वडिलांनो तुम्ही “थकलेल्या जिवाला” उभारी द्याल का?
तिशीत असलेली अंजलीa नावाची एक अविवाहित बहीण काहीशी बेचैन आहे. ती मंडळीच्या वडिलांची वाट पाहत आहे. तिला भेटून वडील तिला काय म्हणणार आहेत, हा प्रश्न तिला सतावत आहे? हे खरे आहे, की तिने मंडळीच्या काही सभा चुकवल्या आहेत, पण दिवसभर वयोवृद्ध लोकांचा सांभाळ करून ती पार दमून जाते. शिवाय, रोजच्या चिंतांसोबतच तिला तिच्या आईच्या तब्येतीचीही खूप काळजी वाटते.
जर तुम्हाला अंजलीची भेट घेऊन तिला प्रोत्साहन देण्यास सांगितले, तर या “थकलेल्या जिवाला” तुम्ही कशा प्रकारे प्रोत्साहन द्याल? (यिर्म. ३१:२५, पं.र.भा.) पण, सर्वात आधी, तुम्ही एका प्रोत्साहनदायक मेंढपाळ भेटीसाठी तयारी कशी कराल?
बंधुभगिनींच्या परिस्थितीचा विचार करा
केव्हाकेव्हा, आपण सर्वच जण नोकरी-धंद्यामुळे किंवा मंडळीतील जबाबदाऱ्यांमुळे थकून जातो. उदाहरणार्थ, दानीएल संदेष्ट्याचा विचार करा. त्याला मिळालेला एक दृष्टान्त तो समजू शकला नाही, तेव्हा त्याला “मूर्च्छा आली,” म्हणजे तो पार गळून गेला. (दानी. ८:२७) गब्रीएल देवदूत त्याच्यासमोर उपस्थित झाला तेव्हा त्याला साहाय्य मिळाले. देवदूताने दानीएलाला दृष्टान्त समजण्यास मदत केली आणि त्याला याचे आश्वासन दिले, की यहोवाने त्याच्या प्रार्थना ऐकल्या आहेत व तो अजूनही देवाला “परमप्रिय” आहे. (दानी. ९:२१-२३) नंतर दुसऱ्या एका प्रसंगी, थकून गेलेल्या या संदेष्ट्याला आणखी एका देवदूताने म्हटलेल्या प्रोत्साहनदायक शब्दांमुळे बळ मिळाले.—दानी. १०:१९.
मेंढपाळ भेटीला जाण्याआधी, बंधुभगिनींच्या परिस्थितीविषयी विचार करा
त्याचप्रमाणे, थकलेल्या किंवा निरुत्साहित झालेल्या एखाद्या बंधू किंवा भगिनीला भेटायला जाण्याआधी थोडा वेळ काढून त्यांच्या परिस्थितीविषयी विचार करा. ते कोणत्या समस्यांना तोंड देत आहेत? या समस्यांचा त्यांच्यावर काय परिणाम होत असेल? त्यांच्यामध्ये कोणते उत्तम गुण आहेत? वीस वर्षांपासून वडील म्हणून सेवा करत असलेले रिचर्ड म्हणतात: “मी माझ्या बंधुभगिनींच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करतो. त्यांना भेटायला जाण्याआधी त्यांच्या परिस्थितीविषयी काळजीपूर्वक विचार केल्यानं, त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार त्यांना प्रोत्साहन कसं देता येईल हे ठरवणं सोपं जातं.” मेंढपाळ भेटीसाठी तुमच्यासोबत जर आणखी एखादे वडील जाणार असतील, तर तुम्ही दोघे मिळून तुमच्या बंधुभगिनींच्या परिस्थितीबद्दल विचार करू शकता.
