोकांसमोर स्वीकारतो त्याला मीसुद्धा स्वर्गातील माझ्या पित्यासमोर स्वीकारेन. पण, जो कोणी लोकांसमोर मला नाकारतो, त्याला मीसुद्धा स्वर्गातील माझ्या पित्यासमोर नाकारेन.” (मत्त. १०:३२, ३३) योसेफने येशूला नाकारलं होतं असं नाही. पण, त्याला उघडपणे स्वीकारण्याचं धैर्यसुद्धा त्याने दाखवलं नव्हतं. तुमच्यामध्ये ते धैर्य आहे का?
योसेफबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे, त्याने येशूविरुद्ध कट करणाऱ्या न्यायसभेला पाठिंबा दिला नाही असं बायबल आपल्याला सांगतं. (लूक २३:५१) काहींच्या म्हणण्याप्रमाणे, येशूची न्यायचौकशी होत असताना योसेफ तिथे उपस्थित नसावा. तो तिथं असता तर, येशूवर होणारा घोर अन्याय पाहून योसेफला नक्कीच खूप वाईट वाटलं असतं. पण, ते थांबवण्यासाठी तो काहीच करू शकत नव्हता!
निर्णायक भूमिका
येशूचा मृत्यू झाला तोपर्यंत योसेफने आपल्या भीतीवर मात केली होती आणि येशूच्या अनुयायांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता असं दिसतं. त्याचा हा निर्णय, मार्क १५:४३ मधल्या शब्दांवरून दिसून येतो. तिथे म्हटलं आहे: “तो हिंमत करून पिलातकडे गेला आणि त्याने येशूचा मृतदेह आपल्याला द्यावा अशी त्याला विनंती केली.”
येशूचा मृत्यू झाला तेव्हा योसेफ तिथे होता असं दिसतं. कारण, येशूचा मृत्यू झाला आहे ही गोष्ट पिलातच्याही आधी योसेफला समजली होती. म्हणूनच योसेफने येशूचा मृतदेह द्यावा अशी विनंती केली तेव्हा “येशू इतक्यात कसा काय मेला याचे पिलातला आश्चर्य वाटले.” (मार्क १५:४४) वधस्तंभावर येशूला भयंकर यातना सोसत असल्याचं पाहून, योसेफ आपल्या विवेकाचं परीक्षण करण्यास प्रवृत्त झाला असेल का? आणि त्यामुळे शेवटी खरेपणाच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याचा त्याने निर्णय घेतला असेल का? या शक्यता नाकारता येत नाहीत. पण एक गोष्ट मात्र खरी. ती म्हणजे, यापुढे तो येशूचा गुप्त शिष्य राहणार नव्हता; आणि त्यासाठी पाऊल उचलण्याची प्रेरणा त्याला नक्कीच मिळाली होती.
योसेफ येशूचा दफनविधी करतो
यहुद्यांच्या नियमानुसार, मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या व्यक्तींचा मृतदेह सूर्यास्तापूर्वी पुरणं आवश्यक होतं. (अनु. २१:२२, २३) रोमी लोक मात्र मृत्युदंड झालेल्या गुन्हेगारांचे मृतदेह वधस्तंभावरच कुजू द्यायचे किंवा ते कबरस्तानात असंच फेकून द्यायचे. पण, येशूच्या बाबतीत असं काही व्हावं अशी योसेफची इच्छा नव्हती. येशूला जिथं मृत्युदंड देण्यात आला त्या जागेच्या जवळच योसेफने खडकात एक नवीन कबर खोदून घेतली होती. ज्या अर्थी, या कबरेत पूर्वी कोणाचाही मृतदेह ठेवण्यात आला नव्हता, त्या अर्थी योसेफ नुकताच अरिमथाईहूनa यरुशलेममध्ये राहायला आला असावा आणि त्या कबरेचा आपल्या कुटुंबासाठी उपयोग करण्याचा त्याचा विचार असावा. (लूक २३:५३; योहा. १९:४१) खरंतर, ज्या कबेरत पुढे योसेफला दफन केलं जाणार होतं त्याच कबरेत येशूचा मृतदेह ठेवून योसेफने मनाचा मोठेपणा दाखवला. तसंच यामुळे, मसीहाला “धनवंताची कबर” प्राप्त होईल अशी जी भविष्यवाणी करण्यात आली होती तीसुद्धा पूर्ण झाली.—यश. ५३:५, ८, ९.
