वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 फेब्रुवारी पृ. १३-१७
  • देवाची अपार कृपा आम्ही अनेक मार्गांनी अनुभवली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाची अपार कृपा आम्ही अनेक मार्गांनी अनुभवली
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • माझ्या वडिलांप्रमाणेच मीदेखील तटस्थ राहिलो आणि पायनियर सेवा केली
  • ब्राझीलमधील मिशनरी सेवा
  • पोर्तुगालमधील आमची नवीन नेमणूक
  • न्यायालयात सुवार्तेचं समर्थन करताना
  • विश्‍वासू बांधवांच्या उदाहरणांवरून आम्ही शिकलो
  • अठराविश्‍वे दारिद्र्‌यापासून गडगंज संपत्तीपर्यंत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • अनपेक्षित घटनांनी भरलेले यहोवाच्या सेवेतील जीवन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यहोवाचे आमंत्रण स्वीकारल्याचे फायदे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • पूर्णवेळेच्या सेवेमुळे अनेक आशीर्वाद मिळाले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 फेब्रुवारी पृ. १३-१७

जीवन कथा

देवाची अपार कृपा आम्ही अनेक मार्गांनी अनुभवली

डगलस गेस्ट

माझे वडील आर्थर यांचं देवावर खूप प्रेम होतं. इतकं की तरुणपणात त्यांना मेथडिस्ट चर्चचा सेवक बनण्याची इच्छा होती. पण जेव्हा त्यांनी बायबल विद्यार्थ्यांकडून मिळालेली काही प्रकाशनं वाचली आणि त्यांच्यासोबत संगती करू लागले, तेव्हा मात्र त्यांनी आपलं मन बदललं. १९१४ साली सतरा वर्षांचे असताना माझ्या वडिलांनी बाप्तिस्मा घेतला. पहिल्या महायुद्धादरम्यान लढण्यासाठी त्यांना सैन्यात भरती होण्याचा हुकूम देण्यात आला. पण त्यांनी तो पाळला नाही. त्यामुळे त्यांना कॅनडामधील ऑन्टारीओ इथं असलेल्या किंगस्टन सुधारणागृहात (तुरुंग) दहा महिने राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली. तिथून सुटल्यानंतर ते कॉलपोर्टर बनले. त्या काळी पायनियरांना कॉलपोर्टर असं म्हटलं जायचं.

१९२६ मध्ये माझ्या वडिलांनी माझ्या आईशी म्हणजे हेझल विल्किनसन हिच्याशी लग्न केलं. तिची आई १९०८ साली बायबल सत्य शिकली होती. माझा जन्म २४ एप्रिल १९३१ मध्ये झाला. मी माझ्या चार भावंडांमध्ये दुसरा होतो. माझ्या वडिलांना बायबलविषयी खूप प्रेम आणि आदर होता. त्यांनी आम्हालाही त्यावर प्रेम करण्यास आणि त्याचा आदर करण्यास शिकवलं. यहोवा देवाची उपासना ही आमच्या जीवनात सर्वात जास्त महत्त्वाची होती. आम्ही कुटुंब या नात्यानं घरोघरच्या प्रचार कार्यात नियमितपणे भाग घ्यायचो.—प्रे. कृत्ये २०:२०.

माझ्या वडिलांप्रमाणेच मीदेखील तटस्थ राहिलो आणि पायनियर सेवा केली

१९३९ साली दुसरं महायुद्ध सुरू झालं. याच्याच दुसऱ्‍या वर्षी कॅनडामध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यांवर बंदी घालण्यात आली. शाळेतील मुलांना वर्गामध्ये झेंडावंदन करणं आणि राष्ट्रगीत गाणं सक्‍तीचं करण्यात आलं. सहसा माझे शिक्षक मला व माझी बहीण डोरोथी हिला राष्ट्रगीत व झेंडावंदनाच्या वेळी वर्गाबाहेर थांबण्याची परवाणगी द्यायचे. पण एक दिवस माझ्या शिक्षकांनी मला इतरांच्या नजरेत खाली पाडण्यासाठी मी भित्रा असल्याचं म्हटलं. शाळा सुटल्यावर माझ्या वर्गातल्या अनेक मुलांनी मला मारहाण केली आणि जमिनीवर खाली पाडलं. पण या सर्व प्रकाराने “मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा” पाळण्याच्या माझ्या निश्‍चयाला आणखीनच दृढ केलं.—प्रे. कृत्ये ५:२९.

