वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w12 ७/१५ पृ. २२-२६
  • “मी कोणाचे भय धरू?”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मी कोणाचे भय धरू?”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा “माझा प्रकाश व माझे तारण आहे”
  • यहोवाने केलेले साहाय्य आठवा
  • खऱ्‍या उपासनेची कदर बाळगा
  • देवाच्या साहाय्यावर भरवसा ठेवा
  • “हे यहोवा, तू आपला मार्ग मला शिकीव”
  • विश्‍वास व आशा बाळगणे गरजेचे
  • यहोवावर पूर्ण भरवसा ठेवल्याने आपला आत्मविश्‍वास वाढतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • यहोवा—प्राचीन काळातील “मुक्‍तिदाता”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • “यहोवाचा शोध घेणाऱ्‍यांना काहीच कमी पडणार नाही”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • सुज्ञ व्हा—देवाची भीती बाळगा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
w12 ७/१५ पृ. २२-२६

“मी कोणाचे भय धरू?”

“माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिंमत धरून राहीन.”—स्तो. २७:३.

पुढील वचनांनुसार, कोणत्या गोष्टी तुम्हाला धैर्य उत्पन्‍न करण्यास साहाय्य करू शकतात?

स्तोत्र २७:१

स्तोत्र २७:४

स्तोत्र २७:११

१. स्तोत्र २७ आपल्याला काय समजून घेण्यास मदत करेल?

जगातील परिस्थिती इतकी बिघडत चालली असतानाही आपले प्रचार कार्य का वाढत चालले आहे? बऱ्‍याच लोकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असूनही आपण आपला बराच वेळ व शक्‍ती प्रचार कार्यासाठी कशी काय खर्च करू शकतो? पुष्कळ लोकांना भविष्याची भीती वाटत असली, तरी आपण मात्र धैर्यवान का राहू शकतो? स्तोत्र २७ यात सापडणाऱ्‍या दावीद राजाच्या एका देवप्रेरित गीतातून आपल्याला या प्रश्‍नांची उत्तरे मिळतात.

२. भीतीमुळे एखाद्यावर काय परिणाम होऊ शकतो, पण आपण कोणता भरवसा बाळगू शकतो?

२ या स्तोत्राच्या सुरुवातीला दावीद म्हणतो: “परमेश्‍वर माझा प्रकाश व माझे तारण आहे; मी कोणाची भीती बाळगू? परमेश्‍वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू?” (स्तो. २७:१) भीतीमुळे एखादा मनुष्य इतका कमजोर होऊ शकतो की त्याला काहीही करणे शक्य होत नाही. पण, जो यहोवाचे भय बाळगतो त्याला कोणत्याही गोष्टीच्या भीतीमुळे अस्वस्थ होण्याची गरज नाही. (१ पेत्र ३:१४) यहोवावर भिस्त टाकल्यास आपण सुरक्षित राहू, आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असू. (नीति. १:३३; ३:२५) असे का म्हणता येईल?

यहोवा “माझा प्रकाश व माझे तारण आहे”

३. यहोवा कोणत्या अर्थाने आपला प्रकाश आहे, पण आपण काय करणे गरजेचे आहे?

३ येथे यहोवाची तुलना प्रकाशाशी करण्यात आली आहे. यावरून, यहोवा आपल्याला अज्ञानापासून व आध्यात्मिक अंधकारापासून मुक्‍त करतो हे लक्षात येते. (स्तो. २७:१) खरोखरचा प्रकाश आपल्या मार्गातील धोके किंवा अडथळे आपल्या दृष्टीस आणून देतो, पण ते धोके किंवा अडथळे काढून टाकत नाही. या धोक्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण जे पाहतो त्यानुसार सुज्ञपणे पाऊल उचलले पाहिजे. त्याच प्रकारे, यहोवा आपल्याला जगातील घडामोडींचा काय अर्थ होतो हे सांगतो. या जगातील धोक्यांविषयी तो आपल्याला सावध करतो. तो आपल्याला बायबलमधील अशी तत्त्वे शिकवतो जी नेहमीच उपयुक्‍त ठरतात. पण आपण या शिकलेल्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. तसे केल्यास, आपल्याला एकतर आपल्या वैऱ्‍यांपेक्षा किंवा आपल्या शिक्षकांपेक्षा अधिक सुज्ञपणे कार्य करणे शक्य होईल.—स्तो. ११९:९८, ९९, १३०.

