तुमचं प्रेम थंड होऊ देऊ नका
“अनीती वाढल्यामुळे पुष्कळांचं प्रेम थंड होईल.”—मत्त. २४:१२.
१, २. (क) मत्तय २४:१२ मधील शब्द प्रथम कोणाला लागू होतात? (ख) बऱ्याच ख्रिश्चनांनी त्यांचं प्रेम थंड होऊ दिलं नाही, हे आपल्याला प्रेषितांची कार्ये या पुस्तकातून कसं समजतं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
येशू पृथ्वीवर होता, तेव्हा या ‘जगाच्या व्यवस्थेची समाप्ती’ लोक कशी ओळखू शकतील याबद्दल त्याने सांगितलं. याविषयीच्या ज्या गोष्टी त्याने भाकीत केल्या त्यांपैकी एक गोष्ट सांगताना तो म्हणाला: “अनीती वाढल्यामुळे पुष्कळांचं प्रेम थंड होईल.” (मत्त. २४:३, १२) पहिल्या शतकातील यहूदी लोक दावा करायचे की ते देवाचे लोक आहेत. पण खरंतर देवावर असलेलं त्यांचं प्रेम कमी झालं होतं.
२ दुसरीकडे पाहता, पहिल्या शतकात असे बरेच ख्रिस्ती होते ज्यांची मनोवृत्ती या यहुदी लोकांपेक्षा फार वेगळी होती. ते आवेशानं ख्रिस्ताबद्दलचा “आनंदाचा संदेश” घोषित करत होते. तसंच देवावर, बांधवांवर आणि ज्यांना सत्य माहीत नाही अशा लोकांवरही ते प्रेम असल्याचं दाखवत होते. या ख्रिश्चनांनी देवावरील आपलं प्रेम टिकवून ठेवलं. (प्रे. कार्ये २:४४-४७; ५:४२) पण दुःखाची गोष्ट म्हणजे, त्या काळी असेही काही ख्रिस्ती होते ज्यांनी आपलं प्रेम थंड होऊ दिलं. हे आपण कशावरून म्हणू शकतो?
३. कोणत्या कारणांमुळे काही ख्रिश्चनांचं प्रेम थंड झालं असावं?
३ पहिल्या शतकातील इफिसमधील मंडळीला उद्देशून बोलताना येशू म्हणाला: “तुझं सुरुवातीचं प्रेम आता आटलं आहे.” (प्रकटी. २:४) इफिसमधील ख्रिश्चनांवर कदाचित त्यांच्या आसपास असलेल्या इतर लोकांचा प्रभाव पडला असावा. तिथले लोक हे प्रामुख्याने स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यामागे लागले होते. (इफिस. २:२, ३) इफिस हे एक समृद्ध शहर होतं. तिथले लोक ऐशआरामाचं जीवन जगण्यालाच जास्त महत्त्व देत होते. अनेक जण असेही होते जे अनैतिक जीवन जगायचे आणि देवाच्या नियमांना जराही आदर दाखवायचे नाहीत. हे लोक देवावर आणि इतरांवर निःस्वार्थ प्रेम करण्याऐवजी, स्वतःचं जीवन मौजमजेत घालवण्यालाच जास्त महत्त्व देत होते.
४. (क) आज आपल्या काळात कशा प्रकारे प्रेम थंड झालं आहे? (ख) कोणत्या तीन क्षेत्रांमध्ये आपण आपलं प्रेम टिकवून ठेवलं पाहिजे?
