वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w16 ऑक्टोबर पृ. २१-२५
  • भविष्यातील आशेवर आपला विश्‍वास मजबूत करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भविष्यातील आशेवर आपला विश्‍वास मजबूत करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मजबूत विश्‍वास असलेले प्राचीन काळातील देवाचे सेवक
  • ते यहोवाला एकनिष्ठ राहिले
  • आजच्या काळातील विश्‍वासू सेवकांची उदाहरणं
  • तुम्हाला सुवार्तेवर खरोखर विश्‍वास आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • “आमचा विश्‍वास वाढवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • विश्‍वास—आपल्याला बळ देणारा गुण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
w16 ऑक्टोबर पृ. २१-२५
ख्रिस्ता पूर्वीच्या काळातील एक विश्‍वासू वृद्ध व्यक्‍ती एका कुटुंबासोबत बोलत आहे

भविष्यातील आशेवर आपला विश्‍वास मजबूत करा

“विश्‍वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा” आहे.—इब्री ११:१.

गीत क्रमांक: ५४, ५५

तुमचं उत्तर काय असेल?

  • प्राचीन काळातील यहोवाच्या सेवकांनी त्यांचा विश्‍वास मजबूत कसा ठेवला?

  • आपला विश्‍वास वाढवण्यासाठी यहोवाने आपल्याला काय दिलं आहे?

  • आपला विश्‍वास मजबूत असल्यास आपल्याला काय करणं शक्य होईल?

१, २. (क) आशा धरण्याच्या बाबतीत आपण जगातील लोकांपेक्षा वेगळे कसे आहोत? (ख) आपण या लेखात काय पाहणार आहोत?

यहोवाने बऱ्‍याच चांगल्या गोष्टी करण्याचं अभिवचन दिलं आहे. आणि त्या गोष्टी पाहण्याची आपण सर्वच जन आशा धरतो. भविष्यात तो त्याचं नाव पवित्र करेल आणि जशी स्वर्गात तशी पृथ्वीवरही त्याची इच्छा पूर्ण होईल. (मत्त. ६:९, १०) या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत आणि त्या पूर्ण होतील त्या काळाची आपण सर्व जण आतुरतेनं वाट पाहत आहोत. तसंच, यहोवाने आपल्याला सार्वकालिक जीवन देण्याचंही अभिवचन दिलं आहे. काही लोकांना स्वर्गात जाण्याची आशा आहे, तर इतर लोकांना पृथ्वीवर जगण्याची आशा आहे. असं जीवन जगणं खरंच किती आनंद देणारं असेल! (योहा. १०:१६; २ पेत्र ३:१३) यासोबतच यहोवा आपल्याला शेवटल्या काळात कशा प्रकारे मार्गदर्शन देत राहील आणि आपल्याला मदत करत राहील हे जाणून घेण्यासही आपण उत्सुक आहेत.

२ बायबल आपल्याला सांगतं की विश्‍वास हा “आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा” आहे. याचा अर्थ ज्या लोकांचा विश्‍वास आहे, त्यांना या गोष्टीची पूर्ण खात्री असते की यहोवा आपलं प्रत्येक अभिवचन नक्की पूर्ण करेल. (इब्री ११:१) दुसरीकडे पाहता आज जगात लोक बऱ्‍याच गोष्टींची आशा धरतात, पण त्यांना त्या गोष्टी मिळतीलच याची खात्री नसते. जसं की, काही लोक अशा करतात की लॉटरीमध्ये त्यांचा नंबर लागेल आणि ते श्रीमंत होतील. पण त्यांचा नंबर लागेलच याची त्यांपैकी कोणालाच खात्री नसते. पण आपली आशा त्या लोकांसारखी नाही. या लेखांत आपण पाहू की देवाच्या अभिवचनांवर आपला विश्‍वास वाढवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करू शकतो. आपण हेदेखील पाहू की भक्कम विश्‍वासामुळे आपल्याला आज कशी मदत होऊ शकते.

३. यहोवा दिलेलं प्रत्येक अभिवचन पूर्ण करेल असा भरवसा आपण का बाळगतो?

३ विश्‍वास हा गुण आपल्यामध्ये जन्मापासूनच नसतो तर तो उत्पन्‍न करावा लागतो. यासाठी आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन स्वीकारणं आणि त्यानुसार चालणं गरजेचं आहे. (गलती. ५:२२) पवित्र आत्मा आपल्याला यहोवाची जवळून ओळख करून घेण्यासाठी मदत करू शकतो. यहोवा देव हा सर्वशक्‍तिमान आणि खूप बुद्धिमान आहे हे जेव्हा आपण शिकतो, तेव्हा त्याच्यावर असलेला आपला भरवसा वाढतो. आपली खात्री पटते की दिलेली सर्व अभिवचनं पूर्ण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. यहोवा अभिवचनांचा उल्लेख अशा प्रकारे करतो जणू काय ती पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्याने भविष्यात होणाऱ्‍या गोष्टींचा उल्लेख केल्यावर “झाले!” असं म्हटलं. (प्रकटीकरण २१:३-६ वाचा.) यहोवा दिलेलं अभिवचन नेहमी पूर्ण करतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तो “विश्‍वसनीय देव आहे.” त्यामुळे भविष्याबद्दल त्याने जे काही सांगितलं आहे ते पूर्ण होईल, यावर आपला भरवसा आहे.—अनु. ७:९.

मजबूत विश्‍वास असलेले प्राचीन काळातील देवाचे सेवक

४. प्राचीन काळातील देवाच्या सेवकांना कोणती आशा होती?

४ इब्री लोकांस पत्राच्या ११ व्या अध्यायात आपल्याला अशा सोळा स्त्री-पुरुषांची नावं वाचायला मिळतात, ज्यांचा यहोवाच्या अभिवचनांवर भक्कम विश्‍वास होता. त्या अध्यायात इतर लोकांचाही उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांच्या “विश्‍वासाविषयी चांगली साक्ष दिली” गेली आणि त्यामुळे यहोवाचं मन आनंदित झालं. (इब्री ११:३९) हे सर्व विश्‍वासू सेवक यहोवाने सांगितलेल्या संततीची वाट पाहत होते. त्यांना भरवसा होता की ही “संतती” देवाच्या सर्व शत्रूंचा विनाश करेल आणि पृथ्वीला पुन्हा एकदा नंदनवन बनवेल. (उत्प. ३:१५) देवाच्या या सेवकांना पूर्ण विश्‍वास होता की यहोवा नक्की त्यांचं पुनरुत्थान करेल. अर्थात या सर्व सेवकांनी स्वर्गात जाण्याची आशा धरली नसेल, कारण तोपर्यंत कोणालाच स्वर्गात जाण्याची आशा देण्यात आली नव्हती. (गलती. ३:१६) याउलट या विश्‍वासू सेवकांनी पृथ्वीवर सदासर्वकाळ जीवन जगण्याची आशा धरली.—स्तो. ३७:११; यश. २६:१९; होशे. १३:१४.

५, ६. अब्राहाम आणि त्याच्या कुटुंबाने कोणत्या आशेवर आपलं लक्ष केंद्रित केलं? त्यांनी आपला विश्‍वास कसा मजबूत केला? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

५ इब्री लोकांस ११:१३ या वचनात विश्‍वासू सेवकांबद्दल असं म्हटलं आहे: “हे सर्व जण विश्‍वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले.” त्यांनी नवीन जगात जाण्याची आशा ठेवली आणि त्यावर मनन केलं. अब्राहाम या विश्‍वासू सेवकांपैकी एक होता. येशूने त्याच्याविषयी असं म्हटलं की अब्राहाम तो काळ “पाहण्यासाठी उल्हासित झाला.” (योहा. ८:५६) सारा, इसहाक, याकोब आणि इतर बऱ्‍याच विश्‍वासू सेवकांनी देवाच्या राज्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं. हे राज्य संपूर्ण पृथ्वीवर शासन करणार होतं. “देवाने योजलेल्या व बांधलेल्या” राज्यावर त्यांचा भरवसा होता.—इब्री ११:८-११.

६ अब्राहाम आणि त्याच्या कुटुंबाने आपला विश्‍वास मजबूत ठेवण्यासाठी काय केलं? ते यहोवाबद्दल शिकत राहिले. काही प्रसंगी यहोवा त्यांच्याशी स्वर्गदूत, दृष्टांत किंवा स्वप्न यांद्वारे बोलला. त्यांनी कदाचित इतर विश्‍वासू सेवकांपासून आणि त्या काळात उपलब्ध असलेल्या प्राचीन लिखाणांपासूनही यहोवाबद्दल माहिती घेतली असेल. यहोवाने दिलेलं अभिवचन अब्राहाम आणि त्याच्या कुटुंबाने नेहमी आठवणीत ठेवलं आणि ते त्याच्यावर मनन करत राहिले. या सर्व गोष्टींचा काय परिणाम झाला? त्यांना खात्री पटली की यहोवा नक्की आपली अभिवचनं पूर्ण करेल. त्यामुळे कठीण प्रसंगांत आणि छळ होत असतानासुद्धा ते देवाला विश्‍वासू राहिले.

७. आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी यहोवाने आपल्याला काय दिलं आहे, आणि आपल्याला काय करण्याची गरज आहे?

७ आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी आपल्याला काय करण्याची गरज आहे? यहोवा भविष्यात काय करणार आहे त्याबद्दल शिकण्यासाठी त्याने आपल्याला बायबल दिलं आहे. जीवनात आनंदी होण्यासाठी काय करण्याची गरज आहे हे त्याने बायबलमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे बायबलचं दररोज वाचन करणं आणि त्यातील सल्ले लागू करणं आपल्या फायद्याचंच आहे. (स्तोत्र १:१-३; प्रेषितांची कृत्ये १७:११ वाचा.) यासोबतच यहोवा आज “विश्‍वासू व बुद्धिमान” दासाद्वारे आपल्याला “यथाकाळी” आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे. (मत्त. २४:४५) देवाच्या प्राचीन काळातील सेवकांप्रमाणेच, आपल्यालाही देवाच्या अभिवचनांचा नियमितपणे अभ्यास करणं आणि त्यांवर खोलवर विचार करणं गरजेचं आहे. यामुळे देवाला एकनिष्ठ राहण्यास आपल्याला मदत होईल. आणि त्याचं राज्य पृथ्वीवर सुरू होईल त्या काळाची आतुरतेनं वाट पाहात राहण्यास आपल्याला प्रेरणा मिळेल.

८. प्रार्थनेमुळे आपला विश्‍वास कसा मजबूत होऊ शकतो?

८ प्राचीन काळातील यहोवाच्या सेवकांना आपला विश्‍वास मजबूत ठेवण्यासाठी आणखी कशामुळे मदत झाली? त्यांनी नेहमी यहोवाला प्रार्थना केली. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की यहोवा आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो, तेव्हा त्यांचा विश्‍वास आणखी वाढला. (नहे. १:४, ११; स्तो. ३४:४, १५, १७; दानी. ९:१९-२१) त्याच प्रकारे आजही जेव्हा आपण पाहतो की यहोवा योग्य वेळी आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो आणि आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्या पुरवतो, तेव्हा आपलाही विश्‍वास मजबूत होतो. (१ योहान ५:१४, १५ वाचा.) पण यासोबतच आपला विश्‍वास मजबूत व्हावा म्हणून आपण यहोवाकडे त्याच्या पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करत राहण्याची गरज आहे.—लूक ११:९, १३.

९. आपण आपल्या प्रार्थनेत कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे?

९ पण जेव्हा आपण यहोवाला प्रार्थना करतो, तेव्हा फक्‍त आपल्याला लागणाऱ्‍या गोष्टीच मागत राहणं योग्य ठरणार नाही. तर आपण प्रार्थनेत दररोज त्याचे आभार मानले पाहिजे आणि त्याची स्तुती केली पाहिजे. कारण त्याने आपल्याला बऱ्‍याच चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. (स्तो. ४०:५) जगभरातील आपल्या बंधुभगिनींसाठीही आपण प्रार्थना केली पाहिजे. उदाहरणार्थ, जे आपल्या विश्‍वासामुळे तुरुंगात आहेत अशांसाठी आपण प्रार्थना करू शकतो. जे बांधव जबाबदाऱ्‍या हाताळतात त्यांच्यासाठीही आपण प्रार्थना केली पाहिजे. यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर कशा प्रकारे देत आहे हे जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपला विश्‍वास आणखी मजबूत होतो आणि त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध आणखी घनिष्ठ होतो.—इब्री १३:३, ७.

ते यहोवाला एकनिष्ठ राहिले

१०. छळाचा धैर्याने सामना करून यहोवाला एकनिष्ठ राहण्यास अनेकांना कशामुळे मदत झाली?

१० इब्री लोकांस पत्राच्या ११ व्या अध्यायात प्रेषित पौलाने म्हटलं: “स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हालहाल सोसले.” (इब्री ११:३५) देवाने ज्या पुनरुत्थानाचं अभिवचन दिलं होतं त्यावर पूर्ण भरवसा असल्यामुळे बरेच सेवक छळाचा सामना करताना यहोवाला एकनिष्ठ राहिले. त्यांना याची पूर्ण खात्री होती की भविष्यात यहोवा त्यांचं पुनरुत्थान करेल आणि मग ते पृथ्वीवर सदासर्वकाळ जीवन जगतील. नाबोथ आणि जखऱ्‍या या सेवकांचा विचार करा. देवाची आज्ञा पाळल्यामुळे त्यांना दगडमार करून मारून टाकण्यात आलं होतं. (१ राजे २१:३, १५; २ इति. २४:२०, २१) दानीएलाला भुकेल्या सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं होतं, तर त्याच्या मित्रांना धगधगत्या अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं होतं. ते मरणाला सामोरे जाण्यास तयार होते, पण त्यांनी यहोवाप्रती असलेली आपली एकनिष्ठता सोडली नाही. या सर्व विश्‍वासू सेवकांना पूर्ण खात्री होती की यहोवा त्यांना त्याचा पवित्र आत्मा देईल आणि छळाचा सामना करण्यासाठी त्यांना नक्की मदत करेल.—दानी. ३:१६-१८, २०, २८; ६:१३, १६, २१-२३; इब्री ११:३३, ३४.

११. आपल्या विश्‍वासामुळे काही संदेष्ट्यांना कोणत्या परीक्षांचा सामना करावा लागला?

११ मीखाया आणि यिर्मयासारख्या बऱ्‍याच संदेष्ट्यांचा छळ करण्यात आला. काहींची थट्टा करण्यात आली तर काहींना तुरुंगात डांबण्यात आलं. एलीयासारख्या इतर सेवकांना “अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून भटकत” राहावं लागलं. या परीक्षांचा सामना करताना हे सर्व सेवक यहोवाला एकनिष्ठ राहिले, कारण त्यांना “आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा” होता.—इब्री ११:१, ३६-३८; १ राजे १८:१३; २२:२४-२७; यिर्म. २०:१, २; २८:१०, ११; ३२:२.

१२. एकनिष्ठ राहण्याच्या बाबतीत सर्वोत्तम उदाहरण कोणी मांडलं, आणि कोणत्या गोष्टीमुळे त्याला परीक्षेचा सामना करण्यास मदत झाली?

१२ येशू ख्रिस्ताने सर्वात मोठ्या परीक्षेचा सामना केला, पण तरीही तो यहोवाला एकनिष्ठ राहिला. त्याला टिकून राहण्यास कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली? पौलाने म्हटलं: “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.” (इब्री १२:२) नंतर पौलाने ख्रिश्‍चनांना सांगितलं की त्यांनी येशूच्या उदाहरणावर बारकाईने “विचार” करावा. (इब्री लोकांस १२:३ वाचा.) पहिल्या शतकातील बऱ्‍याच ख्रिश्‍चनांना यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी येशूप्रमाणे आपला जीव गमवावा लागला. अंतिपा हा त्यांपैकी एक होता. (प्रकटी. २:१३) पहिल्या शतकातील या ख्रिश्‍चनांना प्राचीन काळातील सेवकांप्रमाणे पृथ्वीवर नाही, तर स्वर्गात जाण्याची आशा होती. आणि त्यांना त्यांच्या विश्‍वासूपणाचं बक्षीस मिळालं आहे. (इब्री ११:३५) १९१४ साली येशू राजा बनला, त्याच्या काही काळानंतर मृत पावलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचं स्वर्गातील अमर जीवनासाठी पुनरुत्थान करण्यात आलं. भविष्यात ते संपूर्ण मानवजातीवर राज्य करतील.—प्रकटी. २०:४.

आजच्या काळातील विश्‍वासू सेवकांची उदाहरणं

१३, १४. रुडॉल्फ ग्रेकिन यांनी जीवनात कोणत्या कठीण प्रसंगांचा सामना केला आणि यहोवाला एकनिष्ठ राहण्यास त्यांना कशामुळे मदत झाली?

१३ आज देवाचे लाखो सेवक येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करत आहेत. देवाच्या अभिवचनांवर ते मनन करतात आणि कठीण परीक्षेतही ते त्याला एकनिष्ठ राहतात. रुडॉल्फ ग्रेकिन यांच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. त्यांचा जन्म १९२५ साली जर्मनीमध्ये झाला होता. लहान असताना त्यांच्या आईवडिलांनी बायबलमधील काही वचनांवर आधारित चित्रं घरात लावली होती. त्यांनी म्हटलं: “एका चित्रात असं दाखवलं होतं की लांडगा, कोकरू, चित्त्याचं पिल्लू, वासरू आणि सिंह ही सर्व जणावरं शांतीनं राहत आहेत आणि एक लहान मुलगा त्यांचं नेतृत्व करत आहे.” (यश. ११:६-९) या चित्रामुळे त्यांना नंदनवनात परिस्थिती कशी असेल याबद्दल खोलवर विचार करण्यास मदत झाली. आणि यामुळे त्यांचा विश्‍वास मजबूत झाला. याचा परिणाम असा झाला की जेव्हा बरीच वर्षं नात्झी गुप्तचर पोलिसांनी आणि नंतर उत्तर जर्मनीतील साम्यवादी अधिकाऱ्‍यांनी त्यांचा छळ केला तेव्हा ते यहोवाला एकनिष्ठ राहिले.

१४ रुडॉल्फ यांना इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागला. रॅवेन्सब्रुक नावाच्या छळ छावणीत त्यांच्या आईचा तीव्र तापामुळे मृत्यू झाला. त्यांच्या वडिलांनी एका अशा दस्तऐवजावर सही केली, ज्यात म्हटलं होतं की मी इथून पुढे यहोवाचा साक्षीदार नसणार. पण रुडॉल्फ यांनी या गोष्टीचा परिणाम स्वतःवर होऊ दिला नाही, ते आपल्या विश्‍वासात टिकून राहिले. तुरुंगातून त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी एक विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा केली. नंतर त्यांना गिलियड प्रशालेसाठी आमंत्रित करण्यात आलं. आणि मग प्रशाला झाल्यावर त्यांना चिली या देशात एक विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. तिथं त्यांनी पॅट्‌सी नावाच्या एका मिशनरी बहिणीशी लग्न केलं. पण लग्नाच्या एका वर्षानंतरच त्यांचं लहान बाळ मरण पावलं. त्याच्या काही काळानंतर त्यांनी आपल्या पत्नीलाही मृत्यूमध्ये गमावलं. त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हा त्या फक्‍त ४३ वर्षांच्या होत्या. या सर्व दुःखद प्रसंगांतून जातानाही रुडॉल्फ यहोवाची सेवा करत राहिले. त्यांचं वय झाल्यावर जेव्हा त्यांची तब्येत चांगली नव्हती, तेव्हाही त्यांनी एक वडील व पायनियर म्हणून सेवा केली. १ ऑगस्ट, १९९७ च्या टेहळणी बुरूजमधील पान क्रमांक २०-२५ यांत आपण त्यांची जीवनकथा वाचू शकतो.[1]

१५. छळाचा सामना करत असतानाही यहोवाची आनंदाने सेवा करणाऱ्‍या बंधुभगिनींची काही उदाहरणं सांगा.

१५ आज बरेच बंधुभगिनी तीव्र छळाचा सामना करूनही आनंदाने यहोवाची सेवा करत आहेत. सैन्यात सामील होण्यास नकार दिल्यामुळे एरिट्रिया, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया या ठिकाणी आपले शेकडो बांधव तुरुंगात आहेत. (मत्त. २६:५२) उदाहरणार्थ, आयझॅक, नेगेडी आणि पौलूस हे बांधव एरिट्रियाच्या तुरुंगात मागील २० वर्षांपासून बंद आहेत! त्यांना खूप वाईट रीत्या सतावलं जात आहे. आणि या काळादरम्यान त्यांना काहीच करणं शक्य झालेलं नाही. त्यांना आपल्या आईवडिलांची काळजी घेता आली नाही किंवा मग लग्न करून स्वतःचं कुटुंबही सुरू करता आलं नाही. पण तरीसुद्धा ते अजूनही यहोवाला एकनिष्ठ आहेत आणि त्यांचा विश्‍वास भक्कम आहे. त्यांच्या विश्‍वासामुळे आता तुरुंगातील शिपाईही त्यांचा आदर करतात. jw.org या आपल्या वेबसाईटवर त्यांचं चित्र दिलं आहे. चित्रात ते आनंदी दिसतात. त्यांना खूप काही सहन करावं लागत आहे, पण तरीही त्यांनी यहोवाच्या सेवेतील आपला आनंद टिकवून ठेवला आहे.

एक विश्‍वासू वृद्ध बांधव एका कुटुंबाला आपले अनुभव सांगताना

विश्‍वासाच्या बाबतीत अप्रतिम उदाहरण मांडणाऱ्‍यांकडून तुम्ही शिकत आहात का? (परिच्छेद १५, १६ पाहा)

१६. भक्कम विश्‍वास असल्यामुळे तुम्हाला काय करण्यास मदत होईल?

१६ वर उल्लेख केलेल्या बांधवांना ज्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, तशा समस्या बऱ्‍याच बंधुभगिनींच्या जीवनात नाहीत. पण कदाचित त्यांना गरीबी, नैसर्गिक विपत्ती किंवा देशातील युद्धे यांचा सामना करावा लागला असेल. इतर काही जणांनी अब्राहाम, इसहाक, याकोब आणि मोशे यांच्याप्रमाणे यहोवाची सेवा करण्यासाठी जगात मोठं नाव आणि धनसंपत्तीचा त्याग केला असेल. यहोवाची सेवा करताना आनंदी राहण्यासाठी कोणती गोष्ट या बांधवांना मदत करते? यहोवावर असलेलं प्रेम आणि त्याच्या अभिवचनांवर असलेला भरवसा त्यांना आनंदाने सेवा करण्यास मदत करतं. त्यांना खात्री आहे की यहोवा त्याच्या विश्‍वासू सेवकांना नवीन जगात सदासर्वकाळचं जीवन देईल; एका अशा जगात जिथं कोणावरही अन्याय होणार नाही.—स्तोत्र ३७:५, ७, ९, २९ वाचा.

१७. विश्‍वास मजबूत करण्यासाठी तुम्ही काय कराल, आणि पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

१७ या लेखात आपण पाहिलं की “विश्‍वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा” आहे. असा भक्कम विश्‍वास बाळगण्यासाठी आपल्याला यहोवाला प्रार्थना करण्याची आणि त्याच्या अभिवचनांवर मनन करत राहण्याची गरज आहे. असं केल्यास आपल्याला कोणत्याही परीक्षेचा यशस्वी रीत्या सामना करणं शक्य होईल. विश्‍वास बाळगण्यात काय सामील आहे याबद्दल आपण पुढच्या लेखात आणखी माहिती पाहू या.

^ [१] (परिच्छेद १४) २२ एप्रिल २००२ च्या अवेक! मध्ये स्लोवाकियातील आंद्रेज हानाक यांची जीवनकथा पाहा. त्यात त्यांनी परीक्षेच्या वेळी आपला विश्‍वास कसा टिकवून ठेवला याबद्दल सांगितलं आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा