वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w14 ८/१५ पृ. ३१-३२
  • “युरेका ड्रामा”ने अनेकांना सत्याची ओळख करून दिली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “युरेका ड्रामा”ने अनेकांना सत्याची ओळख करून दिली
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • उपशिर्षक
  • सत्याचे बी वाढवणे
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
w14 ८/१५ पृ. ३१-३२
युरेका ड्रामाचे सामान नेण्यासाठी आणि जाहिरात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्‍या ड्रामा वॅगन

आमच्या संग्रहातून

“युरेका ड्रामा”ने अनेकांना सत्याची ओळख करून दिली

“युरेका!” हा शब्द सहसा काहीतरी “सापडलं आहे” असे व्यक्‍त करण्यासाठी वापरला जातो. १९ व्या शतकात अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील खाणींत सोन्याचा भरपूर साठा आहे असे ऐकून हजारोंच्या संख्येने लोक तेथे गेले होते. त्या काळात, एखाद्या खाणीत कोणाला सोने सापडल्यास तो आनंदाने “युरेका” असे ओरडत असे. पण, चार्ल्‌झ टेझ रस्सल व इतर बायबल विद्यार्थ्यांना सोन्यापेक्षाही कित्येक पटींनी मौल्यवान असे काहीतरी सापडले होते. ते म्हणजे बायबलमधील सत्य. आणि हे सत्य इतरांना सांगण्याची त्यांना मोठीच उत्कंठा होती.

१९१४ च्या उन्हाळ्यापर्यंत मोठमोठ्या शहरांमध्ये अक्षरशः लाखो लोकांनी, इंटरनॅशनल बायबल स्टुडंट्‌स असोसिएशनने (आय.बी.एस.ए.) तयार केलेला “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” हा आठ तासांचा चित्रपट पाहिला होता. बायबलवर आधारित असलेल्या या चित्रपटात आकर्षक चलचित्रे, रंगीबेरंगी स्लाईड्‌स, मनोवेधक निवेदन आणि या सर्वांच्या जोडीला सुमधुर संगीतदेखील होते. चित्रपटात विश्‍वाच्या निर्मितीपासून ते येशू ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीच्या अंतापर्यंत मानवी इतिहासाचा संपूर्ण काळ दर्शकांसमोर उलगडण्यात आला होता.—प्रकटी. २०:४.a

पण लहान शहरांत आणि ग्रामीण भागांत राहणाऱ्‍या लोकांविषयी काय? सत्यासाठी भुकेल्या असणाऱ्‍या कोणीही या सुंदर माहितीपासून वंचित राहू नये म्हणून १९१४ सालच्या ऑगस्ट महिन्यात बायबल विद्यार्थ्यांनी कोठेही सहज नेता येईल असा “युरेका ड्रामा” प्रसिद्ध केला. “फोटो ड्रामा”ची संक्षिप्त आवृत्ती असलेल्या या युरेका ड्रामातून चलचित्रे वगळण्यात आली होती. युरेका ड्रामाचे पुढीलप्रमाणे तीन प्रकार होते आणि प्रत्येक प्रकार अनेक भाषांत उपलब्ध होता: “युरेका X” या प्रकारात संपूर्ण चित्रपटातील निवेदन आणि संगीत होते. “युरेका Y” या प्रकारात निवेदन व संगीतासोबतच सुरेख रंगांतील स्लाईड्‌सदेखील होत्या. आणि “युरेका फॅमिली ड्रामा” हा प्रकार घरी उपयोगात आणण्याजोगा असून यात निवेदनातील काही भाग आणि काही उपासना गीतेदेखील होती. फोनोग्राफ व स्लाईड्‌स दाखवण्यासाठी लागणारे साहित्यदेखील माफक किमतीत उपलब्ध करून देण्यात आले होते.

गॅसबत्तीवर चालणारे प्रोजेक्टर

प्रोजेक्टरच्या साहाय्याने रंगीत स्लाईड्‌स दाखवल्या जायच्या

चित्रपटासाठी लागणाऱ्‍या प्रोजेक्टरची किंवा मोठ्या पडद्याची गरज नसल्यामुळे बायबल विद्यार्थी हा युरेका ड्रामा ग्रामीण भागांत सहज नेऊ शकत होते आणि लोकांना तो मोफत दाखवू शकत होते. यामुळे त्यांना नवनवीन क्षेत्रांत राज्याचा संदेश पोचवणे शक्य झाले. फक्‍त ऐकण्यासाठी असलेला “युरेका X” हा दिवसा किंवा रात्रीही वापरला जाऊ शकत होता. “युरेका Y” यासाठी लागणारे स्लाईड-प्रोजेक्टर चालवण्यासाठी विजेची गरज नव्हती. ते गॅसबत्तीचा उपयोग करून चालवले जाऊ शकत होते. फिनिश भाषेतील टेहळणी बुरूजमध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तात असे म्हणण्यात आले की “ही चित्रे अगदी कोणत्याही ठिकाणी दाखवली जाऊ शकतात.” हे शब्द किती खरे होते!

युरेका ड्रामाच्या रंगीत स्लाईड्‌स

बरेचदा बायबल विद्यार्थी मोठमोठी नाट्यगृहे भाड्याने घेण्याऐवजी शाळेतील वर्ग, कोर्टातील खोल्या, रेल्वे स्थानक किंवा एखाद्या मोठ्या घरातील दिवाणखाना यांसारख्या मोफत ठिकाणांचा हुशारीने वापर करायचे. कित्येकदा युरेका ड्रामा उघड्यावर दाखवला जायचा. अनेकदा धान्य साठवण्याच्या कोठाराच्या एका भिंतीवर एक मोठी चादर लावून तिचा “पडदा” म्हणून वापर केला जायचा. ॲन्थनी हॅमबुक यांनी लिहिले: “लोकांना खाली बसून या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा म्हणून शेतकरी त्यांच्या मळ्यातच लाकडाचे ओंडके रचून एक छोटेसे स्टेडियम तयार करायचे.” “युरेका” ड्रामा दाखवणारी त्यांची टीम ड्रामाचे साहित्य, सामानसुमान तसेच बिछाने व स्वयंपाकाचे सामान ठेवण्यासाठी एका गाडीचा वापर करायचे. या गाडीला त्यांनी “ड्रामा वॅगन” असे नाव दिले होते.

“युरेका” ड्रामाचे प्रेक्षक काही ठिकाणी बोटांवर मोजण्याइतके तर इतर ठिकाणी शेकडो असायचे. अमेरिकेत १५० लोकसंख्या असलेल्या एका गावातील शाळेत “युरेका” दाखवण्यात आला तेव्हा ४०० लोक तो पाहायला आले. काही ठिकाणी हा ड्रामा पाहण्यासाठी लोक आठ किलोमीटर पायी चालून आले. स्वीडनमध्ये शारलॉट ऑल्बर्ग हिच्या घरी युरेका ड्रामा ऐकायला आलेल्या तिच्या शेजाऱ्‍यांना त्यातील माहिती “अतिशय हृदयस्पर्शी” वाटली. ऑस्ट्रेलियातील खूप दूरवर असलेल्या एका खाणीच्या शहरात युरेका ड्रामा दाखवण्यात आला तेव्हा १,५०० लोक तो पाहायला आले होते. टेहळणी बुरूज यात सांगण्यात आले की बऱ्‍याच शाळांतील व महाविद्यालयांतील “प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी चित्रांचा व उत्कृष्ट रेकॉर्ड्‌सचा मनापासून आनंद घेतला.” ज्या ठिकाणी चित्रपटगृहे होती त्या ठिकाणीसुद्धा “युरेका ड्रामा” लोकप्रिय ठरला.

सत्याचे बी वाढवणे

बायबल विद्यार्थ्यांनी नवे अभ्यास वर्ग स्थापित करण्यासाठी एक विशेष मोहीम राबवली होती व यासाठी ठिकठिकाणी वक्त्यांना पाठवले जायचे. या खास मोहिमेत “युरेका ड्रामा” एक अतिशय उपयोगी साधन ठरले. हा ड्रामा पाहिलेल्यांची नेमकी संख्या ठरवणे कठीण आहे. “ड्रामाचे” अनेक संच सतत वापरात होते. पण, १९१५ मध्ये एकूण ८६ “ड्रामा” टीम्सपैकी फक्‍त १४ टीम्स नियमितपणे अहवाल पाठवत होते. त्या वर्षाच्या अखेरीस तयार करण्यात आलेल्या अहवालात या अपूर्ण संख्यांविषयी खंत व्यक्‍त करण्यात आली. पण, तरीसुद्धा दहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी युरेका ड्रामा पाहिला असल्याचे व सुमारे ३०,००० व्यक्‍तींनी बायबल आधारित प्रकाशने मागवल्याचे त्यात म्हणण्यात आले होते.

आज जरी “युरेका ड्रामा”चे कोणाला फारसे स्मरण राहिलेले नसले, तरी ऑस्ट्रेलियापासून अर्जेंटिनापर्यंत, दक्षिण आफ्रिकेपासून ब्रिटिश बेटांपर्यंत, तसेच भारत व कॅरिबियन येथील अक्षरशः लाखो लोकांनी या अनोख्या कलाकृतीचा आनंद घेतला. त्यांपैकी अनेकांना सोन्यापेक्षाही कित्येक पटींनी जास्त मौल्यवान असे बायबलचे सत्य सापडले आणि यामुळे तेसुद्धा “युरेका!” असे म्हणू शकले.

a टेहळणी बुरूज, १५ फेब्रुवारी २०१४ अंकात पृष्ठे ३०-३२ वरील, “आमच्या संग्रहातून—विश्‍वासाला पुष्टी देणाऱ्‍या अविस्मरणीय चित्रपटाची शताब्दी” हा लेख पाहा.

“बायबलकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास साहाय्य”

फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन वर आधारित सिनारियो हे पुस्तक

बायबल हे “सर्वात उत्तम प्रकारचे विज्ञान आणि सर्वोत्तम मार्गदर्शन” असलेला ग्रंथ आहे यावर लोकांचा विश्‍वास वाढावा हा “फोटो ड्रामा” तसेच “युरेका ड्रामा” तयार करण्यामागचा उद्देश होता. “ड्रामा” पाहिल्यानंतर बऱ्‍याच उपस्थितांना सिनारियो ऑफ द फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन नावाचे पुस्तक देण्यात आले. या पुस्तकात “फोटो ड्रामा”मधील अनेक चित्रे व भाषणांचे उतारे देण्यात आले होते. या पुस्तकामुळे लोकांना बायबलकडे “एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास साहाय्य मिळाले.” सिनारियो पुस्तकाच्या लाखो प्रती लोकांना मोफत देण्यात आल्या. एका बायबल विद्यार्थ्याने लिहिले, की “ड्रामा”च्या पाठोपाठ सिनारियो हे पुस्तक “अंधारात असलेल्या लोकांना सत्याचा प्रकाश दाखवण्यासाठी सर्वात प्रभावी साधन ठरले.”

बायबल विद्यार्थ्यांच्या कुटुंबांतील मुलांना सिनारियो या पुस्तकातील चित्रे खूप आवडायची. ॲलिस हॉफमन ही चिमुकली आणि तिच्या भावाला सिनारियो हे पुस्तक अतिशय प्रिय होते. तिने लिहिले: “हे पुस्तक चाळायला आम्हाला फार आवडायचं. त्यातील चित्रं पाहताना ड्रामामध्ये पाहिलेलं एकेक दृश्‍य आम्हाला आठवायचं!”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा