वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 ४/१५ पृ. १४-१८
  • अनुकूल आणि प्रतिकूल काळातही मिळालेले आशीर्वाद

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुकूल आणि प्रतिकूल काळातही मिळालेले आशीर्वाद
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • समस्यांना सुरवात
  • यहोवाची प्रेमळ मदत
  • अटक आणि तुरुंगवास
  • कठीण काळातही मिळाले आशीर्वाद
  • पुन्हा चांगले दिवस आले!
  • यहोवा नेहमीच आपली काळजी घेतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • मी यहोवाने दाखवलेल्या मार्गाने चालायचं निवडलं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 ४/१५ पृ. १४-१८

जीवन कथा

अनुकूल आणि प्रतिकूल काळातही मिळालेले आशीर्वाद

ट्रॉफिम आर. नसोम्बा

ट्रॉफिम नसोम्बा

माझा जन्म मार्च १९३० साली मलावीतील नामकुंबे नावाच्या गावात झाला. माझ्या कुटुंबातील सदस्य देवाचे विश्‍वासू सेवक होते. १९४२ साली मीसुद्धा माझं जीवन यहोवाला समर्पित केलं आणि मलावीत असलेल्या अनेक सुंदर नद्यांपैकी एका नदीत माझा बाप्तिस्मा झाला. पौलानं तीमथ्याला असं उत्तेजन दिलं होतं: “वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा.” (२ तीम. ४:२) मागील ७० वर्षांपासून मी हेच करण्याचा प्रयत्न केला आहे.

१९४८ साली नेथन एच. नॉर आणि मिल्टन जी. हेन्शेल मलावीत आले होते. त्यांच्या भेटीमुळे मला यहोवाची पूर्णवेळ सेवा करण्याचं प्रोत्साहन मिळालं. नंतर लिडासी नावाच्या एका बहिणीशी माझी भेट झाली. माझ्याप्रमाणे तिलाही यहोवाची पूर्णवेळ सेवा करण्याची इच्छा होती. १९५० साली आमचं लग्न झालं आणि १९५३ पर्यंत आम्हाला दोन मुलं झाली. आमच्यावर कुटुंबाच्या बऱ्‍याच जबाबदाऱ्‍या होत्या. पण, आम्ही दोघांनी मिळून विचार केला आणि मी सामान्य पायनियरिंग सुरू करण्याचं ठरवलं. दोन वर्षांनंतर मला खास पायनियर म्हणून नियुक्‍त करण्यात आलं.

मलावीतील एक प्रांतीय अधिवेशन

पुढे येणाऱ्‍या संकटांना तोंड देण्यासाठी अधिवेशनांनी आमचं मनोबल वाढवलं

त्यानंतर लवकरच मला विभागीय पर्यवेक्षक या नात्यानं मंडळ्यांना भेटी देण्याचा सुहक्क मिळाला. लिडासीची साथ मिळाल्यामुळे मी कुटुंबाची चांगली काळजी घेण्यासोबतच पूर्णवेळेची सेवादेखील करू शकलो.a पण, खरंतर आम्हा दोघांनाही यहोवाची पूर्णवेळ सेवा करण्याची इच्छा होती. त्यामुळे, आम्ही विचारपूर्वक योजना केल्या आणि मुलांच्या मदतीनं १९६० साली लिडासीही पूर्णवेळेची सेवा करू लागली.

१९६२ साली आम्ही “धैर्यवान प्रचारक” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहिलो. आणि एका वर्षानंतर मलावीमधील ब्लॅन्टायर या शहरात खास अधिवेशन भरवण्यात आलं. त्या अधिवेशनासाठी बंधू हेन्शेल आले होते. अधिवेशनाला १०,००० पेक्षा जास्त जण उपस्थित होते. आज जेव्हा मी त्या खास कार्यक्रमांबद्दल विचार करतो, तेव्हा मला जाणवतं की लवकरच मलावीतील बांधवांवर जी संकटं येणार होती, त्यांसाठी जणू या कार्यक्रमांनी आमचं मनोबल वाढवलं.

समस्यांना सुरवात

शाखा कार्यालयाच्या फाटकाला कुलूप लावताना एक पोलीस कर्मचारी

सरकारनं सेवाकार्यावर बंदी आणली आणि शाखा कार्यालयाच्या मालमत्तेवर कब्जा केला

राजकीय घडामोडींत सहभाग न घेतल्यामुळे १९६४ साली साक्षीदारांचा खूप छळ करण्यात आला. शंभर पेक्षा जास्त राज्य सभागृहांची आणि बांधवांच्या एक हजार पेक्षा जास्त घरांची तोडफोड करण्यात आली. १९६७ साली सरकारनं साक्षीदारांच्या कार्यावर बंदी आणेपर्यंत आम्ही विभागीय कार्य करत होतो. त्यानंतर, सरकारनं शाखा कार्यालयाच्या मालमत्तेवर कब्जा केला, मिशनरींना देशातून काढून टाकलं आणि अनेक साक्षीदारांना तुरुंगात टाकलं. तुरुंगात टाकलेल्या साक्षीदारांत मी आणि लिडासीही होतो. नंतर, जेव्हा आम्हाला सुटका मिळाली तेव्हा आम्ही सावधगिरीनं पुन्हा विभागीय कार्य करू लागलो.

१९७२ साली ऑक्टोबर महिन्यात एके दिवशी ‘मलावी यूथ लीग’ या अतिशय क्रूर राजकीय गटाच्या सदस्यांचा जमाव आमच्या घराच्या दिशेनं येऊ लागला. पण, त्यांच्यापैकी एक जण धावतधावत पुढे आला. ते मला ठार मारणार असल्यामुळे मी कुठंतरी लपून बसावं, असं त्यानं सांगितलं. त्यामुळे, मी माझ्या पत्नीला आणि मुलांना जवळच असलेल्या केळीच्या बागेत लपायला सांगितलं. आणि मी एका मोठ्या आंब्याच्या झाडावर चढलो. त्या जमावानं आमच्या घराची आणि सर्व वस्तूंची नासधूस केली. मी वरून हे सारं पाहत होतो.

जळालेलं घर

राजकीय घडामोडींत सहभाग न घेतल्यामुळे बांधवांची घरं जाळण्यात आली

साक्षीदारांचा होत असलेला छळ वाढतच गेला आणि त्यामुळे हजारो साक्षीदारांनी मलावी सोडलं. आम्ही जून १९७४ पर्यंत मोझंबिक इथं एका छावणीत राहिलो. त्या वेळी लिडासीला आणि मला मोझंबिकमधील डोमवे या ठिकाणी खास पायनियर म्हणून सेवा करण्यास सांगण्यात आलं. १९७५ पर्यंत आम्ही तिथं पायनियरिंग केली. पण, मग तिथल्या सरकारनं आम्हाला मोझंबिक सोडून मलावीत परतण्यास भाग पाडलं. मलावीत अजूनही साक्षीदारांचा छळ सुरूच होता.

परत आल्यानंतर मला लिलोंग्वे या शहरातील मंडळ्यांना भेटी देण्यासाठी नियुक्‍त करण्यात आलं. छळ आणि समस्या असूनही, ज्या विभागांत आम्ही कार्य करत होतो तिथल्या मंडळ्यांमध्ये खूप वाढ झाली.

यहोवाची प्रेमळ मदत

एकदा आम्ही एका गावात आलो. त्या ठिकाणी राजकीय सभा चालली होती. आम्ही यहोवाचे साक्षीदार असल्याचं काही लोकांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी आम्हाला जबरदस्तीनं ‘मलावी यंग पायनियर्स’ या राजकीय गटासोबत बसायला लावलं. आम्ही यहोवाकडे मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी कळकळीनं प्रार्थना केली. सभा झाल्यानंतर त्या लोकांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरवात केली. तेव्हा अचानक एक वृद्ध स्त्री धावत आली आणि ओरडतच त्यांना म्हणाली, “मारू नका. हा माझ्या भावाचा मुलगा आहे. जाऊ द्या त्यांना.” तेव्हा, सभा चालवणाराही म्हणाला, “जाऊ द्या रे त्यांना!” ती स्त्री आमची नातेवाईक नव्हती. त्यामुळे, ती असं का म्हणाली हे आमच्या लक्षात आलं नाही. पण, यहोवाने नक्कीच आमची प्रार्थना ऐकली असेल असं आम्हाला वाटतं.

राजकीय पक्षाचे कार्ड

राजकीय पक्षाचे कार्ड

१९८१ साली पुन्हा एकदा ‘मलावी यंग पायनियर्स’ या गटासोबत आमची गाठ पडली. या वेळी त्यांनी आमच्या सायकली, बॅगा, पुस्तकं इतकंच नाही तर काही महत्त्वाची कागदपत्रंही हिसकावून घेतली. या कागदपत्रांत विभागातील बांधवांबद्दल माहिती होती. आम्ही कसंबसं तिथून निघालो आणि एका वडिलांच्या घरी जाऊन पोचलो. पण, त्या लोकांच्या हाती लागलेल्या कागदपत्रांतील माहितीबद्दल आम्हाला काळजी वाटत होती. कागदपत्रांत त्यांना मलावीतील वेगवेगळ्या ठिकाणांहून मला आलेली बांधवांची पत्रं दिसली. ती पाहून ते घाबरले, कारण मी कोणी मोठा सरकारी अधिकारी असेन असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी लगेच सगळी कागदपत्रं स्थानिक वडिलांना परत केली.

एकदा आम्ही बोटीतून नदी पार करत होतो. त्या बोटीचा मालक राजकीय अधिकारी होता आणि त्याला प्रत्येकाचं ‘राजकीय पक्षाचं कार्ड’ पाहायचं होतं. तो सर्वांची कार्डं तपासत आमच्यापर्यंत पोचणार, इतक्यात त्याच्या लक्षात आलं की बोटीत बसलेला एक जण चोर आहे. पोलीस बऱ्‍याच काळापासून या माणसाच्या शोधात होते. या प्रकारामुळे सगळ्यांचं लक्ष विचलित झालं आणि मालकानं कार्डं तपासायचं सोडून दिलं. या वेळीही यहोवानंच आपल्याला प्रेमळपणे मदत केली आहे, हे आम्हाला जाणवलं.

अटक आणि तुरुंगवास

मलावीत यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर आलेल्या बंदीबद्दल वृत्तपत्रात आलेली ठळक बातमी

१९८४ च्या फेब्रुवारी महिन्यात झांबियामधील शाखा कार्यालयाला अहवाल देण्यासाठी मी लिलोंग्वे शहरात जात होतो. जाताना एका पोलिसाने मला थांबवलं आणि माझी बॅग तपासली. बॅगेत बायबलवर आधारित काही प्रकाशनं सापडल्यामुळे त्याने मला पोलीस ठाण्यात नेलं. तिथं नेल्यानंतर मला मारहाण करण्यात आली. मग त्याने मला दोरीनं बांधून एका खोलीत टाकलं, जिथं चोरांना ठेवण्यात आलं होतं.

दुसऱ्‍या दिवशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्‍यानं मला वेगळ्या खोलीत नेलं आणि मला एका कागदावर सही करायला सांगितलं. त्या कागदावर असं लिहिलं होतं, “मी ट्रॉफिम आर. नसोम्बा इथून पुढे यहोवाचा साक्षीदार नाही. त्यामुळे मला मुक्‍त करण्यात यावं.” मी त्या कागदावर सही करण्यास नकार दिला. मी त्यांना सांगितलं, “तुरुंगात राहायलाच काय, मरण जरी आलं तरी मला पर्वा नाही. मी नेहमी यहोवाचा साक्षीदारच राहीन.” हे ऐकून पोलिसाला खूप राग आला. त्याने टेबलावर आपला हात इतक्या जोरात आपटला की काय झालं हे पाहण्यासाठी दुसऱ्‍या खोलीतून एक पोलीस धावत आला. वरिष्ठ पोलिसाने त्याला सांगितलं, “हा सही करायला तयार नाही. तर मग, मी यहोवाचा साक्षीदार आहे असं याच्याकडून लिहून घ्या. मग याला लिलोंग्वेच्या तुरुंगात पाठवून देऊ या.” दरम्यान मी कुठं आहे याची माझ्या पत्नीला जराही कल्पना नव्हती. चार दिवसांनंतर काही बांधवांनी घडलेला प्रकार तिला सांगितला.

लिलोंग्वेच्या पोलीस ठाण्यात पोलिसांनी मला चांगली वागणूक दिली. तिथला प्रमुख पोलीस अधिकारी म्हणाला: “इथं सगळे कैदी चोर आहेत. पण तू देवाचं काम करत असल्यामुळे तुला कैद करण्यात आलं आहे. म्हणून खास तुझ्यासाठी भात आणला आहे.” नंतर त्याने मला काचेरे नावाच्या तुरुंगात पाठवलं. तिथं मी पाच महिने होतो.

मी त्या तुरुंगात आल्यामुळे तिथला अधिकारी खूप खूश झाला. कारण, मी त्या तुरुंगात “पाळक” म्हणून काम करावं अशी त्याची इच्छा होती. तिथल्या आधीच्या पाळकाला अधिकाऱ्‍यानं म्हटलं, “तुम्ही पुन्हा इथं देवाचं वचन शिकवू नका. कारण तुम्ही चर्चमध्ये चोरी केल्यामुळे तुम्हाला तुरुंगात टाकण्यात आलं होतं.” असं म्हणून अधिकाऱ्‍यानं त्या पाळकाला तिथून घालवलं. त्यानंतर मी दर आठवडी एका सभेत कैद्यांना बायबल शिकवू लागलो.

पुढे माझ्यावर समस्या येऊ लागल्या. तुरुंगाचे अधिकारी मला प्रश्‍न विचारू लागले. मलावीमध्ये किती साक्षीदार आहेत हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. पण, मी त्यांना स्पष्ट उत्तर दिलं नाही. त्यामुळे, त्यांनी मला अगदी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. एकदा, त्यांना आपलं मुख्यालय कुठं आहे हे जाणून घ्यायचं होतं. मी त्यांना उत्तर दिलं, “तुम्ही तर अगदी सोपा प्रश्‍न विचारला आहे. सांगतो मी तुम्हाला.” मी त्यांना सांगितलं की आपल्या मुख्यालयाबद्दल बायबलमध्ये सांगितलेलं आहे. हे ऐकून त्यांना आश्‍चर्य वाटलं. त्यांनी मला विचारलं, “बायबलमध्ये कुठं?”

मी म्हटलं “यशया ४३:१२ मध्ये.” त्यांनी बायबल उघडून ते वचन लक्षपूर्वक वाचलं: “तुम्ही माझे साक्षी आहा व मीच देव आहे असे परमेश्‍वर म्हणतो.” त्यांनी हे वचन तीन वेळा वाचलं. नंतर त्यांनी मला विचारलं, “यहोवाच्या साक्षीदारांचं मुख्यालय अमेरिकेत नसून बायबलमध्ये कसं असू शकतं?” मी त्यांना सांगितलं, “अमेरिकेतील यहोवाचे साक्षीदारसुद्धा त्यांच्या मुख्यालयाचं स्पष्टीकरण याच वचनातून देतात.” मी त्यांना स्पष्ट उत्तर देत नसल्यामुळे, मला लिलोंग्वेच्या उत्तरेकडे असलेल्या झॉलेका नावाच्या तुरुंगात पाठवण्यात आलं.

कठीण काळातही मिळाले आशीर्वाद

मी १९८४ च्या जुलै महिन्यात झॉलेका तुरुंगात आलो. तिथं आधीच ८१ साक्षीदार होते. तुरुंगात कैद्यांची संख्या इतकी जास्त होती की ३०० माणसं झोपल्यावर त्यांचे खांदे एकमेकांना लागायचे. काही काळानं, आम्ही साक्षीदारांनी लहान लहान गटांत एकत्र येऊन दररोज एका शास्त्रवचनाची चर्चा करण्यास सुरवात केली. यामुळे आम्हाला खरोखर खूप उत्तेजन मिळालं.

न्यायचौकशी झाल्यानंतर यहोवाच्या साक्षीदारांना परत नेताना

न्यायचौकशी झाल्यानंतर बांधवांना परत नेताना

१९८४ च्या ऑक्टोबर महिन्यात सर्व साक्षीदारांना कोर्टात नेण्यात आलं. कोर्टानं आम्हाला दोन वर्षं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. आम्हाला पुन्हा पहिल्याप्रमाणेच साक्षीदार नसलेल्यांसोबत ठेवण्यात आलं. पण, तुरुंगाच्या अधिकाऱ्‍यानं सर्वांना सांगितलं, “यहोवाचे साक्षीदार सिगारेट ओढत नाहीत. तेव्हा, पहारेकऱ्‍यांनो त्यांना त्रास देऊ नका. त्यांच्याकडे सिगारेट मागू नका आणि तुमची सिगारेट पेटवण्यासाठी त्यांना विस्तव आणायला पाठवू नका. ते देवाचे लोक आहेत! सर्व यहोवाच्या साक्षीदारांना दिवसातून दोनदा जेवण द्या. कारण, हे लोक काही गुन्हा केल्यामुळे नाही तर बायबलवरील त्यांच्या विश्‍वासांमुळे कैदेत आहेत.”

आमच्या चांगल्या वागणुकीमुळे आम्हाला खूप फायदे झाले. सहसा अंधार पडल्यावर किंवा पाऊस पडत असताना पहारेकरी कैद्यांना बाहेर जाऊ द्यायचे नाहीत. पण, आम्हाला मात्र जाऊ द्यायचे. कारण, त्यांना आमच्यावर पूर्ण भरवसा होता आणि आम्ही पळून जाण्याचा प्रयत्न करणार नाही हे त्यांना माहीत होतं. एकदा, आम्ही बाहेर शेतांत काम करत असताना एका पहारेकऱ्‍याला अस्वस्थ वाटू लागलं. तेव्हा आम्ही त्याला उचलून तुरुंगात आणलं. आमची वागणूक नेहमी चांगली असल्यामुळे पहारेकरी यहोवाची स्तुती करायचे.—१ पेत्र २:१२.

पुन्हा चांगले दिवस आले!

११ मे १९८५ मध्ये मला झॉलेका तुरुंगातून सुटका मिळाली. पुन्हा कुटुंबासोबत एकत्र आल्यानं मला खूप आनंद झाला! त्या कठीण काळात यहोवाने आम्हाला एकनिष्ठ राहण्यास मदत केली यामुळे आम्ही त्याचे खूप आभारी आहोत. आमच्या भावनाही पौलासारख्याच आहेत. त्यानं लिहिलं: “आम्हावर आलेल्या संकटांविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही . . . आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले; फार तर काय, आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हास सांगत होते; आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्‍या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे झाले. त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडवले.”—२ करिंथ. १:८-१०.

राज्य सभागृहासमोर बंधू नसोम्बा आणि त्यांच्या पत्नी लिडासी

२००४ साली राज्य सभागृहासमोर बंधू नसोम्बा आणि त्यांच्या पत्नी लिडासी

कधीकधी खरंच आम्ही जिवंत वाचणार नाही असं आम्हाला वाटायचं. पण, आम्ही नेहमी यहोवाला प्रार्थना करत राहिलो. त्याच्या महान नावाची स्तुती व्हावी म्हणून धैर्य दाखवण्यास, समजदारीनं कार्य करण्यास आणि नम्रता दाखवण्यास मदत करावी अशी विनंती आम्ही यहोवाला करायचो.

यहोवाने आमच्या सेवेवर अनुकूल आणि प्रतिकूल काळातही आशीर्वाद दिले आहेत. लिलोंग्वेमधील नवीन शाखा कार्यालय पाहून आम्हाला खूप आनंद होतो. मलावीत आता १,००० पेक्षा जास्त राज्य सभागृहे आहेत! यहोवाकडून मिळालेल्या या सर्व आशीर्वादांचा विचार केल्यावर हे जणू स्वप्नच आहे असं मला आणि लिडासीला वाटतं!b

a ज्या बांधवांना लहान मुलं आहेत त्यांना आता विभागीय कार्य करण्यासाठी नेमलं जात नाही.

b हा लेख तयार होत असताना बंधू नसोम्बा यांचा मृत्यू झाला. त्यांचं वय ८३ होतं.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा