एकमेकांकडे लक्ष द्या व एकमेकांना उत्तेजन द्या
“प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ.”—इब्री १०:२४.
१, २. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी झालेल्या डेथ मार्चमधून जिवंत बचावण्यास २३० यहोवाच्या साक्षीदारांना कशामुळे साहाय्य मिळाले?
दुसरे महायुद्ध संपत आले तेव्हा नात्झी राजवट पूर्णपणे कोलमडून पडली होती. त्यांच्या छळ छावण्यांमध्ये अद्यापही जे हजारो कैदी होते, त्यांचा काटा काढण्यासाठी एक आदेश जारी करण्यात आला. या सर्व कैद्यांना बंदरे असलेल्या शहरांपर्यंत चालवत न्यायचे आणि तेथे त्यांना जहाजांवर बसवून ती जहाजे समुद्रात बुडवायची असे त्यांनी ठरवले. या योजनेला नंतर डेथ मार्च (मृत्यू पदयात्रा) असे नाव पडले.
२ झाक्सेनहाउसन येथील छळ छावणीत असलेल्या ३३,००० कैद्यांना जर्मनीतील ल्युबेक येथील बंदर शहरापर्यंत २५० किलोमीटरचे अंतर पायी चालत जावे लागणार होते. या कैद्यांमध्ये एकूण सहा देशांतील २३० यहोवाचे साक्षीदारदेखील होते. त्या सर्वांना सोबत मिळून चालण्यास सांगण्यात आले. उपासमार आणि आजारपण यांमुळे ते सर्व जण अतिशय अशक्त झाले होते. मग आपले हे बांधव त्या पदयात्रेनंतरही कसे काय जिवंत राहिले? त्यांच्यापैकी एकाने सांगितले, “आम्ही सतत एकमेकांना चालत राहण्याचं उत्तेजन देत होतो.” देवाकडून मिळणाऱ्या पराकोटीच्या सामर्थ्यासोबतच एकमेकांबद्दल वाटत असलेल्या प्रेमानेदेखील या संकटातून त्यांना निभावून नेले.—२ करिंथ. ४:७.
३. आपण एकमेकांना उत्तेजन देण्याची गरज का आहे?
३ आज जरी आपल्याला अशा प्रकारच्या डेथ मार्चमध्ये चालावे लागत नसले, तरी आपल्यालाही अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते. १९१४ मध्ये देवाच्या राज्याची स्थापना झाल्यानंतर सैतानाला स्वर्गातून खाली पृथ्वीवर टाकण्यात आले. आज, सैतान “आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त” आहे. (प्रकटी. १२:७-९, १२) हर्मगिदोन जसजसे जवळ येत आहे तसतसा सैतान आपल्याला आध्यात्मिक रीत्या कमकुवत करण्याच्या हेतूने आपल्यावर अनेक परीक्षा व दबाव आणत आहे. शिवाय, दररोजच्या जीवनातील ताणतणावदेखील आहेतच. (ईयो. १४:१; उप. २:२३) या सर्व समस्यांमुळे कधीकधी आपण इतके खचून जाऊ शकतो की आपल्याजवळ असलेली सगळी भावनिक व आध्यात्मिक शक्ती एकवटूनही या निराशेवर मात करणे आपल्याला जमत नाही. एका बांधवांचे उदाहरण घेऊ या. या बांधवांनी अनेक दशके कितीतरी लोकांना आध्यात्मिक रीत्या साहाय्य केले होते. पण उतारवयात त्यांना व त्यांच्या पत्नीला आजारपणाला तोंड द्यावे लागल्यामुळे ते खूप निराश झाले. त्या बांधवांप्रमाणेच आपल्या सर्वांना यहोवाकडून मिळणाऱ्या पराकोटीच्या सामर्थ्याची आणि त्यासोबतच एकमेकांच्या उत्तेजनाचीही अत्यंत गरज आहे.
४. इतरांना उत्तेजन देण्याची इच्छा असल्यास, आपण पौलाचा कोणता सल्ला मनावर घेणे गरजेचे आहे?
४ आपल्याला जर इतरांना उत्तेजन देण्याची इच्छा असेल, तर प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्चनांना दिलेला सल्ला आपण मनावर घेतला पाहिजे. त्याने म्हटले: “प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्री १०:२४, २५) या अर्थभरीत सल्ल्याचे पालन आपण कसे करू शकतो?
“एकमेकांकडे लक्ष देऊ”
५. एकमेकांकडे लक्ष देण्याचा काय अर्थ होतो आणि असे करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल?
५ एकमेकांकडे लक्ष देण्याचा अर्थ “इतरांच्या गरजा लक्षात घेणे किंवा त्यांच्याविषयी विचार करणे” असा होतो. पण राज्य सभागृहात जर आपण इतरांना नुसतेच ‘नमस्ते’ म्हणून पुढे जात असू, किंवा फक्त क्षुल्लक बाबींविषयी त्यांच्याशी बोलत असू तर मग त्यांच्या गरजांकडे लक्ष देणे आपल्याला खरेच शक्य होईल का? नाही. अर्थात, आपण सर्वांनी आपापले काम करण्याची आणि इतरांच्या कामांत लुडबुड न करण्याची काळजी घेतली पाहिजे. (१ थेस्सलनी. ४:१२; १ तीम. ५:१३) तरीपण, आपल्या बांधवांना उत्तेजन द्यायचे असल्यास आपण त्यांची चांगल्या प्रकारे ओळख करून घेणे; म्हणजेच, त्यांची एकंदर परिस्थिती, त्यांचे गुण, त्यांची आध्यात्मिक स्थिती, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील जमेच्या बाजू व त्यांच्या उणिवा जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपले त्यांच्यावर प्रेम आहे याची त्यांना जाणीव होण्याची गरज आहे. याकरता आपण त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे, केवळ त्यांना समस्या येतात तेव्हाच नव्हे, तर इतर वेळीसुद्धा.—रोम. १२:१३.
६. वडिलांना कळपातील बांधवांकडे “लक्ष” देण्यास कोणत्या गोष्टी मदत करतील?
६ मंडळीतील वडील जनांना “देवाच्या कळपाचे पालन” करण्याची आणि संतोषाने व उत्सुकतेने हे कार्य करण्याची आज्ञा देण्यात आली आहे. (१ पेत्र ५:१-३) पण, त्यांच्या कळपातील मेंढरांना जर ते चांगल्या प्रकारे ओळखत नसतील तर त्यांना कळपाचे पालन कसे करता येईल? (नीतिसूत्रे २७:२३ वाचा.) वडील आपल्याला मदत करण्यास उत्सुक आहेत आणि आपल्यासोबत वेळ घालवण्यास त्यांना आनंद वाटतो असे बांधवांना दिसून आल्यास, अडीअडचणीच्या वेळी वडिलांची मदत मागण्यास त्यांना संकोच वाटणार नाही. तसेच, त्यांना वडिलांजवळ आपल्या मनातील भावना व चिंता-विवंचना मोकळेपणाने व्यक्त कराव्याशा वाटतील. परिणामस्वरूप, वडिलांना आपल्या कळपातील बांधवांकडे “लक्ष” देणे व त्यांना आवश्यक मदत पुरवणे शक्य होईल.
७. निरुत्साहित झालेले जेव्हा अविचारीपणे बोलतात तेव्हा आपण कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे?
७ थेस्सलनीका येथील मंडळीला लिहिताना पौलाने म्हटले: “अशक्तांना आधार द्या.” (१ थेस्सलनीकाकर ५:१४ वाचा.) “अल्पधीराचे” म्हणजेच निराश झालेले, तसेच निरुत्साहित झालेले बांधवदेखील एका अर्थाने अशक्तच असतात. नीतिसूत्रे २४:१० म्हणते: “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प होय.” अतिशय निरुत्साहित झालेली व्यक्ती कधीकधी अविचारीपणे बोलण्याची शक्यता आहे. (ईयो. ६:२, ३) अशांना आधार देण्यासाठी, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ते विशिष्ट गोष्टी बोलत असले तरी त्यांच्या मनात कदाचित तसे नसेल. रशेल, जिची आई नैराश्याने ग्रस्त होती तिला स्वतःच्या अनुभवावरून याचा प्रत्यय आला. रशेल सांगते: “कित्येकदा आई खूप द्वेषपूर्ण असं काहीतरी बोलून जायची. अशा वेळी सहसा मी स्वतःला याची आठवण करून द्यायचे की माझी आई खरोखर अशी नाही. मुळात ती खूप प्रेमळ, दयाळू व उदार मनाची आहे. मला जाणीव झाली की नैराश्यानं ग्रस्त असलेली व्यक्ती बरेचदा अशा गोष्टी बोलून जाते ज्या खरोखर तिच्या मनात नसतात. अशा वेळी बदल्यात आपणही अपशब्द काढणं किंवा वाईट वागणूक देणं यासारखा दुसरा निर्दयपणा असू शकत नाही.” नीतिसूत्रे १९:११ म्हणते: “विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.”
८. खासकरून कोणाला आपण आपल्या प्रेमाची खातरी करून दिली पाहिजे, आणि का?
८ एखाद्या व्यक्तीने गतकाळात पाप केले असेल आणि आपली चूक सुधारण्यासाठी आवश्यक पावलेही उचलली असतील; तरीपण केलेल्या चुकीबद्दल तिला अजूनही लाजिरवाणे वाटत असल्यास आणि त्यामुळे ती निराश असल्यास, अशा व्यक्तीकडे आपण “लक्ष” कसे देऊ शकतो? करिंथमधील एका पश्चात्ताप केलेल्या पापी माणसाबद्दल पौलाने असे लिहिले: “तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे. नाही तर तो दुःखसागरात बुडून जावयाचा. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खातरी करून द्या.” (२ करिंथ. २:७, ८) या ठिकाणी, “खातरी करून द्या” या शब्दांचा अर्थ, “दाखवा” किंवा “सिद्ध करा” असा होतो. एखाद्या व्यक्तीवर आपले प्रेम आहे आणि तिच्याबद्दल आपल्याला काळजी आहे हे तिला माहीत आहे असे आपण गृहीत धरू नये. आपल्या बोलण्यातून व कार्यांतून तिच्याबद्दलचे आपले प्रेम तिला दिसून आले पाहिजे.
“प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन”
९. “प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन” देणे याचा काय अर्थ होतो?
९ पौलाने लिहिले: “प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ.” आपण आपल्या बंधुभगिनींना प्रेम व्यक्त करण्याची आणि चांगली कार्ये करण्याची प्रेरणा दिली पाहिजे. शेकोटीची आग विझण्याच्या बेतात असते, तेव्हा ती जळत ठेवण्यासाठी आपल्याला कोळसे वर-खाली करावे लागतात आणि आगीला वारा द्यावा लागतो. (२ तीम. १:६) त्याच प्रकारे, आपल्या बंधुभगिनींनी देवाबद्दल आणि शेजाऱ्यांबद्दल प्रेम दाखवावे म्हणून आपण त्यांना प्रेमळपणे प्रोत्साहन देऊ शकतो. इतरांना चांगली कार्ये करण्याची प्रेरणा देण्यासाठी त्यांची प्रशंसा करणे अत्यंत आवश्यक आहे.
इतरांसोबत क्षेत्रसेवेत भाग घ्या
१०, ११. (क) आपल्यापैकी कोणाकोणाला इतरांकडून प्रशंसेची गरज आहे? (ख) चुकीचे पाऊल उचललेल्या व्यक्तीला प्रशंसेमुळे मदत कशी मिळू शकते हे उदाहरण देऊन सांगा.
१० आपण निरुत्साहित असू वा नसू, आपल्या सर्वांनाच इतरांकडून मिळणाऱ्या प्रशंसेची गरज आहे. मंडळीच्या एका वडिलांनी असे लिहिले: “मी केलेल्या कोणत्याच कार्याबद्दल माझ्या बाबांनी कधीच माझी प्रशंसा केली नव्हती. त्यामुळं, आपण केलेलं कोणतंच काम बरोबर नाही असं मला नेहमी वाटायचं. . . . आज मी ५० वर्षांचा आहे; मी वडील म्हणून चांगली सेवा करत आहे असं जेव्हा माझे मित्र मला सांगतात तेव्हा मला खूप बरं वाटतं. . . . इतरांची प्रशंसा करणं किती महत्त्वाचं आहे हे मी स्वतःच्या अनुभवावरून शिकलो. आणि म्हणूनच इतरांची प्रशंसा करण्याचा मी विशेष प्रयत्न करतो.” प्रशंसेमुळे आपल्या सर्वांनाच उत्तेजन मिळते, मग आपण पायनियर असू, वयोवृद्ध असू किंवा निरुत्साहित असू.—रोम. १२:१०.
११ “कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला” तर त्याला “ताळ्यावर” आणण्याचा प्रयत्न करताना, आध्यात्मिक पात्रता असलेल्यांनी प्रेमळपणे सल्ला दिल्यास आणि चांगल्या गोष्टींबद्दल त्याची प्रशंसा केल्यास, त्याला आपल्या चुकीच्या मार्गातून वळण्याची प्रेरणा मिळेल. (गलती. ६:१) मिरियम नावाच्या एका बहिणीच्या बाबतीत हे खरे ठरले. ती लिहिते: “माझ्या जीवनात एक अतिशय कठीण काळ आला होता. कारण मला खूप जवळच्या वाटणाऱ्या काही जणांनी सत्य सोडून दिलं, शिवाय त्याच सुमारास माझ्या बाबांचं ब्रेन हॅमरेज (मेंदूत रक्तस्राव) झालं. त्यामुळं मी खूप निराश झाले. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी, मी यहोवाचा साक्षीदार नसलेल्या एका माणसाशी मैत्री केली.” यामुळे, आपण यहोवाच्या प्रेमाच्या लायकीचे नाहीत असे तिला वाटू लागले आणि तिने सत्य सोडण्याचा विचार केला. जेव्हा मंडळीच्या एका वडिलांनी तिला गतकाळातील तिच्या विश्वासू सेवेची आठवण करून दिली, तेव्हा ही गोष्ट तिच्या अंतःकरणाला भिडली. यहोवा आजही तिच्यावर प्रेम करतो याची वडिलांनी तिला खातरी पटवून दिली. त्यामुळे, यहोवाबद्दलचे तिचे प्रेम पुन्हा जागृत झाले. तिने साक्षीदार नसलेल्या त्या माणसासोबत सर्व संबंध तोडले आणि पुन्हा एकदा यहोवाची सेवा करायला सुरुवात केली.
प्रेम आणि चांगली कार्ये करण्याचे उत्तेजन द्या
१२. आपण बांधवांची तुलना इतरांशी केली, त्यांची टीका केली, किंवा त्यांना दोष दिला तर काय घडू शकते?
१२ एखाद्या व्यक्तीची इतरांसोबत तुलना करून तिला लाज वाटायला लावणे, अवाजवी नियम बनवून त्यांचे पालन न केल्याबद्दल टीका करणे, किंवा यहोवाच्या सेवेत जास्त न केल्याबद्दल दोष देणे अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. कारण यांमुळे त्या व्यक्तीला काही काळ आवेशाने कार्य करण्याची प्रेरणा कदाचित मिळेलही; पण, तो आवेश जास्त काळ टिकणार नाही. दुसरीकडे पाहता, आपल्या बांधवांची प्रशंसा केल्यामुळे आणि त्यांना यहोवाबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण करून दिल्यामुळे चांगले व दीर्घकालीन परिणाम मिळू शकतात.—फिलिप्पैकर २:१-४ वाचा.
एकमेकांना उत्तेजन देऊ या
१३. इतरांना उत्तेजन देण्याचा काय अर्थ होतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)
१३ “तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे” आपण पाहतो तसतसे आपण एकमेकांना आणखी जास्त उत्तेजन देण्याची गरज आहे. इतरांना उत्तेजन देणे म्हणजे त्यांना देवाच्या सेवेत पुढे वाटचाल करत राहण्यास प्रवृत्त करणे. प्रेम आणि चांगली कार्ये करण्याचे उत्तेजन देण्याची तुलना, आग जळत राहण्यासाठी किंवा आगीची तीव्रता वाढवण्यासाठी आगीत इंधन टाकण्याशी करता येईल. निरुत्साहित लोकांना उत्तेजन देण्यासाठी त्यांना हिंमत देणे आणि त्यांचे सांत्वन करणे गरजेचे आहे. एखाद्या निरुत्साहित व्यक्तीला उत्तेजन देण्याची संधी आपल्याला मिळाल्यास आपण त्यांच्याशी प्रेमळपणे व सौम्यतेने बोलले पाहिजे. (नीति. १२:१८) शिवाय, आपण “ऐकावयास तत्पर” आणि बोलावयास धिमे असले पाहिजे. (याको. १:१९) आपण जर सहानुभूतीने आपल्या बांधवाचे म्हणणे ऐकले, तर आपल्याला अशा परिस्थितींविषयी माहिती मिळू शकेल ज्यांमुळे तो निरुत्साहित झाला आहे; आणि या परिस्थितींचा यशस्वी रीत्या सामना करण्यास मदत होईल असे काहीतरी आपल्याला त्या बांधवाला सांगता येईल.
चांगल्या सहवासाचा आनंद लुटा
१४. एका निरुत्साहित बांधवाला कशा प्रकारे मदत करण्यात आली?
१४ एक बांधव अनेक वर्षे अक्रियाशील होता. या बांधवाला मंडळीच्या एका प्रेमळ वडिलांनी कशी मदत केली त्याकडे लक्ष द्या. वडिलांनी त्या बांधवाचे म्हणणे ऐकले, तेव्हा हे स्पष्ट झाले, की त्याचे अजूनही यहोवावर खूप प्रेम होते. हा बांधव न चुकता टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या प्रत्येक अंकाचा अभ्यास करायचा आणि नियमितपणे सभांना उपस्थित राहण्याचाही प्रयत्न करायचा. पण, मंडळीतील काहींच्या कृतींमुळे तो निराश झाला आणि काहीसा कटू बनला. वडिलांनी त्या बांधवाची चूक न दाखवता त्याचे म्हणणे सहानुभूतीने ऐकून घेतले आणि त्या बांधवाबद्दल व त्याच्या कुटुंबाबद्दल कळकळ व्यक्त केली. हळूहळू त्या बांधवाला याची जाणीव झाली, की देवावर आपले मनापासून प्रेम असूनही आपण गतकाळातील वाईट अनुभवांना त्याची सेवा करण्याच्या आड येऊ देत आहोत. वडिलांनी त्या बांधवाला आपल्यासोबत प्रचार कार्यात भाग घेण्याचे आमंत्रण दिले. वडिलांच्या मदतीमुळे, हा बांधव पूर्वीप्रमाणेच सेवाकार्यात भाग घेऊ लागला आणि कालांतराने मंडळीत पुन्हा एकदा वडील म्हणून सेवा करण्यास पात्र बनला.
उत्तेजनाची गरज असलेल्यांचे सहनशीलतेने ऐका (परिच्छेद १४, १५ पाहा)
१५. निरुत्साहित बांधवांना उत्तेजन देण्याच्या बाबतीत आपण यहोवाकडून काय शिकू शकतो?
१५ एखादी व्यक्ती निरुत्साहित असेल, तर तिला कदाचित लगेच उत्साही वाटणार नाही किंवा आपण देत असलेल्या मदतीला ती ताबडतोब प्रतिसाद देणार नाही. त्यामुळे, आपण तिला सतत आधार देण्याची गरज आहे. पौलाने म्हटले: “अशक्तांना धरून राहा, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.” (१ थेस्सलनी. ५:१४, ॲन अमेरिकन ट्रान्सलेशन) तेव्हा, कमजोर लोक कधीच आपली मदत स्वीकारणार नाहीत असा विचार करण्याऐवजी, आपण त्यांना “धरून” राहू या, अर्थात त्यांना सतत आधार देऊ या. गतकाळात यहोवाचे जे सेवक कधीकधी निरुत्साहित झाले होते त्यांच्याशी तो सहनशीलतेने वागला. उदाहरणार्थ, एलीयाशी यहोवा अतिशय कृपाळूपणे वागला; त्याने त्याच्या भावनांची कदर केली. एलीयाला पुढेही त्याचे सेवाकार्य करत राहण्यासाठी लागणारी मदत यहोवाने पुरवली. (१ राजे १९:१-१८) दाविदाने मनापासून पश्चात्ताप केला तेव्हा यहोवाने त्याला क्षमा केली. (स्तो. ५१:७, १७) तसेच, ७३ व्या स्तोत्राच्या लेखकाने देवाची सेवा करण्याचे जवळजवळ थांबवलेच होते तेव्हा देवाने त्यालादेखील मदत केली. (स्तो. ७३:१३, १६, १७) यहोवा आपल्यासोबतही कृपाळूपणे व दयाळूपणे वागतो; खासकरून आपण निरुत्साहित असतो तेव्हा. (निर्ग. ३४:६) त्याची दया “रोज सकाळी नवी होते” आणि तिच्यात कधीच “खंड पडत नाही.” (विलाप. ३:२२, २३) यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो की आपण त्याचे अनुकरण करावे आणि निरुत्साहित बांधवांशी कोमलतेने वागावे.
जीवनाच्या मार्गावर टिकून राहण्यासाठी एकमेकांना उत्तेजन द्या
१६, १७. या जगाचा अंत जवळ येत असताना आपण कोणता दृढनिश्चय केला पाहिजे, आणि का?
१६ झाक्सेनहाउसन येथील छळ छावणीतून डेथ मार्चवर निघालेल्या ३३,००० कैद्यांपैकी हजारो जण मृत्यूमुखी पडले. पण, त्या छळ छावणीतून निघालेल्या एकूण २३० यहोवाच्या साक्षीदारांपैकी सर्वच्या सर्व त्या बिकट संकटातून जिवंत बचावले. त्यांनी एकमेकांना उत्तेजन व आधार दिला नसता, तर ते डेथ मार्चमधून सुखरूप बचावलेच नसते.
१७ आज आपण “जीवनाकडे” जाण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहोत. (मत्त. ७:१४) लवकरच, यहोवाचे सर्व उपासक नीतिमत्त्वाच्या नवीन जगात ऐक्याने प्रवेश करतील. (२ पेत्र ३:१३) तेव्हा, सार्वकालिक जीवनाकडे जाणाऱ्या मार्गावर चालत राहण्यास एकमेकांना मदत करण्याचा आपण दृढनिश्चय करू या.