तुमच्या जीवनात असं काही आहे का ज्याला तुम्ही यहोवासोबतच्या तुमच्या नात्यापेक्षा जास्त महत्त्व देता?
बायबलच्या चारही शुभवर्तमानांत हे नमूद करण्यात आलं आहे, की येशूचा मृतदेह वधस्तंभावरून उतरवल्यानंतर योसेफने तो एका उत्तम प्रतीच्या मलमलीच्या कापडात गुंडाळला आणि स्वतःच्या कबरेत ठेवला. (मत्त. २७:५९-६१; मार्क १५:४६, ४७; लूक २३:५३, ५५; योहा. १९:३८-४०) या कामात, योसेफला मदत करणाऱ्यांपैकी केवळ एकाच व्यक्तीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे; ती व्यक्ती म्हणजे निकदेम. येशूच्या दफनविधीसाठी निकदेम सुगंधी मसाले घेऊन आला होता. योसेफ आणि निकदेम या दोघांचं पद विचारात घेता, त्यांनी स्वतः येशूचा मृतदेह हाताळला असावा असं वाटत नाही. मृतदेह उचलून नेण्यासाठी आणि तो दफन करण्यासाठी त्यांनी कदाचित सेवकांचा उपयोग केला असेल. पण असं असलं, तरी या दोन पुरुषांनी हाती घेतलेलं हे काम नक्कीच साधंसोपं नव्हतं. कारण, नियमशास्त्रानुसार मृतदेहाच्या संपर्कात येणारी व्यक्ती सात दिवसांपर्यंत अशुद्ध राहायची. शिवाय, ज्या वस्तूला ती शिवायची ती वस्तूसुद्धा अशुद्ध व्हायची. (गण. १९:११; हाग्ग. २:१३) आणि अशा अशुद्ध अवस्थेत असलेल्या व्यक्तीला वल्हांडणाच्या आठवड्यादरम्यान इतर लोकांपासून अलिप्त राहावं लागायचं. तसंच, वल्हांडणाचा विधी व सण ती व्यक्ती पाळू शकत नव्हती किंवा त्यात भागही घेऊ शकत नव्हती. (गण. ९:६) त्यामुळे, दफनविधीची व्यवस्था केल्यामुळे योसेफवर त्याच्या सहकाऱ्यांकडून कडाडून टीका होण्याची शक्यता होती. पण या क्षणी, येशूचा योग्य प्रकारे दफनविधी केल्यामुळे आणि येशूचा शिष्य असल्याचं उघडपणे कबूल केल्यामुळे ओढवणारे कोणतेही परिणाम भोगायला योसेफ तयार होता.
अरिमथाईच्या योसेफचं शेवटी काय झालं?
शुभवर्तमानांत, येशूच्या दफनविधीसंबंधी असलेल्या अहवालांशिवाय बायबलमध्ये पुढे कुठेच अरिमथाईच्या योसेफचा उल्लेख आढळत नाही. त्यामुळे, साहजिकच प्रश्न निर्माण होतो, की त्याचं शेवटी काय झालं? खरंतर, आपण ते सांगू शकत नाही. पण, आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यावरून अशी दाट शक्यता वाटते, की योसेफने ख्रिस्ताचा शिष्य असल्याचं जाहीरपणे कबूल केलं असावं. कारण, परीक्षेच्या व संकटांच्या त्या अत्यंत बिकट प्रसंगी त्याचा विश्वास आणि धैर्य कमी झालं नाही, उलट ते वाढतच गेलं. आणि ही नक्कीच एक चांगली गोष्ट होती.
योसेफच्या अहवालावरून असा एक प्रश्न निर्माण होतो ज्याचा आपण सर्वांनीच गांभीर्याने विचार केला पाहिजे. तो म्हणजे: आपल्या जीवनात असं काही आहे का ज्याला आपण यहोवासोबतच्या आपल्या नात्यापेक्षा जास्त महत्त्व देत आहोत? मग ते काहीही असो; आपलं पद, करिअर, धनसंपत्ती, कौटुंबिक जिव्हाळा किंवा अगदी आपलं वैयक्तिक स्वातंत्र्यसुद्धा.
a अरिमथाई हे बहुधा, रामा म्हणजेच आजच्या काळातलं रेन्टीस (रॅन्टीस) हे ठिकाण असावं. रामा हे शमुवेल संदेष्ट्याचं गाव असून यरुशलेमच्या उत्तर-पश्चिमेकडे सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर होतं.—१ शमु. १:१९, २०.