मुख्य विषय | आपल्याला देवाची गरज का आहे?
आपल्याला देवाची गरज का आहे?
मानसशास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे, की खऱ्या अर्थाने आनंदी होण्यासाठी लोकांना आध्यात्मिक मूल्यांची गरज आहे. त्यामुळेच लोक एखाद्या कार्याला वाहून घेत असल्याचे किंवा थोरामोठ्यांची सेवा करत असल्याचे आपण पाहतो. तर काही जण निसर्ग, कला, संगीत इत्यादी गोष्टींत अध्यात्माचा शोध घेतात. पण, इतके करूनही अनेकांना मनःशांती लाभत नाही.
मानवांनी आता व पुढे सदासर्वकाळ आनंदी राहावे अशी देवाची इच्छा आहे
मानवांमध्ये जन्मतःच आध्यात्मिक भूक असते ही गोष्ट बायबलच्या वाचकांसाठी नवीन नाही. उत्पत्तिच्या सुरुवातीच्या अध्यायांतून दिसून येते, की देवाने पहिल्या मानवी जोडप्याला बनवल्यानंतर नियमितपणे त्यांच्याशी संभाषण केले; त्यांना त्याच्यासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडता यावा हा त्यामागचा उद्देश होता. (उत्पत्ति ३:८-१०) मानवांनी देवाच्या मार्गदर्शनाशिवाय स्वतंत्रपणे जगावे अशा रीतीने त्याने त्यांना बनवले नव्हते; तर त्यांच्या निर्माणकर्त्याशी संवाद करण्याच्या गरजेसह त्यांना बनवले होते. बायबलमध्ये वारंवार या गरजेचा उल्लेख करण्यात आला आहे.
उदाहरणार्थ, येशूने म्हटले: “जे आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव राखतात ते आनंदी असतात.” (मत्तय ५:३; NW) या शब्दांवरून दिसून येते, की आनंदी व समाधानी जीवनासाठी आवश्यक असलेली एक गोष्ट म्हणजे आपली उपजत आध्यात्मिक गरज तृप्त करणे. आपल्याला हे कसे करता येईल? याचे उत्तर येशूने जे म्हटले त्यातून मिळते: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.” (मत्तय ४:४) देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनांमुळे म्हणजे बायबलमध्ये नमूद असलेल्या त्याच्या विचारांमुळे व सूचनांमुळे आनंदी व अर्थपूर्ण जीवन जगणे कसे शक्य आहे? याचे तीन मूलभूत मार्ग आपण पाहू या.
गरज आहे उत्तम मार्गदर्शनाची
आजकाल नातेसंबंध, प्रेम, कौटुंबिक जीवन, समस्या कशा सोडवाव्यात, आनंद आणि जीवनाचा अर्थ या विषयांवर सल्ला देणाऱ्या तज्ज्ञांची व समुपदेशकांची काही कमी नाही. पण, ज्याने मानवांना घडवले त्या यहोवा देवाशिवाय सगळ्यात उत्तम व संतुलित मार्गदर्शन आणखी कोण देऊ शकतो?
एका मार्गदर्शक पुस्तकाप्रमाणे बायबल जीवनाबद्दलचे मार्गदर्शन देते
उदाहरणार्थ, आपण कॅमेरा किंवा कम्प्यूटर यासारखी एखादी नवीन वस्तू खरेदी करतो, तेव्हा त्यासोबत आपल्याला उत्पादकाचे सूचना किंवा मार्गदर्शक पुस्तक दिले जाते. ती वस्तू चांगल्या प्रकारे कशी वापरावी त्याबद्दल त्यात सूचना दिलेल्या असतात. बायबलची तुलना अशाच मार्गदर्शक पुस्तकाशी केली जाऊ शकते. आपल्याला घडवणाऱ्या देवाने जीवनाबद्दलचे हे पुस्तक आपल्याला दिले आहे. देवाने मानवांना जीवन का दिले, जीवन कसे जगावे आणि जीवनाचा सगळ्यात चांगला उपयोग कसा करावा याबद्दलचे उत्तम मार्गदर्शन त्यात दिले आहे.
एका उत्तम मार्गदर्शक पुस्तकाप्रमाणेच बायबलसुद्धा आपल्याला अशा गोष्टींसंबंधी सावध करते ज्यांमुळे आपल्या जिवाला धोका पोहचू शकतो. इतरांनी दिलेला सल्ला किंवा झटपट उपाय हवाहवासा व सोपा वाटू शकतो. पण, आपल्याला घडवणाऱ्या देवाने दिलेले मार्गदर्शन स्वीकारल्याने आपण जीवनातील धोके टाळू शकतो व आपले भले होऊ शकते अशी अपेक्षा करणे योग्य नाही का?
“परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू, म्हणतो; तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांती नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती.” —यशया ४८:१७, १८
आपल्याला हवे असलेले मार्गदर्शन व मदत बायबलमध्ये मिळू शकते
यहोवा देव आपल्याला मार्गदर्शन व सूचना देत असला तरी तो त्या आपल्यावर लादत नाही. त्याचे आपल्यावर प्रेम आहे व आपले भले व्हावे अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणूनच तो प्रेमळपणे आपल्याला असा आर्जव करतो: “परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू, म्हणतो; तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांती नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती.” (यशया ४८:१७, १८) थोडक्यात, आपण देवाचे मार्गदर्शन स्वीकारले तर आपले जीवन सार्थकी लागेल. दुसऱ्या शब्दांत, सुखीसमाधानी जीवन जगण्यासाठी आपल्याला देवाची गरज आहे.
गरज आहे जीवनातील समस्यांवरील उत्तरांची
काहींना देवाची गरज भासत नाही, कारण एका प्रेमळ देवावर विश्वास ठेवूनसुद्धा जीवनात इतके गुंतागुंतीचे प्रश्न का हे त्यांना कळत नाही. उदाहरणार्थ, त्यांना प्रश्न पडतो: ‘चांगल्या लोकांवरच दुःख का येतं?’ ‘काही निष्पाप मुलं जन्मतःच अपंग का असतात?’ ‘आज इतका अन्याय का?’ हे प्रश्न नक्कीच गंभीर आहेत आणि त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यास जीवनात खूप फरक पडू शकतो. पण, अशा समस्यांसाठी देवाला दोषी ठरवण्याचा उतावळेपणा करण्याऐवजी देवाचे वचन, बायबल या विषयावर कसा प्रकाश टाकते ते आपण पाहू या.
उत्पत्तिच्या तिसऱ्या अध्यायात आपल्याला सैतानाबद्दलचा अहवाल वाचायला मिळतो. यहोवा देवाने आदाम व हव्वा या पहिल्या मानवी जोडप्याला अशी आज्ञा दिली होती, की त्यांनी बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नये. पण, सैतानाने एका सापाच्या माध्यमाने त्या मानवी जोडप्याला देवाची ही आज्ञा मोडण्यास प्रवृत्त केले. त्याने हव्वेला म्हटले: “तुम्ही खरोखर मरणार नाही; कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.”—उत्पत्ति २:१६, १७; ३:४, ५.
असे म्हणण्याद्वारे सैतानाने केवळ इतकाच दावा केला नाही की देव खोटे बोलत आहे; तर त्याने हेदेखील सुचवले की देवाची शासन करण्याची पद्धत अन्यायी आहे. सैतानाने असा युक्तिवाद केला की त्याचे ऐकण्यातच मानवांचे भले आहे. सैतानाने उपस्थित केलेले हे वादविषय कसे सुटणार होते? यहोवावर लावण्यात आलेले आरोप खरे आहेत की खोटे हे सर्वांना सिद्ध होण्यासाठी वेळ देणे गरजेचे होते आणि तेच यहोवाने केले. असे करण्याद्वारे, मानव देवाशिवाय खूश राहू शकतात की नाही हे सिद्ध करण्याची संधी देव सैतानाला आणि त्याच्या साथीदारांना देत होता.
देवाबद्दल सैतानाने उपस्थित केलेल्या प्रश्नांची तुम्ही काय उत्तरे द्याल? मानव देवाच्या मार्गदर्शनाशिवाय आनंदी व यशस्वी जीवन जगू शकतात का? गेल्या कित्येक शतकांपासून दुःखे, अन्याय, रोगराई व मृत्यू; तसेच गुन्हेगारी, नैतिक मूल्यांचा ऱ्हास, युद्धे, जातीसंहार आणि अशा इतर अत्याचारांनी मानवजातीला पिडले आहे. यावरून धडधडीतपणे हेच सिद्ध होते, की देवाच्या मार्गदर्शनाशिवाय स्वतंत्रपणे जगण्याचे मानवांचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. बायबल स्पष्टपणे सांगते, की मानवांच्या दुःखांसाठी देव जबाबदार नाही. तर दुःखांमागचे एक प्रमुख कारण म्हणजे: “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.”—उपदेशक ८:९.
यावरून स्पष्ट होत नाही का की मानवांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळवण्यासाठीच नव्हे, तर त्यांवरील तोडग्यासाठीही आपल्याला देवाची गरज आहे? देव काय करेल?
