वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 ५/१५ पृ. ३१-३२
  • कॅफेटेरियातल्या सुरळीत कामाचं गुपित—प्रेम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कॅफेटेरियातल्या सुरळीत कामाचं गुपित—प्रेम
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • “यांच्यात तर उभे राहून जेवतात!”
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 ५/१५ पृ. ३१-३२
अधिवेशनातील कॅफेटेरियात एकत्र मिळून आनंदानं काम करणारे स्वयंसेवक

आमच्या संग्रहातून

कॅफेटेरियातल्या सुरळीत कामाचं गुपित—प्रेम

पूर्वीपासूनच यहोवाच्या लोकांसाठी अधिवेशनं हे खास प्रसंग आहेत. कारण, तिथं त्यांना आपल्या बांधवांसोबत मिळून यहोवाच्या मेजावरील आध्यात्मिक अन्‍नाचा आस्वाद घेण्याची संधी मिळते. पण, आध्यात्मिक अन्‍नासोबतच अशा अधिवेशनांमध्ये जेव्हा ते एकत्र मिळून जेवतात तेव्हा त्यांच्या आनंदात आणखीनच भर पडते.

१९१९ च्या सप्टेंबर महिन्यात, अमेरिकेच्या ओहायो राज्यातील सीडर पॉईंट इथं बायबल विद्यार्थ्यांद्वारे आठ दिवसांचं अधिवेशन भरवण्यात आलं होतं. अधिवेशनाला येणाऱ्‍यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय हॉटेलांमध्ये करण्यात आली होती. पण, अपेक्षेपेक्षाही हजारोंच्या संख्येनं जास्त लोक आल्यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्‍यांची मोठी तारांबळ उडाली. त्यांच्यापैकी बहुतेकांनी हात टेकले आणि ते काम सोडून निघून गेले. बांधवांच्या जेवण्याची व्यवस्था पाहणारा मॅनेजरही पेचात पडला. अधिवेशनासाठी आलेले तरुण मदत करू शकतील का, असं त्यानं विचारलं. आणि अनेक जण आनंदानं पुढं आले. सेडी ग्रीन त्यांच्यापैकी एक होती. ती सांगते, “वेटरचं काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. पण, खरंच खूप मजा आली.”

सिएरा लियोनमध्ये एक बहीण स्वयंपाक करताना

सिएरा लियोन, १९८२

पुढील वर्षांत अधिवेशनाच्या ठिकाणीच जेवणाची व्यवस्था केली जाऊ लागली. यामुळे, असंख्य स्वयंसेवकांना आनंदानं आपल्या बांधवांची सेवा करण्याची संधी मिळाली. शिवाय, बांधवांसोबत मिळून काम केल्यामुळे अनेक तरुणांना आध्यात्मिक ध्येयं ठेवण्यास प्रेरणा मिळाली. ग्लॅडिस बोल्टन हिनं १९३७ च्या अधिवेशनात कॅफेटेरियामध्ये (भोजन विभागात) काम केलं. ती म्हणते, “वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या लोकांना भेटण्याची संधी मला मिळाली. त्यांना कोणत्या समस्या आल्या आणि त्यांचा सामना ते कसा करत आहेत हे ऐकायला मिळालं. मला वाटतं, त्याच वेळी पायनियर बनण्याची इच्छा माझ्या मनात पहिल्यांदा डोकावली.”

ब्यूला कोवी हिनंसुद्धा एका अधिवेशनाबद्दल असं म्हटलं, “स्वयंसेवक पूर्ण मन लावून काम करत असल्यामुळे सगळं कसं सुरळीत चालायचं.” खरंतर, या कामात बऱ्‍याच अडचणी होत्या. १९६९ साली कॅलिफोर्नियात लॉस अँजिलीसच्या डॉजर इथं एक अधिवेशन भरवण्यात आलं. तिथं पोचल्यावर ॲन्जेलो मनेरा यांना सांगण्यात आलं की कॅफेटेरियाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ते म्हणतात, “हे ऐकून मला धक्काच बसला!” या अधिवेशनासाठी बरीच तयारी करावी लागली. उदाहरणार्थ, कॅफेटेरियाच्या किचनपर्यंत गॅस लाईन नेण्यासाठी ४०० मीटर लांब खड्डा खोदण्यात आला होता.

जर्मनीतील फ्रँकफुर्ट इथली उकळण्याची भांडी

फ्रँकफुर्ट, जर्मनी, १९५१

१९८२ साली सिएरा लियोनमध्ये कॅफेटेरियाची व्यवस्था करण्यासाठी स्वयंसेवकांनी खूप मेहनत घेऊन आधी सर्व झाडंझुडपं काढून जमीन मोकळी केली. आणि जे काही सामान त्यांना मिळालं त्याचा उपयोग करून त्यांनी कॅफेटेरिया तयार केला. जर्मनीतील फ्रँकफुर्ट इथं १९५१ साली काही बांधवांनी वाफेच्या इंजिनच्या साहाय्यानं एक युक्‍ती लढवली. ४० मोठमोठ्या उकळण्याच्या भांड्यांसाठी या इंजिनच्या वाफेचा वापर करण्यात आला. स्वयंसेवक एका तासात ३०,००० लोकांना जेवण वाढायचे. ५७६ स्वयंसेवक भांडी घासण्याचं काम करायचे. त्यांचं काम हलकं व्हावं म्हणून अधिवेशनात येणारे बांधव स्वतःचे काटे-चमचे आणायचे. म्यानमारच्या यांगोनमध्ये, इतर देशांतून आलेल्या बांधवांना त्रास होऊ नये म्हणून, स्वयंपाक करणाऱ्‍यांनी मुद्दाम जेवणात कमी मसाले वापरले.

“यांच्यात तर उभे राहून जेवतात!”

१९५० मध्ये अमेरिकेत झालेल्या अधिवेशनात कॅफेटेरियाच्या लांब रांगेत, कडक उन्हात उभं असताना ॲनी पॉगेन्सी हिला एक चांगला अनुभव आला. ती सांगते, “बोटीनं युरोपहून आलेल्या दोन बहिणींचं बोलणं ऐकण्यात मी अगदी गुंग झाले. त्यांचं बोलणं ऐकून मला खूप प्रोत्साहन मिळालं.” यहोवानं त्यांना अधिवेशनाला यायला कशी मदत केली होती हे त्या एकमेकींना सांगत होत्या. ॲनी म्हणते, “अधिवेशनात त्यांच्याइतकं आनंदी दुसरं कुणीच दिसत नव्हतं. उन्हातान्हात त्या लांब रांगेत उभं राहण्याचं त्यांना काहीच वाटत नव्हतं.”

कोरियातील सोल इथं उभे राहून जेवत असताना

सोल, कोरिया, १९६३

अनेक मोठ्या आधिवेशनांत, उभं राहून जेवता येईल इतक्या उंचीचे टेबल कॅफेटेरियात लावण्यात यायचे. यामुळे, लवकरात लवकर आपलं जेवण आटपून इतरांसाठी जागा मोकळी करण्यास मदत व्हायची. असं केल्यामुळेच तर जेवणाच्या सुट्टीत त्या हजारो लोकांना जेवण पुरवणं शक्य झालं. साक्षीदार नसलेल्या एका व्यक्‍तीनं म्हटलं, “हा असा कसा धर्म आहे? यांच्यात तर उभे राहून जेवतात!”

इतकं मोठं काम अगदी सुरळीतपणे होत आहे हे पाहून लष्करी आणि सरकारी अधिकाऱ्‍यांना खूप नवल वाटलं. अमेरिकेचे लष्करी अधिकारी, न्यूयॉर्कमधील यांकी स्टेडियमच्या कॅफेटेरियाची पाहणी करण्यासाठी आले. यानंतर त्यांनी ब्रिटिश वॉर डिपार्टमेंटचे, मेजर फॉक्नर यांनाही साक्षीदारांच्या एका कॅफेटेरियाला भेट देण्यास सुचवलं. त्यामुळे, मेजर फॉक्नर आणि त्यांची पत्नी १९५५ साली इंग्लंडच्या ट्‌विकनहॅममध्ये झालेल्या “ट्रायम्फंट किंग्डम” अधिवेशनात गेले. तिथलं सगळं काम पाहून ते म्हणाले, की सर्व जण प्रेमापोटी काम करत असल्यामुळेच हे सारं इतकं सुरळीत चाललं आहे.

अनेक दशकांपर्यंत, स्वयंसेवक अधिवेशनात आपल्या बांधवांना कमी पैशांत पौष्टिक अन्‍न पुरवत होते. यामुळे, बांधवांना फायदा झाला हे खरं आहे. पण, या कामाचा व्याप फार मोठा होता. आणि त्यासाठी फार मोठ्या संख्येनं स्वयंसेवकांना तास न्‌ तास मेहनत करावी लागायची. शिवाय, अधिवेशनातील कार्यक्रमाचा काही भाग किंवा कधीकधी तर पूर्ण कार्यक्रमच त्यांना चुकवावा लागायचा. या सगळ्या समस्या टाळण्यासाठी १९७० च्या दशकात शेवटीशेवटी जेवण पुरवण्याच्या व्यवस्थेमध्ये काही फेरबदल करण्यात आले. पुढे, १९९५ च्या सुरवातीला बांधवांना सांगण्यात आलं की त्यांनी अधिवेशनाला येताना आपल्यासोबत जेवण आणावं. यामुळे, स्वयंसेवकांना खूप फायदा झाला. त्यांनाही अधिवेशनाच्या कार्यक्रमाचा आणि बांधवांच्या सहवासाचा आनंद घेणं शक्य झालं.a

आपल्या बांधवांची सेवा करण्यासाठी ज्यांनी इतकी मेहनत घेतली त्यांची यहोवा खरंच खूप कदर करतो! कॅफेटेरियात काम करताना अनुभवलेले आनंदी दिवस आठवून आज काही बांधवांना थोडं वाईट वाटत असेल. पण, एक गोष्ट बदललेली नाही. आजही प्रेमच आपल्या अधिवेशनांचं मुख्य वैशिष्ट्य आहे.—योहा. १३:३४, ३५.

a अर्थात अजूनही स्वयंसेवकांना अधिवेशनातील इतर विभागांमध्ये काम करण्यासाठी संधी आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा