देवाचं राज्य या पृथ्वीवर येईल, तेव्हा कोणत्या गोष्टी नाहीशा होतील?
“जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहा. २:१७.
१, २. (क) मरणदंडाची शिक्षा मिळालेल्या गुन्हेगारामध्ये आणि जगाच्या या दुष्ट व्यवस्थेमध्ये कोणतं साम्य आहे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) या दुष्ट व्यवस्थेचा अंत झाल्यानंतर स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व जण कोणत्या गोष्टीशी सहमत होतील?
कल्पना करा, काही शिपाई एका क्रूर आणि अट्टल गुन्हेगाराला घेऊन जेलच्या आवारातून चालले आहेत. त्याला नेत असताना हे शिपाई “मेलेला माणूस चालला आहे” असं ओरडत आहेत. ते या गुन्हेगाराविषयी असं का म्हणत आहेत? कारण, या गुन्हेगाराला मरणदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आणि या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठीच हे शिपाई त्याला जेलच्या आवारातून घेऊन चालले आहेत. हा गुन्हेगार सध्या जिवंत व धडधाकट दिसत असला, तरी लवकरच त्याला त्याची शिक्षा दिली जाणार आहे आणि त्यामुळे तो एखाद्या मेलेल्या माणसाप्रमाणेच आहे.a
२ आज आपण ज्या दुष्ट जगात राहत आहोत, ते जग शिक्षेसाठी चाललेल्या त्या गुन्हेगाराप्रमाणेच आहे. बायबल म्हणतं: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत.” (१ योहा. २:१७) या दुष्ट व्यवस्थेचा अंत करण्याचं यहोवा देवाने ठरवलं आहे. त्यामुळे या व्यवस्थेचा लवकरच नाश होईल यात कोणतीही शंका नाही. पण त्या गुन्हेगाराला सुनावलेल्या शिक्षेमध्ये आणि या दुष्ट व्यवस्थेचा नाश करण्याच्या निर्णयात एक मोठा फरक आहे. त्या गुन्हेगाराला दिलेली शिक्षा चुकीची होती असा काही लोक विचार करतील, आणि त्याला शिक्षेपासून वाचवण्याची त्यांना आशा असल्यामुळे कदाचित आंदोलनदेखील करतील. पण यहोवा हा यथायोग्य न्याय करणारा आहे. आणि या दुष्ट जगाचा नाश करण्याचा त्याचा निर्णय हा पूर्णपणे योग्यच आहे. (अनु. ३२:४) तो या व्यवस्थेचा नाश करण्यासाठी उशीर लावणार नाही. मग, शेवटी या दुष्ट व्यवस्थेचा नाश केल्यानंतर स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व जण या गोष्टीशी सहमत होतील, की यहोवाने केलेला न्याय हा योग्यच होता. खरंच किती मोठा सुटकेचा काळ असेल तो!
३. देवाचं राज्य या पृथ्वीवर येईल, तेव्हा कोणत्या चार गोष्टी नाहीशा होतील?
३ नाहीशा होणार असलेल्या ‘जगात’ कोणत्या गोष्टी सामील आहेत? यामध्ये रोजच्या जीवनात सामान्य झालेल्या वाईट गोष्टींचा समावेश आहे. लवकरच या सर्व गोष्टी काढून टाकल्या जातील. ही खरंतर ‘राज्याची सुवार्ताच’ आहे. (मत्त. २४:१४) देवाचं राज्य या पृथ्वीवर येईल तेव्हा ज्या चार गोष्टींना नाहीसं केलं जाईल, त्यांबद्दल आपण या लेखात चर्चा करणार आहोत. त्या चार गोष्टी म्हणजे दुष्ट लोक, भ्रष्ट संघटना, वाईट कामं आणि वाईट परिस्थिती. यांवर चर्चा करताना आपण पुढील तीन प्रश्न विचारात घेऊ: (१) या गोष्टींचा आपल्यावर आज कसा परिणाम होतो? (२) यहोवा यांविषयी काय करेल? आणि (३) त्यांची जागा कोणत्या गोष्टी घेतील?
