यहोवावर प्रेम असल्याचं दाखवा
“पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली, म्हणून आपण प्रीती करतो.”—१ योहा. ४:१९.
१, २. यहोवानं आपल्याला त्याच्यावर प्रेम करायला कसं शिकवलं आहे?
एक पिता ज्या सर्वोत्तम मार्गानं आपल्या मुलांना शिकवू शकतो तो आहे त्याचं स्वतःचं उदाहरण. आपल्या मुलांवर प्रेम करण्याद्वारे तो त्यांनाही प्रेम करायला शिकवत असतो. आपला पिता यहोवा याचं आपल्यावर जितकं प्रेम आहे तितकं दुसरं कुणाचंही नाही. “पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली,” म्हणून आपणही प्रेम दाखवायला शिकलो.—१ योहा. ४:१९.
२ पण, यहोवानं कोणत्या मार्गानं आपल्यावर ‘पहिल्यानं प्रेम’ दाखवलं आहे? बायबल म्हणतं: “आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” (रोम. ५:८) पाप आणि मृत्यूपासून आपली सुटका करण्यासाठी प्रेमळ पिता यहोवानं त्याच्या पुत्राला खंडणी म्हणून आपल्याकरता दिलं. या बहुमूल्य देणगीमुळेच यहोवासोबत जवळचं नातं जोडणं आणि त्याच्यावर प्रेम दाखवणं आपल्याला शक्य झालं आहे. अशा प्रकारे मोठा त्याग करण्याद्वारे यहोवानं आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण मांडलं आहे. आणि या उदाहरणातून निःस्वार्थ आणि उदार असण्याद्वारे आपण प्रेम कसं करू शकतो, हे त्यानं आपल्याला शिकवलं आहे.—१ योहा. ४:१०.
३, ४. देवावर आपलं प्रेम आहे हे आपण कसं दाखवतो?
३ प्रेम हा यहोवाचा सर्वात प्रमुख गुण आहे. म्हणूनच येशूनं सर्वात मोठी आज्ञा देत म्हटलं: “तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर.” (मार्क १२:३०) यहोवाची इच्छा आहे की आपण त्याच्यावर “संपूर्ण मनाने” प्रेम करावं. पण, जर आपण दुसऱ्या कोणावर किंवा दुसऱ्या एखाद्या गोष्टीवर यहोवापेक्षा जास्त प्रेम करू, तर त्याला याचं खूप दुःख होईल. तसंच, यहोवावरील आपलं प्रेम केवळ भावनिक स्वरूपाचं नसावं, तर आपण “संपूर्ण बुद्धीने” आणि “संपूर्ण शक्तीने” त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे अशीही अपेक्षा तो आपल्याकडून करतो. म्हणजेच, यहोवावरील आपल्या प्रेमात आपल्या विचारशक्तीचा आणि कार्यांचादेखील समावेश असला पाहिजे.—मीखा ६:८ वाचा.
४ म्हणून, आपल्या सर्व क्षमतांचा आणि आपल्याजवळ असणाऱ्या सर्व गोष्टींचा उपयोग करून आपण यहोवावर प्रेम केलं पाहिजे. जेव्हा आपण त्याला आपल्या जीवनात पहिल्या स्थानी ठेवतो, तेव्हा आपलं त्याच्यावर खरंच खूप प्रेम आहे हे आपण दाखवतो. मागच्या लेखात आपण पाहिलं की यहोवा कोणत्या चार मार्गांनी आपल्यावर त्याचं असीम प्रेम दाखवतो. आणि या लेखात, यहोवावरील आपलं प्रेम आपण आणखी कसं वाढवू शकतो आणि त्याच्यावर प्रेम असल्याचं कसं दाखवू शकतो हे पाहू या.
आपली कृतज्ञता व्यक्त करा
५. यहोवानं आपल्यासाठी जे काही केलं आहे त्यावर विचार केल्यानंतर आपल्याला काय करावंसं वाटतं?
५ तुम्हाला कुणी एखादी भेटवस्तू दिली तर तुम्ही सहसा त्यांचे खूप आभार मानता. आणि तुम्हाला त्या भेटवस्तूची कदर असल्यामुळे तुम्ही तिचा वापरही करता. याकोबानं लिहिलं: “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.” (याको. १:१७) जगण्यासाठीच नव्हे तर आनंदी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी यहोवा आपल्याला पुरवतो. यासाठी आपण खरंच त्याचे किती कृतज्ञ आहोत! यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे याची जाणीव आपल्याला असल्यामुळेच आपणही त्याच्यावर प्रेम करतो. तुम्हालाही असंच वाटतं का?
६. यहोवाचे आशीर्वाद मिळवण्याकरता इस्राएली लोकांना काय करण्याची गरज होती?
६ इस्राएली लोकांना यहोवाकडून अनेक चांगल्या गोष्टी मिळाल्या होत्या. यहोवानं शेकडो वर्षं त्यांचं मार्गदर्शन केलं. यासाठी त्यानं त्यांना नियमशास्त्र दिलं होतं. तसंच, जीवनावश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी त्यांना पुरवल्या होत्या. (अनु. ४:७, ८) यहोवानं दिलेल्या नियमांचं पालन करण्याद्वारे इस्राएली लोक यहोवाला कृतज्ञ असल्याचं दाखवू शकत होते. उदाहरणार्थ, जेव्हा ते यहोवाला बलिदानं अर्पण करायचे तेव्हा त्यांना “आपल्या जमिनीच्या प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग” द्यायचा होता. (निर्ग. २३:१९) इस्राएली लोकांना माहीत होतं की जोपर्यंत ते यहोवाच्या आज्ञा पाळतील आणि आपलं सर्वोत्तम ते त्याला देतील, तोपर्यंत यहोवा त्यांना आशीर्वाद देण्याचं थांबवणार नाही.—अनुवाद ८:७-११ वाचा.
७. आपण आपल्याजवळील मौल्यवान गोष्टींचा उपयोग करून यहोवावर प्रेम असल्याचं कसं दाखवू शकतो?
७ आपणही आपल्याजवळील मौल्यवान गोष्टींचा उपयोग करून यहोवावरील आपलं प्रेम दाखवू शकतो. (नीति. ३:९) असं केल्यानं आपण त्याचा महिमा करत असतो. उदाहरणार्थ, आपण आपल्या मंडळीच्या आणि संपूर्ण जगभरात चाललेल्या राज्याच्या कामाला हातभार लावण्यासाठी अनुदान देऊ शकतो. आपल्याकडे कमी असो किंवा जास्त, त्याचा उपयोग करून आपण यहोवावरील आपलं प्रेम व्यक्त करू शकतो. (२ करिंथ. ८:१२) पण, असे इतरही मार्ग आहेत ज्यांद्वारे आपण यहोवावरील आपलं प्रेम दाखवू शकतो.
८, ९. आपण आणखी कोणत्या मार्गानं यहोवावर प्रेम असल्याचं दाखवू शकतो? माईक आणि त्याच्या कुटुंबानं काय केलं?
८ आपण आपल्या दररोजच्या गरजांसाठी चिंता करत बसण्याऐवजी, राज्याच्या कार्याला आपल्या जीवनात प्रथम स्थानी ठेवलं पाहिजे असं येशूनं शिकवलं. कारण, आपल्या पित्यानं आपल्या गरजा पूर्ण करण्याचं अभिवचन दिलं आहे. (मत्त. ६:३१-३३) आपला यहोवावर पूर्ण भरवसा आहे आणि तो त्याचं अभिवचन पूर्ण करेल हे आपल्याला माहीत आहे. शेवटी, ज्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम करता तिच्यावर तुमचा भरवसा असतोच. खरंतर, आपण यहोवावर जितका जास्त भरवसा करतो तितकंच त्याच्यावर प्रेम असल्याचं दाखवत असतो. (स्तो. १४३:८) तेव्हा, आपण स्वतःला असं विचारलं पाहिजे: ‘मी जी ध्येयं ठेवली आहेत आणि ज्या प्रकारे मी वेळ आणि शक्ती खर्च करतो त्यावरून माझं यहोवावर खरंच प्रेम असल्याचं दिसून येतं का? माझ्या गरजांसाठी मी दररोज यहोवावर विसंबून राहतो का?’
९ याबाबतीत माईक आणि त्याच्या कुटुंबाचं खूप चांगलं उदाहरण आहे. त्यांचा यहोवावर पूर्ण भरवसा होता. तरुण असल्यापासूनच माईकला दुसऱ्या देशात जाऊन प्रचार करण्याची इच्छा होती. पुढं त्याचं लग्न झालं, त्याला दोन मुलंही झाली पण तरी त्याच्या मनात अजूनही तशी इच्छा होतीच. माईक आणि त्याच्या कुटुंबानं जेव्हा गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणाऱ्या बंधुभगिनींबद्दल वाचलं, तेव्हा त्यांनीही आपलं राहणीमान साधं करण्याचं ठरवलं. त्यांनी त्यांचं घर विकलं आणि ते एका लहान घरात राहायला गेले. तसंच, माईकनं त्याच्या व्यवसायाचा व्यापही कमी केला. आणि दुसऱ्या देशात राहून इंटरनेटच्या साहाय्यानं आपल्या कामाची देखरेख कशी करता येईल ते पाहिलं. याचा परिणाम असा झाला की माईक आणि त्याचं कुटुंब दुसऱ्या देशात जाऊन सेवा करू शकलं. त्यांनी तिथं सेवाकार्याचा मनापासून आनंद घेतला. माईक म्हणतो, “मत्तय ६:३३ मधील येशूचे शब्द किती खरे आहेत हे आम्ही अनुभवलंय!”
यहोवा शिकवत असलेल्या गोष्टींवर मनन करा
१०. यहोवाबद्दल आपण जे शिकतो त्यावर मनन करणं फायद्याचं का आहे?
१० दावीद राजानं लिहिलं: “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते.” त्यानं पुढं लिहिलं, “परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांस समंजस करतो.” दाविदानं यहोवाच्या सुज्ञ नियमांवर आणि सुंदर निर्मितीवर मनन केलं, तेव्हा तो यहोवाच्या आणखी जवळ आला आणि त्याच्यावर प्रेम करण्यास प्रवृत्त झाला. तो म्हणाला, “हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत.”—स्तो. १९:१, ७, १४.
११. यहोवा देत असलेल्या ज्ञानाचा वापर करून आपण त्याच्यावरील आपलं प्रेम कसं व्यक्त करू शकतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
११ आज जगात लोकांना उच्च शिक्षण घेण्याचं उत्तेजन दिलं जात आहे. पण, या उच्च शिक्षणामुळे सहसा लोकांचा देवावरील विश्वास आणि प्रेम कमी होत आहे. याउलट, यहोवाची इच्छा आहे की आपण त्याचं ज्ञान घ्यावं. म्हणून तो आपल्याला त्याच्याबद्दल, त्याच्या उद्देशांबद्दल, त्याच्या निर्मितीबद्दल आणि बायबलबद्दल बरंच काही शिकवतो. इतकंच नव्हे, तर समजदार होण्यासाठीही तो आपल्याला मदत करतो. शिवाय, या शिक्षणाचा वापर आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठीदेखील करावा अशी त्याची इच्छा आहे. (नीति. ४:५-७) यहोवाची “इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.” (१ तीम. २:४) म्हणूनच जेव्हा आपण देवाच्या राज्याविषयी आणि ते मानवजातीसाठी जे काही करणार आहे त्याविषयी इतरांना सांगतो, तेव्हा आपण यहोवावरील आपलं प्रेम दाखवत असतो.—स्तोत्र ६६:१६, १७ वाचा.
१२. यहोवाकडून मिळालेल्या भेटवस्तूबद्दल एका बहिणीनं काय म्हटलं?
१२ लहान मुलंदेखील, यहोवा त्यांना जे काही देत आहे आणि शिकवत आहे त्यावर मनन करू शकतात. शॅननचंच उदाहरण घ्या. ती ११ वर्षांची होती आणि तिची बहीण १० वर्षांची होती तेव्हा काय घडलं ते तिला आजही चांगलं लक्षात आहे. ते “ईश्वरी भक्ती” या प्रांतीय अधिवेशनाला गेले होते. अधिवेशनाच्या एका सत्रादरम्यान सर्व लहान मुलांना एका खास ठिकाणी बसण्यासाठी सांगण्यात आलं. त्यात शॅनन आणि तिची बहीणही होती. सुरवातीला ती खूप घाबरली. पण, नंतर जेव्हा त्या सर्वांना तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे हे पुस्तक देण्यात आलं तेव्हा तिला खूप आनंद झाला. ती म्हणते: “त्या वेळी मला याची जाणीव झाली की यहोवा एक खरीखुरी व्यक्ती आहे आणि त्याचं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आपला महान देव यहोवा आपल्याला अशा सुंदर आणि अगदी योग्य भेटवस्तू अगदी सढळपणे देतो, तेव्हा आपल्याला खरंच किती आनंद होतो!”
यहोवाकडून मिळणारी शिस्त स्वीकारा
१३, १४. यहोवा आपल्याला शिस्त लावतो तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असली पाहिजे, आणि का?
१३ बायबल आपल्याला याची आठवण करून देते, की “जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो.” (नीति. ३:१२) आपण जेव्हा यहोवाकडून मिळणारी शिस्त आणि प्रशिक्षण स्वीकारतो, तेव्हा योग्य ते करण्यास आपण शिकत असतो. शिवाय, त्यामुळे आपल्याला खरी शांती मिळते. हे खरं आहे की “कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते.” (इब्री १२:११) असं असलं तरी, जेव्हा यहोवा आपल्याला शिस्त लावतो तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असली पाहिजे? अशा वेळी आपण कधीच यहोवाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणार नाही किंवा आपल्याला मिळालेला सल्ला आपल्याला आवडला नसला तरी आपण वाईट वाटून घेणार नाही. उलट, आपलं यहोवावर प्रेम असल्यामुळे आपण त्याचं ऐकू आणि दिलेल्या सल्ल्यानुसार बदल करण्यास तयार असू.
१४ मलाखीच्या काळात अनेक यहुद्यांनी यहोवाच्या आज्ञांकडे दुर्लक्ष केलं. ते अर्पण करत असलेली बलिदानं यहोवा स्वीकारत आहे की नाही याची त्यांना जराही काळजी नव्हती. त्यामुळे यहोवानं त्यांना अगदी कडक इशारा दिला. (मलाखी १:१२, १३ वाचा.) खरंतर, यहोवानं त्यांना अनेक वेळा ताकीद दिली पण त्यांनी ती ऐकली नाही. त्यामुळे तो त्यांना म्हणाला: “मी तुम्हावर शाप पाठवेन व तुमचे आशीर्वाद शाप करेन.” (मला. २:१, २) यावरून हेच स्पष्ट होतं की आपण जर यहोवाच्या सल्ल्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत राहिलो, तर आपण यहोवासोबतची आपली मैत्री गमावून बसू.
जगात जे लोकप्रिय आहे त्याचा विचार करण्याऐवजी यहोवाची इच्छा काय आहे याचा विचार करा (परिच्छेद १५ पाहा)
१५. आपण कशा प्रकारची विचारसरणी टाळली पाहिजे?
१५ सैतानाचं जग लोकांना घमेंडी आणि स्वार्थी वृत्ती बाळगण्याचं उत्तेजन देतं. बऱ्याच जणांना एखादा सल्ला दिला जातो किंवा सुधारणा करण्यासाठी सांगितलं जातं, तेव्हा त्यांना ते मुळीच आवडत नाही. काही जण सल्ला ऐकतात खरा, पण केवळ ऐकावा लागतो म्हणून. पण, आपण त्यांच्यासारखं विचार करण्याचं टाळलं पाहिजे. बायबल आपल्याला या “युगाबरोबर समरूप होऊ नका,” असा सल्ला देते. म्हणूनच, यहोवाच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत ते आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि नेहमी त्याला आनंदित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (रोम. १२:२) आपल्याला योग्य वेळी सल्ला देण्यासाठी यहोवा त्याच्या संघटनेचा उपयोग करतो. उदाहरणार्थ, आपण विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत कसा व्यवहार करावा, मित्र कसे निवडावेत आणि कोणत्या प्रकारची करमणूक निवडावी याबद्दल आपल्याला नेहमी आठवण करून दिली जाते. आपण जेव्हा यहोवाची शिस्त मनापासून स्वीकारतो आणि त्याचं मन आनंदित करण्यासाठी स्वतःमध्ये बदल करतो; तेव्हा आपल्याला त्याच्या मार्गदर्शनाची कदर आहे आणि आपलं त्याच्यावर खरंच खूप प्रेम आहे हे आपण दाखवत असतो.—योहा. १४:३१; रोम. ६:१७.
मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी यहोवावर विसंबून राहा
१६, १७. (क) एखादा निर्णय घेण्यापूर्वी यहोवाला त्याबद्दल काय वाटतं हे जाणून घेणं महत्त्वाचं का आहे? (ख) इस्राएली लोकांनी यहोवावर अवलंबून राहण्याऐवजी काय केलं?
१६ लहान मुलं सहसा मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी आपल्या पालकांवर अवलंबून असतात. पण, कधीकधी मोठेही आपल्या पालकांची मदत घेतात. आपण स्वतःचे निर्णय स्वतःच घेऊ शकत असलो, तरी आपले पालक आपल्याला चांगला सल्ला देऊ शकतात याची त्यांना जाणीव असते. त्याचप्रमाणे आपला पिता यहोवा आपल्याला स्वतःचे निर्णय घेऊ देतो. पण, यहोवावर आपला भरवसा आणि प्रेम असल्यामुळे आपण नेहमी मदतीसाठी त्याच्यावर अवलंबून राहतो. तसंच, एखादा निर्णय घेण्यापूर्वी यहोवा त्याबद्दल काय विचार करतो हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. आपण जर यहोवावर अवलंबून राहिलो, तर तो आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देईल आणि जे योग्य आहे ते करण्यासाठी आपल्याला मदत करेल.—फिलिप्पै. २:१३.
१७ शमुवेलाच्या काळात पलिष्ट्यांविरुद्ध लढताना इस्राएली लोकांचा पराभव झाला. अशा वेळी पुढे काय करावं हे यहोवाला विचारण्याऐवजी त्यांनी म्हटलं: “आपण शिलोहून परमेश्वराच्या कराराचा कोश येथे आणू या. म्हणजे या लढाईत परमेश्वर आपल्याबरोबर राहील आणि शत्रूपासून आपले संरक्षण करेल.” या निर्णयाचा काय परिणाम झाला? बायबल सांगतं, की “त्यांचा तो दारुण पराभव होता. तीस हजार इस्राएली सैनिक मारले गेले. पलिष्ट्यांनी परमेश्वराच्या कराराचा कोश घेतला.” (१ शमु. ४:२-४, १०, ११, ईझी-टू-रीड व्हर्शन) इस्राएली लोकांना वाटलं, की फक्त कराराचा कोश जरी आपल्यासोबत असला, तरी यहोवा आपल्याला मदत करेल आणि आपलं संरक्षण करेल. खरंतर मदतीसाठी त्यांनी यहोवावर अवलंबून राहायला हवं होतं किंवा त्याची इच्छा काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी करायला हवा होता. पण, याउलट त्यांनी स्वतःला योग्य वाटेल तेच केलं आणि त्याचा भयंकर परिणाम त्यांना सहन करावा लागला.—नीतिसूत्रे १४:१२ वाचा.
१८. यहोवावर विसंबून राहण्याविषयी बायबल काय म्हणतं?
१८ यहोवावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि त्याच्यावर विसंबून असणाऱ्या एका स्तोत्रकर्त्यानं असं लिहिलं: “देवाची आशा धर; तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन. हे माझ्या देवा, माझा जीव आतल्या आत खिन्न झाला आहे, म्हणून . . . मी तुझे स्मरण करतो.” (स्तो. ४२:५, ६) यहोवाबद्दल तुमच्याही भावना अशाच आहेत का? तुम्हालाही त्याच्या अगदी जवळ असल्यासारखं वाटतं का? आणि, त्याच्यावर तुम्ही पूर्ण मनानं भरवसा करता का? यहोवावरील तुमचा भरवसा तुम्ही आणखी वाढवू शकता. कारण बायबल म्हणतं, “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”—नीति. ३:५, ६.
१९. यहोवावर तुमचं मनापासून प्रेम असल्याचं तुम्ही कसं दाखवाल?
१९ आधी यहोवानं आपल्यावर प्रेम दाखवलं आहे आणि त्यामुळेच आपणही त्याच्यावर प्रेम करायला शिकलो. यहोवानं आपल्यासाठी जे काही केलं आहे त्यावर आपण मनन करत राहू या. आणि, त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवू या. तसंच, आपण त्याच्यावर पूर्ण मनानं, जिवानं, बुद्धीनं आणि शक्तीनं प्रेम करतो हेदेखील आपण दाखवून देऊ या.—मार्क १२:३०.