वाचकांचे प्रश्न
अँग्लो-अमेरिकन महासत्ता, बायबलमध्ये वर्णन केलेली सातवी जागतिक महासत्ता कधी बनली?
▪ नबुखदनेस्सर राजाने पाहिलेला धातूचा विशाल पुतळा सर्वच जागतिक महासत्तांना सूचित करत नाही. (दानी. २:३१-४५) तर तो केवळ अशा पाच महासत्तांना चित्रित करतो, ज्यांनी दानीएलाच्या काळापासून पुढे राज्य केले आणि देवाच्या लोकांवर उल्लेखनीय प्रभाव पाडला.
धातूच्या पुतळ्याविषयी दानीएलाने केलेल्या वर्णनावरून सूचित होते, की अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्ता रोमवर विजय मिळवून उदयास येणार नव्हती, तर रोममधूनच उदयास येणार होती. दानीएलाने पाहिले की पायांमधील लोखंड खाली पावलांपर्यंत आणि बोटांपर्यंत गेले. (पावलांमध्ये व बोटांमध्ये लोखंड व मातीचे मिश्रण आहे.)a या वर्णनावरून सूचित होते, की अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्ता लोखंडी पायांपासून उदयास येईल. इतिहास दाखवतो की हे वर्णन अगदी अचूक आहे. पूर्वी रोमन साम्राज्याचा भाग असलेल्या ब्रिटनने १७०० च्या उत्तरार्धात वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. नंतर, अमेरिका शक्तिशाली राष्ट्र बनले. पण, बायबलमध्ये भाकीत केलेली जागतिक महासत्ता अद्याप उदयास आली नव्हती. का बरे? कारण, अद्यापही ब्रिटन आणि अमेरिका या दोघांनी मिळून उल्लेखनीय रीत्या कार्य केले नव्हते. हे केवळ पहिल्या महायुद्धादरम्यान घडले.
तोपर्यंत, “राज्याचे पुत्र” खासकरून अमेरिकेतच क्रियाशील होते; आणि न्यू यॉर्कमधील ब्रुकलिन येथे त्यांचे जागतिक मुख्यालय होते. (मत्त. १३:३६-४३) अभिषिक्त वर्गाचे सदस्य, ब्रिटिश साम्राज्याच्या अधीन असलेल्या देशांत आवेशाने प्रचार कार्य करत होते. पहिल्या महायुद्धादरम्यान, ब्रिटन व अमेरिका त्यांच्या शत्रूंशी लढण्यासाठी एकजूट झाले तेव्हा त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. तसेच, युद्धामुळे वाढीस लागलेल्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेमुळे त्यांनी देवाच्या स्त्रीच्या संततीचा भाग असलेल्यांविरुद्ध शत्रुत्वपूर्ण व्यवहार केला. त्यांनी त्यांच्या प्रकाशनांवर बंदी घातली आणि प्रचार कार्यात पुढाकार घेणाऱ्यांना तुरुंगात टाकले.—प्रकटी. १२:१७.
तर मग, बायबलमधील भविष्यवाणीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, सातवी जागतिक महासत्ता १७०० च्या उत्तरार्धात जेव्हा ब्रिटनने वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली तेव्हा स्थापित झाली नाही. तर, प्रभूच्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हा ती एक जागतिक महासत्ता बनली.b
[तळटीपा]
a लोखंडासोबत मिसळलेली माती ही लोखंडासमान असलेल्या अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेतील आंतरिक घटकांना सूचित करते. काळाच्या ओघात, या मातीने अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेचे लोखंडासमान सामर्थ्य कमकुवत केले आहे.
b दानिय्येल की भविष्यवाणी पुस्तकातील पृष्ठ ५७, परिच्छेद २४ मध्ये चर्चा केलेल्या माहितीचे आणि पृष्ठे ५६ आणि १३९ मध्ये असलेल्या तक्त्यांतील माहितीचे हे सुधारित स्पष्टीकरण आहे.
[१९ पानांवरील चित्र]
जून १९१८ मध्ये वॉचटावर मुख्यालयातील आठ बांधवांची तुरुंगात रवानगी करण्यात आली