गरज आहे देवाच्या मदतीची
आजारपण, म्हातारपण व मृत्यू यांपासून मुक्त होण्याची लोकांनी नेहमीच खूप आस बाळगली आहे. त्यासाठी त्यांनी अमाप वेळ, श्रम व पैसा खर्च केला आहे. पण, त्यांचे सर्व प्रयत्न वाळवंटात बिया पेरण्यासारखे ठरले. काहींना तर असेही वाटते की विशिष्ट पेये अथवा विशिष्ट प्रकारचे पाणी प्यायल्याने किंवा विशिष्ट ठिकाणी जाऊन राहिल्याने आपण कायम तरुण राहू. पण लोकांचे हे स्वप्न, स्वप्नच राहिले आहे.
मानवांनी सुखीसमाधानी जीवन जगावे अशी देवाची इच्छा आहे. मानवांना घडवण्यामागे त्याचा हाच उद्देश होता आणि तो आपला उद्देश विसरलेला नाही. (उत्पत्ति १:२७, २८; यशया ४५:१८) खुद्द यहोवा देवाने आपल्याला आश्वासन दिले की त्याने जे काही उद्देशिले आहे ते हमखास पूर्ण होईल. (यशया ५५:१०, ११) पहिल्या मानवी जोडप्याने जे नंदनवन गमावले ते तो पुन्हा स्थापित करेल असे अभिवचन बायबल आपल्याला देते. बायबलच्या शेवटच्या पुस्तकात आपण असे वाचतो: “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल; यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:४) देव कशा प्रकारे पुन्हा नंदनवन स्थापित करेल आणि त्याने दिलेल्या या अभिवचनाचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो?
देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याने आपल्या अनुयायांना अशी प्रार्थना करण्यास शिकवले की देवाची इच्छा पृथ्वीवर पूर्ण होवो. अनेकांना ही प्रार्थना माहीत आहे आणि अनेक जण ती वारंवार म्हणतातसुद्धा. काही जण या प्रार्थनेला प्रभूची प्रार्थना म्हणतात. त्यात असे म्हटले आहे: “हे आमच्या स्वर्गांतील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:९, १०) यावरून स्पष्ट होते, की यहोवा देव त्याच्या राज्याद्वारेच मानवी शासनाचे सर्व दुष्परिणाम नाहीसे करेल व प्रतिज्ञा केलेले नीतिमान नवीन जग आणेल.a (दानीएल २:४४; २ पेत्र ३:१३) देवाने दिलेल्या या प्रतिज्ञेचा फायदा घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
त्यासाठी येशू ख्रिस्ताने एक साधा मार्ग सुचवला जो आपण अनुसरला पाहिजे: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) देवाच्या मदतीने नीतिमान नवीन जगात अनंत जीवन मिळणे नक्कीच शक्य आहे. या आशेमुळेच, ‘आपल्याला देवाची गरज आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असे देण्याचे आणखी एक सबळ कारण आपल्याला मिळते.
हीच वेळ आहे देवाचा विचार करण्याची
प्रेषित पौलाने दोन हजार वर्षांपूर्वी अथेन्समधील अरीयपगात किंवा मार्स टेकडीवर, स्वैर विचारसरणी बाळगणाऱ्या अथेनैकरांना देवाविषयी असे म्हटले: “जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो; कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो व आहो. तसेच तुमच्या कवींपैकीही कित्येकांनी म्हटले आहे की, आपण वास्तविक त्याचा वंश आहो.”—प्रेषितांची कृत्ये १७:२५, २८.
पौलाने अथेनैकरांना जे म्हटले ते आजही खरे आहे. आपण जो श्वास घेतो, आपल्याला जे अन्नपाणी मिळते ते सर्व आपला निर्माणकर्ताच आपल्याला पुरवतो. जगण्यासाठी यहोवा देवाने ज्या चांगल्या गोष्टी पुरवल्या आहेत त्यांशिवाय आपण जगूच शकलो नसतो. पण, लोक देवाचा विचार करोत अगर न करोत, त्या सर्वांना तो या गोष्टी का बरे पुरवतो? ते “अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही,” असे पौलाने म्हटले.—प्रेषितांची कृत्ये १७:२७.
तुम्हाला देवाला आणखी जाणून घ्यायचे आहे का? म्हणजे त्याच्या उद्देशांविषयी आणि आता व पुढे सदासर्वकाळ सुखीसमाधानी जीवन जगण्यासाठी तो जे मार्गदर्शन देतो ते जाणून घ्यायचे आहे का? असल्यास, ज्यांनी तुम्हाला हे नियतकालिक दिले त्यांच्याशी किंवा मग या नियतकालिकाच्या प्रकाशकांशी तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्हाला मदत करण्यास त्यांना आनंदच होईल. ▪ (w13-E 12/01)
a देवाचे राज्य पृथ्वीवर त्याची इच्छा कशी पूर्ण करेल यावरील अधिक माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ८ पाहा. हे पुस्तक www.jw.org/mr यावर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.