वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 मार्च पृ. २८-३१
  • मैत्री धोक्यात असतानाही, तुम्ही मित्र बनून राहाल का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मैत्री धोक्यात असतानाही, तुम्ही मित्र बनून राहाल का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जेव्हा आपल्या मित्राकडून एखादी चूक होते तेव्हा
  • जेव्हा मित्राला तुमची गरज असते तेव्हा
  • तुमच्यासोबत विश्‍वासघात झाला आहे असं तुम्हाला वाटतं तेव्हा
  • त्याने धैर्याने राजाला त्याची चूक दाखवून दिली
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • नाथान—शुद्ध उपासनेचा निष्ठावान समर्थक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • यहोवाच्या एकनिष्ठ सेवकांकडून शिका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तुम्ही यहोवाशी मैत्री करू शकता!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 मार्च पृ. २८-३१
देवाचा संदेश दावीद राजाला कशा प्रकारे सांगावा यावर नाथान संदेष्टा विचार करत आहे

मैत्री धोक्यात असतानाही, तुम्ही मित्र बनून राहाल का?

जॉर्ज आणि मार्टिन हे दोघे जवळपास ५० वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत.a पण या वर्षांदरम्यान अशीही एक वेळ होती जेव्हा त्यांची मैत्री धोक्यात आली होती. मार्टिन म्हणतो: “माझ्या जीवनात असा एक कठीण काळ होता जेव्हा माझ्याकडून काही गंभीर चुका झाल्या, आणि त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांपासून दुरावलो.” याविषयी बोलताना जॉर्ज सांगतो: “मार्टिनने माझा बायबल अभ्यास घेतला होता. आध्यात्मिक गोष्टींसाठी तो माझा एक प्रकारे मार्गदर्शकच होता. त्यामुळे त्याने जे काही केलं त्यावर माझा विश्‍वासच बसत नव्हता. मला असं वाटत होतं, की जसं काय आता सगळं काही संपलं आहे. कारण आमची मैत्री आता पूर्वीप्रमाणे राहणार नाही हे मला माहीत होतं. मला एकटं पडल्यासारखं वाटलं.”

चांगले मित्र हे फार मौल्यवान असतात, आणि कायम टिकणारी मैत्री विकसित करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण जेव्हा आपली मैत्री धोक्यात येते, तेव्हा ती टिकवून ठेवण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? यासाठी बायबलमधील अशा काही लोकांच्या उदाहरणांमुळे आपल्याला मदत होऊ शकते जे खरे मित्र होते, पण कालांतराने त्यांची मैत्री धोक्यात आली.

जेव्हा आपल्या मित्राकडून एखादी चूक होते तेव्हा

पूर्वी मेंढपाळ असलेल्या दावीद राजाचेही बरेच चांगले मित्र होते. दाविदाचे मित्र म्हटल्यावर कदाचित तुमच्या मनात योनाथानाचं नाव आलं असेल. कारण तो दाविदाच्या काही जवळच्या मित्रांपैकी एक होता. (१ शमु. १८:१) पण दाविदाचे इतरही काही चांगले मित्र होते, जसं की नाथान संदेष्टा. दावीद आणि नाथानाची मैत्री कधी झाली याबद्दल बायबलमध्ये काही सांगितलेलं नाही. पण ते जवळचे मित्र होते हे आपल्याला बायबलमधून दिसून येतं. दाविदाची इच्छा होती, की यहोवा देवासाठी एक मंदिर बांधावं. ज्या प्रकारे एखादी व्यक्‍ती आपल्या मित्राला आपल्या मनातील गोष्ट सांगते, त्याच प्रकारे दाविदाने आपल्या मनातील ही गोष्ट नाथानाला बोलून दाखवली. याबाबतीत नाथानाने दावीद राजाला, एक मित्र आणि देवाचा संदेष्टा या नात्याने जो सल्ला दिला त्याची दाविदाने नक्कीच खूप कदर केली असेल.—२ शमु. ७:२, ३.

पण नंतर अशी एक गोष्ट घडली ज्यामुळे त्यांच्या या मैत्रीपूर्ण संबंधांना धोका निर्माण झाला. राजा दाविदाने बथशेबेशी व्यभिचार केला आणि तिच्या पतीला, उरीयाला मारून टाकण्याची योजना केली. (२ शमु. ११:२-२१) खरंतर, अनेक वर्षांपासून दावीद राजा यहोवाला एकनिष्ठ राहिला होता आणि न्यायानं वागला होता. पण आता मात्र त्याने एक फार गंभीर पाप केलं होतं! न्यायानं वागणाऱ्‍या या राजाने असं का केलं? आपल्या वर्तणुकीचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याची त्याला जाणीव नव्हती का? आपण आपलं पाप देवापासून लपवून ठेवू शकतो असं त्याला वाटलं असेल का?

अशा या परिस्थितीत दावीदाचा मित्र नाथान आता काय करणार होता? ही गोष्ट इतरांकरवी तो राजासमोर येऊ देणार होता का? दाविदाने उरीयाला मारण्यासाठी काय केलं होतं हे इतरांनाही माहीत होतं. त्यामुळे मग राजाला त्याची चूक दाखवून अनेक वर्षांपासून असलेली आपली मैत्री धोक्यात घालण्याची गरज नाही, असा नाथानाने विचार केला असावा का? कारण राजाला त्याची चूक लक्षात आणून दिल्याने नाथानाला कदाचित आपला जीवही गमवावा लागला असता. नाहीतरी, उरीयाची काहीही चूक नसताना दाविदाने त्याला जीवे मारलंच होतं.

पण नाथान हा देवाच्या वतीने संदेश सांगणारा होता. त्याला माहीत होतं की जर त्याने दाविदाला त्याची चूक दाखवून दिली नाही, तर दाविदासोबत असलेली त्याची मैत्री पूर्वीप्रमाणे राहणार नाही. तसंच त्याचा स्वतःचा विवेकही त्याला बोचत राहील. त्याच्या मित्राने, दाविदाने असा एक मार्ग निवडला होता, ज्याला यहोवाची मुळीच मंजुरी नव्हती. त्यामुळे दाविदाला यहोवासोबत असलेला त्याचा नातेसंबंध पुन्हा सुधारण्याची खरोखरच खूप गरज होती. अशा परिस्थितीत मार्ग दाखवण्यासाठी दाविदाला एका खऱ्‍या मित्राची गरज होती. आणि नाथान हा अशाच प्रकारचा मित्र होता. विषयाची सुरवात करण्यासाठी मग नाथानाने एका उदाहरणाचा वापर केला. असं एक उदाहरण, जे पूर्वी मेंढपाळ असलेल्या दाविदाच्या हृदयाला स्पर्श करून जाईल. नाथान संदेष्ट्याने दाविदाला देवाचा संदेश कळवला. पण त्याने अशा काही प्रकारे तो दाविदाला सांगितला, की आपण किती गंभीर चूक केली आहे हे दाविदाला समजलं, आणि ती चूक सुधारण्यासाठी तो पावलंदेखील उचलू शकला.—२ शमु. १२:१-१४.

तुमच्या मित्राने एखादी मोठी चूक किंवा एखादं गंभीर पाप केलं तर तुम्ही काय कराल? तुमच्या मनात असा विचार येईल का, की जर तुम्ही तुमच्या मित्राला त्याची चूक लक्षात आणून दिली तर तुमच्या मैत्रीला तडा जाईल? किंवा त्याला आध्यात्मिक रीत्या मदत मिळावी म्हणून, तो करत असलेल्या चुकीच्या गोष्टींविषयी तुम्ही मंडळीतील वडिलांना सांगितलं, तर ते मित्राला धोका देण्यासारखं ठरेल?

या लेखात आधी उल्लेख केलेला जॉर्ज म्हणतो: “मला जाणवलं की काहीतरी बदललंय. मार्टिन पूर्वीप्रमाणे माझ्यासोबत मोकळेपणाने बोलत नाहीये. म्हणून मग मी त्याच्याशी याविषयी बोलण्याचं ठरवलं. असं करणं माझ्यासाठी खरंतर खूप अवघड होतं. मी विचार केला: ‘मी त्याला नवीन काय सांगू, त्याला तर सगळं माहीत आहे. मी त्याच्याशी बोललो तर कदाचित त्याला रागही येईल.’ पण आम्ही सोबत मिळून जो बायबल अभ्यास केला होता त्यात मी जे काही शिकलो, त्यावर मी विचार केला. आणि मला त्याच्याशी बोलण्यासाठी हिम्मत मिळाली. मार्टिनने देखील मला अनेक वेळा अशाच प्रकारे मदत केली होती. मला आमच्यामध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध खराब होऊ द्यायचे नव्हते. पण त्याच वेळी मला मार्टिनला मदतही करायची होती, कारण मला त्याची काळजी वाटत होती.”

मार्टिन म्हणतो: “जॉर्ज माझ्यासोबत प्रामाणिकपणे बोलला. आणि खरंच, तो जे म्हणाला ते बरोबर होतं. मला हेही माहीत होतं की माझ्या चुकीच्या निवडींसाठी आणि त्यामुळे झालेल्या परिणामांसाठी तो किंवा यहोवा देव जबाबदार नाही. त्यामुळे मी मला मिळालेलं ताडन स्वीकारलं, आणि आध्यात्मिक रीत्या पुन्हा सावरलो.”

जेव्हा मित्राला तुमची गरज असते तेव्हा

दावीद राजाशी एकनिष्ठ असलेले इतरही बरेच सोबती होते, ज्यांनी दाविदाच्या कठीण काळादरम्यान त्याला साथ दिली होती. हूशय हा त्यांपैकीच एक होता. बायबलमध्ये हूशयची ओळख, “दाविदाचा मित्र” म्हणून करून देण्यात आली आहे. (२ शमु. १६:१६; १ इति. २७:३३) हूशयला कदाचित राजदरबारात स्थान असावं. तो राजाचा मित्र आणि त्याच्यासोबत काम करणारा होता. हूशयने बऱ्‍याच वेळा राजाने गुप्तपणे दिलेल्या निर्देशनांचं पालन केलं होतं.

दाविदाचा मुलगा अबशालोम याने राजाचं स्थान बळकावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बऱ्‍याच इस्राएली लोकांनीही अबशालोमाची बाजू घेतली होती. पण हूशय मात्र दाविदाला विश्‍वासू राहिला. दावीद जेव्हा अबशालोमापासून पळून चालला होता, तेव्हा हूशय त्याला भेटण्यासाठी गेला. आपल्या मुलाने आणि ज्यांच्यावर आपला भरवसा होता त्यांनी आपल्याविरुद्ध बंड केला, याचं दाविदाला फार दुःख झालं होतं. हूशय दाविदाशी एकनिष्ठ राहिला. त्याने हा बंड मोडून काढण्यासाठी राजाने दिलेल्या आज्ञेचं पालन केलं. या कामात त्याचा जीवही जाऊ शकत होता. एक राजदरबारी आणि कर्तव्य म्हणून हूशयने दाविदाच्या आज्ञेचं पालन केलं नव्हतं, तर राजाचा एकनिष्ठ मित्र म्हणून त्याने त्याच्या आज्ञेचं पालन केलं होतं.—२ शमु. १५:१३-१७, ३२-३७; १६:१५—१७:१६.

आज जगभरातील बंधुभगिनींमध्ये जे ऐक्याचं नातं आपल्याला पाहायला मिळतं, ते खरंच खूप आनंददायी आहे. खरे ख्रिस्ती फक्‍त एकमेकांचे ख्रिस्ती बांधव आहेत, किंवा एखाद्या नेमणुकीत इतरांसोबत त्यांना काम करावं लागतं म्हणून एकमेकांसोबत राहत नाहीत. तर त्यांच्यातील हे नातं यापेक्षाही खूप मोठं आणि महत्त्वाचं आहे. खरे ख्रिस्ती आपल्या बंधुभगिनींसोबत जसे वागतात, त्यातून ते एक प्रकारे असं म्हणत असतात: “तुमच्यासोबत असलेली मैत्री माझ्यासाठी अनमोल आहे. फक्‍त एक ख्रिस्ती या नात्यानं असं करणं माझं कर्तव्य आहे म्हणून नाही, तर तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात म्हणून ही मैत्री माझ्यासाठी अनमोल आहे.”

अशाच प्रकारच्या खऱ्‍या मैत्रीचा अनुभव फ्रान्सीस या आपल्या बांधवाने घेतला. जीवनातील एका कठीण काळातून जात असताना, त्याला त्याचा मित्र ॲन्थनी याच्याकडून मदत मिळाली. या अनुभवाविषयी बोलताना फ्रान्सीस सांगतो: “ॲन्थनी दुसऱ्‍या मंडळीतून आमच्या मंडळीमध्ये आला होता. त्यानंतर काही दिवसांतच आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनलो. आम्ही दोघेही सेवा सेवक होतो आणि एकत्र मिळून काम करणं आम्हाला खूप आवडायचं. याच्या काही काळातच ॲन्थनीला मंडळीमध्ये वडील म्हणून नेमण्यात आलं. त्यामुळे तो माझा फक्‍त एक मित्रच राहिला नाही, तर मी त्याच्याकडे एक चांगलं उदाहरण म्हणूनही पाहायचो.” यानंतर फ्रान्सीसकडून एक मोठी चूक घडली. त्याने लगेचच मंडळीतील वडिलांकडून आध्यात्मिक रीत्या मदत मिळवली. पण तो एक पायनियर आणि सेवा सेवक या नात्यानं आता मंडळीत सेवा करू शकत नव्हता. मग अशा प्रसंगात ॲन्थनी त्याच्याशी कसा वागला?

फ्रान्सीस मंडळीतील वडिलांना भेटतो आणि ॲन्थनी त्याच्यासोबत वेळ घालवत आहे. तसंच त्याला प्रोत्साहन देत आहे

फ्रान्सीस जेव्हा कठीण प्रसंगाचा सामना करत होता, तेव्हा त्याचा मित्र ॲन्थनी याने त्याचं लक्षपूर्वक ऐकलं आणि त्याला प्रोत्साहन दिलं

फ्रान्सीस सांगतो: “ॲन्थनीला माझ्या दुःखाची जाणीव होत होती, हे मी पाहू शकत होतो. मला भावनिक दृष्ट्या आधार देण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. या परिस्थितीतही त्याने मला कधीही सोडलं नाही. मला आध्यात्मिक रीत्या पुन्हा उभारण्यासाठी त्याने फार मदत केली. मी हार मानू नये व आध्यात्मिक रीत्या मजबूत होण्यासाठी प्रयत्न करत राहावेत, म्हणून तो मला प्रोत्साहन देत राहिला.” ॲन्थनी म्हणतो: “फ्रान्सीसने माझ्याशी मनमोकळेपणाने बोलावं असं मला वाटत होतं, अगदी त्याला जे दुःख होत आहे त्याबद्दलही. म्हणून मग मी फ्रान्सीससोबत पूर्वीपेक्षा जास्त वेळ घालवला.” आनंदाची गोष्ट म्हणजे, काही काळाने फ्रान्सीस पुन्हा एकदा आध्यात्मिक रीत्या मजबूत झाला आणि मंडळीत सेवा सेवक व पायनियर म्हणून सेवा करू लागला. शेवटी ॲन्थनी म्हणतो: “आता आम्ही जरी वेगवेगळ्या मंडळीत सेवा करत असलो, तरी पूर्वीपेक्षा आमची मैत्री अधिकच घनिष्ठ झाली आहे.”

फ्रान्सीस आणि ॲन्थनी सोबत चांगला वेळ घालवताना

तुमच्यासोबत विश्‍वासघात झाला आहे असं तुम्हाला वाटतं तेव्हा

तुमच्या जवळच्या मित्राने अगदी तुमच्या गरजेच्या वेळी तुमच्याकडे पाठ फिरवली, तर तुम्हाला कसं वाटेल? साहजिकच तुम्हाला खूप दुःख होईल. कारण यासारखं कदाचितच दुसरं एखादं दुःख असेल. मग अशा वेळी तुम्ही त्याला माफ करू शकाल का? तुमच्यामध्ये असलेली मैत्री पुन्हा पूर्वीप्रमाणे कायम ठेवाल का?

येशू ख्रिस्ताच्या उदाहरणाचा विचार करा. त्याने आपल्या विश्‍वासू शिष्यांसोबत बराच वेळ घालवला होता. त्यांच्यामध्ये एक खास मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळेच येशूने त्यांना स्वतःचे मित्र म्हटले. (योहा. १५:१५) असं असलं तरी पृथ्वीवरील त्याच्या शेवटल्या काळात जेव्हा त्याला अटक करण्यात येत होती, तेव्हा काय घडलं याकडे लक्ष द्या. जवळचे मित्र असलेले त्याचे शिष्य त्याला सोडून पळून गेले. ज्या पेत्राने जाहीर रीत्या सांगितलं होतं की तो येशूला कधीही सोडणार नाही, त्याने त्याच रात्री येशूला आपण ओळखतच नाही असं म्हटलं.—मत्त. २६:३१-३३, ५६, ६९-७५.

येशूला या गोष्टीची चांगली कल्पना होती, की त्याच्यासमोर जी शेवटची परीक्षा होती तिचा त्याला एकट्याला सामना करावा लागणार आहे. पण तरी त्याचे मित्र असलेले शिष्य जेव्हा त्याला सोडून गेले, तेव्हा त्यामुळे त्याच्याजवळ निराश होण्यासाठी आणि दुःखी होण्यासाठी वाजवी कारण होतं. पण येशू त्याच्या पुनरुत्थानानंतर आपल्या शिष्यांशी ज्या प्रकारे बोलला त्यातून, तो त्यांच्यावर नाराज असल्याचा किंवा त्याच्या मनात काही खंत किंवा कटू भावना असल्याचा जराही लवलेश दिसून आला नाही. आपल्याला अटक होत असताना आपले शिष्य आपल्यासोबत कसे वागले किंवा शिष्य इतर गोष्टींमध्ये कसे चुकले किंवा कमी पडले, याची पुनरुत्थान झाल्यानंतर येशूने त्यांना आठवण करून दिली नाही.

याउलट, येशूने पेत्र आणि इतर शिष्यांना सांत्वन दिलं. यासोबतच मानवी इतिहासात यापूर्वी कधीही झालं नाही असं सगळ्यात महत्त्वपूर्ण सुवार्तेचं कार्य त्यांच्यावर सोपवून, शिष्यांवर असलेला त्याचा भरवसा त्याने दाखवून दिला. येशूसाठी त्याचे शिष्य हे अजूनही त्याचे मित्रच होते. त्याने त्यांच्यावर दाखवलेल्या या प्रेमामुळे, त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पाडला. आता ते आपल्या गुरूला कधीही निराश करणार नव्हते. आणि खरोखरच येशूने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्यांनी योग्य प्रकारे पार पाडून हे सिद्ध केलं.—प्रे. कृत्ये १:८; कलस्सै. १:२३.

एलीना नावाच्या आपल्या एका बहिणीचे सुझनसोबत मतभेत झाले. त्याबद्दल आपला अनुभव सांगताना एलीना म्हणते: “जेव्हा सुझनने मला सांगितलं की माझ्यामुळे ती दुखावली गेली आहे, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. खरंतर माझ्यावर रागावण्याचा तिला पूर्ण अधिकार होता. पण तिने तसं केलं नाही. याउलट तिला माझ्या अशा वागण्याचे जे परिणाम होतील त्याची आणि माझी काळजी वाटत होती. मला तर याचं फार विशेष वाटलं. मी सुझनशी जे चुकीचं वागले त्यावर तिने लक्ष केंद्रित केलं नाही, तर उलट अशा वागण्यामुळे मी स्वतःचं जे नुकसान करत होते त्याचीच तिला जास्त काळजी वाटत होती. यासाठी मी नेहमीच तिची कृतज्ञ राहील. मी यहोवाचे आभार मानते की मला एक अशी मैत्रीण मिळाली जी स्वतःपेक्षा माझ्या भल्याचा जास्त विचार करते.”

जेव्हा मैत्री धोक्यात असते तेव्हा एक चांगला मित्र काय करतो? चांगला मित्र प्रेमळपणे पण त्यासोबतच स्पष्ट व मनमोकळेपणाने बोलण्यास तयार असतो. तो नाथान व हूशयप्रमाणे अगदी कठीण प्रसंगांदरम्यान एकनिष्ठ राहणारा, आणि येशूप्रमाणे क्षमा करण्यास तयार राहणारा असतो. तुम्हीही इतरांसाठी अशाच प्रकारचे मित्र शाबीत व्हाल का?

a काही नावं बदलण्यात आली आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा