नैसर्गिक विपत्ती देव निर्दयी असल्याचा पुरावा आहे का?
लोक काय म्हणतात? “देव ही पृथ्वी चालवतो त्यामुळे तोच नैसर्गिक विपत्ती घडू देतो; तर मग तो नक्कीच निर्दयी आहे.”
बायबल काय सांगते? “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) हा दुष्ट कोण आहे? बायबल याला सैतान म्हणून संबोधते. (मत्तय १३:१९; मार्क ४:१५) यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते का? मग पुढील गोष्टीचा जरा विचार करा: सैतान जगावर राज्य करत असल्यामुळेच तो स्वतःप्रमाणे मानवांनाही स्वार्थी, लोभी व अविचारी होण्यास प्रभावित करतो. म्हणून मानव पृथ्वीवरील पर्यावरणाची नीट काळजी घेऊ शकत नाहीत. अनेक तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे, की पर्यावरणातील असंतुलन हे नैसर्गिक विपत्तींना कारणीभूत ठरू शकते, त्या विपत्तींत वाढ होऊ शकते किंवा मानव समाजाला त्यांचा धोका जास्त संभावू शकतो.
असे आहे तर मग, देव सैतानाला त्याचा प्रभाव पाडूच का देतो? याचे उत्तर, मानव इतिहासाच्या सुरुवातीला आपल्या पहिल्या आईवडिलांनी देवाला राजा या नात्याने झिडकारले त्यावरून मिळते. तेव्हापासून बऱ्याच मानवांनी हा मार्ग निवडला. देवाला शासक म्हणून झिडकारल्यामुळे मानव समाज देवाचा शत्रू, सैतानाच्या शासनाखाली आला आहे. म्हणून येशूने सैतानाला “जगाचा अधिकारी” असे म्हटले. (योहान १४:३०) पण मग सैतान सदासर्वकाळ राज्य करेल का? नाही.
सैतानामुळे आपल्याला ज्या समस्यांचा सामना करावा लागतो त्याकडे यहोवाa दुर्लक्ष करतो असे नाही. उलट, मानवांना होणारे दुःख पाहून त्याला अतिशय वाईट वाटते. उदाहरणार्थ, इस्राएली राष्ट्राला कठीण समस्यांचा सामना करावा लागला तेव्हा त्याला कसे वाटले त्याविषयी बायबल म्हणते: “त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला.” (यशया ६३:९) देव लवकरच सैतानाच्या निर्दयी राज्याचा अंत करणार आहे! देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याला न्याय्य व धार्मिक राजा या नात्याने सदासर्वकाळ राज्य करण्यासाठी नेमले आहे.
तुमचा काय फायदा होणार आहे? नैसर्गिक विपत्तींपासून मानवांचे रक्षण करण्यास सैतानाचे राज्य अपयशी ठरले असले तरी, येशूचे राज्य लोकांचे रक्षण करेल. एकदा येशूने मोठ्या वादळापासून आपल्या शिष्यांचे रक्षण केले. त्याविषयी बायबल सांगते: “तेव्हा त्याने . . . वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले.” त्याचे शिष्य म्हणाले: “हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात.” (मार्क ४:३७-४१) या अहवालावरून याची खातरी मिळते की येशू त्याच्या शासनकाळात सर्व आज्ञाधारक मानवांचे रक्षण करेल.—दानीएल ७:१३, १४. (w१३-E ०५/०१)
a बायबलमध्ये देवाचे नाव यहोवा असे दिले आहे.