जीवन कथा
चांगल्या उदाहरणांचं अनुकरण करण्याचा अतोनात प्रयत्न
“माझं वय आता किती झालं आहे, याची कल्पना तरी तुम्हाला आहे का?” आयझक मरे यांना मी हा प्रश्न विचारला. तेव्हा मला उत्तर देत ते म्हणाले: “तुमचं वय किती आहे याची मला पूर्ण कल्पना आहे.” आयझक मरे यांनी मला पॅटरसन, न्यूयॉर्क इथून फोन केला होता. त्या वेळी मी कॉलराडो या ठिकाणी राहत होतो. पण, हे संभाषण नेमकं कशामुळे सुरू झालं हे मी तुम्हाला सांगतो.
माझा जन्म १० डिसेंबर १९३६ साली अमेरिकेच्या कॅन्झस इथल्या विचिटा या शहरात झाला. चार भावंडांपैकी मी सर्वात मोठा होतो. माझे आईवडील, व्हिलियम आणि जीन हे दोघंही यहोवाचे विश्वासू सेवक होते. माझे वडील कंपनी सर्व्हंट (मंडळी सेवक) म्हणून काम करायचे. आता कंपनी सर्व्हंटला वडील वर्गाचे संयोजक असं म्हटलं जातं. माझ्या आईला तिच्या आईकडून म्हणजे एमा वॅग्नर हिच्याकडून सत्य मिळालं होतं. माझ्या आजीने बऱ्याच लोकांना सत्य शिकण्यास मदत केली होती. त्यांत गेरट्रूड स्टेले हेदेखील होते. स्टेले यांनी नंतर पोर्तु रिको या ठिकाणी मिशनरी म्हणून सेवा केली.a अनुकरण करण्यासारख्या अशा बऱ्याच आवेशी सेवकांची चांगली उदाहरणं माझ्यासमोर होती.
चांगल्या उदाहरणांमुळे मिळालेली प्रेरणा
माझे वडील रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना मासिकं देताना
एका शनिवारी संध्याकाळच्या वेळी मी आणि माझे वडील रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना वॉचटॉवर आणि कॉन्सोलेशन (आता याला अवेक! असं म्हटलं जातं) ही मासिकं वाटत होतो. त्या वेळी मी पाच वर्षांचा होतो. तेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि अमेरिकेने त्यात सहभाग घेतला होता. माझे वडील मात्र अशा वेळी तटस्थ राहिले होते. मासिकांचं वाटप करत असताना एक डॉक्टर, जो खूप दारू पिलेला होता, आमच्याकडे आला आणि वडिलांवर आरोप करून म्हणू लागला की ते फार भित्रे आहेत आणि युद्धात सहभाग न घेण्यासाठी कारणं देत आहेत. मग तो वडिलांच्या अगदी जवळ आला आणि म्हणाला, “का रे घाबरलास का? हिम्मत असेल तर मार मला?” मी खूप घाबरलो होतो. पण, माझे वडील मात्र शांत राहून तिथं जमा झालेल्या लोकांना मासिकं वाटत राहिले. हे पाहून मला माझ्या वडिलांचं खूप कौतुक वाटलं. त्यानंतर एक सैनिक तिथं आला आणि तो डॉक्टर त्याला ओरडून म्हणाला, “या भित्र्या माणसाचं काहीतरी करा.” त्या सैनिकानं पाहिलं की तो डॉक्टर खूप नशेत आहे आणि म्हणून तो त्याला म्हणाला, “आधी घरी जा आणि शुद्धीवर ये!” मग ते दोघंही तिथून निघून गेले. त्या वेळी धैर्य दाखवण्यासाठी यहोवाने माझ्या वडिलांना जी मदत केली त्यासाठी मी त्याचे खूप आभार मानतो. विचिटा या ठिकाणी आमची दोन न्हाव्याची दुकानं होती. आणि खरंतर तो डॉक्टर माझ्या वडिलांच्या गिऱ्हाईकांपैकीच एक होता!
१९४० च्या दरम्यान माझ्या आईवडिलांसोबत विचिटा इथं अधिवेशनाला जाताना
मी आठ वर्षांचा झालो तेव्हा माझ्या आईवडिलांनी त्यांचं घर आणि दोन्ही दुकानं विकली. आणि त्यांनी असं एक घर बनवलं जे कारला किंवा कोणत्याही वाहनाला जोडून सहज कुठंही घेऊन जाता येत होतं. मग त्यानंतर आम्ही प्रचारकांची जास्त गरज असलेल्या कॉलराडो इथल्या ग्रॅन्ड जंक्शन या ठिकाणी राहायला गेलो. माझे आईवडील पायनियरिंग करायचे आणि अर्धवेळ शेती आणि पशुपालनाचं काम करायचे. यहोवाच्या आशीर्वादांमुळे आणि त्यांनी आवेशानं केलेल्या कार्यामुळे तिथं एक मंडळी तयार झाली. २० जून १९४८ साली मला आणि सत्य स्वीकारलेल्या इतर काही जणांना माझ्या वडिलांनी डोंगराजवळ असलेल्या एका झऱ्यात बाप्तिस्मा दिला. यांमध्ये बिले निखोल्स आणि त्यांची पत्नीदेखील होती. नंतर बिले निखोल्स आणि त्यांच्या पत्नीने तसंच, त्यांच्या मुलाने आणि सुनेनेही विभागीय कार्य केलं.
यहोवाच्या सेवेत स्वतःला झोकून दिलेल्या बऱ्याच लोकांसोबत आमची जवळची मैत्री होती. खासकरून स्टेले कुटुंबासोबत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे डॉन आणि अर्लिन, डेव्ह आणि जुलिया, सी आणि मार्था. आम्ही सर्व सोबत मिळून बायबलवर चर्चा करायचो. अशा प्रकारे चर्चा करणं आम्हाला खूप आवडायचं. त्यांच्या चांगल्या उदाहरणाने माझ्या जीवनावर खूप मोठी छाप पाडली. त्यांच्यामुळे मला हे समजण्यास मदत झाली की जीवनात आनंदी होणं आणि आपल्या जीवनाला खरा अर्थ मिळवणं शक्य आहे. पण, तेव्हाच जेव्हा आपण राज्याच्या कार्यांना आपल्या जीवनात प्रथम स्थानी ठेवतो.
पुढे वाटचाल करताना
मी १९ वर्षांचा होतो तेव्हा आमच्या एका मित्राने, बड हस्टीने मला त्याच्यासोबत अमेरिकेच्या दक्षिण भागात जाऊन पायनियरिंग करण्यासाठी विचारलं. तिथं मग एका विभागीय पर्यवेक्षकाने आम्हाला रस्टन, लुईझियाना या ठिकाणी जाऊन सेवा करण्याचा आर्जव केला. कारण तिथं असलेले बरेच साक्षीदार अक्रियाशील झाले होते. बांधवाने आम्हाला हेदेखील सांगितलं की आम्ही आठवड्यातल्या सर्व सभा चालवाव्यात; मग सभेसाठी कोणीही हजर राहिलं नाही तरीही. आम्ही सभेसाठी एक ठिकाण शोधलं आणि गरजेच्या सर्व गोष्टींची व्यवस्था केली. आम्ही सर्व सभा चालवू लागलो. काही काळासाठी फक्त आम्ही दोघंच सभेला हजर असायचो. आम्ही आळीपाळीने भाग हाताळायचो आणि आमच्यापैकी एक सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायचा. समजा एखाद्या भागात प्रात्यक्षिक असलं, तर आम्ही दोघंही स्टेजवर असायचो आणि श्रोता एकही नाही! मग बऱ्याच दिवसांनंतर एक वयस्कर बहीण सभांना येऊ लागली. त्यानंतर काही बायबल विद्यार्थी आणि अक्रियाशील झालेले बंधुभगिनीदेखील सभांना येऊ लागले. मग शेवटी, तिथं एक मंडळी तयार झाली.
सेवाकार्य करताना एक दिवस मी आणि बड हस्टी, चर्च ऑफ क्राइस्टच्या एका पाळकाला भेटलो. तो आमच्यासोबत ज्या शास्त्रवचनांवर बोलला, ती वचनं मला माहीत नव्हती. झाल्या प्रकारामुळे मी खूप बेचैन झालो आणि या गोष्टीने मला आपल्या विश्वासांबद्दल आणखी खोलवर विचार करण्यास भाग पाडलं. त्यानंतर, मी एक संपूर्ण आठवडा रात्री उशीरापर्यंत अभ्यास केला आणि त्याने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधून काढली. यामुळे, खरंतर यहोवासोबतचा माझा नातेसंबंध मजबूत करण्यासाठी मला मदतच झाली. आता मी कोणत्याही पाळकासोबत चर्चा करण्यास तयार होतो.
यानंतर काही काळातच विभागीय पर्यवेक्षकाने मला अल डोरॅडो, अर्कान्सास इथल्या एका मंडळीत सेवा करण्यासाठी जाण्यास सांगितलं. तिथून मला बऱ्याच वेळा कॉलराडोला ‘ड्राफ्ट बोर्ड’ पुढे हजर राहण्यासाठी जावं लागायचं. कारण ड्राफ्ट बोर्ड ही एक अशी समिती होती जी लष्करी सेवेतून कोणाला सूट दिली जावी आणि कोणाला नाही हे ठरवायची. असंच एकदा इतर काही पायनियरांसोबत कॉलराडोला जाताना टेक्सास या ठिकाणी आमच्या कारचा अपघात झाला. या अपघातात माझ्या कारचं खूप नुकसान झालं. मग आम्ही तिथल्या एका स्थानिक बांधवाला मदतीसाठी फोन केला. त्या बांधवाने आम्हाला त्यांच्या घरी नेलं आणि ते आम्हाला त्यांच्या सभेसाठीदेखील घेऊन गेले. सभेत जेव्हा झालेल्या अपघाताबद्दल घोषणा करण्यात आली, तेव्हा तिथले बांधव आम्हाला मदत करण्यासाठी पुढे आले. त्यांनी आम्हाला काही पैसे मदत म्हणून दिले. अपघातात नुकसान झालेली माझी कार २५ अमेरिकन डॉलरला विकून देण्यासही त्या बांधवाने माझी मदत केली.
आमची विचिटापर्यंत जाण्याचीदेखील सोय झाली. तिथं आमचे जवळचे मित्र इ. एफ. मॅककार्टने, ज्यांना आम्ही डॉक म्हणायचो ते पायनियरिंग करत होते. त्यांची जुळी मुलं, फ्रँक आणि फ्रान्सीस आजही माझे जिवलग मित्र आहेत. त्यांनी त्यांच्याजवळ असलेली एक जुनी कार मला २५ डॉलरला विकली. नुकसान झालेल्या माझ्या कारच्या बदल्यात मला अगदी तेवढेच पैसे मिळाले होते. राज्याला प्रथम स्थानी ठेवल्यामुळे, मला ज्या गोष्टीची गरज होती ती यहोवाने कशा प्रकारे पुरवली हे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवलं. तिथं असताना मॅककार्टने आणि त्यांच्या पत्नीनं माझी भेट एका सुंदर बहिणीशी, बेथेल क्रेनशी घालून दिली. तिची आई रूथ ही वेलिंग्टन, कॅन्झस इथं अगदी आवेशानं पायनियरिंग करत होती. तिच्या वयाच्या ९० वर्षांपर्यंत तिनं पायनियरिंग केली होती. बेथेल क्रेनशी माझी भेट झाली त्याच्या एका वर्षाच्या आतच, म्हणजे १९५८ मध्ये आम्ही लग्न केलं. त्यानंतर सोबत मिळून एल डोराडोमध्ये आम्ही पायनियरिंग करू लागलो.
आम्हाला मिळालेलं खास आमंत्रण
लहानपणापासूनच आम्हा दोघांसमोर जी उत्तम उदाहरणं होती त्यांचं अनुकरण करण्याची आमची इच्छा होती. त्यामुळे, यहोवाच्या संघटनेकडून कोणतीही नेमणूक मिळाली तरी ती स्वीकारण्याची आमची तयारी होती. आम्हाला अर्कान्सासमधील वॉल्नट रिज या ठिकाणी खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. मग १९६२ मध्ये आम्हाला गिलियड प्रशालेच्या ३७ व्या वर्गासाठी निमंत्रित करण्यात आलं. हे निमंत्रण मिळालं तेव्हा आम्हाला खूप आश्चर्य वाटलं आणि खूप आनंद झाला. याच वर्गात डॉन स्टेले हादेखील आहे हे समजल्यावर आमच्या आनंदात आणखीनच भर पडली. प्रशालेतून पदवीधर झाल्यावर मला आणि माझ्या पत्नीला केनियामधील नैरोबी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं. न्यूयॉर्क सोडताना आम्हाला फार वाईट वाटत होतं. पण, जेव्हा आम्ही नैरोबी इथल्या विमानतळावर पोचलो, तेव्हा आम्हाला भेटण्यासाठी आलेल्या बंधुभगिनींना पाहून आम्हाला खूप आनंद झाला.
नैरोबी इथं क्रिस आणि मेरी कॅनैया यांच्यासोबत सेवाकार्य करताना
केनियामध्ये प्रचारकार्याची सुरवात केल्यानंतर लवकरच आम्हाला तिथं सेवा करणं आवडू लागलं. आमच्या बायबल विद्यार्थ्यांपैकी क्रिस आणि मेरी कॅनैया हे पहिलं जोडपं होतं जे साक्षीदार बनलं. ते आताही केनियामध्ये पूर्णवेळेची सेवा करत आहेत. केनियाला जाण्याच्या एका वर्षानंतर आम्हाला युगांडामधील कम्पाला इथं जाण्यासाठी सांगण्यात आलं. त्या देशातील आम्ही पहिले मिशनरी होतो. ते दिवस खूप रोमांचकारी होते. कारण, बरेच लोक बायबलमधील सत्य शिकून घेण्यास उत्सुक होते आणि पुढे ते साक्षीदारदेखील बनले. आफ्रिकेत साडे तीन वर्षं सेवा केल्यानंतर आणि माझी पत्नी गरोदर राहिल्यानंतर आम्ही पुन्हा अमेरिकेला जाण्याचं ठरवलं. न्यूयॉर्क सोडताना आम्हाला जितकं दुःख झालं होतं त्याच्या कितीतरी पटींनी जास्त दुःख आम्हाला आफ्रिका सोडताना झालं. आफ्रिकेतील लोकांवर आमचं प्रेम होतं आणि संधी मिळाली तर तिथं पुन्हा जाण्याची आमची इच्छा होती.
एक नवीन जबाबदारी
आम्ही पश्चिम कॉलराडोमध्ये जिथं माझे आईवडील राहत होते, तिथं राहायला गेलो. तिथं आमच्या पहिल्या मुलीचा, किंबर्लीचा जन्म झाला. याच्या १७ महिन्यांनंतर आमच्या दुसऱ्या मुलीचा म्हणजे स्टेफनीचा जन्म झाला. आईवडील म्हणून आम्हाला जी नवीन जबाबदारी मिळाली होती ती आमच्यासाठी फार महत्त्वाची व खास होती. आमच्या मुलींना सत्य शिकवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. इतरांची आमच्यापुढे जी चांगली उदाहरणं होती, त्यांचं अनुकरण करण्याची आमची इच्छा होती. आईवडिलांच्या चांगल्या उदाहरणाचा मुलांवर खूप मोठा प्रभाव पडू शकतो हे आम्हाला चांगलं माहीत होतं. पण, मुलं मोठी झाल्यावरही यहोवाची सेवा करतच राहतील या गोष्टीची खात्री त्यामुळे मिळत नाही, ही गोष्टदेखील तितकीच खरी आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे माझ्या एका लहान भावाने आणि बहिणीने नंतर सत्य सोडलं होतं. मला आशा आहे की ते पुन्हा त्यांच्यासमोर असलेल्या चांगल्या उदाहरणांचं अनुकरण करून यहोवाकडे परत येतील.
आमच्या मुलींचं संगोपन करणं ही आम्हाला आनंद देणारी अशी एक जबाबदारी होती. कुटुंब या नात्यानं आम्ही नेहमी सोबत वेळ घालवण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न करायचो. आम्ही कॉलराडोमधील ॲस्पेन इथं राहत होतो. या ठिकाणी बर्फ पडतो. त्यामुळे आम्ही स्कीईंग (बर्फावरील खेळाचा एक प्रकार) करण्याचं शिकून घेतलं. आम्ही संपूर्ण कुटुंब सोबत मिळून स्कीईंग करायला जायचो. यामुळे आमच्या मुलींसोबत संवाद साधण्याची चांगली संधी आम्हाला मिळायची. तसंच आम्ही कॅम्पिंग करायलाही जायचो. मग तिथं संध्याकाळच्या वेळी शेकोटी पेटवून आम्ही भरपूर गप्पा मारायचो. आमच्या मुली लहान होत्या पण तरी त्या आम्हाला विचारायच्या, “मोठी झाल्यावर मी काय करू?” आणि “मी कशा प्रकारच्या व्यक्तीशी लग्न करू?” यहोवाबद्दल आमच्या मुलींच्या मनात प्रेम उत्पन्न करण्यासाठी आम्ही होता-होईल तितका प्रयत्न करायचो. आम्ही नेहमी त्यांना पूर्णवेळेच्या सेवेचं ध्येयं ठेवण्याची प्रेरणा द्यायचो आणि स्वतःसारखी ध्येयं असलेल्या व्यक्तीशीच लग्न करणं सुज्ञपणाचं ठरेल असं सांगायचो. तसंच, आम्ही त्यांना हेदेखील समजावण्याचा प्रयत्न केला की लहान वयात लग्न करणं योग्य ठरणार नाही. सहसा आम्ही त्यांना म्हणायचो: “कमीतकमी २३ वर्षांच्या होईपर्यंत तरी लग्न करू नका.”
आमच्या आईवडिलांच्या उदाहरणाचं अनुकरण करत आम्ही कुटुंब मिळून नियमित रीत्या सभांना आणि प्रचारकार्याला जाण्यासाठी मेहनत घ्यायचो. तसंच, काही पूर्णवेळेच्या सेवकांना आम्ही आमच्या घरी राहायला बोलवायचो. यासोबतच, मिशनरी म्हणून सेवा करण्यात आम्हाला किती आनंद मिळायचा याबद्दलदेखील आम्ही नेहमी बोलायचो. कुटुंब मिळून आफ्रिकेला एकदा तरी जावं अशी आमची मनापासून इच्छा होती. आमच्या मुलींनाही ही गोष्ट आवडली.
आम्ही नियमित रीत्या कौटुंबिक अभ्यास करायचो. त्यात आम्ही अशा परिस्थितींबद्दल बोलायचो ज्या परिस्थितींचा आमच्या मुलींना कदाचित शाळेत सामना करावा लागेल. मग त्यावर आम्ही एक नाटक करायचो ज्यांत आमच्या मुली साक्षीदाराची भूमिका घेऊन उत्तरं द्यायच्या. अशा प्रकारे शिकण्यात त्यांना मजा तर वाटायचीच, पण यासोबतच त्यांच्यात आत्मविश्वासही निर्माण व्हायचा. त्या मोठ्या झाल्यानंतर कधीकधी त्यांना कौटुंबिक अभ्यास करण्याचा कंटाळा यायचा. एकदा मी अगदी वैतागून त्यांना म्हटलं की आज आपण अभ्यास करणार नाही, तुम्ही तुमच्या रुममध्ये जा. त्यांना धक्काच बसला आणि त्या अक्षरशः रडू लागल्या. कारण कौटुंबिक अभ्यास करण्याची त्यांची इच्छा होती. तेव्हा आम्हाला जाणवलं की त्यांनी यहोवाबद्दल आनंदानं शिकावं यासाठी आम्ही जी मेहनत घेत आहोत, तिला खरोखर चांगली फळं येत आहेत. जसजसे दिवस सरत गेले, तसतसं अभ्यास करणं त्यांना खूप आवडू लागलं आणि त्या दोघी त्यांच्या मनातील विचार आणि भावना मोकळेपणाने आमच्यासमोर व्यक्त करू लागल्या. कधीकधी तर त्या आम्हाला असंही म्हणायच्या की बायबलमधील एखाद्या शिकवणीशी त्या सहमत नाहीत. तेव्हा आम्हाला खूप चिंता वाटायची. पण, यामुळे खरंतर त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्यास आम्हाला मदत होत होती. मग, त्यांच्यासोबत बायबलच्या आधारावर तर्क केल्यानंतर देवाचे जे स्तर आहेत ते योग्यच आहेत हे त्यांना पटायचं.
आणखी बदलांशी जुळवून घेणं
मुलींना वाढवण्यात वर्षं कशी सरुन गेली हे आम्हाला जाणवलंही नाही. देवाच्या संघटनेच्या मदतीनं आणि मार्गदर्शनानं आम्ही आमच्या मुलींच्या मनात यहोवासाठी प्रेम उत्पन्न करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आमच्या मुलींनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेच पायनियरिंग करण्यास सुरवात केली. त्या वेळी आम्हाला खूप आनंद झाला. स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी काही कौशल्यंही शिकून घेतली. मग त्या आणखी दोन बहिणींसोबत प्रचारकांची जास्त गरज असलेल्या टेनेसीच्या, क्लेवलॅन्ड इथं गेल्या. आम्हाला त्यांची कमी जाणवायची, पण त्यांनी पूर्णवेळेच्या सेवेत स्वतःला झोकून दिलं आहे या गोष्टीचं आम्हाला समाधानही वाटायचं. मग मी आणि माझ्या पत्नीनेही पुन्हा पायनियरिंग करण्यास सुरवात केली. त्यामुळे, कालांतरानं मला पर्यायी विभागीय पर्यवेक्षक म्हणून काम करण्याची आणि अधिवेशनांत जबाबदाऱ्या हाताळण्याची संधी मिळाली.
टेनेसी इथं जाण्याआधी आमच्या मुलींनी इंग्लंडच्या शाखा कार्यालयाला भेट दिली. तेव्हा स्टेफनी तिथं सेवा करणाऱ्या पॉल नॉर्टन या तरुण बांधवाला भेटली. त्या वेळी ती १९ वर्षांची होती. नंतर परत एकदा तिथल्या बेथेलला भेट देताना, किंबर्लीची पॉलसोबत काम करणाऱ्या ब्रायन लेव्हलीनशी भेट झाली. स्टेफनी जेव्हा २३ वर्षांची झाली तेव्हा तिने पॉलसोबत लग्न केलं. त्याच्या पुढच्या वर्षी किंबर्लीने २५ वर्षांची असताना ब्रायनसोबत लग्न केलं. आमच्या म्हणण्यानुसार आमच्या मुलींनी कमीतकमी २३ वर्षांच्या होईपर्यंत लग्न केलं नाही. विवाह सोबती निवडण्याच्या बाबतीत त्यांनी जो योग्य निर्णय घेतला त्यासाठी आम्हाला त्यांचं खूप कौतुक वाटतं.
२००२ साली मलावीच्या शाखा कार्यालयात पॉल, स्टेफनी, किंबर्ली आणि ब्रायन यांच्यासोबत
आमच्या मुलींनी आम्हाला सांगितलं, की आम्ही आणि आमच्या आईवडिलांनी त्यांच्यासमोर जे चांगलं उदाहरण मांडलं आहे, त्यामुळे त्यांना राज्याला प्रथम स्थानी ठेवण्यास फार मदत झाली; अगदी आर्थिक समस्यांचा सामना करतानासुद्धा. (मत्त. ६:३३) १९९८ सालच्या एप्रिल महिन्यात पॉल आणि स्टेफनी यांना गिलियड प्रशालेच्या १०५ व्या वर्गासाठी आमंत्रित करण्यात आलं. त्यानंतर त्यांची नियुक्ती आफ्रिकेतील मलावी या देशात करण्यात आली. त्याच वेळी ब्रायन आणि किंबर्ली यांना लंडनच्या शाखा कार्यालयात सेवा करण्यासाठी बोलावण्यात आलं. आणि नंतर त्यांनाही मलावी या देशातील शाखा कार्यालयात पाठवण्यात आलं. तरुणांनी अशा प्रकारे आपल्या जीवनाचा उपयोग करणं सर्वात उत्तम आहे आणि आमच्या मुलींनी हेच केलं हे पाहून आम्हाला खूप आनंद होतो.
आम्हाला मिळालेलं आणखी एक आमंत्रण
जानेवारी २००१ साली, सुरवातीला मी ज्या फोन कॉलचा उल्लेख केला होता तो मला आला. भाषांतर सेवा विभागाचे पर्यवेक्षक बंधू आयझक मरे यांनी मला सांगितलं की जगभरातील भाषांतरकारांना इंग्रजी साहित्य चांगल्या प्रकारे समजून घेता यावं यासाठी एक अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. आणि हा अभ्यासक्रम कसा शिकवला जावा यासाठी ते मला प्रशिक्षण देणार होते. त्या वेळी मी ६४ वर्षांचा होतो तरीदेखील त्यांनी माझी निवड या कामासाठी केली होती. माझ्या पत्नीने आणि मी याबद्दल प्रार्थना केली. तसंच, माझ्या आणि माझ्या पत्नीच्या आईचं याबद्दल काय मत आहे ते विचारलं. त्या दोघीही खूप वृद्ध झाल्या होत्या आणि नियुक्ती स्वीकारल्यास त्यांना मदत करणं आम्हाला शक्य होणार नव्हतं. पण, तरी आम्ही दोघांनी ही नेमणूक स्वीकारावी अशी त्यांची मनापासून इच्छा होती. मग मी शाखा कार्यालयाला फोन केला आणि सांगितलं की आम्ही ही नेमणूक स्वीकारण्यास तयार आहोत.
माझ्या आईला कॅन्सर असल्याचं आम्हाला त्यानंतर कळलं. तेव्हा मी तिला सांगितलं की आम्ही इथंच थांबून माझ्या बहिणीला, लिंडाला तिची काळजी घेण्यासाठी मदत करू. पण, आईने माझं ऐकलं नाही. ती म्हणाली: “जर तू गेला नाहीस तर मला जास्त दुःख होईल.” मी पॅटरसनला जावं असं लिंडालाही वाटत होतं. आमच्यासाठी इतका मोठा त्याग करण्याची त्यांनी जी तयारी दाखवली त्याची आम्हाला मनापासून कदर वाटते. तसंच, त्या भागातील इतर बंधुभगिनींनीदेखील जी मदत पुरवली त्यासाठीही आम्ही त्यांचे आभारी आहोत. पॅटरसन इथल्या, वॉचटॉवर एज्युकेशन सेंटरला जाण्यासाठी आम्ही निघालो त्याच्या दुसऱ्याच दिवशी लिंडाने आम्हाला फोन करून कळवलं की आईचा मृत्यू झाला आहे. ती जर जिवंत असती तर तिने नक्कीच आम्हाला नवीन नेमणूक चांगल्या प्रकारे पार पाडण्याचं उत्तेजन दिलं असतं. आणि आम्ही तेच करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पूर्ण मन लावून हे काम करू लागलो.
आमची पहिली नेमणूक मलावीच्या शाखा कार्यालयात करण्यात आली. हे समजल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. कारण आमच्या दोन्ही मुली आणि जावई तिथं सेवा करत होते. पुन्हा एकदा सोबत येणं खरंच किती चांगलं होतं! त्यानंतर, आम्ही झिम्बाब्वे आणि मग झांबिया इथल्या भाषांतरकारांना हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी गेलो. भाषांतरकारांना अभ्यासक्रम शिकवण्याच्या नेमणुकीवर साडे तीन वर्षं राहिल्यानंतर आम्हाला पुन्हा मलावीत बोलावण्यात आलं. तिथं ख्रिस्ती तटस्थता राखल्यामुळे ज्या बंधुभगिनींना छळाचा सामना करावा लागला होता, त्यांचे अनुभव लिहिण्याचं काम आम्हाला देण्यात आलं.b
आमच्या नातींसोबत सेवाकार्य करताना
मग २००५ साली जेव्हा आम्हाला पुन्हा आफ्रिका सोडावं लागलं तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटलं. आम्ही पुन्हा कॉलराडोत बासल्ट इथं असलेल्या आमच्या घरी परत आलो आणि आमची पायनियर सेवा सुरू ठेवली. मग २००६ साली किंबर्ली आणि ब्रायन त्यांच्या दोन मुलींचं म्हणजे मॅकेन्झी आणि एलीजाबेथचं संगोपन करण्यासाठी आमच्या शेजारी राहायला आले. पॉल आणि स्टेफनी अजूनही मलावीच्या शाखा कार्यालयात सेवा करत आहेत. पॉल शाखा समितीचा सदस्य या नात्याने सेवा करतो. आता मी जवळजवळ ८० वर्षांचा आहे. ज्या तरुण बांधवांसोबत मी काम केलं होतं ते बांधव, पूर्वी मी ज्या जबाबदाऱ्या हाताळत होतो त्या हाताळतात. हे पाहून मला खूप बरं वाटतं. आमच्या मुलांना आणि नातवंडांना फायदा व्हावा म्हणून आम्ही इतरांनी आमच्यासमोर मांडलेल्या चांगल्या उदाहरणांचं अनुकरण करण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. यामुळे आम्हाला जीवनात खरं समाधान आणि आनंद अनुभवता आला.
a टेहळणी बुरूज (इंग्रजी) १ मे १९५६, पृ. २६९-२७२ आणि १५ मार्च १९७१, पृ. १८६-१९० यांमध्ये स्टेले कुटुंबातील सदस्यांनी मिशनरी या नात्याने केलेल्या सेवेबद्दल माहिती देण्यात आली आहे.
b उदाहरणार्थ, १५ एप्रिल २०१५ च्या टेहळणी बुरूजमधील पृष्ठं १५-१८ वरील ट्रॉफिम आर. नसोम्बा यांची जीवन कथा वाचा.