येशूप्रमाणे तुम्हीही धैर्य व समजदारपणा दाखवाल का?
“त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता; आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता.”—१ पेत्र १:८.
१, २. (क) सदासर्वकाळचं जीवन मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? (ख) आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून चालत राहण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?
आपण ख्रिस्ती बनतो तेव्हा जणू एका प्रवासाला निघतो. जर आपण देवाला विश्वासू राहिलो, तर आपला हा प्रवास सुखरूप पार पडेल आणि आपल्याला सदासर्वकाळचं जीवन मिळेल. येशूनं म्हटलं होतं: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” (मत्त. २४:१३) याचा अर्थ, आपला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी आपण “शेवटपर्यंत” देवाला विश्वासू राहणं गरजेचं आहे; मग तो आपल्या जीवनाचा शेवट असो, किंवा या दुष्ट जगाचा. आणि हा प्रवास पूर्ण होईपर्यंत या जगातील गोष्टींमुळे आपलं लक्ष विचलित होणार नाही याचीही आपण काळजी घेतली पाहिजे. (१ योहा. २:१५-१७) तर मग, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून चालत राहण्यास कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत मिळेल?
२ याबाबतीत आपल्यासमोर असलेलं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे स्वतः येशू. त्यानं जीवनात कशा प्रकारे वाटचाल केली याचं बायबलमधून परीक्षण केल्यास येशू खरोखर कसा होता हे आपल्याला समजेल. शिवाय, त्याच्यावर असलेल्या आपल्या प्रेमात आणि विश्वासातही आणखी भर पडेल. (१ पेत्र १:८, ९ वाचा.) आपण येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालणं गरजेचं आहे, असं प्रेषित पेत्रानं म्हटलं होतं. (१ पेत्र २:२१) जर आपण येशूसारखं होण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला, तर आपल्याला शेवटपर्यंत धीर धरण्यास मदत मिळेल.a याआधीच्या लेखात, आपण येशूसारखं नम्र आणि दयाळू कसं बनू शकतो याविषयी पाहिलं होतं. आणि या लेखात आपण येशूचं धैर्य आणि त्याचा समजदारपणा यांचं अनुकरण कसं करू शकतो याविषयी पाहू या.
येशूचं धैर्य
३. धैर्य म्हणजे काय, आणि आपण ते कसं उत्पन्न करू शकतो?
३ धैर्य ही एक अशी भावना आहे जी आपलं मनोबल वाढवते आणि कठीण प्रसंगांतही टिकून राहण्यास आपल्याला मदत करते. तसंच, धैर्यामुळे जे योग्य आहे त्याची बाजू घेण्यासही आपल्याला साहाय्य मिळतं. कठीण प्रसंग येतात तेव्हा आपलं मन शांत ठेवणं आणि देवाला विश्वासू राहणं धैर्यामुळेच आपल्याला शक्य होईल. देवाचं भय, आशा आणि प्रेम हे गुण आपल्याला धैर्य उत्पन्न करण्यास मदत करतात. कशा प्रकारे? देवाच्या आज्ञा मोडून त्याचं मन दुखवण्याचं भय जर आपल्या मनात असेल, तर आपल्याला माणसांची भीती वाटणार नाही. (१ शमु. ११:७; नीति. २९:२५) यहोवाची अभिवचनं पूर्ण होण्याची आशा बाळगल्यामुळे आपल्याला सध्याच्या संकटांकडे जास्त लक्ष देण्याऐवजी भविष्याकडे लक्ष लावणं शक्य होईल. (स्तो. २७:१४) शिवाय, यहोवावर निःस्वार्थ प्रेम असल्यास, छळ होत असतानाही आपल्याला धैर्य दाखवण्याची प्रेरणा मिळेल. (योहा. १५:१३) देवावर पूर्ण भरवसा ठेवल्यामुळे आणि त्याच्या पुत्राचं अनुकरण केल्यामुळे अशा प्रकारचं धैर्य उत्पन्न करणं आपल्याला शक्य होईल.—स्तो. २८:७.
४. एकदा येशूनं मंदिरात कशा प्रकारे धैर्य दाखवलं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
४ येशूचं धैर्य, तो “मंदिरात गुरुजनांमध्ये बसून” वादविवाद करत असताना दिसून आलं. त्या वेळी तो फक्त १२ वर्षांचा होता. (लूक २:४१-४७ वाचा.) मंदिरात बसलेल्या त्या धर्मपुढाऱ्यांना मोशेच्या नियमशास्त्राविषयी पुष्कळ ज्ञान होतं; शिवाय, लोकांना नियमशास्त्राचं पालन करणं ज्यांमुळे अतिशय कठीण होऊन बसलं होतं, अशा यहुदी परंपरांचंही त्यांना भरपूर ज्ञान होतं. पण, एवढ्या ज्ञानी लोकांशी कसं बोलावं, असा येशूनं विचार केला नाही. उलट, तो निर्भयपणे त्यांना अनेक प्रश्न विचारत राहिला. अर्थात, लहान मुलं सहसा विचारतात तशा प्रकारचे हे प्रश्न नव्हते. तर त्यानं अतिशय खोल आणि अर्थपूर्ण विषयांवर प्रश्न विचारले असावेत; कारण, ते गुरुजनसुद्धा लक्ष लावून त्याचं ऐकत होते. त्यांनी गुंतागुंतीचे प्रश्न विचारून येशूला शब्दांत पकडण्याचा प्रयत्न केला असेल का? जरी त्यांनी असं केलं असेल, तरी त्यांची नक्कीच निराशा झाली असेल. कारण, या गुरुजनांसोबतच, येशूचं बोलणं ऐकत असलेले इतर लोकही “त्याच्या बुद्धीवरून व उत्तरांवरून थक्क झाले” असं अहवालात सांगण्यात आलं आहे. खरोखर, येशूनं किती धैर्यानं देवाच्या वचनातील सत्याचं समर्थन केलं!
५. सेवाकार्य करताना येशूनं कशा प्रकारे धैर्य दाखवलं?
५ सेवाकार्य करतानाही, येशूनं अनेक मार्गांनी धैर्य दाखवलं. उदाहरणार्थ, धर्मपुढारी खोट्या शिकवणींद्वारे लोकांची फसवणूक करत आहेत ही गोष्ट त्यानं उजेडात आणली. (मत्त. २३:१३-३६) तसंच, त्यानं स्वतःवर जगाचा वाईट प्रभाव अजिबात पडू दिला नाही. (योहा. १६:३३) विरोध होत असूनही तो सुवार्ता सांगण्याचं काम करतच राहिला. (योहा. ५:१५-१८; ७:१४) आणि जे मंदिरात व्यापार करण्याद्वारे खरी उपासना दूषित करत होते, त्यांना बाहेर हाकलून येशूनं दोन वेळा मंदिर शुद्ध केलं.—मत्त. २१:१२, १३; योहा. २:१४-१७.
६. पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटल्या दिवशी येशूनं कशा प्रकारे धैर्य दाखवलं?
६ पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटल्या दिवशी येशूनं कशा प्रकारे धैर्य दाखवलं याकडे आता लक्ष देऊ या. यहूदानं आपल्याला धरून देताच पुढे काय काय घडेल याची येशूला पूर्ण कल्पना होती. तरीसुद्धा, शिष्यांसोबत वल्हांडणाचं भोजन करताना येशूनं यहुदाला सांगितलं: “तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक.” (योहा. १३:२१-२७) त्यानंतर, गेथशेमाने बागेत जेव्हा सैनिक येशूला पकडायला आले, तेव्हा आपणच येशू आहोत असं सांगायला त्यानं मागेपुढे पाहिलं नाही. स्वतःचा जीव धोक्यात असूनही, आपल्या शिष्यांना वाचवण्यासाठी त्यानं सैनिकांना म्हटलं, “यांना जाऊ द्या.” (योहा. १८:१-८) नंतर, यहुद्यांच्या उच्च न्यायालयात त्याची चौकशी चालली असताना, आपण ख्रिस्त व देवाचा पुत्र असल्याचं त्यानं निर्भयपणे सांगितलं. प्रमुख याजक त्याला मृत्युदंड सुनावण्यासाठी निमित्त शोधत आहे हे माहीत असूनही तो मुळीच घाबरला नाही. (मार्क १४:६०-६५) येशू अगदी शेवटपर्यंत देवाला विश्वासू राहिला आणि धैर्यानं वधस्तंभावरील मृत्यूला सामोरे गेला. शेवटचा श्वास घेताना तो मोठ्यानं ओरडून म्हणाला: “पूर्ण झाले आहे.”—योहा. १९:२८-३०.
