आमच्या संग्रहातून
करू या पिलग्रिम्ससोबत प्रवास!
“घरोघरी जाऊन प्रचार करणं मला कधीच जमणार नाही!” कितीतरी नव्या बायबल विद्यार्थ्यांना अनोळखी लोकांकडे जाऊन प्रचार करण्याबाबत असेच वाटते, नाही का? पण वरील उद्गार कोणा नव्या बायबल विद्यार्थ्याचे नव्हे, तर जाहीर भाषणे देण्यात व बायबलचे शिक्षण देण्यात अनुभवी असलेल्या एका बांधवाचे होते. पूर्वी ज्यांना पिलग्रिम्स (यात्रेकरू) म्हटले जायचे, त्यांच्यापैकी ते होते.
त्या काळी झायन्स वॉच टावरच्या बऱ्याच वाचकांनी आपली चर्चेस सोडून दिली होती. आणि त्यांना, आपल्यासारखीच बायबलच्या सत्याबद्दल गोडी असलेल्या इतरांसोबत सहवास करण्याची उत्सुकता वाटत होती. झायन्स वॉच टावरने आपल्या वाचकांना असे प्रोत्साहन दिले की त्यांच्यासारखाच मौल्यवान विश्वास बाळगणाऱ्या इतरांना त्यांनी शोधून काढावे आणि त्यांच्यासोबत बायबल अभ्यासाकरता नियमित रीत्या एकत्र यावे. साधारण १८९४ सालापासून वॉच टावर संस्थेने अशा गटांना—त्यांनी विनंती केली असल्यास, भेट देण्यासाठी प्रवासी प्रतिनिधींना पाठवण्यास सुरुवात केली. या प्रवासी प्रतिनिधींना नंतर पिलग्रिम्स म्हणून ओळखले जाऊ लागले. या अनुभवी व परिश्रमी बांधवांना त्यांची नम्रता, बायबलचे ज्ञान, वक्तृत्त्व कौशल्य व शिकवण्याची कला आणि खंडणी बलिदानाच्या शिकवणीप्रती त्यांनी दाखवलेली निष्ठा या सर्व गोष्टी पाहून सदर नेमणुकीकरता निवडले जायचे. सहसा त्यांची भेट फक्त एक किंवा दोन दिवसांची असे; पण या एकदोन दिवसांसाठी भरगच्च कार्यक्रम आखलेला असे. पिलग्रिमच्या जाहीर भाषणासाठी हस्तपत्रिकांचे वाटप करणे हा अनेक बायबल विद्यार्थ्यांसाठी क्षेत्र सेवाकार्याचा अगदी पहिला अनुभव असे. ह्यूगो रायमर, जे नंतर नियमन मंडळाचे सदस्य बनले, त्यांनी एकदा संध्याकाळी एका शाळेत भाषण दिल्यानंतर, उपस्थितांच्या बायबल आधारित प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात केली ती थेट मध्यरात्र उलटून जाईपर्यंत. त्या सभेनंतर ते थकलेले असले, तरी आनंदी होते आणि सभा “अतिशय सुंदर” झाली असे त्यांनी म्हटले.
द वॉच टावर नियतकालिकात सांगण्यात आल्याप्रमाणे, पिलग्रिम्सच्या भेटींचा “प्रमुख उद्देश,” बायबल विद्यार्थ्यांच्या घरांत सभा घेण्याद्वारे विश्वास ठेवणाऱ्यांच्या परिवाराची उन्नती करणे हा होता. जवळपासच्या परिसरांतील बायबल विद्यार्थी या सभांमध्ये होणाऱ्या भाषणांना व प्रश्नोत्तरांच्या सत्रांना उपस्थित राहण्याकरता यायचे. सभेनंतर जेवणाची व्यवस्था केली जायची. मॉड ॲबट ही लहानपणी एका सकाळच्या भाषणाला उपस्थित राहिली होती, ज्यानंतर सर्व जण अंगणात ठेवलेल्या एका मोठया टेबलाभोवती एकत्र आले. ती सांगते, “हॅम (मांस), तळलेलं चिकन, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड, पक्वान्नं व केक असे कितीतरी रुचकर पदार्थ ठेवलेले होते! सर्वांनी भरपेट जेवण केलं आणि मग दोन वाजता आणखी एक भाषण होतं.” पण, “तोपर्यंत सगळे अर्धवट झोपेत होते” असे ती कबूल करते. अनेक वर्षे पिलग्रिम म्हणून सेवा केलेल्या बेन्जामिन बार्टन यांनी एकदा असा शेरा मारला होता, ‘इतके चमचमीत पदार्थ दिले जायचे, की ते सर्व खाल्ले असते तर माझी पिलग्रिम सेवा कधीच संपुष्टात आली असती.’ काही काळाने ब्रुकलिनमधील मुख्यालयाने एका पत्राद्वारे, आतिथ्य दाखवण्याची प्रामाणिक इच्छा असलेल्या सर्व बहिणींना खास विनंती केली की पिलग्रिम बांधवांना “रोजचे, साधे जेवण” द्यावे आणि त्यांना “शांत झोप” मिळू शकेल अशी व्यवस्था करावी.
बायबलचे विषय समजावून सांगण्यात, तसेच तक्ते, नमुने किंवा जवळपास जे काही सापडेल त्याचा उपयोग करून श्रोत्यांचे लक्ष खिळवून ठेवण्यात पिलग्रिम्स निपुण होते. आर. एच. बार्बर यांची भाषणे “आध्यात्मिक दृष्ट्या नेहमीच रुचकर असायची.” डब्ल्यु. जे. थॉर्न यांचा अतिशय प्रेमळ स्वभाव होता आणि ते “बायबल काळातील देवाच्या एखाद्या वृद्ध सेवकासारखे” बोलायचे. शील्ड टुट्जीअन हे एके दिवशी फोर्डच्या मॉडेल ए मोटारीतून प्रवास करताना अचानक म्हणाले, “थांबा!” मग मोटारीतून उतरून त्यांनी काही रानफुले तोडून आणली आणि त्यांच्यासोबत असलेल्या बांधवांना यहोवाच्या निर्मितीबद्दल शिकवण्यासाठी या साध्याशा संधीचा अगदी सहजपणे वापर केला.
पिलग्रिम्सचे काम हे साधेसोपे नव्हते. त्यामुळे मध्यमवयीन आणि वयस्क बांधवांसाठी ते आव्हानात्मक होते. पण, काही पिलग्रिम बांधवांसमोर असलेली सर्वात मोठी परीक्षा म्हणजे त्यांना मिळालेली एक नवीन जबाबदारी. त्यांच्यावर घरोघरच्या प्रचार कार्यात पुढाकार घेण्याची जबाबदारी टाकण्यात आली. टेहळणी बुरूजच्या १५ मार्च १९२४ अंकात म्हणण्यात आले, की खऱ्या ख्रिश्चनांच्या “सर्वात महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपैकी एक म्हणजे राज्याविषयी साक्ष देणे. पिलग्रिम्सना याच उद्देशासाठी पाठवले जाते.”
काही पिलग्रिम्सना हा बदल रुचला नाही असे दिसते. कारण त्यांच्यापैकी काहींनी प्रवासी कार्य सोडून दिले आणि नाराज झालेल्या काही बांधवांनी तर स्वतःचेच गट तयार केले. रॉबी डी. ॲड्किन्स यांनी सांगितले की हा बदल झाला, तेव्हा उत्तम वक्ता असलेल्या एका बांधवाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले: “मला फक्त व्यासपीठावरून उपदेश देणं कळतं. पण घरोघर जाऊन प्रचार करणं मला कधीच जमणार नाही!” बंधू ॲड्किन्स आठवून सांगतात: “त्यानंतर मी त्या बांधवाला १९२४ साली ओहायोतील कलंबस इथं झालेल्या अधिवेशनात पाहिलं. हजारो आनंदी बांधवांच्या गर्दीत, तो एका लहानशा झाडाच्या सावलीत एकटाच उभा होता, आणि अगदी दुःखी व एकाकी दिसत होता. त्यानंतर मी त्याला कधीच पाहिलं नाही. त्याच्या थोड्याच काळानंतर त्याने संस्थेशी संबंध तोडून टाकला.” दुसरीकडे पाहता, “कितीतरी बांधव हातात पुस्तकं घेऊन आनंदानं आपल्या कारकडे जाताना मला दिसले.” साहजिकच हे बांधव घरोघरचे साक्षकार्य करण्यास उत्सुक होते.—प्रे. कृत्ये २०:२०, २१.
ज्याप्रमाणे बांधवांजवळ प्रचार करण्याचा पुरेसा आत्मविश्वास नव्हता, त्याचप्रमाणे त्यांना प्रशिक्षण देण्यास पाठवण्यात आलेल्या बऱ्याच पिलग्रिम बांधवांजवळही तो नव्हता. पण तरीही या बांधवांनी मोठ्या उत्साहाने स्वतःला या कार्यात झोकून दिले. जर्मन बोलणारे पिलग्रिम मॅक्सवेल जी. फ्रेंड (फ्रेशेल) यांनी घरोघरच्या साक्षकार्याबाबत लिहिले, “पिलग्रिम कार्याच्या या पैलूमुळं आमची भेट आणखीनच आनंददायक बनते.” जॉन ए. बोनेट या पिलग्रिम बांधवाने असे सांगितले, की राज्य प्रचारावर जो भर दिला जात होता, त्याला बहुतेक बांधवांनी मनापासून पाठिंबा दिला. त्यांच्या मते बांधवांपैकी बहुतेक जण “खूप आवेशी होते, जणू त्यांना लढाईत आघाडीवर असण्याची इच्छा होती.”
विश्वासू प्रवासी बांधवांनी कितीतरी वर्षांपासून बंधुभगिनींवर अतिशय चांगला प्रभाव पाडला आहे. एक जुने साक्षीदार बंधू नॉर्मन लार्सन यांनी म्हटले, “पिलग्रिम बांधवांचं कार्य किती मोलाचं व फायदेकारक आहे हे अगदी लहानपणीसुद्धा माझ्या लक्षात आलं होतं. त्यांनी माझ्या व्यक्तिमत्त्वाला योग्य आकार देण्यास बराच हातभार लावला.” आजसुद्धा हे स्वार्थत्यागी व एकनिष्ठ प्रवासी पर्यवेक्षक आपल्या सहविश्वासू बांधवांना असे म्हणण्यास साहाय्य करत आहेत, “आम्ही घरोघरी जाऊन प्रचार नक्कीच करू शकतो!”
[३२ पानांवरील संक्षिप्त आशय]
पिलग्रिम यायचे तो दिवस अतिशय आनंदाचा असायचा!
[३१ पानांवरील चित्र]
बेन्जामिन बार्टन यांच्या १९०५ सालच्या अहवालानुसार त्यांनी जवळजवळ १७० ठिकाणी भेटी दिल्या
[३२ पानांवरील चित्र]
वॉल्टर जे. थॉर्न या पिलग्रिम बांधवाला सर्व जण प्रेमाने पॅपी म्हणायचे कारण त्यांचा स्वभाव मुलांवर प्रेम करणाऱ्या बाबांसारखा आणि त्यांची मनोवृत्ती ख्रिस्तासारखी होती
[३२ पानांवरील चित्र]
जे. ए. ब्राऊन यांना १९०२ च्या सुमारास जमैका येथील १४ लहान गटांना प्रोत्साहन देण्याकरता पिलग्रिम म्हणून पाठवण्यात आले
[३२ पानांवरील चित्र]
पिलग्रिम कार्यामुळे बांधवांचा विश्वास दृढ झाला, त्यांचा संघटनेसोबतचा संबंध आणखी घट्ट झाला आणि ख्रिस्ती ऐक्य वाढले