आपल्या प्रार्थना ऐकणारा कोणी आहे का?
“जगात देव आहे की नाही याबद्दल माझ्या मनात नेहमीच शंका असायची. पण तरीसुद्धा कधीकधी मी प्रार्थना करायचे. आपली प्रार्थना कोणी ऐकतंय की नाही हे मला नक्की माहीत नव्हतं, पण एक गोष्ट मात्र मी कबूल केली पाहिजे की कोणीतरी आहे असं मनात कुठेतरी मला वाटायचं. मी खूप दुःखी होते आणि माझ्या जीवनाला काहीच दिशा नव्हती. मला असं वाटायचं की जे लोक मनाने दुबळे असतात असेच लोक देवावर विश्वास ठेवतात; त्यामुळे देवावर विश्वास ठेवायला मला भीती वाटायची.”—पॅट्रिशा,a आयर्लंड.
तुम्हाला कधी पॅट्रिशासारखे वाटले आहे का? देव आहे की नाही अशी शंका मनात असूनही तुम्ही प्रार्थना करता का? असे असल्यास, असा विचार करणारे तुम्ही एकटे नाहीत. याची काही उदाहरणे पाहा.
◼ ब्रिटनमध्ये घेतलेल्या २,२०० लोकांच्या एका सर्वेक्षणानुसार, केवळ ५०० लोक असा विश्वास बाळगतात की हे विश्व उभे करणारा व आपल्या प्रार्थना ऐकणारा एक देव आहे. तर, सुमारे १,२०० लोकांनी कबूल केले की ते अधूनमधून प्रार्थना करतात.
◼ जगातील वेगवेगळ्या देशांतील १०,००० लोकांचे जे सर्वेक्षण घेण्यात आले होते, त्यातून असे दिसून आले की स्वतःला नास्तिक समजणाऱ्या लोकांपैकी सुमारे ३० टक्के लोक प्रार्थना करतात.
त्यांच्या शंकेचे कारण
इंग्लंडमध्ये राहणारा ॲलन नावाचा एक मनुष्य म्हणतो: “पूर्वी मी म्हणायचो की देवावर माझा विश्वास नाही, कारण मला असं वाटायचं की लोकांना आपल्या कह्यात ठेवण्यासाठी आणि पैसा कमावण्यासाठी माणसानं धर्म बनवला आहे. शिवाय, मला प्रश्न पडायचा की जर देव आहे तर मग जगात इतका अन्याय का? असं असलं तरी कधीकधी मी शांत बसून ‘कुणाशीतरी’ बोलायचो. मी स्वतःला विचारायचो ‘आपण या जगात कसे आलो?’ ”
आपल्या प्रार्थना ऐकणारा कोणी आहे की नाही अशी शंका बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी कारणे आहेत. बरेचदा जीवनातील महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळे लोकांच्या मनातील ही शंका आणखीनच बळावते. जसे की:
◼ जगाचा कोणी निर्माणकर्ता आहे का?
◼ धर्माने सहसा लोकांचे नुकसान का केले आहे?
◼ देव जर आहे तर तो आपले दुःख नाहीसे का करत नाही?
या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली तर तुम्ही अधिक विश्वासाने प्रार्थना करणार नाही का? (w१२-E ०७/०१)
[तळटीप]
a या लेखमालेतील काही नावे बदलण्यात आली आहेत.