वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w16 डिसेंबर पृ. १३-१७
  • “आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “दैहिक गोष्टींकडे चित्त” लावणे याचा काय अर्थ होतो?
  • “आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त” लावणे याचा काय अर्थ होतो?
  • जीवन व शांती मिळवण्यासाठी, आत्म्यानुसार चाला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • रोमकर सर्वात उत्तम अशी वार्ता मिळवतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • आत्म्याचे चिंतन करा व जीवंत राहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • सर्वांना गरज आहे अशी सुवार्ता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
w16 डिसेंबर पृ. १३-१७
एक तरुण बहीण आपल्या सेवाकार्यावर, इतरांना मदत करण्यावर आणि तिच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करत आहे

“आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे”

“जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात.”—रोम. ८:५.

गीत क्रमांक: २२, ५२

तुमचं उत्तर काय असेल?

  • रोमकर ८ अध्यायापासून आपल्या सर्वांनाच कसा फायदा होतो?

  • “दैहिक गोष्टींकडे चित्त” लावण्याचा काय अर्थ होतो?

  • “आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त” लावण्याचा काय अर्थ होतो?

१, २. रोमकर अध्याय ८ अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी महत्त्वाचा का आहे?

दरवर्षी होणाऱ्‍या प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी तुम्ही रोमकर ८:१५-१७ ही वचनं नक्कीच वाचली असतील. आपल्याला स्वर्गीय जीवनाची आशा आहे याची पक्की खात्री अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना कशी होते, हे समजण्यास ही वचनं आपल्याला मदत करतात. रोमकर ८:१ यात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा उल्लेख ‘ख्रिस्त येशूमध्ये असलेले’ म्हणजेच ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेले असा करण्यात आला आहे. पण रोमकर अध्याय ८ हा फक्‍त अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनाच लागू होतो का? की पृथ्वीवर जीवन जगण्याची आशा असलेल्यांनादेखील या अध्यायामुळे फायदा होतो?

२ रोमकर ८ हे मुख्यतः अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी लिहिलं गेलं आहे. “दत्तकपणाची म्हणजे . . शरीराच्या मुक्‍तीची वाट पाहत” असताना त्यांना देवाचा पवित्र “आत्मा” मिळाला आहे. (रोम. ८:२३) भविष्यात ते देवाचे पुत्र म्हणून स्वर्गात जीवन जगणार आहेत. येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवा देवाने त्यांच्या पापांची क्षमा केली आहे. आणि यहोवाने त्यांना स्वतःचे पुत्र होण्याकरता नीतिमान ठरवलं आहे.—रोम. ३:२३-२६; ४:२५; ८:३०.

३. पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा असलेले ख्रिस्तीदेखील रोमकर अध्याय ८ पासून फायदा घेऊ शकतात असं आपण का म्हणू शकतो?

३ रोमकरांस पत्रामध्ये पौलाने आधी अशा एका मनुष्याचा उल्लेख केला जो अभिषिक्‍त नव्हता, पण तरीदेखील देवाने त्याला नीतिमान ठरवलं होतं. हा मनुष्य म्हणजे अब्राहाम. हा विश्‍वासू पुरुष येशू ख्रिस्ताने खंडणी बलिदान देण्याच्याही फार वर्षांआधी होऊन गेला होता. (रोमकर ४:२०-२२ वाचा.) आजही यहोवा पृथ्वीवर सर्वकाळ जीवन जगण्याची आशा असलेल्यांना नीतिमान समजतो. त्यामुळे रोमकर अध्याय ८ मध्ये दिलेल्या सल्ल्यांपासून तेही फायदा मिळवू शकतात.

४. रोमकर ८:२१ हे वचन वाचल्यानंतर आपण स्वतःला कोणता प्रश्‍न विचारू शकतो?

४ रोमकर ८:२१ हे वचन आपल्याला या गोष्टीची खात्री देतं, की यहोवा नक्कीच या पृथ्वीवर नंदनवन आणेल आणि मानवजातीला पाप आणि मृत्यूच्या दास्यातून मुक्‍त करेल. या वचनात म्हटलं आहे की, मानवजात “देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” अनुभवेल. तुम्ही स्वतःला त्या नवीन जगात पाहू शकता का? देवाच्या नवीन जगात सर्वकाळ जगण्यासाठी आपल्याला काय करण्याची गरज आहे हे आता आपण पाहू या.

“दैहिक गोष्टींकडे चित्त” लावणे याचा काय अर्थ होतो?

५. रोमकर ८:४-१३ मध्ये कोणत्या गोष्टींविषयी लिहिलं आहे?

५ रोमकर ८:४-१३ वाचा. रोमकर ८ अध्यायात पौलाने दोन प्रकारच्या लोकांबद्दल सांगितलं. पहिले जे “दैहिक गोष्टींकडे चित्त” लावतात, आणि दुसरे जे “आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त” लावतात. काही जण असं म्हणतात, की इथं पौल ख्रिस्ती असलेल्या व ख्रिस्ती नसलेल्या अशा दोन्ही लोकांबद्दल बोलत होता. पण इथं पौल त्या ख्रिश्‍चनांना लिहित होता जे “पवित्र होण्यास बोलावलेले” होते. (रोम. १:७, पं.र.भा.) त्यामुळे “दैहिक गोष्टींकडे चित्त” लावणारे आणि “आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त” लावणारे हे दोन्हीही ख्रिस्ती होते. मग हे ख्रिस्ती एकमेकांपासून कशा प्रकारे वेगळे होते?

६, ७. (क) बायबलमधील “दैहिक” किंवा देह अशा प्रकारच्या शब्दांचा काय अर्थ होतो? (ख) रोमकर ८:४-१३ या वचनांत “दैहिक” किंवा देह हे शब्द कोणत्या अर्थाने वापरण्यात आले आहेत?

६ बायबल “दैहिक” किंवा ‘देह’ या अर्थाच्या शब्दांचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करतं. कधीकधी या अर्थाच्या शब्दाचा वापर खरोखरचं शरीर दर्शवण्यासाठी केला गेला आहे. (रोम. २:२८; १ करिंथ. १५:३९, ५०) तसंच कुटुंबातील नातेसंबंध दाखवण्यासाठीही अशा अर्थाचे शब्द वापरण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, बायबल सांगतं येशू ख्रिस्त “देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला,” आणि पौलाने यहुद्यांचा उल्लेख “देहदृष्टया माझे नातेवाईक” असा केला.—रोम. १:३; ९:३.

७ मग पौलाने रोमकर ८:४-१३ या वचनांत “दैहिक गोष्टींकडे” असं जे म्हटलं आहे ते कोणत्या अर्थाने? हे समजण्यासाठी प्रथम आपण रोमकर ७:५ हे वचन पाहू. या वचनात पौलाने म्हटलं: “आपण देहस्वभावाच्या अधीन होतो, तेव्हा नियमशास्त्राच्या द्वारे चेतवलेल्या पापवासना आपल्या अवयवात मरणाला फळ देण्यासाठी कार्य करत होत्या.” इथं पौल हे समजावतो की ज्यांचं चित्त “दैहिक गोष्टींकडे” आहे, ते असे लोक आहेत जे स्वतःच्या पापी इच्छांच्या अनुषंगाने आणि त्यांच्या मनाला वाटेल तसं जगतात.

८. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना सावधानतेच्या इशाऱ्‍याची गरज का होती?

८ पौलाने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना “दैहिक गोष्टींकडे चित्त” लावण्यापासून सावध का केलं? आणि आजही सर्व ख्रिश्‍चनांना पौलाने दिलेल्या सावधानतेच्या इशाऱ्‍याकडे लक्ष देण्याची गरज का आहे? याचं एक कारण म्हणजे, विश्‍वासू सेवक देवाच्या सेवेऐवजी स्वतःच्या इच्छांनाच जीवनात प्रथम स्थानी ठेवण्याचा धोका असतो. उदाहरणार्थ, रोममधील काही ख्रिस्ती “स्वतःच्या पोटाची सेवा” करणारे, म्हणजे स्वतःच्याच वासनांचे गुलाम होते. इथं पौलाच्या म्हणण्याचा कदाचित असा अर्थ होऊ शकतो की, या ख्रिश्‍चनांसाठी स्वतःच्या जीवनात खाणंपिणं, सेक्स आणि जीवनातील इतर ऐशआरामाच्या गोष्टींनाच सर्वात जास्त महत्त्व होतं. (रोम. १६:१७, १८; फिलिप्पै. ३:१८, १९; यहू. ४, ८, १२) आणि करिंथमधल्या मंडळीतील एका बांधवाने “आपल्या बापाची बायको ठेवली” होती, म्हणजे तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवले होते. (१ करिंथ. ५:१) या उदाहरणांवरून हे स्पष्टच आहे की त्या वेळच्या ख्रिश्‍चनांना पौलाच्या सावधानतेच्या इशाऱ्‍याची खूप जास्त गरज होती.—रोम. ८:५, ६.

९. रोमकर ८:६ मध्ये सांगितलेले “देह स्वभावाचे चिंतन” हे कोणत्या गोष्टींना सूचित करत नाही?

९ पौलाने दिलेला सावधानतेचा इशारा आजच्या काळातही ख्रिश्‍चनांना लागू होतो. अनेक वर्षं यहोवाची सेवा करणाऱ्‍यांचाही कल कधीकधी “दैहिक गोष्टींकडे” जाऊ शकतो. पण मग पौलाच्या बोलण्याचा असा अर्थ होता का, की आपण कधीही खाणंपिणं, नोकरी-धंदा, मनोरंजन आणि वैवाहिक जीवनातून मिळणाऱ्‍या आनंदाविषयी विचार करू नये? नाही. पौलाच्या बोलण्याचा असा अर्थ नक्कीच होत नाही. कारण या गोष्टी जीवनात सामान्य आहेत. येशूनेही खाण्यापिण्याचा आनंद घेतला आणि त्याने इतरांनाही अन्‍न पुरवलं. तसंच, आपल्याला आरामाचीही गरज आहे याची त्याला जाणीव होती. आणि पौलानेही लिहिलं की, विवाह जोडीदाराबरोबर असलेले शारीरिक संबंध हा वैवाहिक जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे.

एक बांधव घरात, कामाच्या ठिकाणी आणि राज्य सभागृहात सुटीवर जाण्याविषयी बोलत आहे

आपल्या संभाषणांवरून काय दिसून येतं? (परिच्छेद १०, ११ पाहा)

१०. “चित्त” लावणे याचा काय अर्थ होतो?

१० “चित्त लावतात” असं जे पौलाने म्हटलं त्याचा काय अर्थ होतो? मूळ ग्रीक भाषेत या शब्दांचा अर्थ, एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे संपूर्ण लक्ष लावणं, त्याबद्दलच विचार करणं आणि त्याविषयी योजना करणं असा होतो. रोमकर ८:५ मधील “चित्त लावतात” या शब्दांचा अर्थ समजावून सांगताना एक विद्वान म्हणतो, की असे लोक विशिष्ट गोष्टीमध्ये सर्वात जास्त आवड घेतात, आणि त्याबद्दलच ते नेहमी बोलत राहतात. आणि स्वतःच्याच स्वार्थी इच्छा पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असतो. या स्वार्थी इच्छांना ते स्वतःच्या जीवनावर नियंत्रण करू देतात.

११. अशा कोणत्या काही गोष्टी आहेत ज्यांना आपण जीवनात सर्वात जास्त महत्त्व देऊ लागू?

११ आपण “दैहिक गोष्टींकडे” लक्ष लावत आहोत, की “आध्यात्मिक गोष्टींकडे” हे जाणून घेण्यासाठी रोममधील ख्रिश्‍चनांना स्वतःचं परीक्षण करण्याची गरज होती. आज आपणही जीवनात सर्वात जास्त महत्त्व कोणत्या गोष्टींना देत आहोत हे तपासून पाहण्याची गरज आहे. आपल्याला सर्वात जास्त कोणत्या विषयावर बोलायला आवडतं? कोणत्या गोष्टींमध्ये आपल्याला जास्त आनंद मिळतो? काहींना कदाचित या गोष्टीची जाणीव होईल की ते नेहमी कोणती वाईन चांगली आहे, घर कसं सजवावं, कोणते कपडे खरेदी करावेत, पैसे कुठं गुंतवावेत किंवा सुटीवर कुठं जावं अशाच गोष्टींचा विचार करतात. या गोष्टी तशा चुकीच्या नक्कीच नाहीत. खरंतर या जीवनातील सामान्य गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, येशूनेही एका लग्न समारंभात चमत्कार करून द्राक्षारस तयार केला, आणि पौलानेही तीमथ्याला पोटाच्या विकारासाठी “थोडा द्राक्षारस” घेण्यास सांगितलं. (१ तीम. ५:२३; योहा. २:३-११) पण याचा अर्थ तीच गोष्ट त्यांच्या जीवनात जास्त महत्त्वाची होती असं नाही. आज आपल्याबद्दल काय? जीवनात आपण सर्वात जास्त महत्त्व कोणत्या गोष्टींना देतो?

१२, १३. आपण कोणत्या गोष्टींकडे चित्त लावतो याकडे लक्ष देणं इतकं महत्त्वाचं का आहे?

१२ रोमकर ८:६ मध्ये पौलाने असा इशारा दिला: “देह स्वभावाचे चिंतन हे मरण” आहे. पौलाच्या म्हणण्याचा काय अर्थ होतो? जर आपण “दैहिक गोष्टींकडे चित्त” लावले, तर आपण देवासोबत असलेला आपला नातेसंबंध गमावू आणि मग भविष्यात मिळणारं सार्वकालिक जीवनही आपण गमावून बसू. पण पौलाच्या बोलण्याचा असा अर्थ नव्हता की, एखाद्याने “दैहिक गोष्टींकडे चित्त” लावले म्हणजे त्याने सार्वकालिक जीवनाची आशा कायमची गमावली. कारण प्रत्येक जण आपल्या जीवनात बदल करू शकतो. बहिष्कृत करण्यात आलेल्या करिंथमधल्या त्या अनैतिक जीवन जगणाऱ्‍या बांधवाचंच उदाहरण घ्या. त्याने स्वतःच्या जीवनात मोठा बदल केला आणि पूर्वीचं अनैतिक जीवन सोडून पुन्हा साफ मनाने यहोवाची सेवा करू लागला.—२ करिंथ. २:६-८.

१३ “दैहिक गोष्टींकडे चित्त” लावण्याच्या बाबतीत असलेलं हे अगदी टोकाचं उदाहरण आहे. पण, असं असलं तरी हा बांधव त्याच्या जीवनात आवश्‍यक ते बदल करू शकला. आजही जर एखादी ख्रिस्ती व्यक्‍ती यहोवाच्या स्तरांऐवजी, स्वतःच्या पापी वृत्तीनुसार आणि इच्छांनुसार वागत असेल, तर तीही स्वतःच्या जीवनात बदल करू शकते. पौलाने दिलेल्या सावधानतेच्या इशाऱ्‍याकडे आपण लक्ष दिल्यास जीवनात कोणतेही चांगले बदल करण्यास आपल्याला प्रेरणा मिळेल.

“आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त” लावणे याचा काय अर्थ होतो?

१४, १५. (क) पौलाने आपल्याला कोणत्या गोष्टीचं चिंतन करण्यास आर्जवलं? (ख) “आत्म्याचे चिंतन” याचा काय अर्थ होतो?

१४ ‘देह स्वभावाच्या चिंतनाचे’ परिणाम सांगितल्यानंतर, पौल म्हणाला “आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे.” आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावल्याचे खरंच हे किती चांगले परिणाम आहेत!

१५ पण “आत्म्याचे चिंतन,” याचा अर्थ असा होत नाही, की एखाद्या व्यक्‍तीला वास्तविक परिस्थितीचं भानच नसतं. किंवा ती व्यक्‍ती नेहमी बायबल आणि यहोवा देवाविषयीच बोलत राहते असंही नाही. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांचंच उदाहरण घ्या. तेदेखील सामान्य जीवन जगायचे. त्यांनी खाण्यापिण्याचा आनंद घेतला, लग्न केलं, कुटुंबाचं पालनपोषण केलं आणि कामधंदा केला.—मार्क ६:३; १ थेस्सलनी. २:९.

१६. पौलाच्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती होती?

१६ असं असलं तरी पौलाने व सुरवातीच्या ख्रिश्‍चनांनी, या गोष्टींनाच जीवनात सर्वात जास्त महत्त्व दिलं नाही. एक उदाहरण घ्या, आपल्याला माहीत आहे की स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी पौलाने तंबू बनवण्याचं काम केलं. पण हे काम त्याच्यासाठी जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट नव्हती. यहोवाच्या सेवेला पौलाच्या जीवनात प्रथम स्थान होतं. त्यामुळे पौलाने प्रचारकार्यावर आणि देवाचं वचन शिकवण्यावर आपलं चित्त लावलं. (प्रेषितांची कृत्ये १८:२-४; २०:२०, २१, ३४, ३५ वाचा.) रोममधील ख्रिश्‍चनांना पौलाच्या या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण करण्याची गरज होती. आज आपणही पौलाच्या या अप्रतिम उदाहरणाचं अनुकरण केलं पाहिजे.—रोम. १५:१५, १६.

१७. आत्म्याच्या चिंतनाचे कोणते, फायदे आहेत?

१७ यहोवाच्या सेवेला आपण आपल्या जीवनात प्रथमस्थानी ठेवलं, तर आपल्याला काय फायदा होईल? रोमकर ८:६ म्हणतं: “आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे.” मार्गदर्शनासाठी यहोवाच्या पवित्र आत्म्यावर अवलंबून राहणं आणि यहोवाच्या विचारसरणीशी आपली विचारसरणी जुळवून घेणं हे आत्म्याच्या चिंतनात सामील आहे. यामुळे आपलं सध्याचं जीवन तर आनंदी होईलच, पण येणाऱ्‍या भविष्यात आपल्याला सार्वकालिक जीवनदेखील मिळेल असं अभिवचन यहोवा आपल्याला देतो.

१८. “आत्म्याचे चिंतन . . . शांती आहे” याचा काय अर्थ होतो?

१८ “आत्म्याचे चिंतन . . . शांती आहे,” असं जे पौलाने म्हटलं त्याचा काय अर्थ होतो? सर्वांनाच जीवनात शांती हवी असते, खासकरून मनःशांती. पण असे फार थोडे लोक आहेत ज्यांना मनःशांती मिळते. पण आपण ही मनाची शांती मिळवू शकतो, आणि यासाठी आपण यहोवाचे खरंच किती आभारी आहोत! यासोबतच आपण आपल्या कुटुंबीयांसोबत आणि आपल्या मंडळीमध्ये ही शांती अनुभवतो. आपण अपरिपूर्ण असल्याकारणाने अनेक वेळा आपल्या बंधुभगिनींसोबत आपले मतभेद होतात हे खरं आहे. पण जेव्हा असे मतभेद होतात तेव्हा आपण येशूने दिलेला सल्ला लागू करू शकतो. येशूने म्हटलं: “आपल्या भावाबरोबर समेट कर.” (मत्त. ५:२४) नेहमी लक्षात असू द्या की आपले बंधुभगिनी हेदेखील यहोवाची सेवा करतात, एका अशा देवाची जो “शांतीचा देव” आहे.—रोम. १५:३३; १६:२०.

१९. आपण आणखी कोणत्या प्रकारची खास शांती अनुभवू शकतो?

१९ “आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त” लावल्यास आपण यहोवासोबतही एक शांतीपूर्ण नातेसंबंध जोडू शकतो. यशया संदेष्ट्याने म्हटलं: “ज्याचे मन तुझ्या [देवाच्या] ठायी स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुजवर असतो.”—यश. २६:३; रोमकर ५:१ वाचा.

२०. रोमकर अध्याय ८ मधील वचनांमधून आपल्याला जो फायदा मिळतो, त्यासाठी तुम्ही कृतज्ञ का आहात?

२० आपल्याला या पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा असो किंवा स्वर्गात येशूसोबत राज्य करण्याची, आपण सर्वच जण रोमकर अध्याय ८ मधील वचनांमधून फायदा मिळवू शकतो. बायबल आपल्याला आर्जवतं की आपण स्वतःच्या स्वार्थी इच्छांना नाही, तर देवाच्या सेवेला जीवनात प्रथम स्थानी ठेवलं पाहिजे. आपल्याला माहीत आहे की “आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त” लावल्याने आपल्याला चांगले प्रतिफळ मिळेल. आणि ते म्हणजे देवाचे कृपादान, जे “आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.”—रोम. ६:२३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा