देवाचा सन्मान होईल असे निर्णय घ्या
“शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.”—नीति. १४:१५.
१, २. (क) कोणतेही निर्णय घेताना आपला मुख्य हेतू काय असला पाहिजे? (ख) आपण कोणत्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत?
निर्णय. होय, आपण दररोज कितीतरी निर्णय घेतो. यांच्यापैकी अनेक निर्णयांचा आपल्या जीवनावर फारसा परिणाम होत नाही. पण, काही निर्णयांचा आपल्या जीवनावर गहिरा परिणाम होऊ शकतो. लहान-मोठे कोणतेही निर्णय घेताना आपला मुख्य हेतू देवाचा सन्मान करणे हा असला पाहिजे.—१ करिंथकर १०:३१ वाचा.
२ निर्णय घेणे तुम्हाला सोपे वाटते की आव्हानात्मक? ख्रिस्ती या नात्याने प्रौढ बनण्यासाठी, आपण चांगले काय व वाईट काय यात फरक करण्यास शिकले पाहिजे आणि त्यानंतर इतरांच्या मतांनुसार नव्हे, तर ज्यांतून आपला स्वतःचा दृढ विश्वास व्यक्त होईल असे निर्णय घेतले पाहिजे. (रोम. १२:१, २; इब्री ५:१४) आणखी कोणत्या काही सबळ कारणांमुळे आपण चांगले निर्णय घेण्यास शिकण्याची गरज आहे? निर्णय घेणे कधीकधी इतके कठीण का असते? आणि आपण घेत असलेल्या निर्णयांमुळे देवाचा सन्मान होत आहे याची खातरी करण्यासाठी आपण कोणती पावले उचलू शकतो?
मुळात निर्णय का घ्यावेत?
३. निर्णय घेण्याच्या बाबतीत आपण कशाला आड येऊ देऊ नये?
३ बायबल स्तरांचे पालन करण्याच्या बाबतीत आपण अनिर्णायक असल्यास, आपल्या विश्वासांच्या बाबतीत आपल्यालाच खातरी नाही आणि त्यामुळे आपण सहजपणे प्रभावित होऊ शकतो असा निष्कर्ष आपले शाळासोबती किंवा सहकर्मचारी काढू शकतात. ते कदाचित खोटे बोलतील, इतरांची फसवणूक करतील, किंवा चोरी करतील आणि नंतर आपणही “बहुजनसमाजास अनुसरून” त्यांना साथ द्यावी किंवा निदान त्यांची कृत्ये लपवण्यासाठी त्यांना मदत करावी अशी गळ घालण्याचा ते प्रयत्न करतील. (निर्ग. २३:२) पण, देवाचा सन्मान होईल असे निर्णय कसे घ्यायचे हे ज्या व्यक्तीला माहीत आहे ती व्यक्ती इतरांच्या भीतीमुळे किंवा इतरांनी आपला स्वीकार करावा या इच्छेमुळे आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाच्या विरुद्ध वागणार नाही.—रोम. १३:५.
४. इतर जण कदाचित आपल्याकरता निर्णय का घेऊ इच्छितील?
४ आपल्याकरता निर्णय घेऊ इच्छिणारे सर्वच जण आपल्याला नुकसान पोहचवू इच्छितात असे नाही. आपले मित्र आपली मदत करण्याच्या हेतूने आपल्याला त्यांच्या सल्ल्याचे पालन करण्याचा कदाचित आग्रह धरतील. आपण कुटुंबापासून दूर राहत असलो, तरी आपल्या घरच्यांना आपली खूप काळजी वाटत असेल आणि आपल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये स्वतःला गोवून घेण्यास ते प्रवृत्त होऊ शकतात. उदाहरणार्थ, वैद्यकीय उपचाराचाच विचार करा. बायबल स्पष्ट शब्दांत रक्ताच्या दुरुपयोगाचा धिक्कार करते. (प्रे. कृत्ये १५:२८, २९) पण, उपचाराशी संबंधित इतर बाबींवर बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलेले नाही. त्यामुळे कोणती उपचार पद्धती स्वीकारली पाहिजे किंवा नाकारली पाहिजे या बाबतीत आपल्या प्रत्येकाला वैयक्तिकपणे निर्णय घेण्याची गरज आहे.a कदाचित आपल्या प्रिय जनांची या बाबतीत ठाम मते असतील. पण, या विषयावर निर्णय घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येक समर्पित बाप्तिस्माप्राप्त ख्रिश्चनाने “आपला स्वतःचा भार” वाहिला पाहिजे. (गलती. ६:४, ५) असे करताना मनुष्यांसमोर नव्हे, तर देवासमोर एक चांगला विवेक बाळगणे हा आपला मुख्य हेतू असला पाहिजे.—१ तीम. १:५.
५. आपले विश्वासरूपी तारू फुटू नये म्हणून आपण काय करू शकतो?
५ आपली अनिर्णायक वृत्ती आपल्याकरता धोकेदायक ठरू शकते. शिष्य याकोबाने लिहिले की अनिर्णायक व्यक्ती ‘आपल्या सर्व कार्यांत चंचल असते.’ (याको. १:८) ज्याप्रमाणे खवळलेल्या समुद्रात एका सुकाणूरहित बोटीतील मनुष्य हेलकावे खातो, त्याचप्रमाणे एक अनिर्णायक व्यक्तीसुद्धा सतत बदलणाऱ्या मानवी विचारांनी प्रभावित होते. अशा व्यक्तीचे विश्वासरूपी तारू अगदी सहजपणे फुटू शकते आणि अगदी सहजपणे ती आपल्या वाईट परिस्थितीसाठी इतरांना दोष देऊ शकते. (१ तीम. १:१९) आपल्यासोबत असे होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? त्यासाठी आपण “विश्वासात दृढ” बनले पाहिजे. (कलस्सैकर २:६, ७ वाचा.) विश्वासात दृढ बनण्यासाठी, आपण असे निर्णय घेण्यास शिकले पाहिजे ज्यांतून देवाच्या प्रेरित वचनावरील आपला विश्वास दिसून येतो. (२ तीम. ३:१४-१७) पण, चांगले निर्णय घेण्याच्या आपल्या क्षमतेला कोणती गोष्ट अडथळा निर्माण करू शकते?
निर्णय घेणे कठीण का असू शकते?
६. भीतीचा आपल्यावर कशा प्रकारे प्रभाव पडू शकतो?
६ चुकीचा निर्णय घेण्याची भीती, अयशस्वी होण्याची भीती, किंवा इतरांच्या नजरेत मूर्ख ठरण्याची भीती यांमुळे आपण सुन्न होऊ शकतो. या चिंता समजण्याजोग्या आहेत. ज्यामुळे आपल्याला त्रास होईल आणि कदाचित अपमानही होईल असा चुकीचा निर्णय कोणीही घेऊ इच्छित नाही. तरीसुद्धा, देवाबद्दल व त्याच्या वचनाबद्दल आपल्याला असलेल्या प्रेमामुळे आपल्याला आपली भीती कमी करणे शक्य होईल. आपण कोणत्या मार्गांनी असे करू शकतो? कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या आधी देवाबद्दलचे प्रेम आपल्याला नेहमी देवाच्या वचनातील व बायबलवर आधारित प्रकाशनांतील सल्ल्यावर विचार करण्याची प्रेरणा देईल. अशा प्रकारे आपल्या हातून होणाऱ्या चुका आपण कमी करू शकतो. असे का म्हणता येईल? कारण, बायबल “भोळ्यांस चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून” देऊ शकते.—नीति. १:४.
७. दाविदाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?
७ आपण नेहमीच अगदी योग्य निर्णय घेऊ का? नाही. कारण, आपण सर्व जण चुका करतो. (रोम. ३:२३) उदाहरणार्थ, दावीद राजा एक बुद्धिमान व विश्वासू पुरुष होता. तरीसुद्धा, त्याने काही वेळा चुकीचे निर्णय घेतले ज्यांमुळे त्याला स्वतःला व इतरांना त्रास सहन करावा लागला. (२ शमु. १२:९-१२) पण दाविदाने आपल्या चुकांचा, देवाला पसंत असलेले निर्णय घेण्याच्या आपल्या क्षमतेवर विपरित परिणाम होऊ दिला नाही. (१ राजे १५:४, ५) दाविदाप्रमाणे आपणही निर्णायक बनू शकतो. ते कसे? गतकाळात आपल्या हातून चुका झाल्या असल्यास, यहोवा आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करेल आणि आपले पाप क्षमा करेल हे आठवणीत ठेवण्याद्वारे आपण निर्णायक बनू शकतो. जे यहोवावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञांचे पालन करतात अशांना तो सतत आधार देत राहील.—स्तो. ५१:१-४, ७-१०.
८. विवाहाविषयी पौलाने जे म्हटले त्यावरून आपण काय शिकतो?
८ निर्णय घेण्याबद्दल आपल्याला वाटत असलेली चिंता आपण कमी करू शकतो. कशा प्रकारे? ही जाणीव बाळगण्याद्वारे की काही वेळा निर्णय घेण्याचे अनेक योग्य मार्ग असतात. लग्नाच्या विषयावर प्रेषित पौलाने कशा प्रकारे तर्क केला त्याकडे लक्ष द्या. ईश्वरप्रेरणेने त्याने असे लिहिले: “आपल्या वासना काबूत ठेवण्यास आपण असमर्थ असल्यामुळे आपण विवाह करावा, असे जर कोणाला वाटत असेल, तर हरकत नाही, ते पाप नाही. त्याने विवाह करावा. पण एखाद्या माणसाने विवाह न करण्याचा दृढनिश्चय केला असेल, आणि आपल्याला विवाह करण्याची गरज नाही असा निर्णय घेऊन तो विवाह करत नसेल, तर त्याने घेतलेला निर्णय शहाणपणाचा आहे.” (१ करिंथ. ७:३६-३८, सुबोध भाषांतर) पौलाने सल्ला दिला की अविवाहित राहणे सगळ्यात चांगले, पण अविवाहित राहणे हाच एकमेव योग्य पर्याय नव्हता.
९. आपल्या निर्णयांकडे इतर जण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात याची आपल्याला काळजी वाटली पाहिजे का? स्पष्ट करा.
९ आपण घेतलेल्या निर्णयांकडे इतर जण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात याची आपल्याला काळजी वाटली पाहिजे का? काही प्रमाणात. जे अन्न मूर्तींना अर्पण केलेले आहे असे वाटते ते खाण्याच्या विषयावर पौलाने काय म्हटले त्याकडे लक्ष द्या. याबद्दल एखाद्याने घेतलेला निर्णय कदाचित चुकीचा नसेल हे त्याने मान्य केले; पण दुर्बळ विवेक असलेल्या व्यक्तीकरता ते नुकसानदायक ठरू शकते. मग, पौलाने कोणता निर्धार केला? त्याने असे लिहिले: “अन्नामुळे माझ्या बंधूला अडखळण होत असेल तर मी आपल्या बंधूला अडखळवू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही.” (१ करिंथ. ८:४-१३) आपल्या निर्णयांचा इतरांच्या विवेकावर कसा प्रभाव पडेल या गोष्टीकडे आपणही लक्ष देणे गरजेचे आहे. अर्थात, यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर आपल्या निवडींचा कसा प्रभाव पडेल ही आपली मुख्य चिंता असली पाहिजे. (रोमकर १४:१-४ वाचा.) तर मग, ज्यांमुळे देवाचा सन्मान होईल असे निर्णय घेण्यास कोणती बायबल तत्त्वे आपल्याला मदत करतील?
चांगले निर्णय घेण्याचे सहा मार्ग
१०, ११. (क) कुटुंबात गर्विष्ठपणे वागण्याचे आपण कसे टाळू शकतो? (ख) मंडळीविषयी निर्णय घेताना वडिलांनी काय लक्षात ठेवले पाहिजे?
१० गर्विष्ठपणा टाळा. एखादा मार्ग पत्करण्याआधी आपण स्वतःला असे विचारण्याची गरज आहे, ‘हा निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे का?’ शलमोन राजाने असे लिहिले: “गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.”—नीति. ११:२.
११ आईवडील कदाचित आपल्या मुलांना काही निर्णय घेण्याची संधी देतील, पण मुलांनी असा विचार करू नये की त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. (कलस्सै. ३:२०) पत्नींना व मातांना कुटुंबात काही प्रमाणात निर्णय घेण्याचा अधिकार आहे, पण त्यांनी आपल्या पतीच्या मस्तकपदाचा मान राखला पाहिजे. (नीति. १:८; ३१:१०-१८; इफिस. ५:२३) त्याचप्रमाणे, पतींनीदेखील ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांचा अधिकार मर्यादित आहे आणि ते ख्रिस्ताच्या अधीन आहेत. (१ करिंथ. ११:३) ख्रिस्ती वडील, मंडळीविषयी निर्णय घेतात. पण, हे निर्णय घेताना आपण ‘शास्त्रलेखापलीकडे जात नाही’ याची ते खातरी करतात. (१ करिंथ. ४:६) ते विश्वासू दासाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचेदेखील तंतोतंत पालन करतात. (मत्त. २४:४५-४७) आपल्याला निर्णय घेण्याचा अधिकार दिला जातो, तेव्हा आपण आपल्या मर्यादांचे भान ठेवून निर्णय घेतल्यास, आपण स्वतःवर व इतरांवर त्रास ओढवणार नाही.
१२. (क) आपण संशोधन का केले पाहिजे? (ख) एक व्यक्ती कशा प्रकारे असे संशोधन करू शकते ते स्पष्ट करा.
१२ संशोधन करा. शलमोनाने असे लिहिले: “उद्योग्याचे विचार समृद्धि करणारे असतात. जो कोणी उतावळी करितो तो दारिद्र्याकडे धाव घेतो.” (नीति. २१:५) उदाहरणार्थ, तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात का? तर, केवळ भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. त्या व्यवसायाशी निगडित सर्व माहिती गोळा करा, ज्यांना अशा गोष्टींची माहिती आहे त्यांचा सल्ला घ्या, आणि त्या विषयावर बायबलमधील कोणती तत्त्वे लागू होतात याचा विचार करा. (नीति. २०:१८) सुव्यवस्थिपणे संशोधन करण्यासाठी दोन याद्या तयार करा. एका यादीत तपशीलवारपणे फायद्यांबद्दल लिहा आणि दुसऱ्या यादीत जबाबदाऱ्यांबद्दल व संभाव्य नुकसानाबद्दल लिहा. निर्णय घेण्याआधी “खर्चाचा अंदाज करून” घ्या. (लूक १४:२८) तुमच्या निर्णयाचा तुमच्या आर्थिक स्थितीवरच नव्हे, तर तुमच्या आध्यात्मिक स्थितीवरही कोणता प्रभाव पडू शकतो याचा विचार करा. हे मान्य आहे की संशोधन करण्यासाठी तुम्हाला वेळ व शक्ती खर्च करावी लागेल. पण असे करण्याद्वारे, तुम्ही उतावीळपणे असे निर्णय घेण्याचे टाळू शकाल, ज्यांमुळे तुम्हाला पुढे अनावश्यक समस्यांना व चिंतांना तोंड द्यावे लागू शकते.
१३. (क) याकोब १:५ या वचनात कोणते आश्वासन देण्यात आले आहे? (ख) बुद्धीसाठी प्रार्थना करणे कशा प्रकारे साहाय्यक ठरू शकते?
१३ बुद्धीसाठी प्रार्थना करा. आपण निर्णय घेण्यासाठी देवाला मदत मागितली, तरच आपल्या निर्णयांमुळे देवाचा सन्मान होईल. शिष्य याकोबाने असे लिहिले: “जर तुम्हांपैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो.” (याको. १:५) निर्णय घेण्यासाठी आपल्याला देवाच्या बुद्धीची गरज आहे हे मान्य करण्यास आपल्याला लाज वाटू नये. (नीति. ३:५, ६) कारण, आपण पूर्णपणे आपल्या स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून असलो, तर अगदी सहजपणे आपली दिशाभूल होऊ शकते. आपण जेव्हा बुद्धीसाठी प्रार्थना करतो आणि देवाच्या वचनातील तत्त्वांचा शोध करतो, तेव्हा एक विशिष्ट मार्ग पत्करण्यामागे आपला हेतू काय आहे हे समजण्यास आपण पवित्र आत्म्याला आपली मदत करू देत असतो.—इब्री ४:१२; याकोब १:२२-२५ वाचा.
१४. आपण दिरंगाई करण्याचे का टाळले पाहिजे?
१४ निर्णय घ्या. संशोधन करण्याआधी आणि बुद्धीसाठी प्रार्थना करण्याआधी तडकाफडकी निर्णय घेऊ नका. बुद्धिमान मनुष्य “नीट पाहून पाऊल टाकितो,” अर्थात निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ काढतो. (नीति. १४:१५) दुसरीकडे पाहता, निर्णय घेण्यात दिरंगाई करू नका. दिरंगाई करणारी व्यक्ती निर्णय न घेण्याची विचित्र कारणे सांगू शकते. (नीति. २२:१३) पण तरीही ती एक निर्णय घेतेच, तो म्हणजे इतरांना आपल्या जीवनावर नियंत्रण करू देण्याचा निर्णय.
१५, १६. एखादा निर्णय अंमलात आणण्यात काय समाविष्ट आहे?
१५ घेतलेला निर्णय अंमलात आणा. आपण घेतलेला चांगला निर्णय अंमलात आणण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न केला नाही, तर आपण निर्णय घेण्यासाठी जी मेहनत घेतली होती ती सर्व वाया जाईल. शलमोनाने लिहिले: “जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर.” (उप. ९:१०) आपण घेतलेला निर्णय अंमलात आणण्यासाठी आपण आपल्या वेळेची व शक्तीची योग्य वाटणी केली पाहिजे. उदाहरणार्थ, मंडळीतील एक प्रचारक कदाचित पायनियर सेवा करण्याचे ठरवेल. तो त्यात यशस्वी होईल का? त्याने नोकरी व करमणूक या गोष्टींमध्ये वाजवीपेक्षा जास्त वेळ व शक्ती खर्च केली नाही व या गोष्टींना आपल्या सेवाकार्याच्या आड येऊ दिले नाही, तर तो नक्कीच यशस्वी होईल.
१६ सर्वात चांगले निर्णय अंमलात आणणे नेहमीच सोपे नसते. का? कारण, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहा. ५:१९) आपल्याला “सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर” संघर्ष करावा लागतो. (इफिस. ६:१२) प्रेषित पौल व शिष्य यहूदा या दोघांनीही सूचित केले, की जे देवाचा सन्मान करण्याचे ठरवतात त्यांना फार झटावे लागेल.—१ तीम. ६:१२; यहू. ३.
१७. आपण जे काही निर्णय घेतो त्यांसंबंधी यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?
१७ घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करा आणि गरज असल्यास फेरबदल करा. घेतलेले सर्वच निर्णय आपण योजना केल्याप्रमाणे पूर्ण होतील असे नाही. आपल्या सर्वांनाच “समय व प्रसंग” घडतात. (उप. ९:११, पं.र.भा.) तरीसुद्धा, काही निर्णय अंमलात आणताना आपल्याला समस्यांचा सामना करावा लागला तरी आपण चिकाटी दाखवावी अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. उदाहरणार्थ, यहोवाला आपले जीवन समर्पित करण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल किंवा विवाहाच्या शपथा घेण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल आपण तडजोड करू शकत नाही. असे निर्णय आपण पूर्ण करावेत अशी देव आपल्याकडून अपेक्षा करतो. (स्तोत्र १५:१, २, ४ वाचा.) पण, बहुतेक निर्णय इतके गंभीर नसतात. एक बुद्धिमान व्यक्ती वेळोवेळी आपल्या निर्णयांचा पुनर्विचार करेल. आपल्या निर्णयात थोडाफार फेरबदल करण्याची किंवा तो निर्णय पूर्णपणे बदलण्याची गरज असल्यास ती आपल्या गर्वाला किंवा अडेल वृत्तीला आड येऊ देणार नाही. (नीति. १६:१८) आपल्या जीवनक्रमातून देवाचा सन्मान होत आहे याची खातरी करणे ही तिची मुख्य चिंता असते.
ज्यांमुळे देवाचा सन्मान होतो असे निर्णय घेण्यास इतरांना शिकवा
१८. आईवडील आपल्या मुलांना चांगले निर्णय घेण्यास कसे शिकवू शकतात?
१८ आईवडील आपल्या मुलांना, देवाचा सन्मान होईल असे निर्णय घेण्यास शिकवण्यासाठी खूप काही करू शकतात. एक उत्तम उदाहरण एक उत्तम शिक्षक असते. (लूक ६:४०) उचित असते तेव्हा, एक विशिष्ट निर्णय घेण्यासाठी आईवडिलांनी स्वतः कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या होत्या हे ते आपल्या मुलांना सांगू शकतात. ते आपल्या मुलांना काही निर्णय घेण्याची संधीही देऊ शकतात आणि मुलांनी घेतलेला निर्णय चांगला असल्यास ते त्यांची प्रशंसा करू शकतात. पण, एक मूल चुकीचा निर्णय घेते तेव्हा काय? अशा वेळी त्या निर्णयाच्या दुष्परिणामांपासून आपल्या मुलाचे रक्षण करण्याकडे पालकांचा कल असू शकतो, पण असे केल्याने नेहमीच मुलाचे भले होणार नाही. उदाहरणार्थ, आईवडील आपल्या मुलाला ड्रायव्हिंग लायसन्स घेण्याची परवानगी देऊ शकतात. पण समजा, मुलाने रहदारीचा नियम तोडला आणि त्यामुळे त्याला दंड बसला तर काय? कदाचित आईवडील हा दंड भरतील. पण, दंड भरण्यासाठी मुलाला स्वतःला मेहनत करावी लागली, तर तो जे काही करतो ते जबाबदारीच्या भावनेने करण्यास शिकण्याची शक्यता अधिक आहे.—रोम. १३:४.
१९. आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांना काय शिकवले पाहिजे, आणि आपण हे कसे करू शकतो?
१९ येशूने आपल्या अनुयायांना इतरांना शिकवण्यास सांगितले. (मत्त. २८:२०) आपण बायबल विद्यार्थ्यांना एक अतिशय महत्त्वाचा धडा शिकवू शकतो, म्हणजे आपण त्यांना चांगले निर्णय घेण्यास शिकवू शकतो. असे परिणामकारक रीत्या करण्यासाठी, त्यांनी काय केले पाहिजे हे त्यांना सांगण्याची आपल्याला तीव्र इच्छा होत असेल, पण आपण त्या इच्छेचा प्रतिकार केला पाहिजे. त्या ऐवजी, त्यांना बायबलच्या तत्त्वांवर तर्क करण्यास शिकवणे केव्हाही चांगले. असे केल्याने, कोणता निर्णय घ्यायचा हे ते स्वतः ठरवू शकतील. कारण, “आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी [देवाला] हिशेब देईल.” (रोम. १४:१२) तेव्हा, आपल्या सर्वांजवळ देवाचा सन्मान होईल असे निर्णय घेण्याचे सबळ कारण आहे.
[तळटीप]
a या विषयावरील चर्चेसाठी, नोव्हेंबर २००६ ची आमची राज्य सेवा, पृष्ठे ३-६ वरील, “रक्ताचे अंश आणि माझ्याच रक्ताचा वापर करणाऱ्या वैद्यकीय प्रक्रियांविषयी माझा निर्णय काय असेल?” असे शीर्षक असलेली पुरवणी पाहा.
तुमचे उत्तर काय असेल?
• निर्णय कसे घ्यायचे हे शिकण्याची गरज का आहे?
• भीतीचा आपल्यावर कसा प्रभाव पडू शकतो, आणि आपण भीतीवर कशा प्रकारे मात करू शकतो?
• आपल्या निर्णयांमुळे देवाचा सन्मान होतो याची खातरी करण्यासाठी कोणते सहा मार्ग आपण अवलंबू शकतो?
[१६ पानांवरील चौकट/चित्र]
चांगले निर्णय घेण्याचे मार्ग
१ गर्विष्ठपणा टाळा
२ संशोधन करा
३ बुद्धीसाठी प्रार्थना करा
४ निर्णय घ्या
५ निर्णय अंमलात आणा
६ पुनर्विचार व फेरबदल करा
[१५ पानांवरील चित्र]
एक अनिर्णायक व्यक्ती, खवळलेल्या समुद्रातील सुकाणूरहित बोटीत बसलेल्या मनुष्याप्रमाणे आहे