वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp17 क्र. ३ पृ. १२-१४
  • बायबलची इतकी वेगवेगळी भाषांतरं का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबलची इतकी वेगवेगळी भाषांतरं का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मूळ बायबल
  • ग्रीक सेप्टुअजिंट
  • लॅटिन व्हल्गेट
  • अनेक भाषांतरं तयार झाली
  • गतकाळात आणि आजच्या काळातही उपयोगी ठरलेले “सेप्टुअजिंट”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • बायबल आपल्या हातात कसे आले—भाग एक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • संवाद साधणारा देव—यहोवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • पवित्र शास्त्र खरेच देवापासून आहे का?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
wp17 क्र. ३ पृ. १२-१४
अनेक लिखित, छापलेली, इलेक्ट्रॉनीक स्वरुपातले बायबल

बायबलची इतकी वेगवेगळी भाषांतरं का?

आज बायबलची इतकी वेगवेगळी भाषांतरं का आहेत? ही नवीन भाषांतरं, तुम्हाला बायबल समजून घेण्यासाठी मदत वाटते की एक अडथळा? या भाषांतरांची सुरुवात कुठून झाली, हे समजून घेतल्यामुळे त्यांचं महत्त्व ओळखण्यासाठी तुम्हाला मदत होईल.

पण, मूळ बायबल कोणी लिहिलं आणि ते केव्हा लिहिण्यात आलं?

मूळ बायबल

बायबलला सहसा दोन भागांमध्ये विभागण्यात येतं. पहिल्या भागात ३९ पुस्तकं आहेत आणि त्यात “देवाची पवित्र वचने” देण्यात आली आहेत. (रोमकर ३:२) देवाने विश्‍वासू पुरुषांना ही पुस्तकं लिहिण्यासाठी प्रेरित केलं. त्यांनी जवळजवळ १,१०० वर्षांच्या मोठ्या काळात ही पुस्तकं लिहिली. याचं लिखाण इ.स.पू. १५१३ पासून इ.स.पू. ४४३ नंतरच्या काही काळापर्यंत चाललं. त्यांनी बहुतेक भाग इब्री भाषेत लिहिला. त्यामुळे या भागाला इब्री शास्त्रवचने म्हणतात. तसंच, याला जुना करार म्हणूनही ओळखलं जातं.

दुसरा भाग २७ पुस्तकांनी बनलेला आहे. हा भागही “देवाचे वचन” आहे. (१ थेस्सलनीकाकर २:१३) देवाने येशू ख्रिस्ताच्या विश्‍वासू शिष्यांना प्रेरित केलं आणि त्यांनी जवळजवळ ६० वर्षांच्या कमी काळात ही पुस्तकं लिहिली. त्यांनी जवळपास इ.स. ४१ ते इ.स. ९८ या काळात ही पुस्तकं लिहिली. त्यांनी बहुतेक भाग ग्रीक भाषेत लिहिला. त्यामुळे या भागाला ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने, तसंच नवा करार म्हणूनही ओळखलं जातं.

देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेली सर्व ६६ पुस्तकं मिळून पूर्ण बायबल तयार होतं. बायबल म्हणजे मानवांसाठी असलेला देवाचा संदेश. पण, बायबलची इतर भाषांतरं का तयार करण्यात आली? याची तीन मुख्य कारणं आहेत. ती म्हणजे:

  • लोकांना त्यांच्या मातृभाषेत बायबल उपलब्ध करून देण्यासाठी.

  • नक्कल करणाऱ्‍यांकडून झालेल्या चुका सुधारून, बायबलच्या मूळ लिखाणांमधली अचूकता टिकवून ठेवण्यासाठी.

  • जुन्या आणि वापरात नसलेल्या शब्दांच्या जागी, आधुनिक शब्द टाकण्यासाठी.

सुरुवातीच्या दोन भाषांतरांत या गोष्टी कशा दिसून येतात याकडे लक्ष द्या.

ग्रीक सेप्टुअजिंट

येशू पृथ्वीवर येण्याच्या जवळजवळ ३०० वर्षांआधी यहुदी विद्वानांनी इब्री शास्त्रवचनांचं दुसऱ्‍या भाषेत, म्हणजेच ग्रीक भाषेत भाषांतर करायला सुरुवात केली. याला ग्रीक सेप्टुअजिंट म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पण हे भाषांतर का तयार करण्यात आलं? कारण, त्या काळात अनेक यहुदी लोकांना इब्री भाषा येत नव्हती. ते ग्रीक भाषा बोलायचे. म्हणून या भाषांतरामुळे त्यांना “पवित्र लिखाणांचे” ज्ञान घेण्यासाठी मदत झाली.—२ तीमथ्य ३:१५.

सेप्टुअजिंट मुळे यहुदी नसलेल्या ग्रीक बोलणाऱ्‍या लाखो लोकांनाही, बायबल समजण्यासाठी मदत झाली. ती कशी? सेप्टुअजिंट भाषांतराबद्दल प्रोफेसर विल्बर्ट फ्रान्सीस हॉवर्ड म्हणतात: “पहिल्या शतकाच्या मधल्या काळापासून, हे भाषांतर ख्रिस्ती चर्चचं बायबल बनलं. या चर्चच्या मिशनरींनी वेगवेगळ्या सभास्थानांत जाऊन येशू हाच मसीहा आहे, हे शास्त्रवचनांतून सिद्ध करून दाखवलं.” (प्रेषितांची कार्ये १७:३, ४; २०:२०) या एका कारणामुळे बऱ्‍याच यहुदी लोकांना “सेप्टुअजिंटमध्ये आवड राहिली नाही,” असं फ्रेड्रिक फिवी ब्रूस या बायबल विद्वानाचं म्हणणं आहे.

येशूच्या शिष्यांना जसजशी ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांची पुस्तकं मिळायची, तसतसं ते त्या पुस्तकांना इब्री शास्त्रवचनांच्या सेप्टुअजिंट भाषांतरासोबत जोडायचे. अशा प्रकारे आज आपल्याजवळ असलेलं संपूर्ण बायबल तयार झालं.

लॅटिन व्हल्गेट

संपूर्ण बायबल तयार झाल्याच्या, जवळजवळ ३०० वर्षांनंतर जेरोम नावाच्या एका धार्मिक विषयाच्या विद्वानाने बायबलचं लॅटिन भाषांतर तयार केलं. याला नंतर लॅटिन व्हल्गेट म्हटलं जाऊ लागलं. पण, त्या काळात लॅटिन भाषेची इतरही भाषांतरं होती. मग, एका नवीन भाषांतराची गरज का पडली? द इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड बायबल एन्सायक्लोपिडिया यात म्हटलं आहे, की जेरोम यांना “चुकीचं भाषांतर, स्पष्ट दिसणाऱ्‍या चुका आणि खात्री नसताना समावेश करण्यात किंवा गाळण्यात आलेल्या गोष्टींत” सुधार करायचा होता.

जेरोमने अशा बऱ्‍याच चुका सुधारल्या. पण, काही काळाने चर्चच्या अधिकाऱ्‍यांनी एक असा निर्णय घेतला, ज्यामुळे खूप मोठं नुकसान झालं. त्यांनी फक्‍त लॅटिन व्हल्गेट या बायबल भाषांतरालाच मान्यता दिली आणि असं ते कितीतरी शतकांपर्यंत करत राहिले! याचा काय परिणाम झाला? यामुळे बायबल एक असं पुस्तक बनलं, जे सर्वसामान्य लोकांच्या समजण्यापलीकडे होतं. कारण, काही काळाने बऱ्‍याच लोकांना लॅटिन भाषा जराही येत नव्हती.

अनेक भाषांतरं तयार झाली

मधल्या काळात लोक, बायबलची इतरही भाषांतरं तयार करत गेले. त्यांपैकी एक म्हणजे प्रचलित असलेलं सिरियाक पेशीट्ट. हे भाषांतर जवळजवळ इ.स. ५ व्या शतकात तयार झालं. पण, १४ व्या शतकापर्यंत अनेक सर्वसामान्य लोकांसाठी त्यांच्या भाषेत बायबल उपलब्ध नव्हतं. मग, १४ व्या शतकापासून वेगवेगळ्या भाषेत बायबलची भाषांतरं तयार करण्याचे नव्याने प्रयत्न सुरू करण्यात आले.

इंग्लंडमध्ये १४ व्या शतकाच्या शेवटी, जॉन विक्लिफ यांनी त्यांच्या देशातल्या सर्वसामान्य लोकांनाही समजेल अशा भाषेत, म्हणजेच इंग्रजी भाषेत बायबलचं भाषांतर तयार केलं. अशा प्रकारे त्यांनी मृत झालेल्या भाषेच्या बंधनातून बायबलला मुक्‍त करण्याचं काम सुरू केलं. त्यानंतर, लवकरच योहानस गुटेनबर्ग यांनी छपाई तंत्राचा शोध लावला. यामुळे बायबल विद्वानांना खूप मदत झाली. या शोधामुळे संपूर्ण युरोपमध्ये वापरात असलेल्या अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये बायबलची नवीन भाषांतरं छापून, ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी एक मार्ग तयार झाला.

इंग्रजी भाषेत आणखीन वेगवेगळी भाषांतरं तयार करण्यात आली. यामुळे, ‘एकाच भाषेत वेगवेगळी भाषांतरं तयार करण्याची काय गरज आहे?’ असा प्रश्‍न टीकाकारांनी केला. १८ व्या शतकात जॉन लुईस या इंग्लंडमधल्या चर्चच्या अधिकाऱ्‍याने असं लिहिलं: “भाषा ही जुनी होत जाते आणि समजण्यासाठी कठीण बनते. त्यामुळे भाषांतर वापरातल्या भाषेतलं असावं आणि लोकांना समजावं यासाठी जुन्या भाषांतरात काही बदल करण्याची गरज पडते.”

पूर्वी कधी नव्हे इतकं, आज बायबल विद्वानांसाठी जुन्या भाषांतरांत सुधार करणं सोपं झालं आहे. त्यांना बायबलची प्राचीन भाषा आज आणखीन स्पष्टपणे समजते. शिवाय, अलीकडेच सापडलेल्या बायबलच्या मौल्यवान प्राचीन हस्तलिखित प्रतीही त्यांच्याजवळ आहेत. यामुळे बायबलच्या मूळ लिखाणांतली अचूकता तपासून पाहायला मदत होते.

या सर्व गोष्टींचं परीक्षण केल्यानंतर, नवीन बायबल भाषांतरं खरंच खूप मदतीची आहेत असं आपण म्हणू शकतो. पण, बायबलची काही भाषांतरं निवडताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मनापासून देवावर प्रेम असल्यामुळे जेव्हा भाषांतरकार बायबलची नवीन भाषांतरं तयार करतात, तेव्हा त्यांनी केलेली भाषांतरं आपल्यासाठी खरंच खूप फायद्याची ठरतात. ▪

ऑनलाईन किंवा मोबाईलवर बायबल वाचण्यासाठी, www.jw.org/mr या वेबसाईटवर जा आणि प्रकाशने > बायबल, या टॅबखाली पाहा किंवा कोड स्कॅन करा

बायबलमध्ये देवाचं पवित्र नाव

येशूच्या काळातल्या सेप्टुअजिंट हस्तलिखितांच्या तुकड्यांवर देवाचं नाव

येशूच्या दिवसांतल्या सेप्टुअजिंट हस्तलिखिताच्या भागात असलेलं देवाचं नाव

न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स या बायबलच्या इब्री आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, देवाचं पवित्र नाव यहोवा याचा वापर करण्यात आला आहे. बहुतेक आधुनिक इंग्रजी बायबलमध्ये या नावाच्या ठिकाणी “प्रभू” असं वापरण्यात आलं आहे. पण असं का? काही भाषांतरकारांच्या मते असं करण्याचं एक कारण म्हणजे, इब्री शास्त्रवचनांच्या ग्रीक सेप्टुअजिंट भाषांतरात टेट्राग्रॅमेटॉन (YHWH) हे पाहायला मिळत नाही. देवाचं वैयक्‍तिक नाव ज्या चार इब्री अक्षरांनी लिहिलं जातं त्याला टेट्राग्रॅमेटॉन म्हणतात. पण, भाषांतरकारांचं म्हणणं खरं आहे का?

१९४० आणि १९५० च्या मधल्या काळात येशूच्या दिवसांतल्या सेप्टुअजिंट याचे काही अतिशय जुने भाग सापडले. त्यात इब्री अक्षरांत देवाचं पवित्र नाव होतं. असं दिसून येतं, की सेप्टुअजिंटची नकल करणाऱ्‍यांनी पवित्र नावाच्या ठिकाणी “प्रभू” असा अर्थ असलेला ग्रीक भाषेतला कायरिओस हा शब्द वापरला. पण, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन या बायबलमध्ये देवाचं पवित्र नाव यहोवा जिथे जिथे असायला हवं, तिथे तिथे लिहिण्यात आलं आहे.

बायबल बदललं आहे का?

मृत समुद्राजवळ सापडलेली यशयाची गुंडाळी

२००० वर्षं जुनी मृत समुद्रातील यशायाची गुंडाळी. त्यात आणि आजच्या बायबलमध्ये बरंच साम्य आहे

बायबलची नकल करणाऱ्‍यांनी चुका केल्या हे खरं आहे. पण, असं असलं तरी त्यांनी केलेल्या चुकांमुळे बायबलमध्ये खूप जास्त बदल झालेला नाही. त्यामुळे बायबल आजही भरवशालायक आहे. “ख्रिस्ती धर्माच्या कोणत्याही मूलभूत शिकवणी अस्पष्ट किंवा वादग्रस्त वचनांवर आधारित नाहीत.”—आव्हर बायबल ॲन्ड दी एन्शियंट मॅन्युस्क्रिप्ट्‌स.

यहुदी नकलाकारांनी खूप कमी चुका केल्या. “ख्रिस्ती धर्माची सुरुवात झाली तेव्हाच्या शतकांदरम्यान यहुदी शास्त्र्यांनी इब्री बायबलच्या नकला तयार केल्या. या नकला तयार करताना त्यांनी अचूकता टिकवून ठेवण्याचा विश्‍वासूपणे प्रयत्न केला.”—सेकेंड थॉट्‌स ऑन द डेड सी स्क्रोल्स.

उदाहरणार्थ, मृत समुद्रातील गुंडाळ्यांतली यशयाची गुंडाळी ही आधी उपलब्ध असलेल्या लिखाणांपेक्षा १,००० वर्षं जुनी आहे. आज उपलब्ध असलेल्या लिखाणांशी त्याची तुलना केल्यावर काय दिसून येतं? हेच, की “अगदी क्वचितच एखादा शब्द जोडण्यात किंवा गाळण्यात” आला आहे.—द बुक. अ हिस्ट्री ऑफ द बायबल.

काही नकल करणाऱ्‍यांनी निष्काळजीपणा दाखवला. त्यामुळे काही अक्षरं, शब्द किंवा वाक्यांश इकडचे तिकडे झाले. पण, अशा चुका आता सहजच ओळखता येतात आणि त्या सुधारल्या जाऊ शकतात. “आज जगात असलेल्या प्राचीन साहित्यांपैकी फक्‍त नवीन करारच असं एक साहित्य आहे, ज्याच्या लिखाणाच्या अचूकतेबद्दल इतके समृद्ध पुरावे उपलब्ध आहेत.”—द बुक्स ॲन्ड द पार्चमेन्ट्‌स.

“अगदी सुरुवातीला इजिप्तमध्ये पपायरसवर बायबल लिहिण्यात आलं. त्यानंतर, युरोपमध्ये त्याची कितीतरी हस्तलिखितं तयार करण्यात आली. मग ती छापण्यातही आली. पण, असं असलं तरी बायबलच्या अचूकतेबद्दल चिंता करणारे विश्‍वासू लोक या गोष्टीची पुरेपूर खात्री बाळगू शकतात, की अगदी सुरुवातीच्या लिखाणांत आणि नंतरच्या लिखाणांत जबरदस्त साम्य आहे.”—द बुक. अ हिस्ट्री ऑफ द बायबल.

बायबल खरंच बदललं आहे का? नक्कीच नाही!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा