वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w16 डिसेंबर पृ. २९-३१
  • मनाची सौम्यता—समजूतदारपणा दाखवण्याचा एक मार्ग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मनाची सौम्यता—समजूतदारपणा दाखवण्याचा एक मार्ग
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सौम्यतेचा आत्मा दाखवण्यामध्ये सुज्ञता आहे
  • सौम्यता—या गुणाचा आपल्याला कसा फायदा होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • “तुम्हांमध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे?”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • सौम्यता​—तुमची खरी ताकद!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
w16 डिसेंबर पृ. २९-३१
एक नर्स रागात असलेल्या स्त्रीसोबत बोलताना

मनाची सौम्यता—समजूतदारपणा दाखवण्याचा एक मार्ग

ॲन्टोनिया, जी व्यवसायाने नर्स (प्रोफेशनल केअरगीवर) आहे, दारावरची बेल वाजवते. एक स्त्री दार उघडते आणि यायला उशीर झाल्याबद्दल ॲन्टोनियावर चिडते आणि तिच्याशी अपमानास्पद बोलते. खरंतर ॲन्टोनिया ही ठरलेल्या वेळीच आली होती. तरी झालेल्या गैरसमजुतीमूळे ती त्या स्त्रीची शांतपणे माफी मागते. ॲन्टोनिया ही त्या स्त्रीच्या वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी तिथं आली होती.

पुढच्या वेळी जेव्हा ॲन्टोनिया तिथं जाते, तेव्हाही ती स्त्री तिच्यावर ओरडते आणि तिला रागावते. मग ॲन्टोनियाची या वेळी प्रतिक्रिया कशी होती? ती म्हणते: “या वेळी स्वतःवर ताबा ठेवणं थोडं अवघड होतं. कारण ती स्त्री विनाकारण मला बोलत होती, तिचा तो व्यवहार नक्कीच योग्य नव्हता.” तरीदेखील, ॲन्टोनियाने या वेळीही तिची माफी मागितली. ॲन्टोनियाने त्या स्त्रीला सांगितलं की ती स्त्री ज्या त्रासातून जात आहे तो ती पूर्णपणे समजू शकते.

जर तुम्ही ॲन्टोनियाच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? तुम्हीही सौम्य मनोवृत्ती दाखवली असती का? की स्वतःचा राग आवरणं तुम्हाला कठीण गेलं असतं? हे खरं आहे की, वर सांगितलेल्या परिस्थितींप्रमाणे एखाद्या परिस्थितीत स्वतःवर ताबा ठेवून शांत राहणं थोडं कठीण आहे. जेव्हा आपण तणावाखाली असतो किंवा जेव्हा इतरजण आपल्याला चीड येईल अशा प्रकारे वागतात, तेव्हा मनाची सौम्यता दाखवणं खरोखरच अवघड आहे.

पण, बायबल सर्व ख्रिश्‍चनांना सौम्य मनोवृत्ती दाखवण्यासाठी आर्जवते. त्यात असंही सुचवण्यात आलं आहे की, जी व्यक्‍ती सौम्यता दाखवते ती खरंतर ज्ञानाने किंवा बुद्धीने वागत असते. याकोब ३:१३ म्हणतं: “तुम्हांमध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने [सौम्यतेने] सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावी.” सौम्यता देवाकडून असलेल्या ज्ञानाचा पुरावा आहे, असं आपण का म्हणू शकतो? आणि हा चांगला गुण विकसित करण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते?

सौम्यतेचा आत्मा दाखवण्यामध्ये सुज्ञता आहे

सौम्य मनोवृत्तीमुळे तणावग्रस्त परिस्थिती आटोक्यात येते. “मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.”—नीति. १५:१.

रागामुळे तणावग्रस्त परिस्थिती आणखी बिकट होते. कारण हे आगीत तेल ओतण्यासारखंच आहे. (नीति. २६:२१) याउलट सौम्य उत्तराने सहसा चांगले परिणाम घडून येतात. यामुळे तीव्र विरोध करणाऱ्‍या व्यक्‍तीची वागणूकही बदलू शकते.

ॲन्टोनियाने हे स्वतः अनुभवलं. तिने दाखवलेल्या सौम्य मनोवृत्तीमुळे ती स्त्री शांत झाली आणि तिला रडू कोसळलं. त्या स्त्रीने ॲन्टोनियाला सांगितलं की वैयक्‍तिक आणि कौटुंबिक समस्यांमुळे ती त्या प्रकारे वागली. ॲन्टोनियाने तिला साक्ष दिली आणि त्यानंतर त्या स्त्रीचा बायबल अभ्यास चालू झाला. या सर्व गोष्टी शक्य झाल्या त्या केवळ ॲन्टोनियाच्या शांत आणि सौम्य मनोवृत्तीमुळे.

सौम्य मनोवृत्ती बाळगल्याने आपण आनंदी राहतो. “जे सौम्य ते धन्य [आनंदी], कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.”—मत्त. ५:५.

सौम्य मनोवृत्ती बाळगणारे आनंदी राहतात असं आपण का म्हणू शकतो? असे अनेक जण आहेत, जे पूर्वी फार रागीट स्वभावाचे होते. पण सौम्य मनोवृत्ती धारण केल्यामुळे ते आता आनंदी आहेत. त्यांच्या जीवनात अनेक चांगले बदल झाले आहेत, आणि त्यांना या गोष्टीचीही जाणीव आहे की देवाने त्यांच्यासाठी एक चांगलं भवितव्य राखून ठेवलं आहे. (कलस्सै. ३:१२) स्पेनमधील एक विभागीय पर्यवेक्षक अडॉल्फो आपल्या पूर्वीच्या स्वभावाविषयी आणि सत्यात आल्यानंतर त्यांच्या जीवनात जो चांगला बदल झाला त्याविषयी सांगतात.

ते म्हणतात: “माझ्या आयुष्याला पूर्वी कोणतीही दिशा नव्हती. मला लगेच राग यायचा, छोट्या-मोठ्या कारणांवरूनही मी लगेचच चिडायचो. इतका की माझे मित्र माझ्या घमेंडी आणि हिंसक स्वभावामुळे मला खूप घाबरायचे. आणि शेवटी माझ्या आयुष्यात एक मोठी घटना घडली. एकदा भांडणात माझ्यावर सहा वेळ वार झाले आणि माझं इतकं रक्‍त वाहिलं की मी अक्षरशः मरता-मरता वाचलो.”

आता मात्र अडॉल्फो इतरांना सौम्य मनोवृत्ती कशी बाळगावी याविषयी शिकवतात—शब्दांनीच नाही तर स्वतःच्या उदाहरणानेही. त्यांच्या चांगल्या व कोमल व्यक्‍तिमत्त्वामुळे अनेक जण त्यांचे जवळचे मित्र बनले आहेत. अडॉल्फो म्हणतात, जीवनात चांगले बदल करता आले यासाठी ते आता फार आनंदी आहेत. आणि सौम्य मनोवृत्ती धारण करण्यासाठी यहोवाने त्यांना मदत केली यासाठीही ते त्याचे फार आभारी आहेत.

सौम्य मनोवृत्ती बाळगल्याने आपण यहोवालाही आनंदी करतो. “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्‍यास मी प्रत्युत्तर देईन.”—नीति. २७:११.

यहोवाचा मुख्य शत्रू, सैतान हादेखील यहोवाची निंदा करत आला आहे व त्याला दोष लावत आला आहे. यामुळे क्रोध व्यक्‍त करण्यासाठी यहोवाजवळ योग्य व सबळ कारणं आहेत. पण यहोवा देव हा “मंदक्रोध” आहे असं बायबल आपल्याला सांगतं. (निर्ग. ३४:६) त्यामुळे जेव्हा आपण यहोवा देवाचं अनुकरण करून रागावण्यात ‘मंद’ होतो आणि सौम्य मनोवृत्ती धारण करतो, तेव्हा समजूतदारपणाच्या मार्गावर आपण चालत असतो आणि यहोवाचं मन आनंदित करतो.—इफिस. ५:१.

आपण फार कठीण काळात जगत आहोत. अनेकदा आपल्याला अशा लोकांना सामोरं जावं लागतं जे, “बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक . . . चहाडखोर, असंयमी, क्रूर” असे आहेत. (२ तीम. ३:२, ३) आताचं जग हे अशा लोकांनी भरलेलं असलं, तरी ख्रिश्‍चनांनी मनाची सौम्यता विकसित करण्याचं थांबवावं असा याचा अर्थ होत नाही. देवाचं वचन आपल्याला आठवण करून देतं की “वरून येणारे ज्ञान हे मुळात . . . शांतिप्रिय, सौम्य” आहे. (याको. ३:१७) शांत आणि सौम्य मनोवृत्ती दाखवल्यामुळे, देवाकडून मिळणाऱ्‍या ज्ञानाद्वारे आपण चालत आहोत याचा पुरावा आपण देत असतो. जेव्हा आपल्याला चिथवलं जातं तेव्हा या ज्ञानामुळे आपल्याला सौम्यतेनं उत्तर देणं शक्य होतं. आणि अफाट ज्ञानाचा आणि बुद्धीचा जो स्रोत आहे त्याच्याजवळ, म्हणजेच यहोवा देवाजवळ जाण्यास आपल्याला मदत होते.

सौम्य मनोवृत्ती कशी विकसित कराल?

जेव्हा एखादी व्यक्‍ती तुमच्याशी निष्ठुरतेनं वागते किंवा तुम्हाला चुकीची वागणूक देते, तेव्हा स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवून योग्य प्रकारे परिस्थिती हाताळण्याद्वारे यहोवाचं मन आनंदित करायला तुम्हाला कशामुळे मदत होऊ शकते? पुढे दिलेल्या काही बायबल तत्त्वांवर मनन करा.

  1. जगाची वृत्ती टाळा. ‘सौम्यता म्हणजे भित्रेपणा’ असा अनेकांचा समज आहे. ते म्हणतात आपण धाडसी आणि खंबीर आहोत हे दाखवण्यासाठी आपल्याला स्वतःचं म्हणणं जोरदार आणि तीव्रपणे मांडलंच पाहिजे. अशा प्रकारची मनोवृत्ती साहजिकच जगीक मनोवृत्ती आहे; ‘वरून येणाऱ्‍या ज्ञानानुसार नाही.’ (१ करिंथ. २:१२) खरंतर सौम्य वृत्तीमध्ये मोठी ताकद आहे असं बायबल आपल्याला सांगतं. त्यात म्हटलं आहे, “सहनशीलतेने अधिपतीचे मन वळवले जाते, आणि मऊ जीभ हाड मोडते.”—नीति. २५:१५, पं.र.भा.

    विचार करण्यासाठी प्रश्‍न:

    सौम्य वृत्तीला मी ताकद समजतो की कमजोरी?

    “देहाची कर्मे” जसं की रागाने भडकणे, अशा गोष्टीपासून दूर राहण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो का?—गलती. ५:१९, २०.

  2. विचार करा. “धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो. पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकते.” (नीति. १५:२८) जर आपण रागाच्या भरात बोललो, तर कदाचित आपण असं काही बोलून जाऊ ज्याचा नंतर आपल्याला पस्तावा होईल. पण बोलण्याआधी जर आपण विचार केला, तर आपण काय बोलावं आणि कसं उत्तर द्यावं हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल. त्यामुळे आपण शांतपणे आणि सौम्यतेनं उत्तर देऊ शकतो. तसंच परिस्थिती आटोक्यात आणण्यासही आपल्याला मदत होईल.

    विचार करण्यासाठी प्रश्‍न:

    मला लगेच राग येत असेल, तर त्याचा माझ्या स्वतःवर कसा परिणाम होऊ शकतो?

    शांती टिकवून ठेवण्यासाठी, मी माझ्यावर झालेल्या अन्यायाकडे डोळेझाक करू शकतो का?—नीति. १९:११.

  3. प्रार्थना करा. पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा. यहोवाचा पवित्र आत्मा विश्‍वातील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा खूप शक्‍तिशाली आहे. (लूक ११:१३) लक्षात ठेवा सौम्यता आणि आत्मसंयम हे पवित्र आत्म्याच्या फळातील पैलू आहेत. अडॉल्फो म्हणतात, “एकसारखी यहोवाला प्रार्थना करत राहिल्याने मला खूप मदत होते, खासकरून परिस्थिती जेव्हा तणावपूर्ण असते तेव्हा.” अडॉल्फो या बांधवाप्रमाणेच आपणही “प्रार्थनेत तत्पर” राहिल्यास, पवित्र आत्म्यासाठी केलेल्या आपल्या प्रार्थना यहोवा देव नक्कीच ऐकेल.—रोम. १२:१२.

    विचार करण्यासाठी प्रश्‍न:

    माझ्या अंतःकरणातील विचार आणि हेतू पारखण्यासाठी मी यहोवाला नियमित रीत्या प्रार्थना करतो का?

    यहोवाचं मन आनंदित होईल अशा प्रकारे वागण्यास, मी त्याच्याकडे पवित्र आत्म्यासाठी व समंजसपणासाठी प्रार्थना करतो का?—स्तो. १३९:२३, २४; याको. १:५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा