तुमची मेहनत कोणालाही दिसून येत नाही, तेव्हा काय?
बसालेल आणि अहलियाब यांच्यासाठी बांधकामाचं काम काही नवीन नव्हतं. इजिप्तच्या गुलामगिरीत असताना, त्यांना नीट आठवतही नसतील इतक्या विटा त्यांनी तयार केल्या होत्या. पण आता मात्र परिस्थिती बदलली होती. सर्वोच्च अधिपती यहोवा, याच्यासाठी कारागीर म्हणून काम करण्याचा बहुमान त्यांच्यापुढं होता. निवासमंडपाच्या बांधकामात ते पुढाकार घेणार होते. (निर्ग. ३१:१-११) पण अगदी मोजकेच लोक त्यांनी बनवलेल्या अप्रतिम कलाकृतींना पाहू शकणार होते. आपल्या कलाकृतींना काहीच प्रसिद्धी मिळणार नाही या विचारानं मग ते निराश झाले का? आपल्या कलाकृतींना नेमकं कोण पाहणार आहे या गोष्टीनं त्यांना काही फरक पडणार होता का? तुमच्या कामाची कुणी नोंद घेत आहे की नाही यानं तुम्हाला काही फरक पडतो का?
अप्रतिम कलाकृती, पण पडद्याआड!
निवासमंडपातील काही वस्तू कल्पनाही करता येणार नाही इतक्या उत्कृष्ट होत्या. कराराच्या कोशावर असलेल्या सोन्याच्या करूबांचंच उदाहरण घ्या. त्यांची रचना इतकी अप्रतिम होती, की पौलानं त्या करूबांना “गौरवशाली” असं म्हटलं. (इब्री ९:५) घडीव सोन्याच्या त्या कलाकृती किती सुंदर असतील याचा विचार करा!—निर्ग. ३७:७-९.
बसालेल आणि अहलियाब यांनी बनवलेल्या कलाकृती जर आज सापडल्या असत्या, तर त्यांचं स्थान जगप्रसिद्ध संग्रहालयांमध्ये असतं. आणि तिथं असंख्य लोकांनी त्यांच्या कलेची प्रशंसाही केली असती. पण ज्या वेळी त्यांना बनवण्यात आलं, त्या वेळी खूप कमी लोकांनी त्यांचं निरीक्षण करून त्यांची प्रशंसा केली. पण, असं का? कारण, घडीव सोन्याच्या या करूबांना परमपवित्र स्थानात ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे, फक्त महायाजकच त्यांना पाहू शकणार होते. तेदेखील केवळ वर्षातून एकदाच, म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी. (इब्री ९:६, ७) म्हणून, केवळ काही जणच त्यांच्या कलाकृती पाहू शकले.
प्रसिद्धी मिळाली नाही तरी समाधानी
समजा बसालेल आणि अहलियाब यांच्या जागी तुम्ही आहात. आणि त्या अप्रतिम कलाकृती बनवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली आहे. पण केवळ मोजकेच लोक त्या पाहणार आहेत, हे माहीत झाल्यावर तुम्हाला कसं वाटेल? आज लोकांना जेव्हा त्यांच्या अवती-भोवती असणाऱ्यांकडून प्रशंसा मिळते किंवा त्यांचं कौतुक होतं तेव्हा काहीतरी साध्य केल्यासारखं त्यांना वाटतं. कारण बहुतेकांच्या मते एखाद्याच्या कष्टाचं चीज त्याला मिळणाऱ्या प्रशंसेनं होत असतं. पण या बाबतीत यहोवाचे सेवक मात्र वेगळे आहेत. ते लोकांच्या प्रशंसेची अपेक्षा न करता, बसालेल आणि अहलियाबासारखं यहोवाची इच्छा पूर्ण करण्यात आणि त्याची स्वीकृती मिळवण्यात आनंद मानतात.
येशूच्या काळातील धर्मपुढारी सहसा इतर जण प्रभावीत होतील अशा प्रकारे प्रार्थना करायचे. पण प्रार्थनेविषयी येशूचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यानं इतरांकडून प्रशंसा मिळावी या हेतूनं नव्हे, तर खऱ्या मनानं प्रार्थना करण्यास सांगितली. कारण खऱ्या मनानं केलेल्या प्रार्थनांचंच आपला “गुप्तदर्शी पिता” आपल्याला फळ देतो. (मत्त. ६:५, ६) यावरून हेच कळतं, की आपल्या प्रार्थनेविषयी इतरांना काय वाटतं यापेक्षा यहोवाला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या प्रार्थनेचं मोल खरंतर यहोवाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. आपल्या पवित्र सेवेच्या बाबतीतही हीच गोष्ट खरी आहे. आपला पिता “गुप्तदर्शी” असल्यामुळे इतरांना न दिसणाऱ्या गोष्टींचीदेखील तो दखल घेतो. त्यामुळे आपल्या सेवेची खरी किंमत इतरांनी केलेल्या प्रशंसेमुळे नव्हे, तर यहोवाला होणाऱ्या आनंदामुळे ठरते.
बायबल सांगतं की निवासमंडपाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, “दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.” (निर्ग. ४०:३४) यहोवाच्या स्वीकृतीचा हा किती मोठा पुरावा! विचार करा, बसालेल आणि अहलियाब यांना त्या वेळी कसं वाटलं असेल? त्यांच्या हस्तकृतींवर त्यांचं नाव कोरण्यात आलं नसलं; तरी आपल्या मेहनतीवर यहोवाचा आशीर्वाद आहे या जाणिवेमुळे त्यांना किती आनंद झाला असेल! (नीति. १०:२२) पुढंदेखील बरीच वर्षं यहोवाच्या सेवेत त्यांनी बनवलेल्या वस्तूंचा वापर करण्यात येत आहे हे पाहून त्यांना खूप समाधान वाटलं असेल. नवीन जगात जेव्हा बसालेल आणि अहलियाब यांचं पुनरुत्थान होईल, तेव्हा खऱ्या उपासनेसाठी निवासमंडपाचा वापर जवळजवळ ५०० वर्षं करण्यात आला होता हे समजल्यावर त्यांना नक्कीच आनंद होईल.
नम्रतेनं आणि स्वेच्छेनं केलेली तुमची सेवा जरी पडद्याआड असली तरी यहोवा ती पाहतो!
आज यहोवाच्या संघटनेत ॲनिमेशन विभागात, कला विभागात, संगीत विभागात, फोटोग्राफीमध्ये, भाषांतर विभागात आणि लेखन विभागात नेमकं कोण काम करत आहेत याची आपल्याला कल्पना नाही. त्यामुळे एका अर्थानं, ते काय काम करतात हे कोणीच ‘पाहू’ शकत नाही. जगभरात असलेल्या १,१०,००० मंडळ्यांमध्ये होणाऱ्या कामाबद्दलही हेच म्हणता येईल. जसं की, दर महिन्याच्या शेवटी मंडळीचा जमाखर्च पाहणाऱ्या बांधवाला बरीच कागदपत्रं तयार करावी लागतात. मंडळीच्या सचिवाला दर महिन्याला क्षेत्र सेवेचा अहवाल तयार करावा लागतो. तसंच सभागृहाची आवश्यक ती डागडूजी करण्याकरता बरेच बंधुभगिनी हातभार लावत असतात. ही सर्व कामं करत असताना त्यांना कोण पाहतं?
बसालेल आणि अहलियाब यांना त्यांच्या अप्रतिम कलाकृतींसाठी आणि उत्कृष्ट रचनेसाठी, चारचौघात दाखवता येईल अशी कुठल्याही प्रकारची ट्रॉफी, मेडल किंवा पदक मिळालं नाही. पण त्यांना या सगळ्या गोष्टींपेक्षा अतिशय मौल्यवान गोष्ट मिळाली, ती म्हणजे यहोवाची स्वीकृती. आपण या गोष्टीची खात्री बाळगू शकतो की यहोवानं त्यांच्या कामाची दखल घेतली होती. तर मग, त्यांनी दाखवलेल्या नम्रतेचं आणि स्वेच्छेनं केलेल्या कामाचं आपणही अनुकरण करू नये का?