पृथ्वी ग्रह शेवटच्या घटका मोजत आहे का?
पुढील विधान पूर्ण करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल?
नजीकच्या भविष्यात पृथ्वीवरील परिस्थिती
(क) सुधारेल?
(ख) आहे तशीच राहील?
(ग) आणखी बिघडेल?
भविष्याबद्दल तुम्ही नेहमी आशावादी दृष्टिकोनाने विचार करण्याचा प्रयत्न करता का? असा दृष्टिकोन बाळगणे निश्चितच हिताचे आहे. काही अभ्यासांतून असे दिसून आले आहे की आशावादी प्रवृत्तीचे लोक मानसिक तसेच शारीरिक दृष्ट्याही सहसा जास्त कार्यक्षम असतात. जीवनाविषयी निराशावादी असलेल्यांच्या तुलनेत जे आशावादी आहेत अशा पुरुषांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण कमी असते असेही एका दीर्घकालीन अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. या अभ्यासांचे निष्कर्ष, बायबलमध्ये कित्येक शतकांपूर्वी करण्यात आलेल्या या विधानाशी सुसंगत आहेत: “आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय; खिन्न हृदय हाडे शुष्क करिते.”—नीतिसूत्रे १७:२२.
पण, पृथ्वी ग्रहाच्या भविष्याबद्दल शास्त्रज्ञ सध्या जी भाकिते करत आहेत त्यांकडे पाहता, बहुतेक जणांना आनंदी व आशावादी दृष्टिकोन बाळगणे कठीण वाटू लागले आहे. सबंध जगाचे लक्ष वेधत असलेल्या अशाच काही अनिष्टसूचक भाकितांचा येथे विचार करू या.
संकटात सापडलेला ग्रह
स्टॉकहोम एन्वायर्नमेंट इंस्टिट्यूट या मान्यताप्राप्त संस्थेने २००२ साली असा इशारा दिला की आर्थिक विकासाच्या नावावर, मानवाकडून पर्यावरणाला होत असलेले नुकसान कमी करण्याचा प्रयत्न न केल्यामुळे, “येणाऱ्या काळात अशा घटना घडतील की ज्यांमुळे पृथ्वी ग्रहाच्या हवामानावर व परिसंस्थांवर अतिशय टोकाचे दुष्परिणाम होतील.” जगव्याप्त दारिद्र्य, समाजातील असमानता, आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश यामुळे येणाऱ्या दिवसांत मानवसमाज, “एका संकटातून सावरत नाही तोच दुसऱ्या संकटात सापडेल; या संकटांमुळे पर्यावरण, समाजजीवन व सुरक्षितता धोक्यात येईल” असेही या वृत्तात पुढे म्हणण्यात आले.
संयुक्त राष्ट्रसंघाने २००५ साली, मिलेनियम ईकोसिस्टम असेसमेंट या चार वर्षांपर्यंत चाललेल्या एका जगव्याप्त अभ्यासाचे निष्कर्ष प्रसिद्ध केले. ९५ देशांच्या १,३६० पेक्षा जास्त तज्ज्ञांचा समावेश असलेल्या या व्यापक अभ्यासाच्या आधारावर हा गंभीर इशारा देण्यात आला: “मनुष्य आज निसर्गसंपत्तीचे इतके शोषण करत आहे की पृथ्वी ग्रहाच्या परिसंस्था भावी पिढ्यांचे पालनपोषण करू शकतील हे आता खात्रीने म्हणता येत नाही.” सदर वृत्तानुसार, संकट टाळण्यासाठी “मानवसमाजातील धोरणे, संस्था व कार्यपद्धती यांत आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. पण अद्याप हे बदल घडवून आणण्यास सुरुवात करण्यात आलेली नाही.”
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी वसाहत प्रकल्पाच्या कार्यकारी संचालिका आना टीबायूका यांनी केलेल्या विधानाशी आज बहुतेक शास्त्रज्ञ सहमत आहेत. त्या म्हणतात: “काहीही बिघडलेले नाही अशा आविर्भावात जर आपण चालत राहिलो तर भविष्यात अतिशय भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागेल.”
आशावादी असण्यास आधार
पृथ्वीला हादरवून टाकणाऱ्या अतिशय विलक्षण घटना नजीकच्या भविष्यात घडणार आहेत, असे या नियतकालिकाचे प्रकाशन करणारे यहोवाचे साक्षीदार देखील मानतात. पण, त्यांना खात्री आहे की या घटनांमुळे मानवाचे भविष्य धोक्यात येण्याऐवजी, पृथ्वीवर पूर्वी कधीही पाहण्यात आली नाही अशी आनंददायक परिस्थिती स्थापन होईल. हा आशावाद बाळगण्यास त्यांच्याजवळ काही आधार आहे का? हो, आहे. देवाचे वचन, बायबल यात दिलेल्या अभिवचनांवर भरवसा असल्यामुळे ते आशावादी आहेत. उदाहरणार्थ, या अभिवचनांपैकी एक असे आहे: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधिशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही; पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:१०, ११.
हे केवळ स्वप्न आहे का? या प्रश्नाचे उत्तर पाहण्याआधी हे विचारात घ्या: आज पृथ्वीला व मानवसमाजाला ज्या मोठमोठ्या समस्यांनी ग्रासले आहे त्यांपैकी बहुतेक समस्यांबद्दल बायबलमध्ये हजारो वर्षांपूर्वीच भाकीत करण्यात आले होते. पुढील लेखात उल्लेखलेली शास्त्रवचने वाचून त्यांत जे म्हटले आहे व आज जगात जे घडताना तुम्ही पाहात आहात त्याची तुलना करा. असे केल्यामुळे, बायबलमधील भविष्यवाण्या किती विश्वासार्ह आहेत याची तुम्हाला जाणीव होईल. (w०८ ८/१)