तुमच्या बंधुभगिनींना निश्चिंत वाटू द्या
इतरांसमोर आपल्या भावना व्यक्त करणे तितके सोपे नसते हे तुम्हीदेखील मान्य कराल. उदाहरणार्थ: एखाद्या वडलासमोर स्वतःच्या भावना व्यक्त करताना बंधुभगिनींना अवघडल्यासारखे वाटू शकते. तर मग, तुम्ही त्यांना बोलते कसे करू शकता? तुमचा चेहरा हसतमुख असेल आणि तुम्ही चार आश्वासक शब्द बोललात, तर याचा चांगला परिणाम होऊ शकतो. ४० पेक्षा जास्त वर्षांपासून वडील या नात्याने सेवा करत असलेले मायकल कोणाला भेटायला जातात तेव्हा ते सहसा असे म्हणून सुरुवात करतात: “तुम्हाला माहीतंय, वडिलांजवळ असलेला एक खास विशेषाधिकार म्हणजे बंधुभगिनींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणं आणि त्यांना चांगल्या प्रकारे जाणून घेणं. आणि म्हणूनच या भेटीची मी खूप आतुरतेनं वाट पाहत होतो.”
हवे असल्यास भेटीच्या सुरुवातीलाच तुम्ही त्यांच्यासाठी मनापासून प्रार्थना करू शकता. प्रेषित पौलाने त्याच्या प्रार्थनेत बंधुभगिनींचा विश्वास, प्रेम आणि धीर यांचा विशेष उल्लेख केला. (१ थेस्सलनी. १:२, ३) तुमच्या बंधुभगिनींच्या चांगल्या गुणांबद्दल तुम्हाला कसे वाटते हे तुमच्या प्रार्थनेत व्यक्त करण्याद्वारे, तुम्ही खरेतर एका अर्थपूर्ण संवादासाठी स्वतःच्या, तसेच तुमच्या बंधूच्या किंवा भगिनीच्या मनाची तयारी करता. प्रार्थनेत बोललेल्या तुमच्या शब्दांमुळेदेखील त्यांना दिलासा मिळू शकतो. राजीव नावाचे एक अनुभवी वडील सांगतात: “आपल्या हातून जे काही चांगलं घडत असतं, ते कधीकधी आपण सर्वच जण विसरून जातो. म्हणून, जेव्हा कोणीतरी आपल्याला याची आठवण करून देतं, तेव्हा आपल्या मनाला उभारी मिळते.”
बायबलच्या साहाय्याने आध्यात्मिक प्रोत्साहन द्या
पौलाप्रमाणे आपणदेखील आपल्या बंधुभगिनींना बायबलमधून एखादा विचार सांगण्याद्वारे, त्यांना “आध्यात्मिक कृपादान” देऊ शकतो, मग ते फक्त एकाच वचनातून का असेना. (रोम. १:११) उदाहरणार्थ, निराश झालेल्या एखाद्या बांधवाला, आपली काहीच किंमत नाही असे वाटत असेल. तुम्ही त्या बांधवासोबत बायबलमधून स्तोत्रकर्त्याविषयी वाचू शकता ज्याने स्वतःबद्दल असे म्हटले: “धुरात ठेवलेल्या बुधल्यासारखा मी झालो आहे.” त्या स्तोत्रकर्त्याला निराश वाटत असूनही त्याने पुढे म्हटले: “मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही.” (स्तो. ११९:८३, १७६) या वचनांत जे सांगितले आहे त्याविषयी थोडक्यात स्पष्ट केल्यानंतर, तुम्ही आपल्या बांधवाबद्दल हा भरवसा व्यक्त करू शकता, की तोदेखील देवाच्या आज्ञा विसरलेला नाही.
त्याच प्रकारे, एखाद्या बहिणीने कदाचित मंडळीसोबत सहवास करण्याचे थांबवले असेल किंवा सेवेतील तिचा उत्साह मंदावला असेल. हरवलेल्या रुप्याच्या नाण्याचा दृष्टान्त या बहिणीच्या मनाला स्पर्श करू शकतो का? (लूक १५:८-१०) हरवलेले नाणे कदाचित गळ्यातील मौल्यवान हारातील अनेक चांदीच्या नाण्यांपैकी एक असावे. त्या बहिणीसोबत या दृष्टान्तावर चर्चा केल्याने तिला हे समजण्यास मदत मिळू शकते, की ती ख्रिस्ती मंडळीच्या मौल्यवान सदस्यांपैकी एक आहे. चर्चेनंतर, तुम्ही हे स्पष्ट करून सांगू शकता, की ती बहीण यहोवाच्या मेंढरांपैकी एक असून तो तिची काळजी करतो.
आपल्या बंधुभगिनींना सहसा बायबलमधून वाचलेल्या गोष्टींवर टिप्पण्या करायला आवडते. म्हणून, स्वतःच बोलत राहू नका! त्यांच्या परिस्थितीला लागू होणारे एखादे वचन वाचल्यानंतर, तुम्ही त्या वचनातील मुख्य शब्दांकडे त्यांचे लक्ष वेधून त्यांवर टिप्पणी करण्यास सांगू शकता. उदाहरणार्थ, २ करिंथकर ४:१६ हे वचन वाचल्यानंतर, एक वडील असे विचारू शकतात, “यहोवानं तुम्हाला नवं केलं, तुम्हाला बळ दिलं असे काही प्रसंग तुम्हाला आठवतात का?” असे केल्याने, परस्परांना खऱ्या अर्थाने “उत्तेजन प्राप्त” होईल.—रोम. १:१२.
आपल्या बंधुभगिनींना सहसा बायबलमधून वाचलेल्या गोष्टींवर टिप्पण्या करायला आवडते
तुमच्या बंधू किंवा भगिनीच्या परिस्थितीसारखीच परिस्थिती असलेल्या बायबलमधील एखाद्या व्यक्तीविषयी चर्चा करण्याद्वारेही तुम्ही त्यांच्या मनाला उभारी देऊ शकता. हन्ना किंवा एपफ्रदीत यांच्यासारख्या व्यक्तींचा अहवाल वाचल्याने नैराश्याने ग्रस्त असलेल्या बंधू किंवा भगिनीला उत्तेजन मिळू शकते. बायबलमधील या व्यक्तीदेखील केव्हाकेव्हा निराश झाल्या, पण तरीही देवाच्या नजरेत त्या मौल्यवान होत्या. (१ शमु. १:९-११, २०; फिलिप्पै. २:२५-३०) तेव्हा, बंधुभगिनींची परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही त्यांच्यासोबत बायबलमधील काही चांगल्या उदाहरणांची चर्चा करू शकता का?
भेटीनंतरही आस्था दाखवत राहा
मेंढपाळ भेटीनंतरही, आपल्या बंधुभगिनींबद्दल खरी आस्था दाखवत राहा. (प्रे. कृत्ये १५:३६) उदाहरणार्थ, भेटीचा समारोप करताना, तुम्ही त्यांच्यासोबत प्रचार कार्य करण्याची व्यवस्था करू शकता. बर्नार्ड नावाचे एक अनुभवी वडील, अलीकडेच भेट दिलेल्या एखाद्या बंधूला किंवा भगिनीला पुन्हा भेटतात, तेव्हा भेटीच्या वेळी त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा ते विचारशीलपणे उल्लेख करतात. ते म्हणतात: “तर मग, त्या सल्ल्याचा काही फायदा झाला का?” अशा प्रकारे आपुलकी दाखवल्यास, त्यांना आणखी मदतीची गरज आहे की नाही हे तुम्हाला समजेल.
बंधुभगिनींबद्दल आपल्याला कळकळ वाटते, आपण त्यांना समजून घेतो आणि त्यांच्यावर आपले प्रेम आहे याची त्यांना जाणीव होणे आज कितीतरी जास्त गरजेचे आहे. (१ थेस्सलनी. ५:११) म्हणून, मेंढपाळ भेटीला जाण्याआधी, बंधुभगिनींच्या परिस्थितीविषयी विचार करा. त्यांच्याविषयी प्रार्थना करा. योग्य वचनांची निवड करा. असे केल्यास, “थकलेल्या जिवाला” प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हाला उचित शब्द सापडतील!
a नावे बदलण्यात आली आहेत.