४. (क) “परमेश्‍वर माझे . . . तारण” आहे असे दावीद पूर्ण खातरीने का म्हणू शकला? (ख) यहोवा केव्हा खासकरून आपले तारण करेल?

४ स्तोत्र २७:१ यातील दाविदाच्या शब्दांवरून दिसून येते, की त्याने गतकाळातील असे प्रसंग आठवणीत आणले असावेत, जेव्हा यहोवाने त्याचे तारण केले होते, किंवा त्याला वाचवले होते. उदाहरणार्थ, यहोवाने त्याला “सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून” वाचवले होते. तसेच, महाकाय गल्याथावर विजय मिळवण्यासही यहोवाने त्याला साहाय्य केले होते. नंतर, शौल राजाने भाला फेकून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रत्येक वेळी यहोवाने त्याला वाचवले. (१ शमु. १७:३७, ४९, ५०; १८:११, १२; १९:१०) म्हणूनच तर, दावीद पूर्ण खातरीने असे म्हणू शकला: “परमेश्‍वर माझे . . . तारण आहे.” यहोवाने दाविदाचे तारण केले त्याचप्रमाणे तो पुन्हा एकदा त्याच्या लोकांचे तारण करेल. ते कसे? येणाऱ्‍या “मोठ्या संकटातून” त्याच्या उपासकांचा बचाव करण्याद्वारे.—प्रकटी. ७:१४; २ पेत्र २:९.

यहोवाने केलेले साहाय्य आठवा

५, ६. (क) गतकाळातील आठवणी कशा प्रकारे आपल्याला धैर्य उत्पन्‍न करण्यास मदत करतात? (ख) गतकाळात यहोवाने त्याच्या लोकांसोबत ज्या प्रकारे व्यवहार केला ते आठवून तुम्हाला कशा प्रकारे धैर्य मिळते?

५ स्तोत्र २७:२, ३ वाचा. ही वचने वाचल्यावर, धैर्य उत्पन्‍न करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आपल्या लक्षात येतो. दाविदाने अशा घटना आठवणीत आणल्या, ज्यांत यहोवाच्या साहाय्यामुळे त्याचा बचाव झाला होता. (१ शमु. १७:३४-३७) या आठवणींमुळे त्याला कठिणातल्या कठीण परीक्षेलाही तोंड देण्याचा आत्मविश्‍वास मिळाला. तुम्हीही तुमच्या अनुभवांतून अशा प्रकारे धैर्य मिळवता का? उदाहरणार्थ, तुम्ही कदाचित एखाद्या दुःखदायक समस्येविषयी यहोवाला कळकळीने प्रार्थना केली असेल. आणि मग त्या परीक्षेला तोंड देण्यासाठी यहोवाने तुम्हाला सुबुद्धी किंवा ताकद दिल्याचे तुम्ही अनुभवले असेल. किंवा, यहोवाची आनंदाने सेवा करत असताना तुमच्या मार्गात आलेले अडथळे कशा प्रकारे काढून टाकण्यात आले आणि तुमची सेवा आणखी वाढवण्याचा मार्ग कशा प्रकारे मोकळा झाला हे तुम्हाला आठवत असेल. (१ करिंथ. १६:९) अशा घटनांचे स्मरण केल्यामुळे आज तुमच्यावर काय परिणाम होतो? या आठवणी तुम्हाला याची खातरी देत नाहीत का, की भविष्यातील जास्त मोठ्या अडथळ्यांना किंवा परीक्षांना तोंड देण्यासाठीही यहोवा नक्कीच तुमचे साहाय्य करेल?—रोम. ५:३-५.

६ एखाद्या शक्‍तिशाली राष्ट्राच्या सरकारने यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेचे नामोनिशाण मिटवून टाकण्याचा कट रचला, तर काय? अलीकडील काळात बऱ्‍याच जणांनी असे करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आले नाही. गतकाळात यहोवाने त्याच्या लोकांना कशा प्रकारे मदत केली हे आठवणीत आणल्याने भविष्याला धैर्याने तोंड देण्याचा आत्मविश्‍वास आपल्याला मिळेल.—दानी. ३:२८.

खऱ्‍या उपासनेची कदर बाळगा

७, ८. (क) स्तोत्र २७:४ या वचनानुसार, दाविदाने यहोवाकडून काय मागितले? (ख) यहोवाचे महान आध्यात्मिक मंदिर काय आहे आणि आपण कशा प्रकारे या मंदिरात उपासना करतो?

७ धैर्याने कार्य करण्यास मदत करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे खऱ्‍या उपासनेबद्दल आपल्याला वाटणारी कदर. (स्तोत्र २७:४ वाचा.) दाविदाच्या काळात, परमेश्‍वराचे घर म्हणजे निवासमंडप होते. दाविदानेच यहोवासाठी एक मोठे मंदिर बांधण्यासाठी व्यवस्था केली आणि नंतर त्याच्या पुत्राने, शलमोनाने ते बांधले. अनेक शतकांनंतर, येशूने स्पष्ट केले की यहोवाची स्वीकार्य पद्धतीने उपासना करण्यासाठी आता त्याचा आशीर्वाद असलेल्या एका मंदिरात उपासना करण्याची गरज उरली नव्हती. (योहा. ४:२१-२३) प्रेषित पौलाने इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रातील अध्याय ८ ते १० यांत दाखवले की इ.स. २९ मध्ये येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा त्याने यहोवाच्या इच्छेनुसार कार्य करण्याकरता स्वतःला सादर केले. त्या वेळी एक महान आध्यात्मिक मंदिर अस्तित्वात आले. (इब्री १०:१०) हे महान आध्यात्मिक मंदिर म्हणजे यहोवा देवाने केलेली एक तरतूद आहे, जिच्याद्वारे आपण येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर देवाची स्वीकार्य पद्धतीने उपासना करू शकतो. या आध्यात्मिक मंदिरात आपण कशा प्रकारे उपासना करतो? “खऱ्‍या अंतःकरणाने व विश्‍वासाच्या पूर्ण खातरीने” प्रार्थना करण्याद्वारे; धैर्याने आपल्या आशेविषयी जाहीर रीत्या घोषणा करण्याद्वारे; तसेच, मंडळीच्या सभांसाठी व कौटुंबिक उपासनेसाठी आपण एकत्र येतो तेव्हा एकमेकांप्रती विचारशीलता दाखवून एकमेकांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्याद्वारे. (इब्री १०:२२-२५) खऱ्‍या उपासनेबद्दल कदर बाळगल्यामुळे आपल्याला या शेवटल्या कठीण काळात नक्कीच धैर्य मिळेल.

८ सबंध जगात, यहोवाचे विश्‍वासू सेवक प्रचार कार्याला जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत, नवनव्या भाषा शिकून घेत आहेत, आणि राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करत आहेत. त्यांच्या या कृतींवरून दिसून येते की त्यांचेही स्तोत्रकर्त्याप्रमाणे यहोवाकडून फक्‍त एकच मागणे आहे. त्यांना यहोवाचा चांगुलपणा अनुभवत राहायचा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्याच्या पवित्र सेवेत सहभाग घेत राहायचा आहे.—स्तोत्र २७:६ वाचा.

देवाच्या साहाय्यावर भरवसा ठेवा

९, १०. स्तोत्र २७:१० यात दिलेल्या आश्‍वासनाचा काय अर्थ होतो?

९ यहोवाच्या साहाय्यावर असलेला भरवसा दावीद या जोरदार शब्दांत व्यक्‍त करतो: “माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी परमेश्‍वर मला जवळ करील.” (स्तो. २७:१०) पहिला शमुवेल अध्याय २२ मधील माहितीवरून आपण हा निष्कर्ष काढू शकतो की दाविदाच्या आईवडिलांनी त्याला सोडले नव्हते. पण, आज बऱ्‍याच जणांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबीयांनी परक्यांसारखे वागवले आहे किंवा टाकून दिले आहे. तरीसुद्धा, वाळीत टाकलेल्या अशा बऱ्‍याच जणांना ख्रिस्ती मंडळीच्या सावलीत साहाय्य व संरक्षण लाभले आहे.

१० इतर जण यहोवाच्या सेवकांना टाकून देतात तेव्हा तो आपल्या सेवकांना साहाय्य करण्यास तयार असतो. तर मग, दुसऱ्‍या कोणत्याही प्रकारच्या परीक्षेला तोंड देतानाही तो त्यांचा संभाळ करणार नाही का? उदाहरणार्थ, आपल्या कुटुंबाचे भरणपोषण कसे करावे याची आपल्याला चिंता वाटत असेल, तर यहोवा आपले साहाय्य करेल अशी खातरी आपण बाळगू नये का? (इब्री १३:५, ६) त्याला त्याच्या सर्व विश्‍वासू सेवकांच्या परिस्थितीची आणि गरजांची जाणीव आहे.

११. यहोवावरील आपल्या भरवशामुळे इतरांवर कोणता प्रभाव पडू शकतो? उदाहरण द्या.

११ लायबीरियात राहणाऱ्‍या व्हिक्टोरियाचे उदाहरण घ्या. ती बायबलचा अभ्यास करत होती. बाप्तिस्मा घेण्याच्या दिशेने प्रगती करत असतानाच, ज्या मनुष्यासोबत ती राहत होती तो तिला व तिच्या तीन मुलांना टाकून निघून गेला. राहायला घर नाही आणि नोकरीही नाही, अशा अवस्थेतसुद्धा व्हिक्टोरिया आध्यात्मिक प्रगती करत राहिली. तिचा बाप्तिस्मा झाल्यानंतर, एकदा तिच्या १३ वर्षांच्या मुलीला एक बॅग सापडली ज्यात बरीच मोठी रक्कम होती. उगाच मोह होऊ नये म्हणून त्यांनी ते पैसे मोजायचेही नाही असे ठरवले. त्याऐवजी, ज्या सैनिकाची ती बॅग होती त्याच्याशी त्यांनी लगेच संपर्क साधला. बॅग मिळाल्यावर तो म्हणाला की सर्व लोक यहोवाच्या साक्षीदारांसारखे प्रामाणिक असते, तर हे जग जास्त आनंददायी आणि शांतिमय ठिकाण बनले असते. व्हिक्टोरियाने त्याला बायबलमधून यहोवाने नव्या जगाविषयी दिलेले अभिवचन दाखवले. तिच्या प्रामाणिकपणामुळे प्रभावित होऊन त्या सैनिकाने, सापडलेल्या पैशांतून बरीच मोठी रक्कम तिला बक्षीस म्हणून दिली. खरोखर, यहोवा आपल्या गरजा भागवेल हा पक्का विश्‍वास असल्यामुळेच यहोवाच्या साक्षीदारांनी अतिशय प्रामाणिक लोक असे नाव कमवले आहे.

१२. आर्थिक नुकसान झेलावे लागूनही जेव्हा आपण यहोवाची सेवा करत राहतो तेव्हा आपण काय दाखवून देतो? उदाहरण द्या.

१२ किंवा मग, सिएरा लियोन येथील थॉमस या बाप्तिस्मा न झालेल्या प्रचारकाच्या परिस्थितीची कल्पना करून पाहा. तो एका माध्यमिक शाळेत शिक्षकाची नोकरी करू लागला. पण, कागदपत्रांचे काम पूर्ण न झाल्यामुळे जवळजवळ एक वर्षभर त्याला पगारच मिळाला नाही. मागील वर्षभराचा पगार मिळण्यासाठी थॉमसला कोणती एक शेवटची अट पूर्ण करावी लागणार होती? त्याला शाळेच्या व्यवस्थापकाला मुलाखत द्यावी लागणार होती. व्यवस्थापक एक पाळक होता. त्याने थॉमसला सांगितले की यहोवाच्या साक्षीदारांचे विश्‍वास त्यांच्या संस्थेच्या तत्त्वांशी जुळत नाहीत. त्यामुळे नोकरी आणि बायबल-आधारित विश्‍वास यांपैकी कोणतेही एक तुला निवडावे लागेल असे त्याने थॉमसला सांगितले. थॉमसने आपली नोकरी आणि जवळजवळ वर्षभराच्या पगाराकडे पाठ फिरवून, रेडिओ व मोबाईल फोन दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. या व अशा इतर अनेक उदाहरणांवरून हेच सिद्ध होते, की दुसऱ्‍या लोकांना जरी आर्थिक तंगीची भीती वाटत असली, तरी आपल्याला मात्र सर्व गोष्टी निर्माण करणाऱ्‍या आणि आपल्या लोकांचे नेहमी संरक्षण करणाऱ्‍या यहोवा देवावर पूर्ण भरवसा आहे.

