वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w14 ६/१५ पृ. ८-११
  • घटस्फोटित बंधुभगिनींना मदत—कशी कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घटस्फोटित बंधुभगिनींना मदत—कशी कराल?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • त्रस्त करणाऱ्‍या भावनांचा उद्रेक
  • तोल सांभाळण्याचा प्रयत्न
  • एकाकीपणाच्या व नाकारल्याच्या भावना येणे
  • आई आणि बाबा विभक्‍त का झाले?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
w14 ६/१५ पृ. ८-११

घटस्फोटित बंधुभगिनींना मदत—कशी कराल?

घटस्फोट झालेल्या एका ख्रिस्ती बहिणीचे सांत्वन करत असताना एक स्त्री

तुम्ही कदाचित घटस्फोट झालेल्या एखाद्या किंवा अनेक व्यक्‍तींना ओळखत असाल. आजकाल घटस्फोट घेणे सर्वसामान्य बनले आहे. उदाहरणार्थ, पोलंडमध्ये केलेल्या एका संशोधनात असे दिसून आले, की ज्यांच्या लग्नाला तीन ते सहा वर्षे झाली आहेत अशा ३० वर्षीय पती-पत्नींच्या घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे; अर्थात केवळ ३० वर्षीयच घटस्फोट घेतात असे नाही.

खरेतर, स्पेनमधील कुटुंब योजना संस्थेच्या रिपोर्टनुसार, युरोपमधील आकडेवारीवरून दिसून येते, की तेथे ज्यांचे विवाह होतात त्यांतल्या निम्म्या लोकांचा घटस्फोट होतो. इतर विकसित राष्ट्रांमध्ये चित्र काही वेगळे नाही.

त्रस्त करणाऱ्‍या भावनांचा उद्रेक

घटस्फोट ही आजकाल एक सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. पण, घटस्फोट घेण्यात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असतात? पूर्व युरोपातील एक अनुभवी महिला विवाह सल्लागार म्हणते: “घटस्फोटाचा निर्णय एका रात्रीत घेतला जात नाही. आधी, भावनिक नातं तुटतं. ते सोबत राहून सोबत नसल्यासारखे असतात. ही भावनिक रीत्या अगदी क्लेशदायक गोष्ट असते. त्या वेळी, राग, पश्‍चात्ताप, निराशा, नाउमेद, लज्जा यांसारख्या भावनांचा उद्रेक होतो. कधीकधी आत्महत्येचादेखील विचार मनात येतो. कोर्टाकडून जेव्हा घटस्फोट निश्‍चित होतो तेव्हा दुसरा टप्पा सुरू होतो. मनात एकटेपणाच्या व रिक्‍ततेच्या भावना दाटून येतात. घटस्फोटित व्यक्‍ती विचार करू लागते: ‘आता मी लोकांना कसं तोंड देऊ? माझ्या जगण्याला काय अर्थ आहे?’”

इवाचा घटस्फोट झाल्यानंतर तिला कसे वाटले होते त्याबद्दल ती म्हणते: “घटस्फोटानंतर जेव्हा माझे शेजारी व माझ्यासोबत काम करणारे मला उल्लेखताना, ‘घटस्फोटित’ हा शब्द वापरायचे तेव्हा मला खूप लाज वाटायची. खूप रागही यायचा. आता माझ्या दोन मुलांसाठी मीच आई व वडील बनले होते.”a ॲडम, ज्यांचे मंडळीत चांगले नाव होते व ज्यांनी १२ वर्षांपासून वडील म्हणून सेवा केली होती, ते म्हणतात: “मला स्वतःबद्दल आदरच उरला नाही. मला स्वतःचाच राग येतो. पुष्कळदा मला एकटं राहावसं वाटतं.”

तोल सांभाळण्याचा प्रयत्न

भविष्याबद्दलच्या चिंता मन खात असल्यामुळे, घटस्फोट घेतलेल्या पुष्कळांना त्यांचा तोल सांभाळण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. इतरांना आपल्यात काही स्वारस्य नाही, असा निष्कर्ष ते काढतील. या विषयावर लेख लिहिणाऱ्‍या एका स्तंभ लेखिकेने म्हटले, की घटस्फोट घेतलेल्यांना “त्यांच्या सवयी बदलाव्या लागतील आणि इथून पुढं समस्यांना एकट्यानं सामोरं जावं लागेल.”

स्टॅनिस्वॉफ आठवून सांगतात: “आमचा घटस्फोट झाल्यानंतर माझी पत्नी मला आमच्या दोन लहान मुलींना भेटू द्यायची नाही. यामुळं मला वाटू लागलं, की आता कुणाला माझी पर्वा नाही आणि यहोवानंही मला सोडून दिलं आहे. माझी जगण्याची इच्छाच मरून गेली होती. पण हळूहळू मला जाणवलं, की मी किती चुकीचा विचार करत होतो.” भविष्याबद्दल अनिश्‍चिततेच्या भावनांमुळे वँडा नावाच्या एका घटस्फोटित बहिणीला काय वाटत होते ते ती सांगते: “घटस्फोट झाल्यानंतर काही दिवसांतच मला वाटू लागलं, की आता कुणाचंही, म्हणजे अगदी मंडळीतल्या आपल्या बहीण भावांचंसुद्धा माझ्याकडं व मुलांकडं लक्ष राहणार नाही. सर्व आपापल्या कामात व्यस्त होतील. पण तसं झालं नाही. उलट, मंडळीतले बहीण भाऊ आमच्याभोवती अक्षरशः पिंगा घालत होते. मुलांना यहोवाचे उपासक बनण्यास मी करत असलेल्या प्रयत्नांना त्यांचा पाठिंबा होता.”

वर उल्लेखण्यात आलेल्या व्यक्‍तींच्या विधानांवरून तुम्हाला कळले असेल, की ज्यांचा घटस्फोट होतो ते नंतर नकारात्मक भावनांनी घेरले जातात. ते स्वतःच्याच नजरेतून उतरतील; आपण काही कामाचे नाही व कोणालाही आपली पर्वा नाही, असे त्यांना वाटू लागेल. आणि, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांबद्दलही ते टीकात्मक होतील. यामुळे, मंडळीतील बंधुभगिनींना आपली कसलीही काळजी नाही, त्यांना आपली परिस्थिती समजत नाही, असा ते विचार करू लागतील. पण स्टॅनिस्वॉफ व वँडा यांच्या अनुभवावरून दिसते, की घटस्फोट झालेल्यांना नंतर ही जाणीव होऊ शकते, की मंडळीतील बंधुभगिनींना त्यांच्याबद्दल खरोखर काळजी वाटत असते. उलट बंधुभगिनी त्यांना विशेष काळजी दाखवतात. घटस्फोटितांना सुरुवातीला याची जाणीव नसली तरीसुद्धा बहीण भाऊ त्यांना एकटे सोडत नाहीत.

एकाकीपणाच्या व नाकारल्याच्या भावना येणे

आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, घटस्फोटितांना आपण कितीही मदत करण्याचा प्रयत्न केला तरी, एकाकीपणाच्या भावना त्यांच्या मनात वरचेवर येतीलच. खासकरून घटस्फोटित बहिणींना वाटेल, की मी कोणाला आवडत नाही. ॲलेत्स्या नावाची बहीण म्हणते: “माझा घटस्फोट होऊन आठ वर्षं झाली आहेत. अजूनही कधीकधी माझ्या मनात कमीपणाच्या भावना डोकावतात. अशा वेळी मी लोकांमध्ये मिसळत नाही. मला रडू येतं, स्वतःची कीव येते.”

घटस्फोट झालेल्यांच्या मनात अशा भावना येणे साहजिक असले तरी, स्वतःला इतरांपासून दूर नेणे योग्य नाही, असा सल्ला बायबलमध्ये देण्यात आला आहे. या सल्ल्याच्या विरोधात कार्य करणे म्हणजे, व्यावहारिक बुद्धी नाकारणे. (नीति. १८:१) पण, एकाकीपणाला तोंड देणाऱ्‍या व्यक्‍तीने सांत्वन व सल्ला मिळवण्यासाठी वारंवार एखाद्या विरुद्धलिंगी व्यक्‍तीची मदत घेण्याचे टाळले पाहिजे. यामुळे तिचे संरक्षण होईल आणि मनात अयोग्य प्रणय भावना जागृत होणार नाहीत हे तिने समजून घेतले पाहिजे.

घटस्फोट झालेल्या आपल्या बंधुभगिनींच्या मनात भविष्याबद्दलच्या चिंता, नकारात्मक, एकाकीपणाच्या किंवा झिडकारल्याच्या भावना येऊ शकतात. त्यांच्या मनात अशा भावना येणे साहजिक आहे तसेच त्यांच्यावर मात करणे इतके सोपे नाही ही गोष्ट बाकीच्यांनी समजून घेतली पाहिजे. अशा प्रकारे या भावा-बहिणींना एकनिष्ठ प्रेम दाखवून आपण यहोवाचे अनुकरण केले पाहिजे. (स्तो. ५५:२२; १ पेत्र ५:६, ७) आपण देत असलेल्या मदतीबद्दल ते नक्कीच कृतज्ञता दाखवतील. मंडळीत त्यांना खऱ्‍या मित्रांकडून भावनिक आधार मिळू शकतो.—नीति. १७:१७; १८:२४.

a काही नावे बदलण्यात आली आहेत.