येशूसारखे धैर्यवान बना
७. मुलांनो, यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक असण्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं, आणि तुम्ही शाळेत धैर्य कसं दाखवू शकता?
७ आपण कशा प्रकारे येशूसारखं धैर्य दाखवू शकतो? शाळेत: मुलांनो, तुम्ही यहोवाचे साक्षीदार असल्याचं जेव्हा आपल्या वर्गसोबत्यांना आणि इतरांना सांगता तेव्हा तुम्ही धैर्य दाखवत असता. तुम्ही हेही दाखवता की यहोवाच्या नावानं ओळखलं जाण्याचा तुम्हाला अभिमान वाटतो. आणि यामुळे इतरांनी तुमची टिंगल केली तरी तुम्ही पर्वा करत नाही. (स्तोत्र ८६:१२ वाचा.) तसंच, सजीव सृष्टी उत्क्रांतीनं अस्तित्वात आली आहे असं मानण्याचा शाळेत तुमच्यावर दबाव येऊ शकतो. पण, बायबलमध्ये निर्मितीविषयी जे सांगितलेलं आहे ते अगदी खरं आहे हे मानण्याची आपल्याजवळ अनेक कारणं आहेत. तेव्हा, तुमच्या विश्वासांविषयी विचारपूस करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी तुम्ही जीवन की शुरूआत पाँच सवाल—जवाब पाना ज़रूरी या माहितीपत्रकाचा वापर करू शकता.b (१ पेत्र ३:१५) असं केल्यामुळे बायबलमधील सत्याच्या बाजूनं धैर्यानं बोलल्याचं समाधान तुम्हाला मिळेल!
८. धैर्यानं प्रचार करत राहण्यासाठी आपल्याजवळ कोणकोणती कारणं आहेत?
८ सेवाकार्यात: खरे ख्रिस्ती या नात्यानं आपण यहोवाविषयी “निर्भीडपणे” लोकांना सांगितलं पाहिजे. (प्रे. कृत्ये १४:३) आपण सेवाकार्यात धैर्यानं का बोलू शकतो? याचं पहिलं कारण म्हणजे आपण जे काही शिकवतो ते बायबलमधून शिकवतो आणि ते अगदी खरं आहे याची आपल्याला खात्री आहे. (योहा. १७:१७) दुसरं कारण म्हणजे आपण “देवाचे सहकारी” आहोत आणि आपल्याला साहाय्य करण्यासाठी त्यानं त्याचा पवित्र आत्मा दिला आहे. (१ करिंथ. ३:९; प्रे. कृत्ये ४:३१) तिसरं कारण म्हणजे यहोवावर आणि लोकांवर आपलं प्रेम आहे आणि त्यामुळेच त्यांच्यापर्यंत सुवार्ता पोचवण्याचा आपण होताहोईल तितका प्रयत्न करतो. (मत्त. २२:३७-३९) धैर्यवान असल्यामुळेच आपण प्रचार करण्याचं कधीही थांबवणार नाही. उलट, आज धर्मपुढाऱ्यांनी ज्या लोकांना अंधारात ठेवलं आहे किंवा ज्यांची फसवणूक केली आहे, अशांना सत्याविषयी शिकवण्यासाठी आपण खूप उत्सुक आहोत. (२ करिंथ. ४:४) आणि त्यामुळे, लोकांनी आपला संदेश ऐकला नाही किंवा आपला छळ केला तरीसुद्धा आपण सुवार्तेचा प्रचार करतच राहू.—१ थेस्सलनी. २:१, २.
९. जीवनात कठीण प्रसंग येतात तेव्हा आपण धैर्य कसं दाखवू शकतो?
९ कठीण प्रसंग येतात तेव्हा: आपण देवावर भरवसा ठेवल्यास, जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी तो आपला विश्वास मजबूत करेल आणि आपल्याला धैर्य देईल. आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आपण शोक नक्कीच करतो, पण पूर्णपणे खचून जात नाही. कारण “सर्व सांत्वनदाता देव” आपल्याला हे दुःख सहन करण्यास मदत करेल याची खात्री आपल्याला असते. (२ करिंथ. १:३, ४; १ थेस्सलनी. ४:१३) आजारी असल्यामुळे किंवा दुखापत झाल्यामुळे आपल्याला वेदना होत असतील; पण, अशा परिस्थितीतही, आपण देवाला मान्य नसलेले कोणतेही उपचार स्वीकारत नाही. (प्रे. कृत्ये १५:२८, २९) जर आपण निराशेनं पीडित असू, तर कदाचित आपलं मन आपल्याला “दोषी” ठरवत असेल. पण तरीही आपण धैर्य सोडत नाही. कारण जे निराश व दुःखी आहेत त्यांना यहोवा कधीच सोडणार नाही हा भरवसा आपल्याला असतो.c—१ योहा. ३:१९, २०; स्तो. ३४:१८.
येशूचा समजदारपणा
१०. समजदारपणा म्हणजे काय, आणि एक समजदार ख्रिस्ती कशा प्रकारे वागतो व बोलतो?
१० समजदारपणा म्हणजे योग्य आणि अयोग्य यांतला फरक ओळखता येणं आणि मग जे योग्य ते निवडणं. (इब्री ५:१४) एक समजदार ख्रिस्ती असेच निर्णय घेतो, ज्यांमुळे यहोवासोबतचा त्याचा नातेसंबंध आणखी दृढ होऊ शकेल. इतरांशी बोलताना, त्यांचं मन दुखावणार नाही याची तो काळजी घेतो. त्याऐवजी, इतरांना मदत आणि प्रोत्साहन मिळेल अशा रीतीनं बोलून तो यहोवाचं मन आनंदित करतो. (नीति. ११:१२, १३) त्याला “लवकर क्रोध येत नाही.” (नीति. १४:२९) तो “सरळ मार्गाने” वाटचाल करत राहतो, म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तो सुज्ञपणे निर्णय घेतो. (नीति. १५:२१) मग, असा समजदारपणा आपल्यामध्ये यावा म्हणून आपण काय करू शकतो? यासाठी आपण देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यातून जे शिकतो त्याचं पालन केलं पाहिजे. (नीति. २:१-५, १०, ११) समजदारपणा दाखवण्याच्या बाबतीत येशूचं सर्वात उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यामुळे, त्याच्या उदाहरणाचं परीक्षण आणि अनुकरण केल्यास आपल्याला समजदारपणा दाखवायला नक्कीच मदत मिळेल.
११. इतरांशी बोलताना येशूनं समजदारपणा कसा दाखवला?
११ येशूनं त्याच्या वागण्याबोलण्यात नेहमीच समजदारपणा दाखवला. त्याचं बोलणं: इतरांना सुवार्ता सांगताना येशू त्यांच्याशी अतिशय प्रेमळपणे बोलायचा; त्याचं बोलणं ऐकून लोक थक्क व्हायचे. (मत्त. ७:२८; लूक ४:२२) तो सहसा देवाच्या वचनातील शब्द त्यांना वाचून दाखवायचा किंवा त्यांचा उल्लेख तरी करायचा. कोणत्या परिस्थितीत कोणत्या शास्त्रवचनाचा वापर करावा हे त्याला अचूक माहीत होतं. (मत्त. ४:४, ७, १०; १२:१-५; लूक ४:१६-२१) तसंच, तो शास्त्रवचनांचा इतक्या चांगल्या प्रकारे खुलासा करून सांगायचा की ऐकणाऱ्यांच्या मनावर त्यांची खोल छाप पडायची. येशूच्या पुनरुत्थानानंतर, अम्माऊस या ठिकाणी जात असलेल्या दोन शिष्यांशी तो बोलला. त्यानं मशीहाविषयी असलेल्या शास्त्रवचनांचा अर्थ त्यांना स्पष्ट करून सांगितला. त्या शिष्यांनी नंतर असं म्हटलं: “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?”—लूक २४:२७, ३२.
१२, १३. येशू रागीट नव्हता आणि इतरांकडून तो अवाजवी अपेक्षा करत नव्हता हे कोणत्या उदाहरणांवरून दिसून येतं?
१२ त्याच्या भावना आणि त्याची वृत्ती: समजदार असल्यामुळे येशू रागीट नव्हता. (नीति. १६:३२) तो आपल्या भावनांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत होता आणि तो मनानं “सौम्य” होता. (मत्त. ११:२९) शिष्यांमध्ये अनेक दोष असूनही येशू नेहमी त्यांच्याशी सहनशीलपणे वागला. (मार्क १४:३४-३८; लूक २२:२४-२७) तसंच, त्याचा छळ करण्यात आला तेव्हासुद्धा तो शांत राहिला.—१ पेत्र २:२३.
१३ येशू समजदार असल्यामुळे त्यानं कधीही इतरांकडून अवाजवी अपेक्षा केल्या नाहीत. मोशेचं नियमशास्त्र का देण्यात आलं होतं हे त्यानं समजून घेतलं. आणि हे लक्षात ठेवूनच तो इतरांशी वागला. उदाहरणार्थ, “रक्तस्रावाने” पीडित असलेल्या स्त्रीचा विचार करा. (मार्क ५:२५-३४ वाचा.) नियमशास्त्रानुसार, या स्त्रीनं कोणालाही स्पर्श करणं खरंतर चुकीचं होतं. (लेवी. १५:२५-२७) पण, तरीही ती लोकांच्या गर्दीतून येशूजवळ आली आणि त्याच्या कपड्यांना स्पर्श करून आपल्या आजारातून बरी झाली. येशूनं तिला खडसावलं का? नाही, उलट येशूनं “दया व विश्वास” यांसारखे गुण दाखवले. कारण नियमशास्त्राचं काटेकोर पालन करण्यापेक्षा हे गुण दाखवणं जास्त महत्त्वाचं आहे याची त्याला जाणीव होती. (मत्त. २३:२३) येशू अगदी प्रेमळपणे तिला म्हणाला: “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.” खरोखर, समजदारपणामुळे येशू प्रेमळपणे वागण्यास कसा प्रवृत्त झाला याचं हे किती सुंदर उदाहरण आहे!
१४. येशूनं कशा प्रकारची जीवनशैली निवडली आणि सेवाकार्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यानं काय केलं?
१४ त्याची जीवनशैली: येशूनं ज्या प्रकारची जीवनशैली निवडली त्यावरून त्याचा समजदारपणा दिसून आला. त्यानं सेवाकार्याला आपल्या जीवनाचं ध्येय बनवलं होतं. (लूक ४:४३) तसंच, येशूनं जीवनात नेहमी असेच निर्णय घेतले, ज्यांमुळे त्याला या कार्यावर लक्ष केंद्रित करणं आणि ते पूर्ण करणं शक्य झालं. उदाहरणार्थ, सेवाकार्यासाठी जास्तीत जास्त वेळ आणि शक्ती खर्च करता यावी म्हणून येशूनं आपली राहणी अगदी साधी ठेवली. (लूक ९:५८) आपल्या मृत्यूनंतरही प्रचार कार्य सुरू राहावं म्हणून त्यानं इतरांनाही या कार्यासाठी प्रशिक्षित केलं. (लूक १०:१-१२; योहा. १४:१२) शिवाय, “युगाच्या समाप्तीपर्यंत” आपल्या शिष्यांना या कार्यात मदत करण्याचं आश्वासनही त्यानं दिलं.—मत्त. २८:१९, २०.
येशूसारखा समजदारपणा दाखवा
लोकांच्या काळजीचे विषय ओळखा आणि त्यांच्या गरजांनुसार विचारपूर्वक शब्द निवडा (परिच्छेद १५ पाहा)
१५. इतरांशी बोलताना आपण समजदारपणा कसा दाखवू शकतो?
१५ आपण येशूसारखा समजदारपणा कसा दाखवू शकतो? आपलं बोलणं: आपल्या बांधवांशी बोलताना ते निराश होतील अशा प्रकारे नाही, तर त्यांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे आपण त्यांच्याशी बोलतो. (इफिस. ४:२९) विशेषतः देवाच्या राज्याविषयी इतरांशी बोलताना आपले शब्द “मिठाने रुचकर केल्यासारखे असावे,” म्हणजेच, त्यांच्या भावना दुखावणार नाहीत अशा प्रकारे आपण बोललं पाहिजे. (कलस्सै. ४:६) लोकांच्या गरजा आणि त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय कोणते आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे, आणि मग विचारपूर्वक शब्दांची निवड केली पाहिजे. आपण प्रेमळपणे लोकांशी बोललो, तर ते आपलं ऐकून घेण्यास तयार होतील आणि आपला संदेश त्यांना मनापासून आवडेल. तसंच, आपल्या विश्वासांबद्दल समजावून सांगताना जेव्हाही शक्य होईल तेव्हा आपण बायबलमधून वचनं वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण, आपण बायबलच्या आधारावर बोलत आहोत हे त्यामुळे स्पष्ट होईल. शिवाय, आपल्या शब्दांपेक्षा बायबलमधील शब्द जास्त प्रभावी ठरू शकतात हे आपल्याला माहीत आहे.—इब्री ४:१२.
१६, १७. (क) आपण लवकर क्रोधित होत नाही आणि इतरांकडून अवाजवी अपेक्षा करत नाही हे कसं दाखवू शकतो? (ख) सेवाकार्याला जीवनात सर्वात जास्त महत्त्व आपण कशा प्रकारे देऊ शकतो?
१६ आपल्या भावना आणि वृत्ती: समजदारपणामुळे आपल्याला तणावपूर्ण परिस्थितीत आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास आणि लवकर क्रोधित न होण्यास मदत मिळते. (याको. १:१९) इतर जण आपलं मन दुखावतात तेव्हा ते अशा प्रकारे का वागले असावेत, हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. असं केल्यास, त्यांना क्षमा करणं आपल्याला सोपं जाईल आणि आपण त्यांच्याविरुद्ध मनात राग बाळगणार नाही. (नीति. १९:११) तसंच समजदारपणा आपल्याला इतरांकडून अवाजवी अपेक्षा न करण्यास मदत करेल. मंडळीतील आपले बहीणभाऊ कधीच चुकणार नाहीत अशी अपेक्षा आपण करणार नाही. उलट, त्यांच्या जीवनात काही समस्या असू शकतील आणि त्या पूर्णपणे समजून घेणं आपल्याला शक्य नाही हे आपण आठवणीत ठेवू. इतरांची मतं ऐकून घेण्यास आपण तयार असू. आणि जेव्हाही शक्य असेल तेव्हा आपण स्वतःच्या मतांवर अडून न राहता इतरांच्या इच्छेला मान देऊ.—फिलिप्पै. ४:५.
१७ आपली जीवनशैली: सुवार्तेचा प्रचार करणं हा आपल्याला मिळालेला सर्वात मोठा बहुमान आहे. म्हणूनच, आपण नेहमी असेच निर्णय घेऊ इच्छितो, ज्यांमुळे या कार्याला जीवनात सर्वात जास्त महत्त्व देणं आपल्याला शक्य होईल. यहोवा देवाला आपण जीवनात सर्वात वरचं स्थान देतो. तसंच, अंत येण्याआधी सुवार्तेच्या प्रचारात जास्तीत जास्त वेळ व शक्ती खर्च करता यावी, म्हणून आपण आपली राहणी साधी ठेवण्याचा प्रयत्न करतो.—मत्त. ६:३३; २४:१४.
१८. सार्वकालिक जीवनापर्यंतच्या प्रवासात पुढे वाटचाल करत राहणं आपल्याला कशामुळे शक्य होईल, आणि तुम्ही कोणता निश्चय केला आहे?
१८ खरंच, येशूच्या काही सुरेख गुणांबद्दल या दोन लेखांतून माहिती घेणं किती आनंददायक होतं! त्याच्या इतर गुणांचंही परीक्षण करून त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला आणखी किती फायदा होऊ शकेल याची कल्पना करा! तेव्हा, आपण येशूच्या गुणांचं अनुकरण करत राहण्याचा दृढ निश्चय करू या. असं केल्यास सार्वकालिक जीवनापर्यंतच्या प्रवासात पुढे वाटचाल करत राहणं आपल्याला शक्य होईल. तसंच, यहोवासोबतचा आपला नातेसंबंधही आणखी घनिष्ठ होईल.
a पहिले पेत्र १:८, ९ यातील शब्द खरंतर स्वर्गातील जीवनाची आशा असलेल्या ख्रिश्चनांसाठी लिहिण्यात आले होते. पण, पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा असलेल्या ख्रिश्चनांनाही पेत्राचे हे शब्द लागू होऊ शकतात.
b यासंदर्भातील उपयोगी माहितीसाठी टेहळणी बुरूज १५ ऑक्टोबर २०१३ अंकात, पृष्ठे ७-११ वरील “सृष्टी देवाच्या अस्तित्वाची साक्ष देते” हा लेख पाहा.
c कठीण प्रसंगांना तोंड देताना धैर्य दाखवलेल्या काही जणांची उदाहरणं, टेहळणी बुरूज १ डिसेंबर २०००, पृष्ठे २४-२८; सावध राहा! जुलै-सप्टेंबर २००३, पृष्ठे २०-२३; तसंच अवेक! २२ जानेवारी १९९५ पृष्ठे ११-१५ यांत दिलेली आहेत.