१३. उदरनिर्वाह करणे कठीण असलेल्या देशांत राज्य प्रचाराचे कार्य कसे चालले आहे?

१३ लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, उदरनिर्वाह करणे कठीण असलेल्या अनेक देशांत राज्य प्रचारक अतिशय उत्साही असल्याचे आढळते. असे का? यासंदर्भात एका शाखा कार्यालयाने लिहिले: “बायबल अभ्यास स्वीकारणाऱ्‍या बऱ्‍याच घरमालकांजवळ रोजगार नाही आणि त्यामुळे त्यांच्याजवळ अभ्यास करण्यासाठी सहसा जास्त वेळ असतो. बांधवांजवळही प्रचार करण्यासाठी जास्त वेळ असतो. आर्थिक समस्यांचा सर्वात जास्त फटका बसलेल्या भागांत, आपण शेवटल्या काळात जगत आहोत हे लोकांना वेगळे सांगण्याची गरज नसते; त्यांच्या सभोवतालची परिस्थितीच त्यांना याची खातरी पटवून देते.” प्रत्येक प्रचारक जेथे सरासरी तीनपेक्षा जास्त बायबल अभ्यास घेतो, अशा एका देशात १२ वर्षांपेक्षा जास्त काळ मिशनरी सेवा केलेला एक बांधव लिहितो: “बहुतेक प्रचारकांची राहणी साधी असल्यामुळे आणि लक्ष विचलित करणाऱ्‍या कमी गोष्टी त्यांच्याजवळ असल्यामुळे त्यांना क्षेत्र सेवेसाठी आणि बायबल अभ्यास चालवण्याच्या कार्यासाठी सहसा जास्त वेळ मिळतो.”

१४. मोठ्या लोकसमुदायाला कशा प्रकारे यहोवाचे संरक्षण लाभते?

१४ यहोवाने आपल्या लोकांना एक समूह या नात्याने शारीरिक व आध्यात्मिक रीत्या साहाय्य करण्याचे, त्यांचे संरक्षण करण्याचे, आणि त्यांचा बचाव करण्याचे वचन दिले आहे; आणि यहोवावर आपला पूर्ण भरवसा आहे. (स्तो. ३७:२८; ९१:१-३) “मोठ्या संकटातून” एक मोठा लोकसमुदाय बचावेल असे सांगण्यात आले आहे. (प्रकटी. ७:९, १४) त्यामुळे, या शेवटल्या काळादरम्यान यहोवा या मोठ्या लोकसमुदायाला नष्ट होऊ देणार नाही. परीक्षांना तोंड देताना धीर धरण्यासाठी आणि यहोवासोबतचा त्यांचा नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी जे काही आवश्‍यक असेल ते सर्व त्यांना पुरवले जाईल. आणि मोठे संकट संपुष्टात येईपर्यंत यहोवा आपल्या लोकांचे संरक्षण करेल.

“हे यहोवा, तू आपला मार्ग मला शिकीव”

१५, १६. देवाच्या मार्गदर्शनाचे पालन केल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे फायदा होतो? उदाहरण द्या.

१५ धैर्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला सातत्याने देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. दाविदाने केलेल्या पुढील विनंतीवरून हे दिसून येते: “हे यहोवा, तू आपला मार्ग मला शिकीव, आणि माझ्या वैऱ्‍यांमुळे सपाट वाटेने मला चालवीत ने.” (स्तो. २७:११, पं.र.भा.) या प्रार्थनेनुसार कार्य करण्यासाठी, यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या कोणत्याही बायबल आधारित मार्गदर्शनाकडे आपण काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे आणि लगेचच त्याचे पालनही केले पाहिजे. उदाहरणार्थ, जीवनातील गुंतागुंत कमी करण्याविषयी देण्यात आलेल्या सल्ल्याचे अनेकांनी पालन केले आहे. त्यांनी कर्जातून मोकळे होऊन, आवश्‍यक नसलेल्या वस्तू विकून टाकल्या आहेत. त्यामुळे, अलीकडे आर्थिक मंदी आली तेव्हा त्यांना तितक्याशा आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. आता त्यांना, अनावश्‍यक असलेल्या गोष्टींचे कर्ज फेडण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागत नाही. शिवाय, त्यांना सेवाकार्यासाठी जास्त वेळ देता येतो. आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे: ‘बायबलमध्ये आणि विश्‍वासू व बुद्धिमान दासाने पुरवलेल्या प्रकाशनांमध्ये मी जे काही वाचतो त्याचे लगेच पालन करतो का—मग त्यासाठी वैयक्‍तिक जीवनात काही तडजोडी कराव्या लागल्या तरीसुद्धा?’—मत्त. २४:४५.

१६ यहोवाचे मार्गदर्शन स्वीकारून त्याने दाखवलेल्या सरळ मार्गाने चालत राहिल्यास आपल्याला भयभीत होण्याचे कोणतेही कारण राहणार नाही. अमेरिकेत सामान्य पायनियर असलेल्या एका बांधवाने अशा एका नोकरीसाठी अर्ज केला होता, जी मिळाल्यास त्याच्या संपूर्ण कुटुंबाला पूर्ण वेळेच्या सेवेत राहणे शक्य होणार होते. पण, त्याच्या सुपरव्हायजरने त्याला सांगितले की त्याच्याजवळ महाविद्यालयाची पदवी नसल्यामुळे ती नोकरी त्याला कधीही मिळणार नाही. तुमच्यासोबत असे घडले असते, तर उच्च शिक्षण न घेता, पूर्ण वेळेची सेवा निवडल्याचा तुम्हाला पस्तावा झाला असता का? दोन आठवड्यांनंतर त्या सुपरव्हायजरला कामावरून कमी करण्यात आले. त्याच्याऐवजी आलेल्या दुसऱ्‍या सुपरव्हायजरने आपल्या बांधवाला त्याच्या भविष्यातील ध्येयांविषयी विचारले. बांधवाने आपण व आपली पत्नी यहोवाच्या साक्षीदारांपैकी असून पूर्ण वेळेचे सेवक असल्याचे आणि ही सेवा पुढेही करत राहण्याची इच्छा असल्याचे त्याला सांगितले. बांधवाने पुढे काही बोलण्याआधीच सुपरव्हायजर त्याला म्हणाला: “मला नेहमीच वाटायचं की तू इतरांपेक्षा वेगळा आहेस! माझ्या वडिलांच्या शेवटल्या आजारपणात तुमच्याच बांधवांपैकी दोघं जण दररोज येऊन त्यांना बायबलचा काही भाग वाचून दाखवायचे. मी तेव्हाच ठरवलं होतं की कधी संधी मिळाली तर मी एखाद्या यहोवाच्या साक्षीदाराला अवश्‍य मदत करेन.” दुसऱ्‍या दिवशी, आधीचा सुपरव्हायजर जी नोकरी द्यायला तयार नव्हता तीच नोकरी बांधवाला देण्यात आली. खरोखर, आपण राज्याच्या कार्यांना जीवनात इतर गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व देतो तेव्हा यहोवा, त्याने दिलेल्या शब्दानुसार आपल्या सर्व गरजा भागवतो.—मत्त. ६:३३.

विश्‍वास व आशा बाळगणे गरजेचे

१७. भविष्याला धैर्याने तोंड देण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

१७ विश्‍वास व आशा बाळगणे किती गरजेचे आहे हे दावीद पुढे या शब्दांत व्यक्‍त करतो: “जिवंतांच्या भूमीत यहोवाचे चांगुलपण पाहायला मी विश्‍वास धरला नसता तर मी खचलो असतो.” (स्तो. २७:१३) खरोखर, देवाने दिलेली आशा आपल्याजवळ नसती; आणि स्तोत्र २७ यातील आपण आताच चर्चा केलेल्या आध्यात्मिक गोष्टींविषयी आपल्याला कदर नसती; तर आज आपले जीवन कसे असते? तर मग, या शेवटल्या दिवसांत यहोवाने आपल्याला धैर्य द्यावे आणि हर्मगिदोनातून आपला बचाव करावा अशी आपण त्याला पूर्ण विश्‍वासाने प्रार्थना करत राहू या.—स्तोत्र २७:१४ वाचा.

[२३ पानांवरील चित्र]

यहोवाने गतकाळात केलेल्या तारणाचे प्रसंग आठवणीत आणल्यामुळे दाविदाला धैर्य मिळाले

[२५ पानांवरील चित्र]

यहोवाच्या सेवेत जास्त योगदान देण्याची संधी, या दृष्टिकोनातून आपण आर्थिक समस्यांकडे पाहतो का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा