तुमच्या स्वेच्छेने पुढे येण्याच्या मनोवृत्तीमुळे यहोवाचा गौरव होतो!
“लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा.”—शास्ते ५:२.
१, २. (क) अलीफज आणि बिल्दद यांच्या मते यहोवाच्या सेवेत आपण जी मेहनत घेतो त्याप्रती यहोवा कसा दृष्टिकोन बाळगतो? (ख) याविषयी यहोवाने कसं उत्तर दिलं?
फार वर्षांपूर्वी तीन पुरुष देवाच्या एका विश्वासू सेवकाला, ईयोबला भेटण्यासाठी आले. त्यांपैकी एक म्हणजे अलीफज तेमानी. अलीफजने ईयोबला विचार करायला लावतील असे काही प्रश्न विचारले. तो म्हणाला: “मनुष्याकडून देवाला काही लाभ आहे काय? सुज्ञ पुरुष स्वतःचाच लाभ करून घेतो. तू धार्मिक असलास तर तेणेकरून सर्वसमर्थाला काही सुख होते काय? तू सात्विकतेने वर्तलास तर त्याला काही लाभ होईल काय?” (ईयो. २२:१-३) हे प्रश्न विचारताना यांचं उत्तर ‘नाही’ हेच असेल अशी अलीफजची खात्री होती. तसंच, ईयोबला भेटायला आलेल्यांपैकी आणखी एक जण म्हणजे बिल्दद शूही. तोदेखील म्हणाला, की मनुष्य देवापुढे कधीही नीतिमान ठरू शकत नाही.—ईयोब २५:४ वाचा.
२ अलीफज व बिल्दद हे ईयोबला असा विचार करण्यास प्रेरीत करत होते, की यहोवाची सेवा करण्यासाठी तो जी मेहनत घेत आहे ती सर्व व्यर्थ आहे. देवाच्या नजरेत मनुष्याचं मोल हे एखाद्या कीटकापेक्षा अधिक नाही, असाही ईयोबने विचार करावा अशी त्यांची इच्छा होती. (ईयो. ४:१९; २५:६) हे पुरुष नम्र वृत्तीचे असल्यामुळे असं म्हणत होते का? (ईयो. २२:२९) हे खरं आहे की सर्वोच्च आणि महान असलेल्या यहोवा देवाच्या तुलनेत आपण अगदीच लहान आहोत. जेव्हा आपण एखाद्या उंच डोंगरावरून किंवा आकाशात उडणाऱ्या विमानातून खाली पाहतो, तेव्हा मनुष्य किती क्षुद्र आहे याची आपल्याला जाणीव होते. पण यहोवाची सेवा करण्यासाठी आणि त्याच्या राज्यासाठी आपण जी मेहनत घेतो, त्याबद्दल यहोवाचाही दृष्टिकोन असाच आहे का? नाही. यहोवाने अलीफज, बिल्दद आणि ईयोबला भेटायला आलेला तिसरा पुरुष सोफर यांना सांगितलं, की ते बोलत असलेल्या गोष्टी साफ खोट्या आहेत. पण याउलट ईयोबविषयी मात्र यहोवा देव म्हणाला, की तो “माझा सेवक” आहे. आणि ईयोबच्या सेवेमुळे तो प्रसन्न असल्याचंही त्याने सांगितलं. (ईयो. ४२:७, ८) यावरून आपल्याला दिसून येतं की अपरिपूर्ण मानव ‘देवाला लाभदायक आहेत.’ म्हणजेच देवाच्या नजरेत मानव मौल्यवान आहेत.
तू यहोवाला काय देणार?
३. यहोवाची सेवा करण्यासाठी आपण जी मेहनत घेतो त्याबद्दल अलीहू काय म्हणाला? आणि असं म्हणण्याद्वारे तो कोणता मुद्दा मांडत होता?
३ ईयोब आणि त्या तीन पुरुषांमध्ये चाललेला संवाद, अलीहू नावाचा एक तरुणही ऐकत होता. जेव्हा त्यांच्यातील संवाद संपला तेव्हा अलीहूने ईयोबला यहोवा देवाविषयी विचारलं. तो म्हणाला: “तू धार्मिक असलास तर तू त्याला काय देणार? तुजपासून त्याला काय मिळणार?” (ईयो. ३५:७) इथं अलीहूदेखील देवाच्या सेवेत आपण जी मेहनत घेतो ती व्यर्थ असल्याचं म्हणत होता का? नाही. हे आपण कशावरून म्हणू शकतो? कारण, यहोवाने ज्या प्रकारे त्या तीन पुरुषांची चुकीची विचारसरणी सुधारली, त्या प्रकारे त्याने अलीहूची विचारसरणी सुधारली नाही. खरंतर इथं अलीहू एक वेगळा मुद्दा मांडत होता. तो असं म्हणत होता की यहोवा आपल्या उपासनेवर अवलंबून नाही. तो पूर्ण आहे, त्याला इतर कोणत्याही गोष्टीची गरज नाही. आपण एखादी गोष्ट केल्याने यहोवा श्रीमंत किंवा बलवान होतो असं नाही. याउलट, आपल्यामध्ये जे चांगले गुण किंवा ज्या चांगल्या क्षमता आहेत त्या सर्व यहोवाकडूनच आहेत. तसंच, आपण त्यांचा कसा वापर करतो हेदेखील तो पाहत असतो.
४. आपण इतरांवर दया दाखवतो तेव्हा यहोवा त्या कृत्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?
४ यहोवाची सेवा करणाऱ्या आपल्या बंधुभगिनींप्रती जेव्हा आपण आपलं एकनिष्ठ प्रेम दाखवतो आणि त्यांना मदत करतो, तेव्हा ते एकनिष्ठ प्रेम आपण यहोवाप्रतीच दाखवत आहोत असं तो समजतो. नीतिसूत्रे १९:१७ मध्ये म्हटलं आहे: “जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्याची फेड तो करेल.” यावरून हे दिसून येतं की जेव्हा जेव्हा आपण इतरांवर दया दाखवतो, तेव्हा तेव्हा यहोवा ते पाहतो आणि लक्षात ठेवतो. यहोवा या विश्वाचा निर्माणकर्ता आहे. तरी आपण इतरांवर दाखवत असलेली दया ही आपण यहोवाला दिलेल्या कर्जाप्रमाणे तो लेखतो आणि त्याची परतफेड आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी देऊन करतो. याविषयी देवाच्या पुत्राने, येशूनेही स्वतः कबूली दिली आहे.—लूक १४:१३, १४ वाचा.
५. आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
५ प्राचीन काळात यहोवाने यशया संदेष्ट्याला एका खास सेवेसाठी निवडलं. (यश. ६:८-१०) यशयाने यहोवाच्या आमंत्रणाचा स्वीकार करत म्हटलं: “हा मी आहे, मला पाठव.” आजदेखील यहोवा विश्वासू सेवकांना त्याच्या कार्यात सहभागी होण्याची संधी देतो. या संधीचा स्वीकार करण्याद्वारे हजारो यहोवाचे सेवक त्यांचीही मनोवृत्ती ही यशया संदेष्ट्याप्रमाणेच आहे हे दाखवून देत आहेत. हे सेवक वेगवेगळ्या प्रकारच्या नेमणूका स्वीकारण्यास तयार आहेत. तसंच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याची आणि तिथल्या समस्यांचा आणि परिस्थितींचा सामना करण्याचीही त्यांची तयारी आहे. पण यहोवाची सेवा करत असताना कदाचित कोणी असा विचार करेल, की ‘सेवा करण्याची जी संधी मला मिळाली आहे, तिची मला कदर आहे. पण मी करत असलेल्या सेवेचं खरंच काही मोल आहे का? माझ्याशिवायही यहोवा त्याचं कार्य पूर्ण करून घेऊ शकतोच ना?’ तुम्हालाही कधी असं वाटलं आहे का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण प्राचीन काळातील यहोवाच्या दोन सेवकांच्या जीवनात घडलेल्या काही घटनांवर नजर टाकू. आपण दबोरा आणि बाराक या सेवकांबद्दल आता पाहू.
देवाने इस्राएली लोकांना धैर्य दिलं
६. याबीनची सेना इस्राएली लोकांवर युद्धात सहज विजय मिळवू शकेल असं का दिसत होतं?
६ बाराक हा इस्राएलमधील एक योद्धा होता, आणि दबोरा ही यहोवाच्या वतीनं संदेश सांगणारी एक संदेष्ट्री होती. कनानचा राजा याबीन याने २० वर्षांपासून इस्राएली लोकांचा खूप छळ चालवला होता. याबीनची सेना इतकी क्रूर आणि हिंसक होती, की गावांमध्ये राहणारे इस्राएली लोक त्यांच्या घराबाहेर पडायलाही फार घाबरायचे. त्याच्याकडे युद्धासाठी ९०० लोखंडी रथ होते.a पण इस्राएली लोकांकडे युद्धात लढण्यासाठी योग्य शस्त्रंही नव्हती आणि युद्धात स्वतःच्या बचावासाठी साधनंही नव्हती.—शास्ते ४:१-३, १३; ५:६-८.
७, ८. (क) यहोवाने बाराकला सुरवातीला कोणती आज्ञा दिली? (ख) इस्राएली लोकांनी कसा विजय मिळवला? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
७ याबीनच्या सैन्यापुढे इस्राएली लोक हे अगदी दुर्बळ दिसत होते, आणि त्यांच्यावर विजय मिळवणं हे सहज शक्य वाटत होतं. पण दबोरा संदेष्ट्रीद्वारे यहोवाने बाराकला अशी आज्ञा दिली, की “तू नफताली व जबुलून यांच्यातले दहा हजार पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा . . . याबीनाचा सेनापती सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे कीशोन नदीपर्यंत येईल असे मी करेन, आणि त्याला तुझ्या हाती देईन.”—शास्ते ४:४-७.
८ यहोवाने दिलेल्या या आज्ञेनंतर युद्धात स्वेच्छेने सहभागी होण्यासाठी इस्राएलमधील सर्व लोकांना आर्जव करण्यात आला. त्यानंतर युद्धात सहभागी होण्यासाठी १०,००० जण ताबोर डोंगराजवळ एकत्र जमले. मग बाराक आणि त्याचे लोक तानख या ठिकाणी त्यांच्या शत्रूंबरोबर युद्ध करण्यास गेले. (शास्ते ४:१४-१६ वाचा.) या युद्धात यहोवाने त्यांना मदत केली का? हो नक्कीच. युद्धाच्या ठिकाणी अचानक वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस पडायला सुरवात झाली. त्यामुळे कोरड्या असलेल्या त्या युद्धभूमीचं दलदलीत रूपांतर झालं. या परिस्थितीचा इस्राएली लोकांना फायदा झाला. बाराकने सीसराच्या सैन्याचा २४ किलोमीटरपर्यंत, म्हणजे हरोशेथ या ठिकाणापर्यंत पाठलाग केला. बाराकपासून पळून जात असताना, सीसराचा रथ चिखलामध्ये अडकून पडला. त्यामुळे तो पळतच साननीम इथं गेला. साननीम हे ठिकाण कदाचित केदेशाजवळ असावं. तिथं सीसरा याएल नावाच्या एका स्त्रीच्या तंबूमध्ये लपला. तो फार थकला होता त्यामुळे त्याला गाढ झोप लागली. तो झोपेत असतानाच याएलने मोठ्या धैर्याने त्याला मारून टाकलं. (शास्ते ४:१७-२१) अशा प्रकारे यहोवाने इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूवर विजय मिळवून दिला.b
स्वेच्छेने पुढे येण्याबद्दल असलेली मनोवृत्ती
९. शास्ते ५:२०, २१ मधून सीसराविरुद्ध झालेल्या युद्धाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं?
९ शास्ते याच्या चौथ्या अध्यायात दिलेल्या घटनांविषयीची अधिक माहिती आपल्याला त्याच्या पुढच्या अध्यायात शिकायला मिळते. शास्ते ५:२०, २१ मध्ये म्हटलं आहे: “आकाशातून तारे लढले; त्यांनी आपआपल्या कक्षातून सीसराशी लढाई केली. कीशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या कीशोन नदीने त्यांना वाहून नेले.” या वचनाचा असा अर्थ होतो का, की देवदूतांनी इस्राएली लोकांना युद्धाच्या वेळी मदत केली? किंवा मग युद्धाच्या वेळी तिथे आकाशातून उल्कापात झाला, असा याचा अर्थ होतो? बायबलमध्ये याविषयी अधिक सांगण्यात आलेलं नाही. पण, यहोवाने अगदी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी जोरदार पाऊस पाडून त्याच्या लोकांचा बचाव केला, या निष्कर्षावर आपण नक्कीच पोहचू शकतो. कारण यामुळेच याबीनचे ९०० रथ चिखलात अडकले आणि इस्राएलच्या १०,००० जणांनी त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवला. पण त्यातल्या एकालाही या विजयाचं श्रेय मिळालं नाही. शास्ते ४:१४, १५ मध्ये आपण वाचतो की तीन वेळा यहोवाला या विजयाचं श्रेय देण्यात आलं आहे.
१०, ११. ‘मेरोज’ हे काय असावं? आणि त्याला शाप का देण्यात आला?
१० इस्राएली लोकांना विजय मिळाल्यानंतर दबोरा आणि बाराक यांनी यहोवाची स्तुती करत गीत गायिले. पण या गीतादरम्यान त्यांनी आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला. ते म्हणाले: “परमेश्वराचा दूत म्हणतो, मेरोजला शाप द्या त्यातल्या रहिवाश्यांना मोठा शाप द्या; कारण परमेश्वराला साहाय्य करावयास, वीरांविरुद्ध परमेश्वराला साहाय्य करावयास ते आले नाहीत.”—शास्ते ५:२३.
११ दबोरा आणि बाराक यांनी ‘मेरोज’ याचा जो उल्लेख केला ते काय आहे? याविषयी खात्रीने आपण काही म्हणू शकत नाही. पण मेरोजला दिलेला शाप इतका खरा ठरला की आज त्याचं नामोनिशाणही राहिलेलं नाही. ‘मेरोज’ हे असं एखादं नगर असावं जिथल्या लोकांनी बाराकसोबत युद्धात सहभाग घ्यायला नकार दिला असेल. कारण जेव्हा कनानी लोकांविरुद्ध लढण्यासाठी १०,००० लोक स्वेच्छेने आले, त्या वेळी मेरोजच्या लोकांनी या युद्धात सहभाग घेण्यासाठी केलेला आर्जव नक्कीच ऐकला असेल. किंवा अशीही शक्यता आहे, की सीसरा बाराकपासून पळून जात असताना मेरोज या नगरातून गेला असावा. आणि मेरोजमधून जात असताना तिथल्या लोकांना सीसराला पकडण्याची संधी असतानाही त्यांनी तसं केलं नसावं. कल्पना करा, मोठा नावाजलेला क्रूर योद्धा स्वतःचा जीव घेऊन त्यांच्या शहरातून पळत असताना मेरोजमधील लोक पाहत आहेत. त्या लोकांसमोर, योग्य अशी पावलं उचलण्याद्वारे यहोवाच्या कार्यात हातभार लावण्याची चांगली संधी उपलब्ध होती. जर त्यांनी तसं केलं असतं तर त्याबद्दल त्यांना यहोवाकडून नक्कीच प्रतिफळ मिळालं असतं. पण जेव्हा त्यांच्यासमोर यहोवासाठी काही करण्याची संधी उपलब्ध होती, तेव्हा त्यांनी काहीही केलं नाही. धाडसी स्त्री याएल हिच्यापेक्षा मेरोजच्या लोकांची मनोवृत्ती फारच वेगळी होती.—शास्ते ५:२४-२७.
१२. शास्ते ५:९, १० या वचनांमध्ये लोकांच्या कोणत्या वेगवेगळ्या मनोवृत्तींबद्दल सांगितलं आहे? याचा आपल्यावर कसा प्रभाव पडला पाहिजे?
१२ शास्ते ५:९, १० मध्ये आपण पाहतो की स्वेच्छेने पुढे आलेल्या १०,००० जणांची मनोवृत्ती ही युद्धात सहभाग घेण्यासाठी न आलेल्या लोकांपेक्षा खूप वेगळी होती. दबोरा आणि बाराक यांनी, लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आलेल्या इस्राएलच्या अधिपतींची स्तुती केली. स्वेच्छेने पुढे आलेले हे लोक “शुभ्र गर्दभांवर [गाढवांवर] स्वारी” करणाऱ्यांपेक्षा फार वेगळे होते. या शुभ्र गर्दभांवर स्वारी करणारे, स्वसंतोषाने सेवेसाठी पुढे येण्याऐवजी स्वतःला फार महत्त्व देत होते. त्यांचं वर्णन ‘अमूल्य गालिच्यांवर बसणारे,’ ‘वाटेने चालणारे’ असं करण्यात आलं आहे. ते आरामाचं जीवन जगणारे होते. त्यांच्या अगदी उलट, युद्धासाठी स्वेच्छेने पुढे आलेले लोक बाराकसोबत, ताबोरच्या खडकाळ डोंगरात आणि कीशोन खोऱ्यातील दलदलीच्या प्रदेशात लढाईसाठी गेले. आरामाचं जीवन जगण्याची इच्छा असलेल्यांनी, सेवेसाठी स्वेच्छेने पुढे न येण्याद्वारे ज्या संधी गमावल्या होत्या त्यावर विचार करण्याची गरज होती. आज आपल्यालाही यहोवाच्या सेवेसाठी असलेल्या आपल्या मनोवृत्तीचं परीक्षण करण्याची गरज आहे.
१३. रऊबेन, दान आणि आशेर या कुळातील लोकांची मनोवृत्ती, जबुलून व नफताली इथल्या लोकांपेक्षा कशी वेगळी होती?
१३ इस्राएलच्या ज्या १०,००० लोकांनी स्वेच्छेने युद्धात सहभाग घेतला, त्यांना या सर्व विश्वाचा अधिपती कसा कार्य करतो हे पाहण्याची संधी मिळाली. ‘परमेश्वराच्या विजयाबद्दल’ बोलत असताना, त्यांनी स्वतः पाहिलेल्या गोष्टींविषयी ते इतरांना सांगू शकत होते. (शास्ते ५:११) त्यांच्या अगदी उलट रऊबेन, दान आणि आशेर या कुळातील लोकांनी यहोवाच्या कार्यांना महत्त्व देण्याऐवजी स्वतःच्या धनसंपत्तीचा म्हणजे स्वतःकडे असलेल्या जनावरांचा, जहाजांचा आणि बंदरांचाच जास्त विचार केला. (शास्ते ५:१५-१७) पण सर्वच कूळ तसे नव्हते. जबुलून व नफताली इथल्या लोकांनी दबोरा आणि बाराक यांना साहाय्य करण्यासाठी “मृत्यूची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला.” (शास्ते ५:१८) यहोवाच्या सेवेबद्दल असलेल्या या वेगवेगळ्या मनोवृत्तींपासून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो.