दुष्ट लोक
४. दुष्ट लोकांचा आज आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो?
४ दुष्ट लोकांचा आज आपल्यावर कसा परिणाम होतो? प्रेषित पौलने म्हटलं: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील.” पुढे तो म्हणाला: “दुष्ट व भोंदू माणसे . . . दुष्टपणात अधिक सरसावतील.” (२ तीम. ३:१-५, १३) तुम्हालाही याचा अनुभव आला आहे का? आपल्यापैकी अनेकांना क्रूरपणे निंदा करणाऱ्यांचा, वर्णद्वेष करणाऱ्यांचा किंवा क्रूर व गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा अनुभव कदाचित आला असेल. अशा लोकांपैकी काही जण अगदी उघडपणे वाईट कामं करतात. तर काही जण इतरांना मदत करत असल्याचं सोंग आणतात, पण खरंतर ते दुष्ट वृत्तीने भरलेली असतात. कदाचित तुम्ही स्वतः अशा गोष्टी थेटपणे अनुभवल्या नसतील, पण दुष्ट लोकांमुळे आपल्या सगळ्यांच्याच जीवनावर परिणाम होत असतो. जेव्हा हे दुष्ट लोक करत असलेल्या कृत्यांबद्दल आपण ऐकतो, तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. जसं की, जेव्हा लहान मुलांना, वृद्धांना आणि स्वतःचा बचाव न करू शकणाऱ्या कमजोर लोकांना क्रूरतेनं व हीनतेनं वागवलं जातं, तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं. एखाद्या जनावरासारखी किंवा दुरात्म्यांसारखी कृत्यं हे दुष्ट लोक करतात. (याको. ३:१५) पण यहोवाचं वचन आपल्याला खरी आशा देतं.
५. (क) दुष्ट लोकांकडे अजूनही कोणती संधी आहे? (ख) जे लोक स्वतःला बदलणार नाहीत त्यांचं काय होईल?
५ यहोवा देव काय करेल? सध्या यहोवा या दुष्ट लोकांना आपल्या चुकीच्या मार्गापासून मागे फिरण्याची संधी देत आहे. (यश. ५५:७) या दुष्ट व्यवस्थेचा नाश केला जाणार हे नक्की असलं, तरी अजूनही या लोकांचा न्याय करण्यात आलेला नाही. त्यामुळे या लोकांकडे स्वतःमध्ये बदल करण्यासाठी अजूनही वेळ आहे. पण जे लोक स्वतःला बदलण्यास नकार देतील, आणि अगदी मोठ्या संकटापर्यंत या दुष्ट व्यवस्थेला आपला पाठिंबा देत राहतील त्यांच्याबद्दल काय? यहोवाने वचन दिलं आहे की तो सर्व दुष्ट लोकांचा या पृथ्वीवरून नाश करेल. (स्तोत्र ३७:१० वाचा.) आज अनेक जण ते करत असलेली वाईट कामं लपवतात, आणि सहसा त्यांना या वाईट कृत्यांबद्दल शिक्षाही मिळत नाही. (ईयो. २१:७, ९) पण बायबल आपल्याला या गोष्टीची आठवण करून देतं, की “देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते; त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो. अधर्मी ज्यात लपून राहतील असा काळोख, असा घोर अंधकार नाही.” (ईयो. ३४:२१, २२) त्यामुळे यहोवापासून लपून राहण्याचा कोणताही मार्ग नाही. दुष्ट लोक करत असलेली सर्व कामं तो पाहत आहे. हर्मगिदोनानंतर या दुष्ट लोकांना शोधण्याचा जरी आपण प्रयत्न केला, तरी ते आपल्याला सापडणार नाहीत. त्यांचा कायमचा नाश झालेला असेल!—स्तो. ३७:१२-१५.
६. दुष्ट लोकांना नाहीसं केल्यानंतर, या पृथ्वीवर कोण राहतील? आणि ही एक सुवार्ता आहे असं आपण का म्हणू शकतो?
६ दुष्ट लोकांना नाहीसं केल्यानंतर, या पृथ्वीवर कोण राहतील? यहोवाने वचन दिलं आहे: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” पुढे त्याने असं म्हटलं आहे: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.” (स्तो. ३७:११, २९) हे “लीन जन” व “नीतिमान” लोक कोण आहेत? लीन जन असे नम्र वृत्तीचे लोक आहेत, जे यहोवाकडून शिकतात आणि त्याच्या आज्ञांचं पालन करतात. तसंच, नीतिमान लोक ते आहेत ज्यांना यहोवाने सांगितलेल्या चांगल्या गोष्टी करण्याची आवड आहे. आज जगामध्ये आपण पाहिलं तर नीतिमान लोकांपेक्षा दुष्ट लोकच जास्त दिसतात. पण, देवाच्या नवीन जगात फक्त नम्र आणि नीतिमान लोकच राहतील. आणि ते या पृथ्वीला एक अतिशय सुंदर असं नंदनवन बनवतील!
भ्रष्ट संघटना
७. भ्रष्ट संघटनांचा आपल्यावर कसा परिणाम होतो?
७ भ्रष्ट संघटनांचा आपल्यावर कसा परिणाम होतो? आज जगभरात चाललेल्या बहुतेक वाईट गोष्टींसाठी फक्त एक-दोन माणसे जबाबदार नाहीत, तर या गोष्टींसाठी भ्रष्ट संघटना मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत. आज धार्मिक संघटना लाखो लोकांना भुलवत आहेत. उदाहरणार्थ, देव कोण आणि कसा आहे याबद्दल ते लोकांना खोटं सांगतात, बायबलवर आपण विश्वास ठेवू शकत नाही असं ते म्हणतात, आणि मानवांच्या व या पृथ्वीच्या भविष्याबद्दल ते लोकांमध्ये खोट्या गोष्टी पसरवतात. यासोबतच, भ्रष्ट सरकारे युद्ध आणि जातीयवादाला खतपाणी घालतात आणि गरीब व स्वतःचा बचाव न करू शकणाऱ्या लोकांना दाबून टाकतात. अशी सरकारे एखाद्या विशिष्ट गटाला आपला पाठिंबा देऊन किंवा लाच घेऊन प्रबळ बनतात. तसंच, पैशाची हाव असलेले उद्योग व व्यापारी संस्था वातावरणाला प्रदूषित करतात. त्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर करतात आणि फक्त काही थोड्या लोकांना श्रीमंत बनवण्यासाठी इतरांचा फायदा घेतात. या सर्व गोष्टींवरून हे स्पष्टच आहे, की आज हे जग ज्या दुष्ट गोष्टींनी भरलेलं आहे त्यामागे भ्रष्ट संघटना मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत.
८. डोंगराप्रमाणे मजबूत भासणाऱ्या संघटनांचं काय होईल असं बायबल सांगतं?
८ याबाबतीत यहोवा देव काय करेल? जेव्हा मानवी सरकारे खोट्या धर्मावर हल्ला करतील, तेव्हा मोठ्या संकटाची सुरवात होईल. या खोट्या धर्माला बायबलमध्ये मोठी बाबेल व मोठी कलावंतीण असं म्हटलं आहे. (प्रकटी. १७:१, २, १६; १८:१-४) या खोट्या धार्मिक संघटनांचा समूळ नाश केला जाईल. पण मग इतर भ्रष्ट संघटनांच्या बाबतीत काय? बायबलमध्ये सांगितलं आहे की या संघटना एखाद्या डोंगराप्रमाणे किंवा बेटाप्रमाणे मजबूत आहेत असं वाटतं. (प्रकटीकरण ६:१४ वाचा.) पण त्यात पुढे असंही म्हटलं आहे, की जी सरकारे आणि इतर संघटना देवाच्या राज्याला आपला पाठिंबा देत नाहीत त्या सर्वांचा नाश केला जाईल. हे मोठ्या संकटाच्या शेवटल्या टप्प्यात होईल. (यिर्म. २५:३१-३३) मग यानंतर पृथ्वीवर कोणत्याही भ्रष्ट संघटनेचं अस्तित्व उरणार नाही!
९. नवी पृथ्वी ही एक चांगली व्यवस्था असलेलं ठिकाण असेल, हे आपण कोणत्या आधारावर म्हणू शकतो?
९ या भ्रष्ट संघटनांची जागा कोण घेईल? हर्मगिदोनानंतर या पृथ्वीवर कोणती संघटना राहील? बायबल म्हणतं: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३) जुने आकाश व जुनी पृथ्वी म्हणजे भ्रष्ट सरकारे आणि त्यांच्या शासनाखाली असलेले लोक. जेव्हा या जुन्या आकाशाला व पृथ्वीला काढून टाकलं जाईल, तेव्हा त्याची जागा “नवे आकाश व नवी पृथ्वी” घेईल. नवे आकाश हे नवीन सरकाराला सूचित करतं. हे सरकार म्हणजे येशू ख्रिस्त आणि त्यासोबत राज्य करणारे १,४४,००० अभिषिक्त जन. नवी पृथ्वी ही देवाच्या राज्याचे भाग असलेल्या लोकांना सूचित करते. येशू आणि त्याचं राज्य, व्यवस्थेचा देव असलेल्या यहोवाचं अगदी पूर्णपणे अनुकरण करेल. (१ करिंथ. १४:३३) म्हणूनच पृथ्वीवर चांगली व्यवस्था असेल. आणि या पृथ्वीची काळजी घेण्याची जबाबदारी नम्र व चांगल्या पुरुषांवर असेल. (स्तो. ४५:१६) यांना येशू ख्रिस्त आणि त्याच्यासोबत असलेले १,४४,००० जन मार्गदर्शन देतील. तुम्ही त्या काळाची कल्पना करू शकता का, जेव्हा सर्व भ्रष्ट संघटनांना काढून टाकलं जाईल आणि त्याच्या जागी फक्त एकच संघटना या पृथ्वीवर असेल; एक अशी संघटना ज्यामध्ये ऐक्य असेल आणि जी कधीही भ्रष्ट होणार नाही?
वाईट कामं
१०. तुम्ही राहत असलेल्या परिसरात कोणत्या वाईट गोष्टी सर्रासपणे चालतात? याचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कसा परिणाम होतो?
१० जगात चाललेल्या वाईट कामांचा आपल्यावर कसा परिणाम होतो? आज आपण अशा जगात राहत आहोत जिथं अनैतिक गोष्टी, अप्रामाणिकपणा आणि हिंसा या गोष्टी सर्रासपणे होत आहेत. मनोरंजन उद्योग म्हणजे टिव्ही, चित्रपट इत्यादी, जगात चाललेल्या या वाईट गोष्टींना अशा प्रकारे दाखवतात की लोकांना त्याबद्दल आकर्षण निर्माण होतं. यासोबतच ते यहोवाचे जे नीतिमान स्तर आहेत त्यांना अगदी कालबाह्य असल्यासारखं चित्रित करतात. (यश. ५:२०) अशा प्रकारच्या वाईट प्रभावांपासून खासकरून पालकांनी आपल्या मुलांना सांभाळलं पाहिजे. खरंतर देवाच्या स्तरांचा जराही आदर न करणाऱ्या या जगात राहत असताना, सर्वच खऱ्या ख्रिश्चनांनी यहोवासोबत असलेला त्यांचा नातेसंबंध जपण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे.
११. यहोवाने सदोम आणि गमोरा या शहरांचा नाश केला यावरून आपल्याला काय समजतं?
११ जगात चाललेल्या वाईट कामांचं यहोवा काय करेल? प्राचीन काळात सदोम आणि गमोरा इथं चाललेल्या वाईट कामांचं यहोवाने काय केलं याचा विचार करा. (२ पेत्र २:६-८ वाचा.) तिथं राहणारा लोट हा एक नीतिमान मनुष्य होता. आणि तिथं चाललेल्या वाईट कामांमुळे त्याला आणि त्याच्या परिवाराला बराच त्रास व दुःख सहन करावं लागत होतं. यहोवा देवाने वाईट कामांना संपवण्यासाठी त्या संपूर्ण प्रदेशाचा नाश केला. ही गोष्ट त्याने आजच्या काळातील वाईट लोकांसमोर एक उदाहरण म्हणून ठेवली आहे. ज्या प्रकारे यहोवा देवाने सदोम आणि गमोराचा नाश करून अनैतिक कामांना काढून टाकलं, त्याच प्रकारे तो आजच्या दुष्ट व्यवस्थेचा नाश करून जगात होत असलेल्या वाईट कामांना काढून टाकेल.
१२. नवीन जगात तुम्हाला कोणकोणती कामं करायला आवडतील?
१२ वाईट कामांना काढून टाकल्यावर या पृथ्वीवर काय राहील? नवीन जगात खरा आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी आपण करू. जसं की, या पृथ्वीचं आपण एका सुंदर बागेत रूपांतर करू. तसंच स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी घरे बांधू. यासोबतच पुनरुत्थान झालेल्या लाखो लोकांचं आपण स्वागत करू आणि त्यांना यहोवाबद्दल आणि त्याने मानवजातीसाठी केलेल्या कार्यांबद्दल शिकवू. (यश. ६५:२१, २२; प्रे. कार्ये २४:१५) त्या वेळी आपण अशा कामांमध्ये व्यस्त असू ज्यांमुळे यहोवाच्या नावाचा महिमा होईल आणि आपल्याला खरा आनंद मिळेल.
वाईट परिस्थिती
१३. एदेन बागेत झालेल्या बंडामुळे कोणते परिणाम झाले?
१३ आजच्या वाईट परिस्थितीचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? आज जगात असलेल्या दुष्ट लोकांमुळे, भ्रष्ट संघटनांमुळे, आणि चाललेल्या वाईट कामांमुळे जगाची परिस्थिती अतिशय वाईट होत चालली आहे. युद्ध, गरीबी, जातीभेद, आजारपण आणि मृत्यू यांचा आपल्या सर्वांच्याच जीवनावर परिणाम होत असतो. या सर्व वाईट परिस्थितींची सुरवात सैतान, आदाम आणि हव्वा यांनी देवाविरुद्ध केलेल्या बंडामुळे झाली. आणि त्याचा परिणाम आज आपल्या सर्वांच्या जीवनावर होत आहे.
१४. वाईट परिस्थितीबाबत यहोवा देव काय करेल?
१४ वाईट परिस्थितीबाबत यहोवा देव काय करेल? काही उदाहरणांचा विचार करा. यहोवाने वचन दिलं आहे की तो युद्धांचा अंत करेल. (स्तोत्र ४६:८, ९ वाचा.) सर्व आजार व रोगांना काढून टाकेल. (यश. ३३:२४) मृत्यू नाहीसा करेल. (यश. २५:८) गरीबीदेखील काढून टाकेल. (स्तो. ७२:१२-१६) यासोबतच आपल्या जीवनाला त्रासदायक ठरणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींना यहोवा देव कायमचं नाहीसं करेल. इतकंच नाही तर सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांच्या वाईट प्रभावालादेखील यहोवा देव मिटवून टाकेल.—इफिस. २:२.