४ प्रेम थंड होण्याविषयी येशूने जे भाकीत केलं होतं, ते आज आपल्या काळालाही लागू होतं. आज लोकांचं देवावरील प्रेम दिवसेंदिवस कमी होत असल्याचं दिसतं. जगातील समस्या सोडवण्यासाठी देवाकडे पाहण्याऐवजी, लाखो लोक मानवी संघटनांकडे आशेनं पाहतात. आजच्या काळात लोकांचं प्रेम खरोखरच थंड होत चाललं आहे. इफिसमधील ख्रिश्चनांप्रमाणेच आजही यहोवाच्या सेवकांचं प्रेम थंड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आपण असे तीन क्षेत्र पाहू, ज्यांत आपल्याला आपलं प्रेम टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. हे तीन क्षेत्र म्हणजे: (१) यहोवावर असलेलं आपलं प्रेम, (२) बायबलमधील सत्यावर असलेलं आपलं प्रेम, आणि (३) बंधुभगिनींवर असलेलं आपलं प्रेम.
यहोवावर असलेलं प्रेम
५. आपण देवावर प्रेम का केलं पाहिजे?
५ आपण सर्वात जास्त कोणावर प्रेम केलं पाहिजे? याविषयी बोलताना येशू म्हणाला: “‘तू आपला देव यहोवा याच्यावर आपल्या पूर्ण मनाने आणि आपल्या पूर्ण जिवाने आणि आपल्या पूर्ण बुद्धीने प्रेम कर.’ हीच सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली आज्ञा आहे.” (मत्त. २२:३७, ३८) देवावरील प्रेम, आपल्याला त्याच्या आज्ञा पाळण्यास, धीर दाखवण्यास आणि वाईट गोष्टींचा द्वेष करण्यास मदत करतं. (स्तोत्र ९७:१० वाचा.) पण सैतान आणि त्याचं दुष्ट जग, देवावरील आपलं प्रेम कमी करण्याचा किंवा ते पूर्णपणे नाहीसं करण्याचा प्रयत्न करतं.
६. देवावर असलेलं प्रेम कमी झाल्यामुळे काय होतं?
६ प्रेमाबद्दल जगाचा जो दृष्टिकोन आहे तो चुकीचा आहे. देवावर प्रेम करण्याऐवजी अनेक “लोक केवळ स्वतःवर प्रेम” करतात. (२ तीम. ३:२) ते “देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी” याच गोष्टींना जीवनात जास्त महत्त्व देतात. (१ योहा. २:१६) आपण जर स्वतःलाच खूश करत राहिलो, तर त्याचे कोणते गंभीर परिणाम घडू शकतात याबद्दल प्रेषित पौलने ताकीद दिली. तो म्हणाला: “शरीराकडे मन लावल्याने मरण येते.” पौलने असं का म्हटलं? कारण जे लोक या गोष्टींना महत्त्व देतात, ते खरंतर देवाचे शत्रू ठरतात. (रोम. ८:६, ७) तसंच, जे लोक पैसा कमावण्यात किंवा लैंगिक वासना तृप्त करण्यातच आपलं संपूर्ण आयुष्य घालवतात, त्यांच्या पदरी शेवटी दुःख व निराशाच येते.—१ करिंथ. ६:१८; १ तीम. ६:९, १०.
७. ख्रिश्चनांवर कोणत्या संकल्पनांचा प्रभाव पडण्याचा धोका आहे?
७ नास्तिक, अज्ञेयवादी (देवाच्या अस्तित्वाबद्दल निश्चित मत नसणारी व्यक्ती) आणि उत्क्रांतीवर विश्वास ठेवणारे अनेक जण, इतरांना देवाचं अस्तित्व नाकारण्यासाठी प्रवृत्त करतात. तसंच, ते देवावर प्रेम न करण्यासही लोकांना प्रवृत्त करतात. हे लोक असं भासवतात की फक्त मूर्ख किंवा अशिक्षित लोकच देवावर विश्वास ठेवतात. याशिवाय असेही बरेच लोक आहेत जे निर्माणकर्त्याला आदर देण्याऐवजी शास्त्रज्ञांनांच जास्त आदर व सन्मान देतात. (रोम. १:२५) अशा संकल्पनांचा खऱ्या ख्रिश्चनांवरही मोठा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे यहोवासोबत असलेला त्यांचा नातेसंबंध कमकुवत होऊन देवावरील त्यांचं प्रेमही थंड होण्याची शक्यता आहे.—इब्री ३:१२.
८. (क) यहोवाच्या सेवकांना कोणकोणत्या परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो? (ख) स्तोत्र १३६ मधून आपल्याला सांत्वन कसं मिळतं?
८ आपण सैतानाच्या दुष्ट जगात राहत आहोत. त्यामुळे अनेक वेळा आपल्याला अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो ज्यामुळे आपल्याला निराश वाटू शकतं. (१ योहा. ५:१९) पण आपण जर निराशेच्या आहारी गेलो, तर देवावर असलेला आपला विश्वास आणि प्रेम थंड होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, कदाचित वाढत्या वयामुळे येणाऱ्या समस्यांचा आपण सामना करत असू, एखाद्या आजारपणाला किंवा आर्थिक समस्येला आपण तोंड देत असू. किंवा मग आपण अपेक्षा केली होती त्याप्रमाणे करू शकलो नाही, त्यामुळे आपल्याला वाईट वाटत असेल. किंवा आपण आशा केली त्याप्रमाणे जीवनात घडलं नाही यामुळेही आपण निराश झालो असू. पण आपण अशा कोणत्याही परिस्थितीचा सामना करत असलो, तरी यहोवा देवाने आपल्याला सोडलं आहे असा आपण कधीही विचार करू नये. स्तोत्र १३६:२३ मध्ये जे सांत्वनदायक शब्द आपल्याला वाचायला मिळतात त्यांकडे लक्ष द्या. त्यात म्हटलं आहे: यहोवाने “आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली . . . कारण त्याची दया सनातन आहे.” आपण मदतीसाठी यहोवाला केलेल्या विनवण्या तो ऐकतो आणि त्यांचं उत्तर देतो, या गोष्टीची आपण खात्री बाळगू शकतो.—स्तो. ११६:१; १३६:२४-२६.
९. देवावरील आपलं प्रेम टिकवून ठेवण्यासाठी पौलला कशामुळे मदत मिळाली?
९ स्तोत्रकर्त्याप्रमाणे पौलनेदेखील यहोवाकडून मिळत असलेल्या मदतीवर लक्ष केंद्रित केलं. यामुळे त्याला सर्व परिस्थितींत खंबीर राहण्यास बळ मिळालं. त्याने लिहिलं: “यहोवा मला साहाय्य करतो; मी भिणार नाही. माणूस माझं काय करणार?” (इब्री १३:६) यहोवावर असलेल्या भरवशामुळे पौलला त्याच्या जीवनात येणाऱ्या समस्यांचा सामना करण्यास मदत झाली. जीवनात कठीण प्रसंगांचा सामना करतानाही त्याने यहोवावरील आपला विश्वास कमी होऊ दिला नाही. अगदी तुरुंगात असतानाही त्याने मंडळ्यांना प्रोत्साहनदायक पत्रं लिहून ख्रिस्ती बांधवांना मदत केली. (इफिस. ४:१; फिलिप्पै. १:७; फिले. १) पौलने प्रत्येक परिस्थितीत यहोवावर असलेलं त्याचं प्रेम टिकवून ठेवलं. “सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव,” जो “आपल्या सर्व परीक्षांमध्ये आपले सांत्वन करतो” त्याच्यावर पौल विसंबून राहिला. (२ करिंथ. १:३, ४) या बाबतीत आपण पौलचं अनुकरण कसं करू शकतो?
यहोवावर प्रेम असल्याचं दाखवा (परिच्छेद १० पाहा)
१०. यहोवावर असलेलं आपलं प्रेम आपण कसं टिकवून ठेवू शकतो?
१० देवावरील आपलं प्रेम टिकवून ठेवण्याच्या एका महत्त्वपूर्ण मार्गाविषयी पौलने सांगितलं. तो म्हणाला: “प्रार्थना करत राहा.” नंतर आणखी एकदा त्याने तेच म्हटलं: “प्रार्थना करत राहा.” (१ थेस्सलनी. ५:१७; रोम. १२:१२) प्रार्थनेमुळे आपल्याला देवाच्या जवळ जाण्यास कशी मदत मिळते? आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण यहोवा देवासोबत संवाद साधत असतो. यामुळे त्याच्यासोबत आपल्याला एक चांगला नातेसंबंध जोडण्यास मदत होते. (स्तो. ८६:३) आपण जेव्हा आपल्या मनातील भावना आणि विचार देवाजवळ व्यक्त करतो, तेव्हा आपण त्याच्या अधिक जवळ जातो. (स्तो. ६५:२) तसंच, यहोवा आपल्या प्रार्थनांचं कशा प्रकारे उत्तर देतो हे जेव्हा आपण पाहतो, तेव्हा त्याच्यावर असलेलं आपलं प्रेम आणखी वाढतं. “जे कोणी त्याचा [परमेश्वराचा] धावा करतात . . . त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.” आणि या गोष्टीवर आपल्याला पूर्ण भरवसा आहे. (स्तो. १४५:१८) यहोवा आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्याला साहाय्यही करतो. या गोष्टीवर भरवसा ठेवल्यामुळे, आपल्याला आता आणि भविष्यात येणाऱ्या कोणत्याही समस्येचा सामना करण्यास मदत मिळेल.
बायबलमधील सत्यावर असलेलं प्रेम
११, १२. बायबलमधील सत्यांसाठी आपण आपलं प्रेम कशा प्रकारे वाढवू शकतो?
११ ख्रिस्ती या नात्यानं सत्यावर आपलं प्रेम आहे. आणि हे सत्य आपल्याला देवाच्या वचनात सापडतं. येशूने आपल्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना करताना म्हटलं: “तुझं वचन सत्य आहे.” (योहा. १७:१७) बायबलमधील सत्यावर प्रेम करण्यासाठी, प्रथम आपल्याला त्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे माहीत असलं पाहिजे. (कलस्सै. १:१०) पण तेवढंच पुरेसं नाही; तर त्यासाठी आणखीनही काही करण्याची गरज आहे. हे समजण्यास स्तोत्र ११९ चा लेखक आपल्याला कशी मदत करतो त्याकडे लक्ष द्या. (स्तोत्र ११९: ९७-१०० वाचा.) बायबलमधून आपण जे काही वाचतो, त्यावर दिवसभर मनन करण्याची किंवा खोलवर विचार करण्याची गरज आहे. बायबलमधील सत्य जीवनात लागू केल्याने आपल्याला कोणते फायदे होतात यावर आपण जितकं मनन करू, तितकंच त्यावरील आपलं प्रेम वाढत जाईल.
१२ स्तोत्रकर्त्याने असंही म्हटलं: “तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात! माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात.” (स्तो. ११९:१०३) देवाची संघटना बायबलवर आधारित जी प्रकाशनं तयार करते, ती एका चविष्ट अन्नासारखीच आहेत. आपण आपल्या आवडीचं एखादं चविष्ट अन्न खातो, तेव्हा आपण सहसा त्याचा आनंद घेण्यासाठी वेळ देतो. अगदी त्याच प्रकारे, आध्यात्मिक अन्नाचा आस्वाद घेण्यासाठीही आपल्याला वेळ देण्याची गरज आहे. आपण जर असं केलं, तर बायबलमधील “मनोहर” वचनांचा आनंद घेण्यास आपल्याला मदत मिळेल. तसंच, आपण जे काही वाचतो ते लक्षात ठेवण्यासाठी, आणि इतरांना मदत करण्यासाठीही त्यांचा उपयोग होईल.—उप. १२:१०.
१३. कोणत्या गोष्टीमुळे यिर्मयाला देवाच्या वचनावर प्रेम करण्यासाठी मदत मिळाली? आणि याचा त्याच्यावर कसा प्रभाव पडला?
१३ यिर्मया संदेष्ट्याचंही देवाच्या वचनावर प्रेम होतं. त्याने म्हटलं: “मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली; तुझी वचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्लास अशी होती; कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवतो.” (यिर्म. १५:१६) यिर्मयाने देवाच्या अनमोल वचनांवर खोल विचार केला आणि त्यांवर त्याचं प्रेमही होतं. यहोवाचा संदेष्टा असण्याचा आणि त्याचा संदेश इतरांना कळवण्याचा जो बहुमान त्याला मिळाला होता, त्याची त्याला खूप कदर होती. यिर्मयाप्रमाणेच आपलंही बायबलमधील सत्यांवर प्रेम असेल, तर या शेवटल्या दिवसांत यहोवाविषयी आणि त्याच्या राज्याविषयी साक्ष देण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे याची आपल्याला जाणीव होईल.
बायबलवर प्रेम असल्याचं दाखवा (परिच्छेद १४ पाहा)
१४. बायबलमधील सत्यांवर असलेलं आपलं प्रेम आपण आणखी कोणत्या एका मार्गाने वाढवू शकतो?
१४ बायबलमधील सत्यांवर असलेलं आपलं प्रेम वाढवण्यासाठी आपल्याला आणखी कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळेल? यासाठी आपल्याला मंडळीच्या सभांना नियमितपणे हजर राहण्याची गरज आहे; कारण यहोवा आपल्याला मंडळीच्या सभांद्वारे शिकवत असतो. तो ज्या मुख्य मार्गांनी आपल्याला शिकवतो त्यांपैकी एक म्हणजे, बायबलच्या मदतीनं दर आठवडी होणारा टेहळणी बुरूज अभ्यास. या सभेचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आपल्याला सभेची चांगली तयारी करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, अभ्यास लेखाची तयारी करताना लेखात दिलेलं प्रत्येक शास्त्रवचन आपण पाहू शकतो. आज टेहळणी बुरूज मासिक आपल्या टॅब किंवा मोबाईलवर सर्वांसाठी उपलब्ध आहे आणि अनेक जण ते सहज डाऊनलोड करून वाचू शकतात. हे मासिक jw.org या आपल्या वेबसाईटवर आणि JW लायब्ररी ॲपवर अनेक भाषांमध्येही उपलब्ध आहे. तसंच, ते अशाही काही इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे, ज्यांमुळे दिलेली शास्त्रवचनं आपल्याला तिथल्या तिथं वाचता येतात. लेखांचा अभ्यास करताना दिलेलं प्रत्येक वचन आपण काळजीपूर्वक वाचतो आणि त्यावर मनन करतो, तेव्हा बायबलमधील सत्यांवर असलेलं आपलं प्रेम आणखी वाढवण्यास आपल्याला मदत होते.—स्तोत्र १:२ वाचा.
बंधुभगिनींवर असलेलं आपलं प्रेम
१५, १६. (क) योहान १३:३४, ३५ मध्ये येशूने आपल्याला कोणती आज्ञा दिली आहे? (ख) यहोवावर आणि बायबलवर असलेलं आपलं प्रेम, हे बंधुभगिनींवर असलेल्या आपल्या प्रेमाशी कसं निगडित आहे?
१५ पृथ्वीवरील आपल्या शेवटल्या रात्री येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देतो, की एकमेकांवर प्रेम करा; जसं मी तुमच्यावर प्रेम केलं, तसंच तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा. तुमचं एकमेकांवर प्रेम असलं, तर यावरूनच सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”—योहा. १३:३४, ३५.
१६ बंधुभगिनींवर असलेलं आपलं प्रेम, यहोवा देवावर आपण करत असलेल्या आपल्या प्रेमाशी निगडित आहे. आपण जर देवावर प्रेम करत नसू, तर आपल्या बंधुभगिनींवरही प्रेम करू शकणार नाही. आणि जर आपल्या बंधुभगिनींवर आपलं प्रेम नसेल, तर देवावरही आपण प्रेम करू शकणार नाही. प्रेषित योहानने असं म्हटलं: “जो कोणी असे म्हणतो, की ‘मी देवावर प्रेम करतो,’ पण आपल्या भावाचा द्वेष करतो तो खोटे बोलतो. कारण ज्याला त्याने पाहिले आहे त्या भावावर जर तो प्रेम करत नाही, तर न पाहिलेल्या देवावर तो प्रेम करूच शकत नाही.” (१ योहा. ४:२०) यहोवावरील आणि बंधुभगिनींवरील असलेलं आपलं प्रेम, हे बायबलमधील सत्यांवर असलेल्या प्रेमाशीही निगडित आहे. असं आपण का म्हणू शकतो? कारण, बायबलमधून शिकत असलेल्या गोष्टींवर जर आपलं प्रेम असेल, तर देवावर आणि बंधुभगिनींवर प्रेम करण्याची जी आज्ञा त्यामध्ये देण्यात आली आहे, तिचं पालन करण्याचीही आपल्याला इच्छा असेल.—१ पेत्र १:२२; १ योहा. ४:२१.
बंधुभगिनींवर प्रेम असल्याचं दाखवा (परिच्छेद १७ पाहा)
१७. बंधुभगिनींवर आपलं प्रेम आहे हे आपण कोणत्या काही व्यावहारिक मार्गांनी दाखवू शकतो?
१७ १ थेस्सलनीकाकर ४:९, १० वाचा. मंडळीतील बंधुभगिनींवर आपलं प्रेम आहे, हे आपण कोणत्या काही व्यावहारिक मार्गांनी दाखवू शकतो? कदाचित एखाद्या वयस्कर बांधवाला किंवा बहिणीला मंडळीच्या सभांना येण्या-जाण्यासाठी मदतीची गरज असेल. किंवा एखाद्या विधवा बहिणीला तिच्या घरात काही दुरुस्तीचं काम करण्यासाठी मदत हवी असेल. (याको. १:२७) असेही काही बंधुभगिनी असतील जे निराशेचा किंवा समस्यांचा सामना करत असतील. त्यांना आपलेपणाची, प्रोत्साहानाची किंवा सांत्वनाची गरज असेल. (नीति. १२:२५; कलस्सै. ४:११) “विश्वासात असलेल्या” आपल्या बांधवांबद्दल आपल्याला मनापासून काळजी आहे, हे जेव्हा आपण आपल्या शब्दांतून आणि कृतीतून दाखवून देतो तेव्हा त्यांच्यावर आपलं प्रेम आहे हेच आपण सिद्ध करत असतो.—गलती. ६:१०.
१८. बंधुभगिनींसोबत झालेले मतभेद सोडवण्यास आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत होईल?
१८ बायबल आपल्याला सांगतं की या दुष्ट व्यवस्थेच्या “शेवटच्या दिवसांत” अनेक लोक स्वार्थी व लोभी असतील. (२ तीम. ३:१, २) पण खरे ख्रिस्ती या नात्यानं आपल्याला यहोवावरील, बायबल सत्यांवरील आणि बंधुभगिनींवरील प्रेम वाढवत राहण्यासाठी खूप मेहनत घेण्याची गरज आहे. अपरिपूर्ण असल्यामुळे अनेकदा, आपल्या बांधवांसोबत आपले काही लहानसहान मतभेद होण्याचीही शक्यता आहे. पण, बांधवांवर आपलं प्रेम असल्यामुळे, आपसातील मतभेद प्रेमळपणे व लवकरात लवकर सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. (इफिस. ४:३२; कलस्सै. ३:१४) तेव्हा, आपलं ख्रिस्ती प्रेम कधीही थंड होऊ देऊ नका. त्याऐवजी, यहोवावर, बायबल सत्यांवर आणि आपल्या बंधुभगिनींवर असलेलं आपलं प्रेम, आपण अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न करत राहू यात.