“परमेश्वराचा धन्यवाद करा”
१४. आज आपण यहोवाच्या राज्याला पाठिंबा कसा देतो?
१४ यहोवाच्या राज्याला पाठिंबा देण्यासाठी, आज आपण एखाद्या खरोखरच्या युद्धात सहभाग घेत नाही. तर धैर्याने आणि आवेशाने प्रचारकार्य करण्याद्वारे आपण त्याच्या राज्याला आपला पाठिंबा देत असतो. यहोवाच्या कार्यासाठी स्वेच्छेने पुढे येणाऱ्यांची कधी नव्हे इतकी आज गरज आहे. लाखो ख्रिस्ती बंधुभगिनी आणि तरुण लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पूर्णवेळेच्या सेवेसाठी स्वेच्छेने पुढे येत आहेत. उदाहरणार्थ, आज अनेक जण पायनियर सेवा व बेथेल सेवा करत आहेत. तसंच अनेक जण राज्य सभागृह बांधकाम आणि संमेलने व अधिवेशनांमध्ये काम करण्यासाठी पुढे येत आहेत. मंडळीतील काही वडील इस्पितळ संपर्क समितींमध्ये (HLC) आणि अधिवेशनांचं नियोजन करण्यासाठी बरीच मेहनत घेत आहेत. आपण सर्व जण या गोष्टीची खात्री बाळगू शकतो, की जी सेवा आपण करत आहोत त्याची यहोवा खूप कदर करतो. तसंच आपण घेत असलेली मेहनत तो कधीही विसरणार नाही.—इब्री ६:१०.
निर्णय घेण्याआधी त्याचा तुमच्या कुटुंबावर व मंडळीवर कसा परिणाम होईल याचा विचार करा (परिच्छेद १५ पाहा)
१५. यहोवाच्या सेवेबाबत योग्य मनोवृत्ती बाळगण्यासाठी आपण काय करू शकतो?
१५ स्वेच्छेने सेवा करण्याच्या आपल्या मनोवृत्तीचं परीक्षण करण्याची आपल्यालाही गरज आहे. आपण स्वतःला विचारू शकतो: ‘यहोवाच्या सेवेत काम करत असताना मी इतरांवरच कामाचा जास्त भार टाकतो का? यहोवाच्या सेवेऐवजी भौतिक गोष्टींकडे माझा जास्त कल आहे का? मी बाराक, दबोरा, याएल आणि स्वेच्छेने पुढे आलेल्या १०,००० जणांचं अनुकरण करण्याद्वारे, माझ्याकडे जी साधनं उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग यहोवाच्या सेवेसाठी करतो का? मी जास्त पैसे कमवण्यासाठी आणि चांगलं जीवन जगण्यासाठी दुसऱ्या शहरात किंवा देशात जाण्याचा विचार करत आहे का? असा विचार करताना त्याचा माझ्या कुटुंबावर व मंडळीवर कसा परिणाम होईल, यावर खोलवर विचार करून यहोवाकडे प्रार्थना करत आहे का?’c
१६. सर्व काही यहोवाचंच आहे, पण तरी अशी कोणती एक गोष्ट आहे जी आपण यहोवाला देऊ शकतो?
१६ यहोवाने त्याच्या राज्याला पाठिंबा देण्याची संधी आपल्याला दिली आहे. हा आपल्यासाठी त्याने दिलेला खरोखर एक फार मोठा सन्मान आहे. मनुष्यांना देवाविरुद्ध करण्यासाठी सैतान हा अगदी आदाम आणि हव्वा यांच्या काळापासून प्रयत्न करत आहे. पण जेव्हा आपण यहोवाच्या राज्याला आपला पाठिंबा देतो, तेव्हा आपण यहोवाच्या बाजूने आहोत हे सैतानाला स्पष्टपणे दाखवून देत असतो. यहोवावर असलेला आपला विश्वास आणि त्याच्याप्रती असलेली आपली एकनिष्ठता आपल्याला त्याची सेवा स्वेच्छेने करण्यासाठी प्रेरित करते. आणि यामुळे यहोवाचं मनही आपण आनंदित करत असतो. (नीति. २३:१५, १६) जेव्हा आपण यहोवाच्या आज्ञा पाळतो आणि त्याच्या राज्याला एकनिष्ठपणे पाठिंबा देतो, तेव्हा यहोवा त्याची निंदा करणाऱ्या सैतानाला प्रत्युत्तर देतो. (नीति. २७:११) आपण यहोवाला आज्ञाधारक राहण्याद्वारे खरंतर त्याला अशी एक गोष्ट देत असतो, जी त्याच्या नजरेत फार मौल्यवान आहे. आणि आपल्या आज्ञाधारकतेमुळे त्याला फार आनंदही होतो.
१७. शास्ते ५:३१ हे वचन आपल्याला भविष्यात जे होणार आहे त्याबद्दल काय शिकवते?
१७ लवकरच या पृथ्वीवर फक्त असेच लोक राहतील, जे यहोवाच्या राज्याला आपला पाठिंबा देतील. त्या काळाची आपण खूप आतुरतेनं वाट पाहात आहोत! आपल्याही भावना दबोरा आणि बाराक यांच्याप्रमाणेच आहेत. ते म्हणाले: “हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर [परमेश्वरावर] प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होवोत.” (शास्ते ५:३१) यहोवा सैतानाच्या या दुष्ट व्यवस्थेचा नाश करेल तेव्हा हे घडेल. जेव्हा यहोवा हर्मगिदोनाची लढाई सुरू करेल, तेव्हा या युद्धात सहभाग घेण्यास स्वेच्छेने पुढे येणाऱ्या मानवी सेवाकांची गरज पडणार नाही. त्याऐवजी आपण “स्थिर उभे” राहून ‘परमेश्वर आपले तारण’ कसे करेल ते पाहू. (२ इति. २०:१७) पण तोपर्यंत यहोवाच्या राज्याला धैर्याने आणि आवेशाने पाठिंबा देण्याची एक अनमोल संधी आपल्याकडे उपलब्ध आहे.
१८. स्वेच्छेनं पुढे येण्याच्या आपल्या मनोवृत्तीमुळे इतरांवर त्याचा कसा चांगला परिणाम होतो?
१८ दबोरा आणि बाराक यांनी जे विजयाचं गीत गायिलं त्यात त्यांनी कोणा मानवाला नाही तर यहोवाला महिमा दिला. ते म्हणाले: “लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा.” (शास्ते ५:१, २) त्याच प्रकारे जेव्हा आपण यहोवाची सेवा करण्यासाठी स्वेच्छेने पुढे येतो, तेव्हा इतरांनाही यहोवाचा धन्यवाद व गौरव करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं.
a याबीनच्या सैन्याकडे असलेल्या या रथांच्या चाकांना लोखंडी आऱ्या होत्या. या आऱ्या खूप धारधार व लांब असून त्यांचा आकार विळ्याप्रमाणे असायचा. त्या चाकांच्या मधल्या भागामधून बाहेर निघालेल्या असायच्या. या लोखंडी आऱ्यांमुळे हे रथ एक प्रकारे घातक आणि विध्वंसक यंत्रंच बनून जायचे.
b या रोमांचक घटनेचा सविस्तर अहवाल १५ नोव्हेंबर २००३ टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठे २८-३१ मध्ये देण्यात आला आहे.
c १ ऑक्टोबर २०१५ च्या टेहळणी बुरूज अंकातील “पैशांची चिंता” हा लेख पाहा.