खंबीर व्हा यहोवा तुमच्यासोबत आहे!
“खंबीर हो आणि हिंमत धर. . . . यहोवा तुझा देव तुझ्याबरोबर आहे.”—यहो. १:९, NW.
१, २. (क) समस्यांचा सामना करण्यास कोणते गुण आपल्याला साहाय्यक ठरू शकतात? (ख) विश्वासाची परिभाषा काय आहे? उदाहरण द्या.
यहोवाची सेवा केल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. पण, इतर मानवांप्रमाणे आपल्यालाही समस्यांचा सामना करावा लागतो. शिवाय, “नीतिमत्त्वामुळे” आपल्याला दुःख सोसावे लागू शकते. (१ पेत्र ३:१४; ५:८, ९; १ करिंथ. १०:१३) अशा समस्यांचा यशस्वी रीत्या सामना करण्यासाठी आपल्याला विश्वासाची आणि खंबीरपणाची गरज आहे.
२ विश्वास काय आहे? प्रेषित पौलाने असे लिहिले: “विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खातरी आहे.” (इब्री ११:१) आणखी एक भाषांतर असे म्हणते: “विश्वास हा आशा केलेल्या गोष्टींचा हक्कलेख आहे. विश्वास हा डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टींची खातरी आहे.” (द सिंपल इंग्लिश बायबल) जर मालमत्ता लेखी स्वरूपात आपल्या नावावर करण्यात आली असेल, तर ती आपल्या मालकीची होईल असा भरवसा आपल्याला असतो. देव नेहमीच आपले अभिवचन पूर्ण करतो हा विश्वास आपल्याला असल्यामुळे, हे जणू आपल्याजवळ एक मोलाचा हक्कलेख असल्यासारखे आहे. आपल्या विश्वासामुळे आपल्याला याची पक्की खातरी मिळते की बायबलमधील जी अभिवचने पूर्ण होण्याची आपण आशा धरलेली आहे ती नक्कीच पूर्ण होतील. आणि बायबलमध्ये सांगितलेल्या सर्वच गोष्टी, मग आपण त्या पाहू शकत नसलो, तरी आपल्याला त्यांची खातरी आहे.
३, ४. (क) खंबीरपणा म्हणजे काय? (ख) आपला विश्वास व खंबीरपणा आपण कसा वाढवू शकतो?
३ खंबीरपणाची परिभाषा, “संकटांचा व धोक्यांचा सामना करताना निर्भयपणे बोलण्यासाठी आणि कृती करण्यासाठी लागणारे आध्यात्मिक, भावनात्मक, आणि नैतिक बळ” अशी करण्यात आली आहे. (द न्यू इंटरप्रिटर्स डिक्शनरी ऑफ द बायबल) आपल्यात खंबीरपणा किंवा धैर्य असल्यास, आपण बळकट, धाडसी आणि आपल्या विश्वासांसाठी दुःख सोसण्यासही तयार असतो.—मार्क ६:४९, ५०; २ तीम. १:७.
४ विश्वास आणि खंबीरपणा हे गुण नक्कीच आपल्यामध्ये असले पाहिजेत. पण, समजा वैयक्तिक रीत्या आपल्याला आणखी विश्वासाची गरज आहे आणि आपण खंबीर किंवा धैर्यवान नाही असे आपल्याला वाटत असल्यास काय? बायबलमध्ये उल्लेख केलेल्या हजारो जणांनी हे गुण दाखवण्याच्या बाबतीत उत्तम उदाहरण मांडले आहे. तेव्हा, त्यांच्यापैकी काही उदाहरणांवर मनन करण्याद्वारे आपण आपला विश्वास व धैर्य आणखी वाढवू शकतो.
यहोवा यहोशवासोबत होता
५. यहोशवाला आपल्या नेमणुकीत यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज होती?
५ आपण इतिहासात ३,५०० वर्षे मागे जाऊ या. यहोवाच्या बलशाली हाताखाली लाखो इस्राएली लोकांना इजिप्तच्या दासत्वातून मुक्त करण्यात आल्यानंतर ४० वर्षे लोटली आहेत. त्यांची सुटका करण्यात मोशे संदेष्ट्याने पुढाकार घेतला. आता तो १२० वर्षांचा आहे. तो दुरूनच म्हणजे नबो पर्वताच्या शिखरावरून प्रतिज्ञात देशाची पाहणी करतो आणि तेथेच मरण पावतो. त्याचा उत्तराधिकारी यहोशवा हा “ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण” असा मनुष्य आहे. (अनु. ३४:१-९) इस्राएल लोक कनान देशाचा ताबा घेण्यास सज्ज आहेत. इस्राएल लोकांचे नेतृत्व करण्यात यशस्वी होण्यासाठी यहोशवाला देवाकडून मिळणाऱ्या बुद्धीवर अवलंबून राहावे लागेल. तसेच, त्याला यहोवावर विश्वास दाखवावा लागेल आणि खंबीर होऊन हिंमत धरावी लागेल.—अनु. ३१:२२, २३.
६. (क) यहोशवा २३:६ या वचनानुसार आपल्याला काय करण्यासाठी धैर्याची गरज आहे? (ख) प्रेषितांची कृत्ये ४:१८-२० आणि ५:२९ या वचनांवरून आपल्याला काय शिकायला मिळते?
६ कनान देशाचा ताबा घेण्यासाठी इस्राएल लोकांना अनेक वर्षे युद्ध करावे लागले. त्या काळात यहोशवाने दाखवलेला सुज्ञपणा, खंबीरपणा आणि विश्वास यांमुळे इस्राएली लोकांचे मनोबल नक्कीच आणखी वाढले असेल. पण, त्यांना केवळ युद्ध लढण्यासाठीच नव्हे, तर देवाच्या आज्ञांचे पालन करण्यासाठीही धैर्याची गरज होती. यहोशवाच्या जीवनाच्या शेवटी त्याने आपल्या शेवटच्या भाषणात त्यांना असे म्हटले: “मोठी हिंमत धरा, मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात जे लिहिले आहे ते सगळे काळजीपूर्वक पाळा, त्यापासून उजवीडावीकडे वळू नका.” (यहो. २३:६) आपल्यालाही सर्व प्रसंगी यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्यासाठी धैर्याची गरज आहे. यात अशा प्रसंगांचाही समावेश होतो जेव्हा मानव आपल्याकडून देवाच्या इच्छेविरुद्ध वागण्याची मागणी करतात. (प्रेषितांची कृत्ये ४:१८-२०; ५:२९ वाचा.) आपण पूर्ण भरवशाने यहोवाला प्रार्थना केल्यास, अशा प्रकारे खंबीर भूमिका घेण्यास तो आपल्याला मदत करेल.
आपण कशा प्रकारे आपला मार्ग यशस्वी बनवू शकतो?
७. धैर्याने कार्य करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी यहोशवाने काय करणे गरजेचे होते?
७ देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याकरता लागणारे धैर्य उत्पन्न करण्यासाठी आपण त्याच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे आणि शिकलेल्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत. मोशेनंतर इस्राएल लोकांचे नेतृत्व करण्यासाठी यहोशवाला निवडण्यात आले तेव्हा देवाने त्याला असे सांगितले: “तू खंबीर हो व खूप हिंमत धर, आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. . . . नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ती घडेल.” (यहो. १:७, ८) यहोशवाने या सल्ल्याचे पालन केले आणि तो यशस्वी झाला. आपणही तसेच केल्यास, आपण आणखी जास्त धैर्यवान बनू आणि देवाच्या सेवेत आपल्याला यशःप्राप्ती घडेल.
२०१३ चे वार्षिक वचन: “खंबीर हो आणि हिंमत धर. . . . यहोवा तुझा देव तुझ्याबरोबर आहे.”—यहोशवा १:९, NW.
८. सन २०१३ चे वार्षिक वचन कोणत्या वचनावर आधारित आहे, आणि यातील शब्दांमुळे तुम्हाला मदत मिळेल असे तुम्हाला का वाटते?
८ यहोवाने पुढे यहोशवाला जे म्हटले ते ऐकून त्याचे मनोधैर्य आणखी वाढले असेल: “खंबीर हो आणि हिंमत धर. घाबरू नको, कचरू नको; कारण तू जाशील तिकडे यहोवा तुझा देव तुझ्याबरोबर आहे.” (यहो. १:९, NW) यहोवा आज आपल्यासोबतही आहे. तेव्हा, आपल्यासमोर कोणत्याही परीक्षा आल्या, तरी आपण घाबरू नये, कचरू नये. या वचनातील उल्लेखनीय विधान हे आहे: “खंबीर हो आणि हिंमत धर. . . . यहोवा तुझा देव तुझ्याबरोबर आहे.” यहोशवा १:९ यातील हे शब्द २०१३ साठी वार्षिक वचन म्हणून निवडण्यात आले आहेत. या शब्दांमुळे आणि विश्वास व धैर्य दाखवणाऱ्या इतर अनेकांच्या शब्दांमुळे व कार्यांमुळे येणाऱ्या महिन्यांत नक्कीच आपले मनोधैर्य वाढेल.
त्यांनी खंबीर भूमिका घेतली
९. राहाबेने कशा प्रकारे विश्वास आणि खंबीरपणा दाखवला?
९ यहोशवाने कनान देशात दोन हेर पाठवले तेव्हा राहाब वेश्येने त्यांना लपवले आणि त्यांच्या शत्रूंची दिशाभूल केली. तिचा विश्वास व खंबीरपणा यांमुळे, इस्राएल लोकांनी यरिहो शहराचा नाश केला तेव्हा तिचा व तिच्या कुटुंबाचा बचाव करण्यात आला. (इब्री ११:३०, ३१; याको. २:२५) अर्थातच, यहोवाचे मन आनंदित करण्यासाठी तिने आपले अनैतिक जीवन सोडून दिले. ख्रिस्ती बनलेल्यांपैकी काहींनीही देवाचे मन आनंदित करण्यासाठी विश्वास, खंबीरपणा व नैतिक बळ दाखवून जीवनात असेच बदल केले आहेत.
१०. रूथने कोणत्या परिस्थितीत खऱ्या उपासनेसाठी खंबीर भूमिका घेतली, आणि त्यामुळे तिला कोणते आशीर्वाद मिळाले?
१० यहोशवाच्या मृत्यूनंतर, मवाबी रूथ हिने खऱ्या उपासनेसाठी खंबीर भूमिका घेतली. एका इस्राएली पुरुषाची विधवा असल्यामुळे, तिला यहोवाबद्दल थोडीफार माहिती असावी. तिची सासू नामी मवाबमध्ये राहत होती, पण नंतर तिने इस्राएलच्या बेथलेहेम या गावात परतण्याचा निर्णय घेतला. वाटेत नामीने रूथला तिच्या लोकांकडे मवाब देशात परत जाण्याचा आग्रह केला, पण रूथने तिला असे उत्तर दिले: “मला सोडून जा आणि माझ्यामागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. . . . तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव.” (रूथ १:१६) रूथचा निश्चय दृढ होता. कालांतराने, नामीचा नातेवाईक बवाज याने रूथशी लग्न केले. नंतर, रूथने एका मुलाला जन्म दिला आणि अशा प्रकारे ती दावीद आणि येशू यांची पूर्वज बनली. यावरून स्पष्टपणे दिसते, की विश्वास व खंबीरपणा दाखवणाऱ्यांना यहोवा आशीर्वादित करतो.—रूथ २:१२; ४:१७-२२; मत्त. १:१-६.
अनेकांनी आपला जीव धोक्यात घातला!
११. यहोयादा आणि यहोशेबा यांनी कशा प्रकारे धैर्य दाखवले, आणि यामुळे काय साध्य झाले?
११ देवाच्या राज्याशी संबंधित गोष्टींना आणि स्वतःच्या हितांपेक्षा आपल्या सहविश्वासू बंधुभगिनींच्या हितांना प्राधान्य देणाऱ्यांबरोबर यहोवा असतो, हे पाहिल्यावर आपला विश्वास आणि धैर्य आणखी मजबूत होते. उदाहरणार्थ, मुख्य याजक यहोयादा आणि त्याची पत्नी यहोशेबा यांचा विचार करा. अहज्या राजाच्या मृत्यूनंतर त्याची आई अथल्या हिने यहोआशचा अपवाद वगळता उरलेल्या सर्व राजपुत्रांना मारून टाकले आणि राजासन बळकावले. पण, यहोयादा आणि यहोशेबा यांनी आपला जीव धोक्यात घालून अहज्याचा मुलगा यहोआश याला वाचवले होते व सहा वर्षे लपवून ठेवले होते. सातव्या वर्षी यहोयादाने यहोआश याला राजा घोषित केले आणि अथल्या हिला जिवे मारले. (२ राजे ११:१-१६) नंतर यहोयादाने मंदिराच्या डागडुजीच्या कार्यात यहोआश राजाला पाठिंबा दिला. आणि यहोयादा याजक १३० वर्षांचा होऊन मरण पावला तेव्हा त्याला राजांमध्ये मूठमाती देण्यात आली, “कारण त्याने इस्राएलात देव व त्याचे मंदिर यांच्या संबंधाने चांगले काम केले होते.” (२ इति. २४:१५, १६) शिवाय, यहोयादा व त्याच्या पत्नीच्या धैर्यवान कृत्यांमुळे दाविदापासून मशीहापर्यंतचा राजवंश टिकून राहिला.
१२. एबद-मलेख याने कशा प्रकारे खंबीर भूमिका घेतली?
१२ सिद्कीया राजाच्या घरातील एबद-मलेख नावाच्या एका खोज्याने यिर्मयासाठी आपला जीव धोक्यात घातला. राजाने यिर्मयाला यहुदाच्या राजपुत्रांच्या हवाली केले होते. त्यांनी यिर्मयावर देशद्रोहाचा खोटा आरोप लावून त्याला ठार मारण्यासाठी चिखलाने भरलेल्या एका विहिरीत टाकले. (यिर्म. ३८:४-६) लोक यिर्मयाचा द्वेष करतात हे माहीत असूनही एबद-मलेख याने आपला जीव धोक्यात घातला आणि सिद्कीया राजाला यिर्मया संदेष्ट्यास वाचवण्याची विनंती केली. सिद्कीयाने एबद-मलेखाची विनंती ऐकली आणि यिर्मयाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी त्याच्यासोबत ३० माणसांना पाठवले. देवाने यिर्मया संदेष्ट्याद्वारे एबद-मलेख याला आश्वासन दिले की बॅबिलोनची सेना जेरूसलेमला वेढा घालेल तेव्हा त्यात त्याचा नाश होणार नाही. (यिर्म. ३९:१५-१८) देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी जे लोक खंबीर भूमिका घेतात त्यांना देव आशीर्वादित करतो.
१३. तीन इब्र्यांनी कोणती खंबीर भूमिका घेतली, आणि त्यांच्या अनुभवाचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?
१३ विश्वास आणि खंबीरपणा दाखवल्यामुळे यहोवा देव आशीर्वादित करतो याचा स्पष्ट पुरावा इ.स.पू. सातव्या शतकात देवाच्या तीन इब्री सेवकांना मिळाला. नबुखद्नेस्सर राजाने बॅबिलोनमधील प्रतिष्ठित लोकांना एकत्र केले आणि त्यांनी सोन्याच्या एका मोठ्या मूर्तीची उपासना करावी अशी मागणी केली. तसे न करणाऱ्याला आगीच्या भट्टीत टाकण्यात येणार होते. त्या तीन इब्र्यांनी आदराने नबुखद्नेस्सराला असे सांगितले: “ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवावयाला समर्थ आहे; महाराज, तो आम्हास आपल्या हातातून सोडवील. ते कसेही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापिलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही.” (दानी. ३:१६-१८) या तीन इब्र्यांची कशा प्रकारे अद्भुत रीत्या सुटका करण्यात आली याचे सुंदर वर्णन आपल्याला दानीएल ३:१९-३० यात वाचायला मिळते. आज कदाचित आपल्याला आगीच्या भट्टीत टाकण्याची धमकी कोणी देणार नाही; तरी आजही आपल्या सचोटीची परीक्षा होते. आणि आपण ही खातरी बाळगू शकतो की आपण विश्वास व खंबीरपणा दाखवतो तेव्हा देव आपल्याला आशीर्वादित करेल.
१४. दानीएल ६ व्या अध्यायानुसार, दानीएलाने कशा प्रकारे खंबीर भूमिका घेतली, आणि याचा परिणाम काय झाला?
१४ दानीएलचे वाईट करू पाहणाऱ्या त्याच्या शत्रूंनी राजा दारयावेश याला एक फर्मान काढण्यास राजी केले. त्यांनी राजाला असे सांगितले: “तीस दिवसपर्यंत आपल्याशिवाय कोणाही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्यास सिंहांच्या गुहेत टाकावे.” दानीएलाने अशा परिस्थितीत विश्वास आणि खंबीरपणा दाखवला. या फर्मानावर राजाने सही केल्याचे त्याने ऐकले तेव्हा “तो आपल्या घरी गेला; त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या; त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला.” (दानी. ६:६-१०) दानीएलाने खंबीर भूमिका घेतल्यामुळे त्याला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले, पण यहोवाने त्याची सुटका केली.—दानी. ६:१६-२३.
१५. (क) अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांनी विश्वास आणि धैर्य दाखवण्याविषयी कोणते उदाहरण मांडले? (ख) योहान १३:३४ यातील येशूच्या शब्दांचा काय अर्थ आहे, आणि अनेक ख्रिश्चनांनी अशा प्रकारचे प्रेम कसे दाखवले आहे?
१५ अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांनी पौलाच्या “जिवाकरता आपला जीव धोक्यात घातला.” त्यांनी हे कोणत्या परिस्थितीत केले याविषयी बायबलमध्ये सांगितलेले नाही. (प्रे. कृत्ये १८:२; रोम. १६:३, ४) त्यांनी येशूच्या शब्दांच्या सामंजस्यात धैर्याने पावले उचलली: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.” (योहा. १३:३४) मोशेच्या नियमशास्त्रात सांगितले होते की एका व्यक्तीने स्वतःप्रमाणेच आपल्या शेजाऱ्यावरही प्रेम केले पाहिजे. (लेवी. १९:१८) पण, येशूने दिलेली आज्ञा “नवी” होती, ती या अर्थाने की येशूप्रमाणेच आपणही इतरांबद्दल प्रेम दाखवण्याकरता आपला जीव धोक्यात घालण्यासही तयार असले पाहिजे. सहविश्वासू बंधुभगिनींना शत्रूंच्या हाती क्रूर वागणूक किंवा मृत्यू सोसावा लागू नये म्हणून अनेक ख्रिश्चनांनी धैर्याने “आपला जीव धोक्यात” घालण्याद्वारे प्रेम दाखवले आहे.—१ योहान ३:१६ वाचा.
पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी तडजोड करण्याचा विचारही केला नाही
१६, १७. पहिल्या शतकात ख्रिस्ताच्या काही अनुयायांना, तसेच आपल्या काळातील काही ख्रिश्चनांनाही विश्वासाच्या कोणत्या परीक्षांचा सामना करावा लागला?
१६ येशूप्रमाणेच, पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी खंबीरपणे केवळ यहोवा देवाची उपासना केली. (मत्त. ४:८-१०) त्यांनी रोमन सम्राटाच्या सन्मानार्थ धूप जाळण्यास नकार दिला. (चित्र पाहा.) याविषयी डॅनिएल पी. मॅनिक्स यांनी असे लिहिले: “ख्रिश्चनांच्या सोयीसाठी आखाड्यात एका वेदीवर आग जाळत ठेवली जायची, तरी जवळजवळ सर्वांनीच धूप जाळण्यास नकार दिला. कैद्यांना केवळ एक चिमूटभर धूप घेऊन आगीत टाकायचा होता आणि त्यांनी तसे केल्यास त्यांना ‘बलिदानाचे प्रमाणपत्र’ दिले जायचे व मुक्त केले जायचे. त्यांना काळजीपूर्वक समजावून सांगितले जायचे की या कृत्याद्वारे ते सम्राटाची उपासना करत नाहीत, तर रोमन साम्राज्याचा प्रमुख या नात्याने ते केवळ सम्राटाचे दैवीपण मान्य करत आहेत. तरीसुद्धा, जवळजवळ सर्वच ख्रिश्चनांनी स्वतःची सुटका करून घेण्याच्या या संधीचा फायदा घेण्यास नकार दिला.”—दोज अबाऊट टू डाय.
१७ आधुनिक काळातही नात्झी छळ छावण्यांत अनेक ख्रिश्चनांना मुक्त होण्याच्या आणि मृत्यू टाळण्याच्या अनेक संधी देण्यात आल्या. याकरता त्यांना यहोवाची सेवा करण्याचे सोडून दिले आहे असे घोषित करणाऱ्या पत्रावर केवळ सही करायची होती. पण, फार कमी साक्षीदारांनी तसे केले. अलीकडच्या काळात, रुआंडा देशातील जातिसंहाराच्या वेळी तुत्सी व हुतू साक्षीदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून एकमेकांचे संरक्षण केले. अशा परीक्षांचा सामना करण्यासाठी विश्वास व धैर्याची गरज असते.
यहोवा आपल्यासोबत आहे हे आठवणीत ठेवा!
१८, १९. विश्वास आणि धैर्य दाखवलेल्या बायबलमधील कोणत्या उदाहरणांमुळे आपल्याला प्रचार कार्य करत राहण्यास मदत मिळू शकते?
१८ देवाने आपल्या मानवी सेवकांवर सोपवलेल्या सर्वात मोठ्या कार्यात भाग घेण्याची सुसंधी आज आपल्याला लाभली आहे. ती म्हणजे देवाच्या राज्याचा संदेश घोषित करण्याची आणि शिष्य बनवण्याची सुसंधी. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) याविषयी येशूने मांडलेल्या अतुलनीय उदाहरणाबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! तो “उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता.” (लूक ८:१) त्याच्याप्रमाणेच, राज्य संदेशाचा प्रचार करण्यासाठी आपल्यालादेखील विश्वास आणि धैर्याची गरज आहे. देवाच्या साहाय्याने आपण नोहाप्रमाणे धैर्यवान बनू शकतो. नोहाने “नीतिमत्त्वाचा उपदेशक” या नात्याने, जागतिक जलप्रलयात नाश होणार असलेल्या अभक्त लोकांना निर्भयपणे प्रचार केला.—२ पेत्र २:४, ५.
१९ प्रार्थनेमुळे प्रचार कार्यात भाग घेण्यास आपल्याला मदत मिळते. ख्रिस्ताच्या काही अनुयायांचा छळ करण्यात आला तेव्हा त्यांनी “धैर्याने” देवाचे वचन सांगता यावे म्हणून प्रार्थना केली आणि देवाने त्यांची प्रार्थना ऐकली. (प्रेषितांची कृत्ये ४:२९-३१ वाचा.) घरोघरचे प्रचार कार्य करण्यास तुम्हाला जर काहीशी भीती वाटत असेल, तर तुम्ही आणखी जास्त विश्वास आणि धैर्यासाठी यहोवाला प्रार्थना केल्यास तो तुमची विनंती ऐकेल.—स्तोत्र ६६:१९, २० वाचा.a
२०. आपण यहोवाचे सेवक असल्यामुळे आपल्याला कोणते साहाय्य उपलब्ध आहे?
२० या दुष्ट व समस्यांनी ग्रस्त असलेल्या जगात देवाच्या इच्छेनुसार वागणे मुळीच सोपे नाही. आपल्यावर परीक्षा येतीलच. पण, आपण एकटे नाही. देव आपल्यासोबत आहे. तसेच, त्याचा पुत्रही आपल्यासोबत आहे, जो मंडळीचे मस्तक आहे. त्यासोबतच यहोवाचे साक्षीदार असलेले जगभरातील ७० लाखांपेक्षा जास्त बंधुभगिनी आपल्यासोबत आहेत. त्या सर्वांसोबत मिळून आपणही विश्वास व्यक्त करत राहू या आणि सुवार्ता घोषित करत राहू या. या बाबतीत २०१३ चे वार्षिक वचन आपल्याला साहाय्यक ठरेल: “खंबीर हो आणि हिंमत धर. . . . यहोवा तुझा देव तुझ्याबरोबर आहे.”—यहो. १:९, NW.
a टेहळणी बुरूज, १५ फेब्रुवारी २०१२ अंकातील “खंबीर व धैर्यवान व्हा” या लेखात खंबीरपणा दाखवलेल्यांची आणखी काही उदाहरणे पाहा.