आर्मगेडन याबद्दलचे सत्य
“भुतांचे आत्मे . . . संपूर्ण जगातील राजास एकत्र करावयास त्यांच्याकडे बाहेर जातात. . . . त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले.”—प्रकटीकरण १६:१४, १६.
आर्मगेडन, ज्याला इब्री भाषेत “हर्मगिदोन” असे म्हटले जाते ते एका जागेचे नाव आहे.
तर मग, या शब्दाचा संबंध सहसा युद्धासारख्या घटनेशी का केला जातो? त्या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो?
आर्मगेडन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले जाते
इब्री भाषेतील मूळ शब्द हर्मगिदोन याचा शब्दशः अर्थ “मगिद्दोचे पर्वत” असा होतो. या नावाचे कोणतेही पर्वत अस्तित्वात नसले, तरी मगिद्दो नावाचे एक ठिकाण अस्तित्वात आहे. प्राचीन इस्राएल राष्ट्र ज्या भागात राहत होते त्याच्या उत्तरपश्चिमेस म्हणजे जेथे दोन मुख्य रस्ते एकमेकांना मिळायचे अशा मोक्याच्या जागी ते ठिकाण आहे. त्या भागाजवळ अनेक निर्णायक युद्धे लढली गेली. त्यावरून, मगिद्दो हे नाव युद्धाशी जोडले गेले.a
पण, मगिद्दो या ठिकाणी कोणती युद्धे लढली गेली हे महत्त्वाचे नाही, तर ती युद्धे का लढली गेली हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मगिद्दो हे ठिकाण यहोवा देवाने इस्राएल लोकांना दिलेल्या प्रतिज्ञात देशात होते. (निर्गम ३३:१; यहोशवा १२:७, २१) देवाने इस्राएल लोकांना वचन दिले होते की तो त्यांच्या शत्रूंपासून त्यांचे रक्षण करेल आणि देव आपल्या वचनाला जागला. (अनुवाद ६:१८, १९) उदाहरणार्थ, मगिद्दो याच ठिकाणी यहोवाने कनानचा राजा याबीन आणि त्याचा सेनापती सीसरा यांच्या हल्ल्यापासून इस्राएल लोकांचे रक्षण केले.—शास्ते ४:१४-१६.
त्यामुळे “हर्मगिदोन” किंवा ‘आर्मगेडन’ या शब्दाला मोठे लाक्षणिक महत्त्व आहे. त्याचा संबंध युद्धाशी करण्यात आला आहे, ज्यात दोन सामर्थ्यशाली शक्ती एकमेकांशी संघर्ष करतात.
प्रकटीकरण पुस्तकातील भविष्यवाणी नजीकच्या भविष्यातील अशा एका काळाविषयी सांगते जेव्हा सैतान आणि त्याचे दुरात्मे मानवी सरकारांना आपापली सैन्ये एकत्र करण्यास उद्युक्त करतील; आणि असे करण्याद्वारे ते देवाच्या लोकांना आणि त्यांच्या कार्याला उद्धामपणे आव्हान करतील. देवाच्या लोकांवर हल्ला होईल तेव्हा देव आपल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी हस्तक्षेप करून त्या लक्षावधी विरोधकांचा नाश करेल.—प्रकटीकरण १९:११-१८.
पण, बायबल म्हणते की देव “कृपाळू, दयामय, मंदक्रोध व अतिकरुणामय” आहे. मग, असा देव इतक्या सगळ्या लोकांचा नाश का करेल? (नहेम्या ९:१७) हे समजण्यासाठी तीन प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे गरजेचे आहे: (१) युद्ध कोण सुरू करते? (२) देव हस्तक्षेप का करतो? (३) या युद्धाचा पृथ्वीवर व पृथ्वीवरील रहिवाशांवर कोणता कायमस्वरूपी परिणाम होईल?
१. युद्ध कोण सुरू करते?
हर्मगिदोनाचे युद्ध देव सुरू करत नाही. याउलट, युद्ध सुरू करणाऱ्या वाईट लोकांपासून तो चांगल्या लोकांचे रक्षण करेल. हे युद्ध सुरू करणारे “संपूर्ण जगातील” राजे अर्थात जगातील पुढारी आहेत. पण, ते असे का करतात? कारण सैतान, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ दाखवणाऱ्या व्यक्तीप्रमाणे सर्व सरकारी व लष्करी प्रतिनिधींना यहोवा देवाच्या उपासकांवर हल्ला करण्यास कावेबाजपणे उद्युक्त करेल.—प्रकटीकरण १६:१३, १४; १९:१७, १८.
आज जगातील काही देशांत अभिव्यक्ती स्वातंत्र्याला व धार्मिक स्वातंत्र्याला खूप महत्त्व दिले जाते; ते लक्षात घेता, सरकारे कोणत्याही धार्मिक चळवळीवर बंदी घालतील किंवा ती चिरडून टाकतील ही गोष्ट कदाचित अशक्यप्राय वाटेल. पण, अशा प्रकारचे हल्ले २० व्या शतकात झाले होते आणि आजही होत आहेत.b असे असले, तरी आधी झालेल्या हल्ल्यांमध्ये आणि आर्मगेडनच्या वेळी होणाऱ्या हल्ल्यामध्ये कमीतकमी दोन मुख्य फरक आहेत. पहिला फरक म्हणजे, हा हल्ला जगव्याप्त स्वरूपाचा असेल. आणि दुसरा, या हल्ल्याच्या वेळी यहोवा देव जी प्रतिक्रिया दाखवेल ती अतिशय तीव्र स्वरूपाची असेल; इतकी तीव्र प्रतिक्रिया गतकाळात त्याने कधीच दाखवलेली नसेल. (यिर्मया २५:३२, ३३) म्हणूनच, बायबल या संघर्षाचे वर्णन सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाची लढाई असे करते.
२. देव हस्तक्षेप का करतो?
यहोवा आपल्या उपासकांना शांतीप्रिय असण्याचे व आपल्या शत्रूंवर प्रेम करण्याचे शिकवतो. (मीखा ४:१-३; मत्तय ५:४३, ४४; २६:५२) त्यामुळे हर्मगिदोनाच्या किंवा जगाच्या अंताच्या वेळी होणाऱ्या जबरदस्त हल्ल्यात देवाचे उपासक स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शस्त्रांचा आश्रय घेणार नाहीत. देवाने जर मधे पडून त्यांना वाचवले नाही तर त्यांचे समूळ उच्चाटन होईल. आणि असे झाले तर यहोवा देवाचे नाव, त्याचा नावलौकिक कलंकित होईल. देवाच्या लोकांवर हल्ला करणाऱ्यांनी जर देवाच्या लोकांचा समूळ नाश केला, तर यहोवा अन्यायी आहे, त्याचे आपल्या लोकांवर प्रेम नाही किंवा तो हतबल आहे असे वाटेल आणि असे तो कधीच होऊ देणार नाही.—स्तोत्र ३७:२८, २९.
कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. त्यामुळे देव पुढे काय करणार आहे त्याविषयी तो पुरेसा इशारा देतो. (२ पेत्र ३:९) बायबलमध्ये नमूद केलेल्या अनेक वृत्तान्तांतून तो सर्वांना याची आठवण करून देतो की गतकाळात विरोधकांनी त्याच्या लोकांवर हल्ला केला तेव्हा त्याने बदला घेतला होता. (२ राजे १९:३५) बायबल असाही इशारा देते, की भविष्यात सैतान आणि त्याचे मानवी हस्तक देवाच्या लोकांवर हल्ला करतील तेव्हा यहोवा पुन्हा हस्तक्षेप करेल आणि आपल्या लोकांच्या जीवावर उठणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आपल्या बळाचा वापर करेल. किंबहुना, देवाच्या वचनात बऱ्याच आधी हे सांगण्यात आले होते, की यहोवा दुष्टांचा नाश करेल. (नीतिसूत्रे २:२१, २२; २ थेस्सलनीकाकर १:६-९) त्या वेळी, हल्लेखोरांच्या मनात कोणतीही शंका नसेल, की आपण खुद्द सर्वसमर्थ देवाच्या विरोधात उठलो आहोत.—यहेज्केल ३८:२१-२३.
३. या संघर्षाचा कोणता कायमस्वरूपी परिणाम होईल?
हर्मगिदोनाच्या युद्धामुळे लक्षावधी लोकांचे जीवन वाचेल. किंबहुना, पृथ्वीवरील शांतीच्या काळाची ती सुरुवात असेल.—प्रकटीकरण २१:३, ४.
प्रकटीकरणाचे पुस्तक एका अगणित मोठ्या लोकसमुदायाविषयी बोलते जे या संघर्षातून वाचतील. (प्रकटीकरण ७:९, १४) पृथ्वीचे रूपांतर नंदनवनात व्हावे असा देवाचा जो मूळ उद्देश होता त्या उद्देशानुसार हे लोक देवाच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीचे रूपांतर नंदनवनात करण्यात मदत करतील.
देवाच्या लोकांवर हा हल्ला केव्हा होईल हे आपण सांगू शकतो का? (w१२-E ०२/०१)
[तळटीपा]
a एखाद्या जागेचा संबंध युद्धाशी जोडणे ही काही नवीन गोष्ट नाही. हिरोशिमा या जपानी शहराचेच उदाहरण घ्या जे एका अणुबॉम्बने उडवले गेले होते. आज हे शहर आण्विक युद्धाचे प्रतिक बनले आहे.
b याचे एक ढळढळीत उदाहरण म्हणजे, नाझी राजवटीत सरकारने केलेले धार्मिक व वंशीय गटांचे समूळ उच्चाटन. सोव्हियत संघाच्या काळात, यु.एस.एस.आर अंतर्गत असलेल्या धार्मिक गटांनादेखील दडपून टाकण्यात आले होते.
[६ पानांवरील चित्र]
यहोवा देवाने गतकाळात आपल्या लोकांचे रक्षण केले
[७ पानांवरील चित्र]
हर्मगिदोनाच्या युद्धादरम्यान यहोवा पुन्हा आपल्या लोकांचे रक्षण करेल