युद्ध, आजारपण किंवा मृत्यू नाही अशा जगात राहणं खरंच किती चांगलं असेल! (परिच्छेद १५ पाहा)
१५. हर्मगिदोनानंतर अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या सदासर्वकाळासाठी नाहीशा झालेल्या असतील?
१५ कल्पना करा, जिथं युद्ध, आजारपण किंवा मृत्यूही नाही अशा जगात राहणं खरंच किती चांगलं असेल! एका अशा ठिकाणी जिथं लष्कराची किंवा शस्त्रांची गरज नाही, जिथं युद्धाची स्मारके नाहीत. आपल्याला कोणत्याही दवाखान्याची, डॉक्टरची किंवा नर्सची गरज नाही. जिथं शवालयं किंवा स्मशानं नाहीत. एक असं जग जिथं गुन्हे होणार नाहीत. त्यामुळे पोलिसांची, धोक्याची सूचना देणाऱ्या कोणत्याही यंत्रणेची आणि कदाचित कुलूप आणि चाव्यांचीही गरज राहणार नाही! आपल्याला ज्यामुळे चिंता वाटते अशा सगळ्या गोष्टी सदासर्वकाळासाठी नाहीशा झालेल्या असतील.
१६, १७. (क) हर्मगिदोनातून बचावलेले मोठी सुटका अनुभवतील हे आपण का म्हणू शकतो? स्पष्ट करा. (ख) या दुष्ट व्यवस्थेचा नाश होत असताना स्वतःचा जीव वाचवणं आपल्याला कशामुळे शक्य होईल?
१६ सर्व वाईट परिस्थिती काढून टाकली जाईल, त्यानंतरची परिस्थिती कशी असेल? आज अशा परिस्थितीची पूर्णपणे कल्पना करणं आपल्याला शक्य नाही. कारण आजपर्यंत आपण वाईट परिस्थितींमध्ये जगत आलो आहोत. त्यामुळे आपल्याला या सर्व वाईट गोष्टींचा किती प्रमाणावर त्रास होतो याचा नेमका अंदाज बांधता येणार नाही. हे समजण्यासाठी आपण पुढील उदाहरणं पाहूयात. जे लोक जास्त वर्दळ असलेल्या रेल्वे स्टेशनजवळ राहतात त्यांना काही काळानंतर तिथल्या मोठ्या आवाजाचा त्रास जाणवत नाही. आणि जे लोक कचरा डेपोजवळ राहतात त्यांना काही काळाने तिथल्या वासाचा त्रास होत नाही. पण जेव्हा यहोवा देव सर्व वाईट परिस्थितीला कायमचं काढून टाकेल, तेव्हा ती आपल्यासाठी खरंच एक मोठी सुटका असेल.
१७ आज आपल्याला ज्या दबावांचा आणि त्रासाचा सामना करावा लागत आहे, त्यांना काढून टाकल्यानंतर आपलं जीवन कसं असेल? स्तोत्र ३७:११ मध्ये म्हटलं आहे: “ते [लीन जन] उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” यहोवा आपल्यासाठी शांतीची अपेक्षा करतो ही गोष्ट किती आनंद देणारी आहे. आज या तणावपूर्ण परिस्थितीत जगत असताना, यहोवा आणि त्याच्या संघटनेशी जडून राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. भविष्यासाठी आपल्याला जी आशा आहे, ती इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा फार मौल्यवान आहे. त्यामुळे त्या आशेला धरून रहा, त्यावर मनन करा आणि त्याबद्दल इतरांनाही सांगा. (१ तीमथ्य ४:१५, १६; १ पेत्र ३:१५) असं केल्याने या दुष्ट व्यवस्थेचा नाश होईल, तेव्हा तुमचा जीव वाचेल आणि सदासर्वकाळासाठी तुम्हाला आनंद मिळेल!
a या परिच्छेदात सांगितलेलं हे दृश्य, अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेच्या काही भागांतील तुरुंगात पाळण्यात येणाऱ्या रिवाजाबद्दल आहे.