घटस्फोटाबद्दल संतुलित दृष्टिकोन

यहोवाचे सेवक विवाह व्यवस्थेला गंभीर लेखतात. कारण ते शास्त्रवचनांत विवाहाबद्दल जे म्हटले आहे ते मान्य करतात. जसे की, मलाखी २:१६ या वचनात आपण देवाचे स्पष्ट विधान वाचतो: “मला सूटपत्राचा तिटकारा आहे.” बायबलनुसार, विवाहसोबत्यांपैकी एकाने लैंगिक अनैतिक कृत्य केले असेल तरच निष्पाप सोबती घटस्फोट घेऊ शकतो. त्यामुळे, दुसऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीशी लग्न करण्याच्या हेतूने, शास्त्रवचनीय आधार नसताना आपल्या विवाहसोबत्यापासून घटस्फोट घेण्याचा विचार करणे ही एक गंभीर चूक ठरेल.—उत्प. २:२२-२४; अनु. ५:२१; मत्त. १९:४-६, ९.

पण, मंडळीतील एखाद्या ख्रिश्‍चनाचा, त्याच्या सोबत्याने विश्‍वासघात केल्यामुळे घटस्फोट झाला असेल, तर इतर बंधुभगिनी निष्पाप सोबत्याला पूर्ण पाठिंबा देतात. असे करण्याद्वारे ते “भग्नहृदयी” असलेल्यांना हवी ती मदत देऊन यहोवाचे अनुकरण करतात.—स्तो. ३४:१५, १८; यश. ४१:१०.

मदत कशी कराल?

घटस्फोटितांना खरोखरच मदतीची गरज आहे. कशी द्याल ही मदत त्यांना? वर लेखात उल्लेखलेल्या बंधुभगिनींप्रमाणे ज्यांच्या मनात नकारात्मक भावना येतात त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? बायबलमध्ये कोणता सल्ला देण्यात आला आहे आणि आपल्या एकनिष्ठ बंधुभगिनींनी त्यांना कशा प्रकारे व्यावहारिक मदत केली आहे ते पाहा.

समंजसपणे ऐका. (नीति. १६:२०, २३)

ज्यांचा घटस्फोट झाला आहे त्यांना, या निर्णयाविषयीच्या बारीकसारीक गोष्टींबद्दल बोलण्याची कदाचित इच्छा नसेल, हे समजून घ्या. खरेतर, रागाच्या भरात भावना व्यक्‍त केल्यामुळे मनःस्ताप कमी होण्याऐवजी आणखी वाढू शकतो. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करा आणि त्यांची इच्छा नसल्यास त्या गोष्टींबद्दल बोलण्यास त्यांना भाग पाडू नका. (नीति. १२:२५; रोम. १२:१५) याआधी उल्लेखण्यात आलेल्या बंधू ॲडम यांना, मिकाऊ नावाच्या एका बांधवाने भावनिक आधार दिला. त्यांचेदेखील हेच मत आहे, की आपण घटस्फोटित व्यक्‍तीचे बोलणे जास्त खोलात न शिरता, दयाळूपणे व समंजसपणे ऐकून घेऊ शकतो. ते म्हणतात: “मी ॲडमच्या लक्षात एक गोष्ट आणून दिली आहे. ती ही, की त्याच्या मनात दाटून आलेल्या नकारात्मक भावनांना वाट करून देत असताना, तो कदाचित अशा काही खासगी गोष्टी मला सांगून जाईल, ज्यांचा त्याला नंतर पस्तावा होऊ शकतो.” त्यामुळे मिकाऊने ॲडमला स्पष्टपणे सांगितले, की तो एक सच्चा मित्र म्हणून त्याचे सर्व म्हणणे ऐकून घेत असला तरी, बारीकसारीक गोष्टी माहीत करून घेण्याची त्याची इच्छा नाही. ख्रिस्ती सभेच्या आधी किंवा नंतरही आपण अशा बंधुभगिनींबरोबर मनमोकळेपणे बोलू शकतो. कदाचित आपण म्हणू शकतो: “आता कसं वाटतंय? कठीण आहे माहीत आहे. पण मी तुझ्या पाठीशी आहे.”

आवड दाखवा. (फिलिप्पै. २:४)

मिरोस्वॉफ आठवून सांगतात: “आम्ही दोघा पती-पत्नीनं, मंडळीतल्या एका घटस्फोटित बहिणीला मदत करण्यासाठी वेळ ठरवली आहे. जसं की आम्ही तिच्या दाराचं कुलूप दुरुस्त केलं. एकदा तिला दवाखान्यात जायचं होतं तर तिला तिथं नेलं.” ही कामे अगदी क्षुल्लक वाटतील. पण व्यावहारिक आहेत आणि त्यांचा तिला फायदा झाला. या जोडप्याच्या मदतीमुळे घटस्फोटित बहीण आपला तोल पुन्हा सावरू शकली. एवढेच नव्हे तर, तिने पायनियरिंग सुरू केली आणि तिच्या ११ वर्षीय मुलीचा बाप्तिस्मा झाला.

घटस्फोट झालेल्या एका ख्रिस्ती बहिणीबद्दल व्यक्‍तिगत आस्था दाखवणारे एक जोडपे

घटस्फोटित व्यक्‍तीला ही खातरी द्या, की यहोवा तिची परिस्थिती समजून घेतो.

एखाद्याने त्याचा आत्मविश्‍वास गमावला असेल तर तुम्ही त्याला ही खातरी देऊ शकता, की देव त्याच्या प्रत्येक सेवकाला अनमोल समजतो. “पुष्कळ चिमण्यांपेक्षा” आपले मोल नक्कीच अधिक आहे; आपण यहोवाच्या नजरेत अनोखे व मौल्यवान आहोत. (मत्त. १०:२९-३१) यहोवा “हृदये पारखतो” त्यामुळे घटस्फोट झालेल्यांच्या मनात माजलेले काहूर तो समजू शकतो. त्याच्याशी विश्‍वासू राहणाऱ्‍या कोणत्याच सेवकाचा तो त्याग करणार नाही. (नीति. १७:३; स्तो. १४५:१८; इब्री १३:५) त्यामुळे, घटस्फोटित व्यक्‍तीबद्दल तुम्ही तुमची काळजी व्यक्‍त करता तेव्हा तिला याचीदेखील खातरी द्या, की सत्याबद्दल ती दाखवत असलेले प्रेम व खऱ्‍या उपासनेला ती देत असलेला पाठिंबा यामुळे यहोवा तिची कदर करतो.—फिलिप्पै. २:२९.

घटस्फोट घेतलेल्या व्यक्‍तीला मंडळीतील बंधुभगिनींच्या सहवासात राहण्याचे उत्तेजन द्या.

मनात नकारात्मक भावनांचे काहूर माजलेले असते तेव्हा काहींना सभांना जावेसे वाटत नाही. पण या सभांमध्येच तर आपल्याला बळकटी व उत्तेजन मिळते; शिवाय त्या आपल्याच “उन्‍नतीसाठी” आहेत. (१ करिंथ. १४:२६; स्तो. १२२:१) तेव्हा घटस्फोटित व्यक्‍तीला सभांना येण्याचे उत्तेजन देण्यासाठी वडील जन पुढाकार घेऊ शकतात. आधी उल्लेख करण्यात आलेल्या वँडाने म्हटले: “वडिलांनी दिलेला प्रेमळ पाठिंबा आम्ही कधीच विसरू शकत नाही.”

घटस्फोट घेतलेल्या व्यक्‍तीला प्रार्थना, वैयक्‍तिक अभ्यास आणि मनन यांद्वारे देवाबरोबरचा आपला नातेसंबंध आणखी घट्ट करण्याचे उत्तेजन द्या. (याको. ४:८)

यहोवा सर्वसमर्थ व स्वर्गात असला तरी, “जो दीन व भग्नहृदय आहे व [त्याची] वचने ऐकून कंपायमान होतो” त्याच्याकडे त्याचे लक्ष असते, ही गोष्ट घटस्फोट घेतलेल्या व्यक्‍तीला सांगा. प्रार्थना व वैयक्‍तिक अभ्यास यांद्वारे प्रत्येक जण देवाच्या आणखी जवळ येऊ शकतो यावर जोर द्या.—यश. ६६:२.

घटस्फोटित व्यक्‍तीबरोबर क्षेत्र सेवेत जा किंवा एखाद्या सभेची तयारी करा.

दोन ख्रिस्ती बांधव सोबत मिळून सेवाकार्य करत असताना

यामुळे, ती तिचा गमावलेला आत्मविश्‍वास पुन्हा मिळवू शकेल. मार्टाने घटस्फोट झालेल्या एका बहिणीला खूप मदत केली. ही बहीण सत्यात आवेशी होती. पण घटस्फोटानंतर ती मनाने पूर्णपणे खचून गेली. मार्टा म्हणते: “आम्ही दोघी सेवेत नियमित रीत्या जातो. यामुळं, आम्ही स्वतःसाठी ठेवलेली ध्येयं पूर्ण करतो तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. कधीकधी आम्ही दोघी एकत्र बसून एखाद्या सभेची तयारी करतो आणि मग त्यानंतर खायला काहीतरी चविष्ट बनवतो.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा