पालकांनो—मेंढपाळांप्रमाणे आपल्या मुलांना मदत करा
“तू आपल्या शेरडांमेढरांची स्थिती पाहत जा.”—नीति. २७:२३.
१, २. (क) इस्राएलमधील मेंढपाळ कोणकोणत्या गोष्टी करायचे? (ख) पालकांची तुलना मेंढपाळाशी का करता येईल?
प्राचीन इस्राएलमधील मेंढपाळांचे जीवन सोपे नव्हते. दिवसा त्यांना रणरणत्या उन्हाचा तर रात्री थंडीचा सामना करावा लागायचा. इतकेच नाही, तर त्यांना चोरांपासून व जनावरांपासून आपल्या मेंढरांचे रक्षण करावे लागायचे. मेंढपाळ नेहमीच आपल्या प्रत्येक मेंढराच्या शारीरिक स्थितीकडे लक्ष द्यायचे. त्यांपैकी एखादे मेंढरू आजारी असल्यास किंवा त्याला दुखापत झाल्यास मेंढपाळ त्याची काळजी घ्यायचे. मेंढरांच्या तुलनेत कोकरांकडे कमी ताकद असल्यामुळे मेंढपाळ त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचे.—उत्प. ३३:१३.
२ काही बाबतींत ख्रिस्ती पालकही मेंढपाळासारखेच आहेत. त्यांना मेंढपाळांसारखेच गुण दाखवण्याची गरज आहे. आपल्या मुलांना यहोवाच्या “शिस्तीत व शिक्षणात” वाढवण्याची जबाबदारी पालकांवर सोपवण्यात आली आहे. (इफिस. ६:४) ही जबाबदारी पार पाडणे सोपे आहे का? मुळीच नाही! सैतान आज मुलांवर वाईट विचारांचा भडिमार करत आहे. तसेच, मुलांना त्यांच्या मनात येणाऱ्या चुकीच्या इच्छांशीदेखील झगडावे लागते. (२ तीम. २:२२; १ योहा. २:१६) तुम्ही पालक असाल, तर तुम्ही आपल्या मुलांना मदत कशी करू शकता? मुलांना मदत करण्यासाठी तुम्ही पुढील तीन गोष्टी करू शकता: मुलांना समजून घ्या, त्यांचे पोषण करा आणि त्यांना मार्गदर्शन करा.
मुलांना समजून घ्या
३. आपल्या मुलांची “स्थिती पाहत जा,” याचा काय अर्थ होतो?
३ आपली मेंढरे उत्तम स्थितीत आहेत याची खात्री करण्यासाठी मेंढपाळ प्रत्येकाची जवळून तपासणी करतो. एका अर्थाने पालकदेखील आपल्या मुलांची तपासणी करू शकतात. बायबलमध्ये असे म्हटले आहे: “तू आपल्या शेरडांमेढरांची स्थिती पाहत जा.” (नीति. २७:२३) असे करण्यासाठी मुले कशी वागतात हे पाहण्याची गरज आहे. तसेच, त्यांचे विचार व त्यांच्या भावना जाणून घेणेही गरजेचे आहे. तुम्ही हे कसे करू शकता? असे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मुलांशी नेहमी बोलत राहणे.
४, ५. (क) मुलांनी पालकांशी मोकळेपणाने बोलावे यासाठी पालक कोणती पावले उचलू शकतात? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.) (ख) मुलांनी तुमच्याशी मोकळेपणाने बोलावे यासाठी तुम्ही कोणती पावले उचलली आहेत?
४ काही पालकांचे असे म्हणणे आहे, की मुले जेव्हा किशोरवयीन होतात तेव्हा त्यांच्याशी संवाद साधणे कठीण जाते. किशोरवयीन मुले सहसा आपल्या भावना आणि विचार पालकांसमोर व्यक्त करायला कचरतात. त्यामुळे ते पालकांशी मनमोकळेपणाने बोलत नाहीत. तुमच्या मुलांच्या बाबतीत हे खरे असल्यास, तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता? तुमच्या मुलाशी किंवा मुलीशी गंभीर वातावरणात चर्चा करण्याचे टाळा. त्यांच्याशी खेळीमेळीच्या वातावरणात बोला. (अनु. ६:६, ७) मुलांसोबत एकत्र मिळून काही गोष्टी करण्यासाठी तुम्हाला कदाचित प्रयत्न करावे लागतील. तुम्ही त्यांच्यासोबत फिरायला जाऊ शकता, त्यांच्यासोबत एखादा खेळ खेळू शकता किंवा त्यांच्यासोबत मिळून घरातील एखादे काम करू शकता. असे खेळीमेळीचे वातावरण असल्यास मुलांना आपल्या भावना आणि विचार व्यक्त करायला सोपे जाईल.
५ असे करूनसुद्धा तुमचा मुलगा किंवा मुलगी मनमोकळेपणाने बोलत नसेल तर काय? मग तुम्ही वेगळ्या प्रकारे प्रयत्न करू शकता. उदाहरणार्थ, तुमच्या मुलीला तिचा दिवस कसा गेला असे विचारण्याऐवजी तुमचा दिवस कसा गेला हे तुम्ही तिला सांगू शकता. असे केल्यामुळे कदाचित तीसुद्धा दिवसभरात कायकाय घडले हे सांगण्यास प्रवृत्त होईल. किंवा, एखाद्या विषयावर तुमच्या मुलीचे विचार जाणून घेण्यासाठी तुम्ही तिला पुढील प्रश्न विचारू शकता: “या विषयाबद्दल तुझ्या मैत्रिणींना काय वाटतं?” त्यानंतर ती तिच्या मैत्रिणींना याबद्दल कोणता सल्ला देईल हेही तुम्ही विचारू शकता.
६. मुलांचे ऐकून घेण्यास तयार असणे आणि मनमिळाऊ असणे याचा काय अर्थ होतो?
६ पालकांची इच्छा असते की मुलांनी आपल्या भावना व विचार त्यांच्यासमोर व्यक्त करावेत. पण यासाठी पालकांनी त्यांचे ऐकून घेण्यास नेहमी तयार असले पाहिजे व स्वभावाने मनमिळाऊ असले पाहिजे. पालकांजवळ मुलांशी बोलायला वेळच नसेल तर किशोरवयीन मुले आपल्या समस्या कधीच त्यांना सांगणार नाहीत. तसेच, मनमिळाऊ असण्याचा काय अर्थ होतो? मनमिळाऊ असण्यात “तू माझ्याशी कधीही येऊन बोलू शकतोस,” इतकेच बोलणे पुरेसे नाही. तर तुम्ही मुलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणार नाही किंवा त्यांचे ऐकून लगेच चिडणार नाही याची जाणीव तुमच्या मुलांना झाली पाहिजे. तुम्हाला मुलांच्या समस्या ऐकून घेण्याची इच्छा आहे हे मुलांना तुमच्या वागण्यातून दिसून आले पाहिजे. बरेच पालक या बाबतीत चांगले उदाहरण मांडतात. एकोणीस वर्षांची केएला असे म्हणते: “मी माझ्या बाबांशी कोणत्याही विषयावर बोलू शकते. ते माझं बोलणं कधीच तोडत नाहीत आणि लगेच मला रागवत नाहीत. ते माझं बोलणं पूर्ण ऐकून घेतात. त्यानंतर ते नेहमी मला चांगला सल्ला देतात.”
७. (क) एखाद्या गंभीर विषयावर बोलताना पालक समजूतदारपणा कसा दाखवू शकतात? (ख) पालकांच्या कोणत्या वागणुकीमुळे कदाचित मुलांना त्यांच्याशी बोलावेसे वाटणार नाही?
७ तुम्हाला तुमच्या मुलांशी एखाद्या गंभीर विषयावर बोलावे लागू शकते. उदाहरणार्थ, विरुद्धलिंगी व्यक्तींसोबतची वागणूक. अशा विषयांवर बोलताना फक्त धोक्याचे इशारे देऊ नका, तर या गोष्टी हाताळण्याचे योग्य मार्ग काय आहेत हे त्यांना शिकवा. पुढील उदाहरणावर विचार करा: कल्पना करा की तुम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला गेला आहात. तुम्ही जेव्हा तेथील मेन्यूकार्ड पाहता, तेव्हा त्यावर पदार्थांविषयीच्या माहितीऐवजी जेवणातून होणाऱ्या विषबाधेसंबंधी सूचनाच देण्यात आल्या आहेत असे तुम्हाला दिसते. ते वाचून तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हाला मुळीच तेथे जेवावेसे वाटणार नाही. तुमच्या मुलांची प्रतिक्रियादेखील अशीच असू शकते. मुले तुमच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन येतात तेव्हा जर तुम्ही त्यांच्यासमोर कडक शब्दांतील सूचनांचे “मेन्यूकार्ड” ठेवले तर त्यांना नक्कीच तुमच्याशी बोलावेसे वाटणार नाही. (कलस्सैकर ३:२१ वाचा.) त्याऐवजी मुलांच्या समस्या समजून घ्या. एमिली नावाची एक तरुण बहीण म्हणते की जेव्हा तिचे आईबाबा विरुद्धलिंगी व्यक्तींशी कसे वागावे यासंबंधी तिच्याशी बोलतात, तेव्हा ते फक्त नकारात्मक गोष्टींवर भर देत नाहीत. त्याऐवजी ते विषयाच्या दोन्ही बाजू तिला समजावून सांगतात. यामुळे तिला त्यांच्यापासून काहीही लपवून ठेवावेसे वाटत नाही.
८, ९. (क) मुलांचे बोलणे पूर्ण ऐकून घेण्याचे कोणकोणते फायदे आहेत? (ख) मुलांचे ऐकून घेतल्यामुळे तुम्हाला कसा फायदा झाला आहे?
८ वर उल्लेख केलेल्या केएलाच्या आईवडिलांप्रमाणे मनमिळाऊ बनण्यासाठी तुम्ही मुलांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले पाहिजे. (याकोब १:१९ वाचा.) एकटी पालक असलेली केटिया असे म्हणते: “आधी मी माझ्या मुलीचं बोलणं पूर्ण ऐकून घेत नव्हते. ती बोलत असताना मी तिला मध्येच तोडायचे. कदाचित, थकल्यामुळे मला तिचं ऐकायची इच्छा नसायची किंवा मला तिनं काही सांगू नये असं मला वाटायचं. पण, मी माझ्यात खूप बदल केला, यामुळे माझ्या मुलीनंही स्वतःत बदल केला. आता ती माझं ऐकते व मला समजून घेते.”
समजून घेण्यासाठी त्यांचे ऐकून घ्या (परिच्छेद ३-९ पाहा)
९ रेनल्ड नावाच्या वडिलांनाही आपल्या किशोरवयीन मुलीबद्दल असाच अनुभव आला. ते असे म्हणतात: “तिनं मला जेव्हा सांगितलं की शाळेतील एका मुलावर तिचं प्रेम आहे, तेव्हा मी खूप चिडलो. पण, यहोवा आपल्या सेवकांसोबत धीराने वागतो, त्यांना समजून घेतो याचा मी विचार केला, तेव्हा मला वाटलं की तिला सुधारण्याआधी मी तिला तिच्या भावना व्यक्त करू दिल्या पाहिजेत. मी तसं केलं म्हणून खूप बरं झालं. आयुष्यात पहिल्यांदा मी माझ्या मुलीच्या भावना समजून घेतल्या. तिचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतल्यावर प्रेमळपणे तिच्याशी बोलायला मला सोपं गेलं. मला वाटलं नव्हतं की ती माझं ऐकून त्यानुसार वागेल, पण तिनं तसं केलं. स्वतःत बदल करण्याची तिनं मनापासून इच्छा दाखवली.” आपल्या मुलांशी तुम्ही जर सतत बोलत राहिला तर त्यांच्या भावना व त्यांचे विचार तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेता येतील. यामुळे जीवनात योग्य निर्णय घेण्यास तुम्ही मुलांना मदत करू शकाल.a
मुलांचे पोषण करा
१०, ११. मुलांनी चुकीचा मार्ग निवडू नये म्हणून तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता?
१० चांगल्या मेंढपाळाला याची जाणीव असते की एखादे मेंढरू कळपापासून दूर भरकटत जाऊ शकते. कदाचित थोड्या अंतरावर असलेले हिरवे गवत पाहून एखादे मेंढरू त्या दिशेने जाईल. मग, आणखी गवत पाहून परत थोडे पुढे जाईल. अशा प्रकारे हळूहळू ते मेंढरू कळपापासून दूर जाते. याच प्रकारे तुमचा मुलगा किंवा मुलगी हळूहळू भरकटत जाऊ शकते. मुले असा एखादा मार्ग निवडू शकतात ज्यामुळे त्यांची आध्यात्मिकता धोक्यात येऊ शकते. कदाचित वाईट संगत किंवा अश्लील मनोरंजन यांमुळे ते भरकटत जाऊ शकतात. (नीति. १३:२०) तुमच्या मुलांच्या बाबतीत असे घडू नये म्हणून तुम्ही काय करू शकता?
११ मुलांमध्ये अशा काही कमतरता आढळल्यास लगेच पावले उचला. त्यांच्यात असलेले ख्रिस्ती गुण वाढवण्यास त्यांना मदत करा. (२ पेत्र १:५-८) कौटुंबिक उपासनेची वेळ असे करण्यासाठी सर्वोत्तम वेळ ठरू शकते. या व्यवस्थेबद्दल ऑक्टोबर २००८ ची आपली राज्य सेवा यात असे म्हटले होते: “आपल्या कुटुंबात कौटुंबिक बायबल अभ्यासाचा अर्थपूर्ण, नियमित कार्यक्रम अनुसरण्याची यहोवाकडून मिळालेली जबाबदारी सर्व कुटुंब प्रमुखांनी गांभीर्याने घ्यावी, असे त्यांना उत्तेजन दिले जाते.” आपल्या मुलांना मदत करण्यासाठी या प्रेमळ व्यवस्थेचा तुम्ही फायदा घेत आहात का? असल्यास, मुलांच्या आध्यात्मिक गरजा पुरवण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता त्याची मुलांना कदर आहे ही खात्री बाळगा.—मत्त. ५:३; फिलिप्पै. १:१०.
त्यांचे पोषण करा (परिच्छेद १०-१२ पाहा)
१२. (क) नियमितपणे होणाऱ्या कौटुंबिक उपासनेमुळे तरुणांना कसा फायदा झाला आहे? (“त्यांना कदर आहे” ही चौकटदेखील पाहा.) (ख) कौटुंबिक उपासनेमुळे तुम्हाला वैयक्तिक रीत्या कसा फायदा झाला आहे?
१२ केरिसा नावाची किशोरवयीन मुलगी, कौटुंबिक उपासनेमुळे कुटुंबाला झालेल्या फायद्याबद्दल असे म्हणते: “आम्ही सर्व एकत्र मिळून बोलत बसतो हे मला खूप आवडतं. यामुळे आम्ही एकमेकांच्या आणखी जवळ आलो आहोत आणि या खूप चांगल्या आठवणी आहेत. माझे बाबा कौटुंबिक उपासना कधीही चुकवत नाहीत. त्यांच्यासाठी कौटुंबिक उपासना इतकी महत्त्वाची आहे हे पाहून मलासुद्धा या उपासनेचं महत्त्व समजलं आहे. यामुळे माझ्या बाबांप्रती माझा आदर खूप वाढला आहे, ते माझे जन्मदाते वडीलच नाही तर माझे आध्यात्मिक वडीलसुद्धा आहेत.” ब्रिटनी नावाची एक तरुण बहीण असे म्हणते: “कौटुंबिक उपासनेमुळे मी माझ्या आईबाबांच्या खूप जवळ आले आहे. त्यांना माझ्या समस्या ऐकून घ्यायच्या आहेत, त्यांना माझी काळजी आहे हे मला जाणवलं आहे. यामुळे आमच्यातील ऐक्याचं बंधन खूप मजबूत झालं आहे.” खरेच, कौटुंबिक उपासनेद्वारे आपल्या मुलांचे पोषण करणे हा मुलांना मदत करण्याचा एक मुख्य मार्ग आहे.b
मुलांना मार्गदर्शन करा
१३. यहोवाची सेवा करण्यास मुलांना कोणती गोष्ट मदत करू शकते?
१३ चांगला मेंढपाळ आपल्या कळपाला मार्ग दाखवण्यासाठी व त्यांचे रक्षण करण्यासाठी काठीचा उपयोग करतो. आपल्या मेंढरांना “चांगल्या चरणीत” किंवा कुरणात नेणे हा मेंढपाळाचा मुख्य उद्देश असतो. (यहे. ३४:१३, १४) पालक या नात्याने मुलांबाबत तुमचाही हाच उद्देश असेल. मुलांनी यहोवाची सेवा करावी यासाठी तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू इच्छित असाल. त्यांच्या भावना स्तोत्रकर्त्यासारख्याच असाव्यात असे तुम्हाला वाटत असेल. त्याने म्हटले: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” (स्तो. ४०:८) जे तरुण आपल्या मनात अशी कदर उत्पन्न करतात ते यहोवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतात. मुलांना यहोवाची सेवा करण्याची मनापासून इच्छा असल्यास व हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यास लागणारी समज असल्यास त्यांनी हा निर्णय घ्यावा.
१४, १५. (क) ख्रिस्ती पालकांनी नेहमी कोणता प्रयत्न केला पाहिजे? (ख) आपल्या विश्वासांबद्दल मुलांच्या मनात शंका येण्याचे कारण काय असू शकते?
१४ तुमची मुले आध्यात्मिक बाबींत प्रगती करत नसल्यास काय? ते आपल्या विश्वासांबद्दल शंका घेत असल्यास काय? यहोवा देवाप्रती व त्याने आपल्यासाठी जे काही केले आहे त्याप्रती मुलांच्या मनात प्रेम उत्पन्न करण्याचा आटोकाट प्रयत्न करा. (प्रकटी. ४:११) हे प्रेम उत्पन्न झाल्यास मुले यहोवाची उपासना करण्याचा निर्णय स्वतः घेतील.
१५ मुलांच्या मनात आपल्या विश्वासांबद्दल शंका असेल तर धीर दाखवून त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करा. यहोवाची सेवा करणे हा जीवनाचा सर्वोत्तम मार्ग आहे व यामुळे सर्वकाळचा आनंद मिळतो ही गोष्ट तुम्ही मुलांच्या मनात कशी बिंबवू शकता? त्यांच्या मनातील शंकांचे खरे कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, तुमच्या मुलाला बायबल शिकवणी पटत नाहीत का, की त्याच्या मित्रांना या शिकवणींबद्दल सांगण्यास त्याला भीती वाटते? तुमच्या मुलीला देवाचे स्तर पाळणे तिच्या फायद्याचे नाही असे वाटते का? की, या स्तरांनुसार जीवन जगल्यामुळे तिच्याशी कोणी मैत्री करत नाही ही खरी समस्या आहे?
त्यांना मार्गदर्शन करा (परिच्छेद १३-१८ पाहा)
१६, १७. सत्य स्वीकारण्यासाठी पालक आपल्या मुलांना कोणत्या मार्गांनी मदत करू शकतात?
१६ शंकेचे कारण कोणतेही असो, ती मुळातून काढून टाकण्यास तुम्ही तुमच्या मुलांना मदत करू शकता. तुम्हाला हे कसे करता येईल? मुलाच्या किंवा मुलीच्या मनातील विचार जाणून घेण्यासाठी बऱ्याच पालकांनी त्यांना पुढील प्रश्न विचारले आहेत: “तू एक ख्रिस्ती आहेस याबद्दल तुला कसं वाटतं? याचे कोणते फायदे आहेत? कोणते तोटे आहेत? तोट्यांच्या तुलनेत आपल्याला आज व भविष्यात जे फायदे मिळणार आहेत ते जास्त आहेत, असं तुला वाटतं का? आणि असं तुला का वाटतं?” हे प्रश्न तुम्ही स्वतःच्या शब्दांत मुलांना प्रेमळपणे विचारले पाहिजेत. तुम्ही उलटतपासणी करत आहात असे त्यांना वाटू नये, तर या प्रश्नांमुळे मुलांना त्यांचे विचार मांडण्यास उत्तेजन मिळाले पाहिजे. मुलांशी बोलताना तुम्ही मार्क १०:२९, ३० या वचनांवर चर्चा करू शकता. कदाचित काही मुले त्यांचे विचार लिहून काढू शकतात. उदाहरणार्थ, ते एका बाजूला सत्यात असल्यामुळे होणारे फायदे आणि दुसऱ्या बाजूला तोटे लिहू शकतात. यामुळे तुम्हाला व मुलांना हे पाहता येईल की समस्या कोणत्या आहेत व त्या सोडवण्यासाठी तुम्ही सोबत मिळून काय करू शकता. सत्यात आवड असलेल्यांशी आपण बायबल काय शिकवते आणि देवाचे प्रेम या पुस्तकांतून अभ्यास करतो, तर मग आपल्या मुलांसोबत या पुस्तकांतून अभ्यास का करू नये? तुम्ही हे करत आहात का?
१७ आपण कोणाची सेवा करणार हा निर्णय पुढे जाऊन तुमच्या मुलांना स्वतः घ्यावा लागेल. तुम्ही सत्यात आला आहात म्हणून तुमची मुलेदेखील सत्यात आपोआप येतील असा चुकीचा ग्रह बाळगू नका. त्यांनी स्वतः सत्य स्वीकारले पाहिजे. (नीति. ३:१, २) तुमच्या मुलाला असे करण्यास कठीण जात असेल तर तुम्ही बायबलमधील मूलभूत शिकवणींवर त्याच्याशी चर्चा करू शकता. पुढील प्रश्नांवर विचार करण्यास मुलांना मदत करा: “देव अस्तित्वात आहे याची मला खात्री का आहे? मी असं का म्हणू शकतो की यहोवा देवाच्या नजरेत मी खूप मौल्यवान आहे? यहोवाचे स्तर माझ्या फायद्यासाठी आहेत अशी खात्री मी का बाळगतो?” यहोवाची सेवा करणे हा जीवनाचा सर्वोत्तम मार्ग आहे हे आपल्या मुलांना पटवून द्या. एका चांगल्या मेंढपाळाप्रमाणे त्यांना धीराने मदत करा. असे करण्याद्वारे तुम्ही एक चांगले पालक आहात हे दिसून येईल.c—रोम. १२:२.
१८. पालक महान मेंढपाळ यहोवा याचे अनुकरण कसे करू शकतात?
१८ सर्व खऱ्या ख्रिश्चनांनी महान मेंढपाळाचे अनुकरण केले पाहिजे. (इफिस. ५:१; १ पेत्र २:२५) पालकांनी खासकरून आपल्या कळपाला म्हणजे आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे ओळखले पाहिजे. आणि त्यांना यहोवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सतत मदत केली पाहिजे. तर मग पालकांनो आपल्या मुलांना सत्यात वाढवण्याद्वारे त्यांना होताहोईल तितकी मदत करत राहा.
a या विषयावर अधिक माहितीसाठी टेहळणी बुरूज, १ ऑक्टोबर २००८ पृष्ठे १८-२० पाहा.
b अधिक माहितीसाठी टेहळणी बुरूज, १५ ऑक्टोबर २००९ अंकातील पृष्ठे २९-३१ वरील “कौटुंबिक उपासना बचावाकरता अत्यंत महत्त्वपूर्ण!” हा लेख पाहा.
c या विषयावर अधिक माहितीसाठी टेहळणी बुरूज, १ जुलै २०१२ अंकातील पृष्ठे २२-२५ पाहा.