डगलस गेस्ट यांचे वडील, साल १९१८-१९१९. आणि त्यांचे आईवडील, १९२६; डगलस गेस्ट यांनी पायनियर सेवा करताना आणि पहिलं जाहीर देताना

मी अकरा वर्षांचा असताना, म्हणजे जुलै १९४२ मध्ये, शेतातील एका पाण्याच्या टाकीत मला बाप्तिस्मा देण्यात आला. माझ्या शाळेला जेव्हा-जेव्हा सुट्या असायच्या तेव्हा-तेव्हा मी पायनियरिंग करायचो. आज याला सहायक पायनियरिंग असं म्हणतात. मला सुट्यांमध्ये पायनियरिंग करायला खूप आवडायचं. एक वर्षी, मी इतर तीन बांधवांसोबत उत्तर ऑन्टारीओमध्ये प्रचारकार्यासाठी जाऊ शकलो. तिथं आम्ही लाकूड तोडणाऱ्‍यांना प्रचार केला.

१ मे १९४९ साली मी नियमित पायनियर बनलो. त्यानंतर मला कॅनडातील शाखा कार्यालयात बांधकाम विभागात मदत करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. याच्या काही काळानंतर मी बेथेल कुटुंबाचा सदस्य बनलो. तिथं मला प्रिंटरीमध्ये काम करण्यासाठी नेमण्यात आलं. प्रिंटरीमध्ये मी फ्लॅटबेड प्रेसवर कसं काम करायचं ते शिकलो. मला आठवतं, यहोवाच्या साक्षीदारांचा कॅनडामध्ये जो छळ होत होता त्यावर आधारित पत्रिका छापण्यासाठी आम्ही अनेक आठवडे रात्रभर काम केलं होतं.

त्यानंतर मी बेथेलमधील सेवा विभागात काम करू लागलो. त्या वेळी क्विबेकमध्ये यहोवाच्या साक्षीदारांचा फार तीव्र छळ चालला होता. त्यामुळे तिथं जाऊन सेवा करण्याची इच्छा असणाऱ्‍या पायनियरांची मुलाखत घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. एडमंटन, अलबर्टा इथली मेरी ज्याझूला ही त्या पायनियरांपैकी एक होती. तिचे आईवडील ऑर्थोडॉक्स चर्चचे सदस्य होते. जेव्हा मेरीने आणि तिच्या मोठ्या भावाने साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास थांबवण्यास नकार दिला, तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्यांना घराबाहेर हाकलून दिलं होतं. मेरीचा आणि तिच्या भावाचा बाप्तिस्मा जून १९५१ मध्ये झाला आणि त्याच्या सहा महिन्यांनंतर लगेचच त्यांनी पायनियरिंग करण्यास सुरवात केली होती. तिची मुलाखत घेत असताना, तिचं यहोवावर किती प्रेम आहे हे मी पाहू शकत होतो. मला आठवतं मी असाही विचार केला, की मला हिच्याशी लग्न करायला आवडेल. त्यानंतर नऊ महिन्यांनी म्हणजे, ३० जानेवारी १९५४ ला आमचं लग्न झालं. लग्नाच्या एका आठवड्यानंतर आम्हाला विभागीय कार्याच्या प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलं. आम्ही त्यानंतर दोन वर्षं उत्तर ऑन्टारीओमध्ये विभागीय कार्य केलं.

जगभरात प्रचाराचं कार्य जसजसं वाढत चाललं होतं, तसतसं मिशनरी सेवा करणाऱ्‍या अधिकाधिक बंधुभगिनींची गरज पडत होती. मी आणि मेरीने असा विचार केला, की आम्ही कॅनडामधील गोठवून टाकणाऱ्‍या हवामानाचा आणि उन्हाळ्यात त्रास देणाऱ्‍या मच्छरांचा जर सामना करू शकतो, तर मग आम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्‍यात राहू शकतो. म्हणून मग आम्ही गिलियड प्रशालेच्या २७ व्या वर्गासाठी उपस्थित राहिलो आणि जुलै १९५६ ला आमचा पदवीदान समारंभ झाला. त्यानंतर त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये आम्ही आमच्या नवीन घरी, म्हणजे ब्राझीलमध्ये राहायला लागलो.

ब्राझीलमधील मिशनरी सेवा

ब्राझीलमध्ये पोहचल्यानंतर आम्ही पोर्तुगीज भाषा शिकण्यास सुरवात केली. सुरवातीला आम्ही काही सोप्या वाक्यांचा वापर करून संभाषण कसं सुरू करायचं ते शिकलो. त्यानंतर आम्ही मासिक सादरीकरणाची लहान प्रस्तावना पाठ केली. त्यानंतर जेव्हा आम्ही प्रचारासाठी क्षेत्रामध्ये गेलो, तेव्हा आम्हाला एक आस्थेवाईक स्त्री भेटली. आम्ही आधीच ठरवलं होतं की, जर एखाद्याने आम्ही सांगत असलेल्या संदेशात आस्था दाखवली, तर आम्ही त्याला देवाच्या नवीन जगात आपलं जीवन कसं असेल त्याबद्दल वचन वाचून दाखवू. त्यामुळे मग या स्त्रीला मी प्रकटीकरण २१:३, ४ हे वचन वाचून दाखवलं आणि वचन वाचल्यानंतर चक्कर येऊन खाली पडलो! याचं कारणं म्हणजे, खरंतर मी तिथल्या त्या उष्ण आणि दमट वातावरणाशी अजून जुळलो नव्हतो. तिथली उष्णता माझ्यासाठी एक आव्हानच होती.

डगलस गेस्ट बेथेलमध्ये सेवा करताना; त्यांचा लग्नाचा दिवस; गिलियड पदवीदान समारंभाच्या दिवशी आपल्या पत्नीसोबत; ब्राझीलमध्ये सेवा करताना आणि टिव्हीवर

आमची मिशनरी नेमणूक ही कॅम्पोझ या शहरात होती. आज तिथं १५ मंडळ्या आहेत! पण, जेव्हा आम्ही तिथं पोहचलो होतो, तेव्हा तिथं फक्‍त एक लहान गट आणि एक मिशनरी गृह होतं. त्या मिशनरी गृहात चार साक्षीदार बहिणी राहत होत्या: एस्तर ट्रासे, रमोना बाऊएर, लुएझा श्‍वार्टझ आणि लारान ब्रुक्स (आता वॉलेन). मिशनरी गृहात माझ्यावर, लॉन्ड्रीची आणि जेवण बनवण्यासाठी लाकडांची व्यवस्था करण्याची जबाबदारी होती. सोमवारी एकदा रात्री, मिशनरी गृहात टेहळणी बुरूज अभ्यासानंतर मेरी सोफॅवर आराम करत होती. तिचं डोकं उशीवर होतं आणि मीही तिथेच तिच्याजवळ होतो. दिवसभर काय-काय केलं याविषयी आम्ही गप्पा मारत होतो. जेव्हा मेरी उठली तेव्हा तिच्या उशीखालून चक्क एक साप बाहेर निघाला! जोपर्यंत मी त्या सापाला मारून टाकलं नाही, तोपर्यंत त्या अनपेक्षित पाहुण्यामुळे आमची ती संध्याकाळ चांगलीच रंगली.

जवळजवळ एक संपूर्ण वर्ष पोर्तुगीज भाषा शिकल्यानंतर, आम्ही विभागीय कार्य सुरू केलं. आम्ही अशा ठिकाणी सेवा केली जिथं लाईट नव्हती. आम्ही खाली चटईवर झोपायचो आणि घोड्यावर किंवा घोडागाडीने प्रवास करायचो. एकदा आम्ही ट्रेनने डोंगराळ प्रदेशातील दुर्गम ठिकाणी प्रचारकार्यासाठी गेलो आणि तिथं राहण्यासाठी भाड्याने एक खोली घेतली. शाखा कार्यालयाने आम्हाला ८०० मासिकं पाठवली होती. त्या सर्व मासिकांचे बॉक्स आणण्यासाठी आम्हाला खूप वेळा पोस्ट ऑफिसच्या चकरा माराव्या लागल्या होत्या.

१९६२ मध्ये ब्राझीलमधील वेगवेगळ्या ठिकाणी ‘राज्य सेवा प्रशाला’ भरवण्यात आल्या. या प्रशाला घेण्यासाठी मी सहा महिने वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत होतो. मला एकट्यालाच या नेमणूकीवर पाठवलं गेलं होतं. एकानंतर एक झालेल्या या प्रशालांमध्ये शिकवण्यासाठी मी मनाउस, बेलेम, फोर्टालेझा, रेसिफे आणि साल्वाडॉर या शहरांमध्ये गेलो. जेव्हा मी मनाउसमध्ये होतो, तेव्हा तिथं मी एका जिल्हा अधिवेशनाची व्यवस्था केली. हे अधिवेशन आम्ही एका प्रसिद्ध नाट्यगृहात आयोजित केलं होतं. अधिवेशनादरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे जवळजवळ सगळं पिण्याचं पाणी गढूळ झालं होतं आणि जेवण करण्यासाठी आमच्याकडे चांगली जागा राहिली नव्हती. (त्या काळी अधिवेशनाच्या वेळी बंधुभगिनींना जेवण पुरवलं जायचं.) मी एका लष्करी अधिकाऱ्‍याशी याविषयी बोललो आणि त्याला आमची समस्या समजावून सांगितली. त्या लष्करी अधिकाऱ्‍याने फार प्रेमळपणे संपूर्ण अधिवेशनादरम्यान आमच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. त्याने काही सैनिकांना पाठवून दोन मोठे तंबूदेखील बांधून दिले. हे तंबू आम्ही स्वयंपाक घर म्हणून आणि जेवण करण्यासाठी वापरत असू.

यादरम्यान, तिकडे मेरीने व्यापारी क्षेत्रात प्रचारकार्य केलं. तिथली माणसं ही पोर्तुगाल या देशातून ब्राझीलमध्ये पैसे कमवण्यासाठी आली होती. प्रचारकार्य करताना त्या क्षेत्रात मेरीला एकही आस्था दाखवणारी व्यक्‍ती भेटली नाही. त्यामुळे मेरी फार निराश झाली. तिने तिच्या काही मित्रमैत्रिणींना म्हटलं: “या पृथ्वीवर पोर्तुगाल हे सर्वात शेवटलं ठिकाण असेल, जिथं मी जाईन.” त्याच्यानंतर काही काळातच आम्हाला एक पत्र आलं. संघटनेकडून आलेल्या या पत्रात आम्हाला आमच्या नवीन नेमणुकीबद्दल सांगण्यात आलं होतं. ही नेमणूक होती पोर्तुगालमध्ये! मेरीला तर धक्काच बसला! पण आम्ही ही नवीन नेमणूक स्वीकारली आणि पोर्तुगालला गेलो. त्याकाळी पोर्तुगालमध्ये साक्षीदारांच्या कार्यांवर बंदी होती.

पोर्तुगालमधील आमची नवीन नेमणूक

आम्ही ऑगस्ट १९६४ मध्ये पोर्तुगालमधील लिस्बन या ठिकाणी पोहचलो. आपले बांधव तेथील गुप्त पोलिसांच्या निशाण्यावर होते. हे पोलीस आपल्या बांधवांना फार त्रास द्यायचे. त्यामुळे सुरवातीला तिथल्या स्थानिक बांधवांशी संपर्क न करणंच योग्य ठरेल असं आम्हाला वाटलं. सुरवातीचा काही काळ आम्ही भाड्याने घेतलेल्या एका खोलीत काढला. नंतर जेव्हा आम्हाला आमचा व्हिसा मिळाला तेव्हा आम्ही एक भाड्याचं थोडं मोठं घर घेतलं. लिस्बनला पोहचल्याच्या पाच महिन्यांनंतर तिथल्या स्थानिक शाखेच्या बांधवांशी संपर्क करणं सुरक्षित झालं होतं. आता आम्ही मंडळीच्या सभांना हजर राहू शकत असल्यामुळे आम्हाला फार आनंद होत होता!

संघटनेच्या कामावर बंदी असल्यामुळे, राज्य सभागृहं बंद होती आणि मंडळीच्या सभा बांधवांच्या घरी भरवल्या जायच्या. त्यामुळे पोलिसांकडून अनेकदा या बांधवांच्या घराची झडती घेतली जायची. एकदा आपल्या शेकडो बंधुभगिनींना उलटतपासणीसाठी पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. पोलिसांनी बांधवांना वाईट वागणूक दिली आणि पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांची नावं सांगावीत म्हणून त्यांच्यावर दबाव आणला. त्यामुळे मग नंतर, एकमेकांना सुरक्षित ठेवण्यासाठी बांधवांनी आडनावांचा वापर करणं थांबवलं. बांधव एकमेकांच्या फक्‍त पहिल्या नावाचाच वापर करायचे.

आपल्या बांधवांना या छळाला यशस्वी रीत्या तोंड देता यावं म्हणून, आपली प्रकाशनं त्यांच्यापर्यंत पोहचणं गरजेचं होतं. त्यामुळे ही प्रकाशनं त्यांच्यापर्यंत पोहचवणं हे आमचं मुख्य ध्येय होतं. माझी पत्नी मेरी ही प्रकाशनं आणि टेहळणी बुरूजमधील अभ्यास लेख एका विशिष्ट प्रकारच्या कागदावर टाईप करायची. त्यानंतर या कागदाचा स्टेन्सिल म्हणून वापर करून बांधवांसाठी त्याच्या अनेक प्रती बनवल्या जायच्या.

१९६४ मध्ये डगलस गेस्ट पोर्तुगालमध्ये; १९६६ मध्ये न्यायालयात खटला चालू असताना, १९७४ मध्ये एका सभेदरम्यान; आणि त्यांची पत्नी मेरी यांच्यासोबत

न्यायालयात सुवार्तेचं समर्थन करताना

जून १९६६ मध्ये लिस्बनमधील न्यायालयात एक महत्त्वपूर्ण खटला चालू झाला. फाझूमधील मंडळीतील सर्व ४९ बंधुभगिनींवर आरोप लावण्यात आला की, त्यांनी एका व्यक्‍तीच्या घरात बेकायदेशीर रीत्या सभा घेतली आहे. न्यायालयात होणाऱ्‍या उलटतपासणीसाठी बांधवांना तयार करावं, या उद्देशानं मी विरोधी पक्षाचा वकील असल्यासारखं भासवलं व त्यांना प्रश्‍नं विचारले. पण आम्हाला ज्याची अपेक्षा होती तेच घडलं. हा खटला आम्ही हरलो. त्या सर्व ४९ बंधुभगिनींना वेगवेगळ्या काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा ४५ दिवसांपासून साडे पाच महिन्यांपर्यंतची होती. पण या खटल्यामुळे राज्याची सुवार्ता चांगलीच गाजली. या खटल्यादरम्यान आमच्या वकिलाने बायबलमधील गमलियेल याने जे म्हटलं होतं ते बोलून दाखवलं. (प्रे. कृत्ये ५:३३-३९) तसंच या खटल्याची दखल प्रसारमाध्यमांनी देखील घेतली. ते या खटल्याची माहिती प्रसिद्ध करू लागले. नंतर जेव्हा आमच्या वकिलाने बायबल अभ्यास सुरू केला आणि तो सभेला हजर राहू लागला, तेव्हा तर आम्हाला फार आनंद झाला.

डिसेंबर १९६६ मध्ये मला शाखा पर्यवेक्षक (आता शाखा समिती संयोजक) म्हणून नेमणूक मिळाली. त्यामुळे मी जास्तीत जास्त वेळ कायदेशीर बाबी हाताळण्यात घालवायचो. पोर्तुगालमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या उपासनेला कायदेशीर रीत्या मान्यता मिळावी यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले. (फिलिप्पै. १:७) शेवटी १८ डिसेंबर १९७४ ला आम्हाला यश मिळालं. पोर्तुगालमध्ये यहोवाच्या साक्षीदारांना कायदेशीर रीत्या मान्यता मिळाली. बंधू नेथन नॉर आणि बंधू फ्रेडरिक फ्रांझ हे संघटनेच्या जागतिक मुख्यालयातून आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आले. त्या वेळी ओपोर्तो आणि लिस्बनमध्ये सभा भरवण्यात आल्या. या सभांना एकत्रित रीत्या ४६,८७० जणांनी उपस्थिती लावली. ती सभा आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली!

यहोवाने प्रचाराचं कार्य पोर्तुगीज भाषा बोलल्या जाणाऱ्‍या बेटांवरदेखील वाढवण्यास मदत केली. जसं की अझोर्स, केप वर्दे, मडीयरा. तसंच, साओ टोमे आणि प्रिन्सिप या बेटांवरदेखील. जसजशी या बेटांवरील साक्षीदारांची संख्या वाढली, तसतशी आम्हाला आणखी मोठ्या शाखा कार्यालयाची गरज भासू लागली. जेव्हा शाखा कार्यालयाचं बांधकाम पूर्ण झालं, तेव्हा २३ एप्रिल १९८८ रोजी बंधू मिल्टन हेन्शेल यांनी शाखेच्या समर्पणाचं भाषण दिलं. या सभेसाठी ४५,५२२ बंधुभगिनी उपस्थित होते. यांत पूर्वी पोर्तुगालमध्ये मिशनरी सेवा केलेल्या २० बंधुभगिनींचा देखील समावेश होता. ते या ऐतिहासिक समारोहासाठी तिथं आले होते.

विश्‍वासू बांधवांच्या उदाहरणांवरून आम्ही शिकलो

या सर्व वर्षांदरम्यान मला आणि माझ्या पत्नीला विश्‍वासू बांधवांकडून बरंच काही शिकायला मिळालं. उदाहरणार्थ, एका झोन व्हिजिटच्या वेळी (शाखा कार्यालयातील बंधुभगिनींना उत्तेजन देण्यासाठी साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयातर्फे केली जाणारी व्यवस्था) जेव्हा मी बंधू थियोडोर जॅरझ यांच्यासोबत काम करत होतो, तेव्हा मला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळाला. ज्या शाखा कार्यालयाला आम्ही भेट देण्यासाठी गेलो होतो, ती एका मोठ्या समस्येचा सामना करत होती. तिथल्या शाखा समितीने ही समस्या सोडवण्यासाठी सर्व प्रयत्न केले होते. पण ती समस्या काही सुटली नव्हती. आपण यापेक्षा अधिक काहीच करू शकत नाही याची त्या बांधवांना फार खंत वाटत होती. म्हणून मग, बंधू थियोडोर जॅरझ यांनी त्यांना सांत्वन देत म्हटलं: “आता पवित्र आत्म्याला कार्य करू देण्याची वेळ आहे.” या अनुभवासोबतच आणखीही एक अनुभव आहे जो मी विसरू शकत नाही. बऱ्‍याच वर्षांपूर्वी मी आणि माझी पत्नी ब्रुकलिन बेथेलला भेट देण्यासाठी गेलो होतो. तिथं आम्ही व आमच्यासोबत असलेल्या इतर जणांनी बंधू फ्रांझ यांना काही सल्ला विचारला. त्या वेळी ते म्हणाले: “मी म्हणेल, कोणत्याही परिस्थितीत यहोवाच्या दृश्‍य संघटनेला धरून राहा. कारण, देवाच्या राज्याची सुवार्ता घोषित करण्याविषयी येशूने त्याच्या शिष्यांना जी आज्ञा दिली होती, त्याप्रमाणे कार्य करणारी हीच एकमात्र संघटना आहे.”

त्यांच्या त्या सल्ल्याप्रमाणेच आम्ही यहोवाच्या संघटनेला धरून राहिलो, याचा मला आणि मेरीला फार आनंद आहे. यासोबतच झोन व्हिजिट करताना जगभरातील ज्या शाखा कार्यालयांना आम्ही भेटी दिल्या, त्याच्याही अनेक चांगल्या आठवणी आमच्या स्मरणात ताज्या आहेत. या कार्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या वयोगटातील यहोवाच्या सेवकांना भेटता आलं. हे बंधुभगिनी यहोवाची जी सेवा करत आहेत त्यासाठी कदर व्यक्‍त करण्याची आणि त्यांना त्या सेवेत टिकून राहण्यास प्रोत्साहन देण्याची संधी आम्हाला मिळाली.

आता अनेक वर्षं लोटली आहेत आणि आम्हा दोघांचं वय ८० पेक्षा जास्त आहे. माझ्या पत्नीला, मेरीला बऱ्‍याच आरोग्याच्या समस्या आहेत. (२ करिंथ. १२:९) यासोबतच आम्हाला इतरही बऱ्‍याच समस्यांचा सामना करावा लागला आहे. पण या समस्यांमुळे आमचा विश्‍वास अधिकच मजबूत झाला आहे आणि यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा आमचा निश्‍चयदेखील. जेव्हा आम्ही यहोवाच्या सेवेत घालवलेल्या या सर्व वर्षांचा विचार करतो, तेव्हा आम्हाला याची जाणीव होते की आम्ही देवाची अपार कृपा अनेक मार्गांनी अनुभवली आहे.a

a हा लेख प्रकाशित करण्यासाठी तयार केला जात असताना बंधू डगलस गेस्ट यांचा २५ ऑक्टोबर २०१५ रोजी मृत्यू झाला. ते शेवटपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहिले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा